चांद बीबी : अकबराच्या सैन्याला वेठीस धरणारी, मुघल जिला 'सुलतान' म्हणत होते, अशी अहमदनगरची राणी

फोटो स्रोत, ANIL RELIA / THEINDIANPORTRAIT
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार आणि संशोधक
1580 मध्ये विजापूरचा 5 वा शासक अली आदिल शाह मरण पावला आणि सत्तेचा सगळा कारभार त्याची पत्नी चांद बीबीने आपल्या हाती घेतला. आपण एका विधेवेपेक्षा अधिक आहोत हे तिने तिच्या कृतीतून दाखवून दिलं होतं.
दक्षिण भारतातील दख्खन प्रदेशात इ.स.पू. 1347 मध्ये बहामनी साम्राज्याची स्थापना झाली होती. पुढे 180 वर्षांनंतर हे साम्राज्य कोसळून त्याची 5 शकलं झाली. या पाच राज्यांपैकी विजापूरचा पाचवा शासक अली आदिल शाह हा होता.
अहमदनगरचा सुलतान हुसेन निजाम शाह तिसरा याची मुलगी चांद बीबी निजाम शाही ही त्याची पत्नी होती.
हुसेन शाह हयात असतानाच त्याची पत्नी कुंजा हुमायूँ राज्याच्या कामकाजात सहभागी व्हायची. पतीच्या निधनानंतर मुलगा मुर्तझा, जो तरुण होता त्याने राज्याची जबाबदारी घेतली.
अझरबैजानच्या राजघराण्यातील सदस्य कुंजा हुमायूँ ही प्रगतशील विचारांची स्त्री होती , असं इतिहासकार मनू एस. पिल्लई नमूद करतात.
कुंजाकडे राज्य चालविण्याचं कौशल्य, बुद्धिमत्ता, धैर्य आणि शासनाची समज होती असं रफिउद्दीन शिराझी आणि मोहम्मद कासिम फरिश्ता यांसारख्या इतिहासकारांनी दिलेल्या संदर्भावरून दिसून येतं.
सय्यद अहमदउल्ला कादरी लिहितात की, कुंजा अनेक लढायांमध्ये सहभागी होती. ही कुंजा हुमायूँ चांद बीबीची आई होती.
वजीर हसन यांनी त्यांच्या 'चांद बीबी सुलतान: अ डॉटर' या पुस्तकात 'चांद बीबी तिच्या आईसारखी होती' असा उल्लेख केला आहे.
चांद बीबी धनुर्विद्या, घोडेस्वारी आणि तलवारबाजी यात निपुण होती. अरबी, फारसी, तुर्की, कन्नड आणि मराठी या भाषा अस्खलितपणे बोलता येत होत्या. तिला सतार वाजवण्याची आणि चित्रकलेची विशेषत: फुलांची आवड होती.
चांद बीबीने पतीवर झालेला हल्ला परतवून लावला
चांद बीबीने अली आदिल शाहशी लग्न केलं. चांद बीबीचा भाऊ मुर्तझाने अली आदिल शाहची बहीण हुदिया सुलतानशी लग्न केलं.
या दोन विवाहांमुळे अहमदनगर आणि विजापूरमधील वैर संपुष्टात आल्याचे अली अहमद नमूद करतात. चांद बीबीने अनेक प्रसंगात पतीला साथ दिली आहे. वेळ पडल्यावर चांद बीबी रणांगणातही उतरली.
तिच्या सल्ल्याने आणि प्रयत्नांमुळे विजापूरचे अहमदनगरशी चांगले संबंध निर्माण झाले. साम्राज्य मजबूत झाले आणि बंडखोरी संपली.
एकदा चांद बीबीला गुप्त बातमी मिळाली की, तिच्या पतीला मारण्याचा कट रचला जातोय. चांद बीबीने तिच्या पतीला धीर दिला आणि रात्री त्याच्यावर पाळत ठेऊन राहिली. तेव्हाच कोणीतरी उडी मारल्याचा आवाज आला. चांद बीबी तलवार घेऊन एकटीच वरच्या खोलीत गेली.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
मुखवटे घातलेले तलवारधारी चांद बीबीकडे धावले. मग चांद बीबीही पुढे सरकली आणि तलवार संपूर्ण ताकदीनिशी मुखवटाधाऱ्यांवर चालवली.
गडबड गोंधळ ऐकून अली आदिल शाह वरच्या मजल्यावर धावला. हे दृश्य पाहून अली आदिल शाहने आपल्या शूर राणीच्या तलवारीचे चुंबन घेतलं आणि म्हणाला, "चांद बेगम, जर तू माझ्या पाठीशी असशील तर जग जरी माझं शत्रू झालं तरी मला भीती नाही."
अली आदिल शाहचा मृत्यू झाला तेव्हा चांद बीबी 28 वर्षांची होती. पण त्या वयातही तिला सरकारचे नियम आणि सर्व हत्यारांचा वापर करता येत होता, असं इतिहासकार सांगतात.
तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, चांद बीबी निपुत्रिक राहिली आणि राज्याचा कारभार तिचा जावई इब्राहिमकडे आला. त्याला इतिहासात इब्राहिम आदिल शाह दुसरा म्हणून ओळखले जाते.
अहमदनगरचं शासन
इब्राहिमचा राज्याभिषेक झाला तेव्हा तो नऊ वर्षांचा होता. राज्य हडप करण्याची योजना आखणाऱ्या अमृत कमाल खानला काढून टाकल्यानंतर, चांद बीबीने स्वतः इब्राहिमच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि राज्य कारभाराची जबाबदारी घेतली.
बहमनी साम्राज्याच्या पतनानंतर बेरार, बिदत आणि गोवळकोंडा या राज्यांनी एकत्र आक्रमण केलं. या वेढ्यादरम्यान चांद बीबी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जात राहिली. एकदा मुसळधार पावसामुळे भगदाड पडलं तेव्हा चांद बीबी स्वतः संरक्षणासाठी उभी राहिली आणि तिच्या देखरेखीखाली दरड दुरुस्त केली गेली. हा वेढा वर्षभर चालला, त्यानंतर शत्रूने माघार घेतली.
1584 मध्ये, इब्राहिमच्या बहिणीने चांद बीबीच्या पुतण्या, मुर्तजाच्या मुलाशी लग्न केलं. त्यामुळे चांद बीबी विजापूर सोडून अहमदनगरला गेली. मुर्तझाला मानसिक आजार होता. त्याने आपल्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुटण्याच्या प्रयत्नात त्याच्याच मुलाने मुर्तजाची हत्या केली.
ब्रिटिश इतिहासकार अर्नेस्ट बॅनफिल्ड हॉवेल लिहितात की, चांद बीबीला अहमदनगरचं वजीर पद देण्यात आलं तेव्हा गादीचे तीन दावेदार होते.
या तीन गटांपैकी एकाने अकबराचा मुलगा राजकुमार मुराद याच्याकडे मदत मागितली. राजकुमार मुराद त्यावेळी गुजरातमध्ये मुघल सैन्याचा सेनापती होता. मुरादने या संधीचा फायदा घेतला.
अकबराने पाठवलेला सेनापती खान-ए-खानान सैन्य घेऊन अहमदनगरच्या दिशेने निघाला. जेव्हा मुघल सैन्य किल्ल्याच्या सीमेवर पोहोचले तेव्हा त्यांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी चांद बीबीच्या नेतृत्वाखाली काही सैन्य एकत्र आलं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अकबराचा मुलगा मुराद दारूच्या आहारी गेला होता. सक्षम आणि अनुभवी जनरल खान-ए-खानान ज्याला अकबराने आपला सल्लागार म्हणून पाठवले होते, मुरादमुळे तो गोंधळून गेला.
नऊ महिने वेढा पडला. शेवटी राजकुमार मुरादने अहमदनगरचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी चांद बीबीची निवड स्वीकारली आणि बेरार राज्यावरील आपला दावा मागे घेतला. तेव्हापासून मुघल तिला चांद सुलतान म्हणू लागले.
पण चांद बीबीच्या अडचणी अजून संपल्या नव्हत्या. लवकरच चांद बीबीच्या मंत्रीपदाची निष्ठा आणि बेरार राज्याच्या सीमांवरील वादामुळे ती पुन्हा मुघलांकडे गेली.
या वेळी मुघलांनी एकत्रित सैन्यासह हल्ला केला. खान-ए-खानान आणि राजकुमार मुराद यांच्यातील संघर्षामुळे, अकबरने 1598 च्या सुरुवातीस खानाला परत बोलावून घेतलं आणि अबुल फझलला दख्खनला जाण्याचा आदेश दिले. पण अबुल फजल परत आल्याच्या दिवशीच मुरादचा गुदमरून मृत्यू झाला.
चांद बीबीची हत्या
शूर आणि निर्भय चांद बीबीची हत्या झाली. अबुल फजलने विश्वासघात केल्याच्या अफवेवर हत्या झाली असं म्हणतात. पण आयरिश इतिहासकार व्हिन्सेंट आर्थर स्मिथ लिहितात की चांद बीबीने स्वतः विष घेतलं.
इब्राहिम शनी लिहितात, "तिने रणांगणावर कधीही हिंमत गमावली नाही. ती हुशार आणि दयाळू होती. गरजूंसाठी उदार होती. ती विजापूरची प्रिय राणी चांद सुलतान होती."
इतिहासकार मनू एस.च्या मते, चांद बीबीची हत्या विनाकारण करण्यात आली. पिल्लई लिहितात, अहमदनगरने एक सक्षम शासक गमावला.
आणखी सहा महिन्यांमध्ये म्हणजे 1601 मध्ये अहमदनगरवर अकबराच्या धाकट्या मुलाने हल्ला केला. शासक बहादूर निजाम शाहला ग्वाल्हेर किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आलं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
मुघलांनी चांद बीबीच्या मारेकऱ्यांनाही मारले. अबुल फजलच्या सल्ल्यानुसार अकबरने खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवटचा शासक बहादूर खान याच्या प्रदेशातून दख्खनमध्ये प्रवेश केला.
बहादूर खान 30 वर्षांच्या तुरुंगवासानंतर सिंहासनावर आरूढ झाला होता. महामारीमुळे असीरगड किल्ल्याला 11 महिन्यांच्या वेढा घातल्यानंतर बहादूरने अकबरासमोर आत्मसमर्पण केलं.
खानदेशचा प्रदेश मुघल साम्राज्यात सामील झाला. मुघलांच्या विजयानंतर, विजापूर आणि गोवळकोंड्याच्या सुलतानांनी अकबराशी शांतता राखण्याचा विचार केला.
अकबराचा धाकटा मुलगा आणि इब्राहिम आदिल शाह यांच्या मुलीचे लग्न ठरले. 1602 मध्ये अकबर विजयी होऊन आग्र्याला परतला. दख्खनच्या सम्राटाची पदवी स्वीकारून त्यांनी अबुल फजलकडे कारभार सोपवला.
स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक
संशोधक सारा वाहीद यांच्या मते चांद बीबी हिंदी, पर्शियन आणि दख्खन जगताशी संबंधित होती.
"चांद बीबीची अनेक चित्रे आहेत ज्यात ती बहिरी ससाण्याची शिकार करताना दिसते."

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अब्दुल कादिर यांच्या 'हिस्ट्री ऑफ अहमदनगर' या पुस्तकात चांद बीबीच्या दरबारात ज्योतिषी, शिल्पकार, चित्रकार, डॉक्टर, तत्त्वज्ञ, शिंपी, सोनार, कथा सांगणारे, नर्तक इत्यादींचा समावेश असल्याचा उल्लेख आहे.
चांद बीबीच्या प्रवासात तिच्या सोबत सात महिला होत्या.
तिच्याकडे हत्तीचे माहूत आणि उंट हाकणारे शंभरहून अधिक सशस्त्र सैनिक असतील. पुरुषांच्या पोशाखात, सोन्याचे दागिने घातलेल्या चारशेहून अधिक महिला असतील.
सारा म्हणतात, "चांद बीबीचं वास्तव्य जिथे होतं तो दक्षिण भारत मी बघून आले आहे. मला असं जाणवलं की लोकांच्या मनात आजही चांद बीबी जिवंत आहे."











