कापूस बाजारभाव : कापसाचा भाव पुढच्या काही दिवसांत वाढणार का?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांत कापसाचे दर जवळपास 2 हजार रुपयांनी घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी 3 ते 4 महिन्यांपासून घरात साठवलेला कापूस विकून टाकला आहे. तर अद्याप काही शेतकरी कापसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेनं कापूस घरातच ठेवून आहेत.

पण, कापसाचे दर का आणि किती रुपयांनी पडलेत आणि पुढच्या काही दिवसांत कापसाचे दर वाढतील का? या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

कापसाच्या दरात जवळपास 2 हजारांची तुट

Agmarknet ही भारत सरकारची अधिकृत वेबसाईट आहे, जिथं तुम्हाला देशभरातील बाजारपेठांधील वेगवेगळ्या पिकांचे बाजारभाव पाहता येतात.

या वेबसाईटवरील 24 मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कापूस पिकाचा विचार केल्यास गेल्यावर्षी 16 ते 23 मार्च या आठवड्यात कापसाला प्रती क्विंटल 9 हजार 355 रुपये इतका दर मिळाला होता.

यंदा म्हणजे 2023 च्या 16 ते 23 मार्च या आठवड्यात कापसाला प्रती क्विंटल 7 हजार 466 इतका दर मिळत आहे.

याचा अर्थ गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी कापसाला 1,889 रुपये कमी दर मिळत आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

गेल्यावर्षी कापसाला काही ठिकाणी 10 हजारांहून अधिक दर मिळाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मग कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून कापूस घरातच साठवून ठेवला होता.

पुढच्या काळात कापसाला गतवर्षीसारखा दर मिळेल, अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती.

पण, आता 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कापसाच्या दरामधील घसरण कायम आहे.

गेल्या 5 महिन्यांमध्ये कापलासा प्रती क्विंटल मिळालेला सरासरी दर -

  • नोव्हेंबर 2022– 8,461 रुपये प्रती क्विंटल
  • डिसेंबर 2022- 8,017 रुपये प्रती क्विंटल
  • जानेवारी 2023- 8,005 रुपये प्रती क्विंटल
  • फेब्रुवारी 2023 - 7,815 रुपये प्रती क्विंटल
  • मार्च 2023 - 7,580 रुपये प्रती क्विंटल

घरात साठवलेल्या कापसात आता पिसा (कीटक) होत असल्यानं त्याचाही अनेक शेतकऱ्यांना त्रास होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या भिवधानोरा गावातील अनेक शेतकऱ्यांनी याविषयीची चिंता व्यक्त केली.

कापसामुळे अंगाला गुथा येत असल्याचं आणि दवाखान्यासाठी जवळपास 2 हजार रुपये लागल्याचं इथले शेतकरी सांगतात.

अकोला जिल्ह्यातील प्रशांत पांडुरंग पोहरे यांनी भाववाढीच्या अपेक्षेनं एवढे दिवस कापूस साठवून ठेवला होता.

पण, आठवडाभरापूर्वी त्यांनी कापूस विकून टाकला आहे.

कापसातील किटकांमुळे अंगाला खाज सुटली होती. यामुळे लेकराबाळांना त्रास व्हायला लागला होता, त्यामुळे कापूस विकून टाकल्याचं अकोल्याचे शेतकरी सांगत होते.

कापसाचे दर का पडले?

या प्रश्नाचं उत्तर देताना महाराष्ट्र राज्य कॉटन फेडरेशनचे सेवानिवृत्त महाप्रबंधक गोविंद वैराळे सांगतात, “सरकीचे रेट कमी झालेले आहेत. एक्स्पोर्टची डिमांड कमी आहे. देशीतल वापर कमी आहे. त्यामुळे कापसाची मागणी कमी झालीये.

“दुसरं कारण म्हणजे कापसाची बाजारातील आवक अचानक वाढली आहे. यामुळे भाव कमी झाला आहे. प्रती क्विंटल 1 ते दीड हजाराच्या दरम्यान नैसर्गिक मंदी आहे. कापसाला साधारणपणे 8 हजार रुपये प्रती क्विंटल भावाचा बेस असायला हवा. पण, बाजारातील आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले आहेत.”

विदर्भातील कापूस अभ्यासक स्वप्निल कोकाटे यांच्या मते, “जागतिक पातळीवर काय परिस्थिती आहे, त्यानुसार कापसाचे दर ठरत असतात. कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर कमी आहेत. सुताला पाहिजे तेवढा उठाव नाहीये.

“याशिवाय सरकीला मागणी कमी आहे. ढेपीला कमी मागणी आहे. ढेपीला पर्याय म्हणून मूरघासाचं उत्पादन पंजाब, हरियाणात मोठ्या प्रमाणात घेतलं गेलंय. यामुळेही कापसाचे दर कमी झाले आहेत.”

कापसाचे बाजारभाव वाढतील का?

कापसाचे दर पुढच्या काही दिवसांत वाढतील का, याविषयी अभ्यासकांमध्ये दुमत असल्याचं दिसतं.

गोविंद वैराळे सांगतात, “एप्रिल महिन्यात कापसाचे भाव वाढतील, असं मला वाटतंय. कारण, यावेळी बाजारपेठेतील आवक कमी होईल, तिचा दबाव कमी होईल आणि देशातील कापसाची मागणी वाढेल.”

तर स्वप्निल कोकाटे सांगतात, “भविष्यात कापसाचे दर वाढण्याची शक्यता नाहीये. कारण सुताला मागणी कमी आहे. शेतकऱ्यांनी सध्या जो भाव मिळतोय, त्यात कापूस विकला तरी त्यांना परवडेल. कारण जसंजसं ऊन्हाळा येईल, तसंतसं कापसाचं वजन घटत जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन टप्प्यांत कापूस विकला तर त्यांना ते परवडेल.”

सध्या विदर्भात कापसाला 7 हजार 800 ते 8 हजार रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळत आहे.

ही झाली शेतमाल अभ्यासक आणि इंडस्ट्रीमधील लोकांची मतं. पण, या मतांसोबतच शेतकऱ्यानं स्थानिक बाजारपेठेतील बाजारभावातील चढ-उतार बघून शेतमालाची विक्री करणं कधीही योग्य ठरू शकतं.

कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ

गेल्या वर्षी महाराष्ट्रात कापूस पिकाखालील लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

महाराष्ट्राच्या कृषी सांख्यिकी विभागानं सप्टेंबर महिन्यात बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये 39.37 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती.

2022 मध्ये त्यात 3 लाख हेक्टरनं वाढ झाली असून कापूस लागवडीखालील एकूण क्षेत्र 42 लाख 29 हजार हेक्टर एवढं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)