नितीन गडकरींनी असं काय म्हटलं ज्याचा संबंध त्यांच्या राजकीय भवितव्याशी जोडला जातोय...

फोटो स्रोत, ANI
- Author, कीर्ति दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या वक्तव्याचा संबंध त्यांच्या राजकीय भवितव्याशी जोडला जातोय.
त्याचं झालं असं होतं की, मागील रविवारी नितीन गडकरी नागपुरातील एका कार्यक्रमात म्हणाले होते की, "सध्या मी देशात अनेक प्रयोग करतोय. यात जैविक इंधन आणि वॉटरशेड संरक्षण आदी गोष्टी आहेत. लोकांना हे प्रयोग आवडले तर ठीक....नाहीतर त्यांनी मला मत दिलं नाही तरी चालेल. पॉप्युलर पॉलिटिक्ससाठी मी कोणाला जास्त मस्का मारायला जाणार नाही."
गडकरी यांनी असं बोलायची ही काही पहिलीच वेळ नाहीये.
यापूर्वी जुलै 2022 मध्येही त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात त्याच्या चर्चा रंगल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून गडकरी राजकारणाला रामराम ठोकणार असल्याचे कयास लावण्यात आले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्यावेळी ते म्हटले होते की, "आपल्याला राजकारणाचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. हे राजकारण समाजाच्या भल्यासाठी आहे का सरकारमध्ये राहण्यासाठी? महात्मा गांधींच्या काळापासून राजकारण हा सामाजिक चळवळीचा एक भाग आहे.
पण आज आपण जे पाहतोय त्यात राजकारण फक्त सत्तेसाठी केलं जातं. मला कधी कधी असं वाटतं की राजकारण सोडून द्यावं. राजकारणाव्यतिरिक्त ही बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत."
मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये नितीन गडकरी म्हणाले होते की, सध्याचं सरकार निर्णय घ्यायला वेळ लावतंय.
राजकीय जाणकारांच्या मते, गडकरींनी अलीकडे केलेल्या वक्तव्याचा वेगळा असा अर्थ काढता येणार नाही. मात्र मागच्या काही महिन्यांतील त्यांची वक्तव्यं पाहता गडकरी आणि भाजप हायकमांडमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं दिसत नाही.
'स्वतःच्या अटींवर काम करणारे एकमेव केंद्रीय मंत्री'
गडकरी जेव्हा केव्हा अशी विधानं करतात तेव्हा तेव्हा हेडलाईन्स बनतात.
कारण सध्याच्या घडीला पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या जोडगळी समोर असं वक्तव्य करणारे ते एकमेव केंद्रीय मंत्री आहेत.
महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित सांगतात की, "मोदी सरकारमध्ये असे फारच कमी मंत्री आहेत जे स्वतःचं मंत्रालय स्वतः बघतात, स्वतः निर्णय घेतात. त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयातून आदेश येत नाहीत. आणि परिवहन मंत्रालय याचंच एक उदाहरण आहे. तुम्ही 2014 पूर्वी रस्त्याची झालेली कामं बघा आणि आता बघा. पूर्वी देशात रस्ते बांधणीचा वेग दररोज 2 किमी इतका असायचा, आज तो 28 किमीपेक्षा जास्त झाला आहे."
गडकरी परिवहन मंत्री झाल्यापासून त्यांनी दररोज 60 किलोमीटर रस्ते बांधणीचं उद्दिष्ट ठेवलंय.
श्रीपाद अपराजित पुढे सांगतात की, "त्यांची वक्तव्यं तुम्ही या प्रकारे समजून घेतली पाहिजेत. त्यांना असं वाटतं की, लोकांनी त्यांचं काम बघावं आणि त्यांना मत द्यावं. आणि भले ही त्यांनी राजकारण सोडण्याची गोष्ट सांगितली असेल, पण मला वाटत नाही की ते लगेचच राजकारण सोडतील. कारण त्यांच्या कामात आणखीन वेग आलाय. असा कोणता नेता असेल जो चांगलं काम करतोय आणि तरीही राजकारण सोडेल."
श्रीपाद सांगतात की, केंद्रात मंत्री होण्यापूर्वी ते महाराष्ट्रात मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांनी मुंबईत 50 हून अधिक उड्डाणपूल बांधले. कामामुळे आणि मेहनती स्वभावामुळे त्यांची ओळख आहे. त्यांनी तळागाळात जे काम केलंय त्यामुळे पक्षात आणि परिसरात त्यांची मोठी लोकप्रियता आहे.
संघाचा पाठिंबा आणि नागपूरातून दिल्लीत एंट्री
हा किस्सा आहे 2009 सालचा. त्यावेळी नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 52 व्या वर्षी अध्यक्ष बनलेले गडकरी पक्षाच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष होते.
त्यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की, "विद्यार्थी दशेत असताना मी राजकारणाला सुरुवात केली. एक कार्यकर्ता म्हणून कधीकाळी मी भिंतींवर पोस्टर चिकटवले होते आणि आज मला पक्षाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी देण्यात आली आहे."
या पत्रकार परिषदेवेळी गडकरींसोबत व्यासपीठावर अरुण जेटली, सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी देखील उपस्थित होते.
पुढे 2010 मध्ये जेव्हा इंदूरमध्ये भाजपच्या नॅशनल कौन्सिलची बैठक पार पडली तेव्हा 40 हजारांहून जास्त कार्यकर्ते इंदूरमध्ये जमा झाले होते. त्यावेळी पक्षात त्यांची लोकप्रियता शिखरावर होती.

फोटो स्रोत, Twitter
बैठकीच्या शेवटच्या दिवशी गडकरींनी मन्ना डे यांचं एक गाणं गायलं होतं...'जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये हंसाए, कभी ये रुलाए'
गडकरींच्या राजकीय प्रवासाचं वर्णन करताना या गाण्याचे बोल तंतोतंत लागू पडतात.
एक काळ असा होता की, गडकरींची अध्यक्ष म्हणून फेरनिवड व्हावी यासाठी भाजपने आपली घटना बदलली होती. आज तेच गडकरी कुठेच दिसत नाहीत. ना ते भाजपच्या संसदीय मंडळात सदस्य आहेत आणि ना केंद्रीय निवडणूक समितीत.
नागपूरस्थित ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे संघ आणि भाजपचे अभ्यासक आहेत.
ते सांगतात, "2009 मध्ये संघाच्या सूचनेवरून नितीन गडकरींना भाजपचं अध्यक्ष बनवण्यात आलं. आजच्या तुलनेत बघता त्यावेळी संघाचं पक्षावर वर्चस्व होतं. पण संघाने अशी भूमिका घेऊन बऱ्याच जणांची नाराजी ओढवल्याचं मला वाटतं. कारण त्यावेळी भाजपमध्ये सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी, अडवाणी असे अनेक मोठे नेते होते.
नागपुरातून एका तरुण आणि ज्युनियर मुलाला पक्षाचं अध्यक्ष केल्यामुळे हे लोक नाराज होते. त्यावेळी सुषमा स्वराज, अरुण जेटली यांची राष्ट्रीय राजकारणात अधिक विश्वासार्हता होती."
मोदी आणि गडकरी यांच्यातील वाद
गडकरी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा पूर्ती समूहाच्या घोटाळ्याचं प्रकरण चर्चेत होतं. आणि याचे सर्वेसर्वा होते गडकरी.
या प्रकरणात गडकरींविरोधातील कोणत्याच गोष्टी समोर आल्या नाहीत. पण ते पुन्हा अध्यक्ष होऊ शकले नाहीत.
बऱ्याच काळापासून भाजपवर नजर ठेऊन असणाऱ्या पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी भाजपमधील एक गट पूर्ती घोटाळ्याच्या बातम्या लिक करायचा. त्या लोकांना गडकरी नको होते.
नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय मानले जातात. नरेंद्र मोदींचं सरकार असताना देखील गडकरीच संघाचे लाडके आहेत, असं मानलं जातं.
श्रीपाद अपराजित सांगतात, "अगदी लहान असल्यापासून गडकरी संघाच्या शाखेत जायचे. ते नागपूर महाल इथं राहतात. संघाची पहिली शाखा देखील याच भागात आहे. त्यामुळे ते संघाच्या जवळ असणं स्वाभाविक आहे."
असं म्हटलं जातं की, 2013 पर्यंत पक्षाचं अध्यक्ष पद भूषवल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदासाठी दावेदार व्हावं, अशी संघाची इच्छा होती.

फोटो स्रोत, ANI
नितीन गडकरी यांचं सरकारमधील स्थान
विवेक देशपांडे सांगतात, "त्यावेळी संघातील एका मोठ्या विचारवंताने मला बोलता बोलता असं सांगितलं होतं की, जर नितीन गडकरी पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले तर तेच पुढचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. संघातील अनेकांना गडकरी हवे होते पण पक्षात मात्र मोदींचं नाव पुढे येत होतं. त्यामुळे संघाला देखील काहीच करता आलं नाही, शिवाय गडकरींनाही पुन्हा नागपुरात यावं लागलं. या स्पर्धेत संघाला माघार घ्यावी लागली, हे उघड आहे."
देशपांडे पुढे सांगतात की, "2014 च्या सुरुवातीला संघाच्या एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की, मोदी हे 'दीर्घद्वेषी' व्यक्ती आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांची नाराजी फार काळ टिकून असते. त्यामुळे त्यांना जर एखादा नेता किंवा कार्यकर्ता आवडत नसेल तर खूप काळासाठी ते त्या व्यक्तीवर नाराज राहू शकतात."
2014 मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात गडकरींना ‘हेवीवेट’ मंत्री मानलं जात होतं. त्यांच्याकडे परिवहन मंत्रालयाबरोबरच जहाजबांधणी मंत्रालयही होतं.
2017 मध्ये उमा भारती यांच्याकडे असलेलं जलसंपदा मंत्रालय गडकरींना देण्यात आलं.
2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला.
पण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांचा हेवीवेट पोर्टफोलिओ कमी झाला. या टर्ममध्ये त्यांना परिवहन मंत्रालय तर मिळालं, पण जलसंपदा मंत्रालय काही मिळालं नाही.
त्याऐवजी त्यांना एमएसएमई म्हणजेच लघु-मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आलं. पण 2021 मध्ये त्यांच्याकडून हे मंत्रालयही काढून घेण्यात आलं.
गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तानाट्य रंगलं होतं. एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. तेव्हा या सगळ्या पिक्चरमध्ये भाजपच्या बाजूने देवेंद्र फडणवीसच दिसले होते. भाजप मधील सर्वात मोठे नेते असा नावलौकिक असून देखील गडकरी या सगळ्यापासून लांब होते.

फोटो स्रोत, ANI
यावर विवेक देशपांडे सांगतात, "गडकरींना पक्षीय राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण त्यांचं काम बघता, मोदी सरकारमध्ये परिवहन मंत्रालय सध्या टॉपला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हे मंत्रालय काढून घेतलं जाणार नाही. कारण असं करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतं कारण नाहीये. एखाद्या चांगल्या मंत्र्यांकडून मंत्रालय काढून घेणं योग्य ठरणार नाही. 2024 पूर्वी ते असं काही करतील असं मला वाटत नाही."
अनेक जाणकारांना असं वाटतं की, मोदी-शहा यांच्या भाजपमध्ये संघाचं भक्कम अस्तित्व असलेल्या गडकरींना पूर्णपणे साईडलाईन करता येणार नाही. यावरून संघ नाराज होऊ शकतो.
जेव्हा सोनिया गांधींनी गडकरींचं कौतुक केलं होतं
ही गोष्ट आहे 2018 सालची. सोनिया गांधींनी गडकरींचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं.
परिवहन मंत्र्यांनी रायबरेलीत जे सकारात्मक पाऊल उचललं होतं त्याचं कौतुक सोनिया गांधींनी केलं होतं. आणि विकास कामांना गती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले होते.
श्रीपाद अपराजित म्हणतात की नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील असे एकमेव मंत्री आहेत, ज्यांना विरोधी पक्षनेत्याने कौतुक करणारं पत्र लिहिलंय.
आणि गडकरी हे भाजपचे एकमेव नेते आहेत, ज्यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत.
देशपांडे सांगतात की, "भाजपला इतर पक्षांना सोबत घेणाऱ्या नेत्याची गरज असेल तेव्हा गडकरी पुन्हा पिक्चर मध्ये येतील. संघ खूप पुढचा विचार करतो आणि त्यांना माहीत आहे की, एक वेळ अशी येईल की, जेव्हा पक्षाला बहुमत मिळणार नाही तेव्हा गडकरींसारख्या नेत्यावर अवलंबून राहावं लागेल. गडकरी हिंदू-मुस्लिम राजकारण करत नाहीत आणि कठीण काळात ते भाजपला उपयोगी पडतील."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








