You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदेंनी जपून राहावं, अजित पवारांनी काकांकडे लक्ष द्यावं- राज ठाकरेंचा सल्ला
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. शिंदेंनी जपून राहावं, तर पवारांनी काकांकडे लक्ष द्यावं, राज ठाकरेंचा सल्ला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जपून राहावं, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी काकांकडे लक्ष द्यावं, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरचे संबंध नीट करावेत, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिघांना दिला आहे.
'लोकमत'मार्फत आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.
यावेळी राजकारणातील या व्यक्तींना तुम्ही कोणता स्पष्ट सल्ला द्याल असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला.
एकनाथ शिंदेंना राज यांनी जपून राहण्याचा सल्ला दिला, तर देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतल्यावर 'वरच्यांशी चांगले संबंध ठेवा' असं राज यांनी म्हटलं.
अजित पवारांना काय सांगाल असं विचारल्यावर राज यांनी 'काकांकडेही लक्ष द्या' असं उत्तर दिलं.
या मुलाखतीत राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर चांगलीच राजकीय टोलेबाजी केल्याचं दिसून आलं.
“आपले उपमुख्यमंत्री कोणासोबत आहेत तेच कळत नाही. देवेंद्रजी पहाटे गाडी घेऊन कुठे जातात तुम्हालाही पत्ता नसतो. ते कधी शिंदेंसोबत असतात, कधी अजित पवारांसोबत असतात. कारण राजकारणात कोणालाही भेटणं-बोलणं ही बातमी झाली आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
2. सरनाईक, जाधव, गवळी यांच्यावरील ED-CBI खटल्यांचं काय झालं, संजय राऊतांचा सवाल
“प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाकडून गुन्हे दाखल आहेत. या सगळ्यांना भाजपाने आपल्यात घेतलं, वॉशिंगमशीनमध्ये टाकलं, धुतलं आणि स्वच्छ केलं. आता त्यांच्या खटल्याचं काय झालं,” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे आयोजित सभेत संजय राऊत बोलत होते.
ते म्हणाले, “अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, संजय राऊत, अनिल परब आणि तिकडे दिल्लीत मनीष सिसोदिया हे सर्व नेते फक्त विरोधी पक्षाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात.
“आता शिवसेनेतून जे 40 आमदार तिकडे गेले आहेत. त्यातील 12 जण भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. प्रत्येकावर ईडी आणि सीबीआयचा खटला दाखल आहे,” असा दावा राऊत यांनी केला.
“पुढच्या वेळी इकडे येताना मी किरीट सोमय्यांना बरोबर आणणार आहे. ते आले नाहीत तर कॉलर पकडून घेऊन येईन, अशा शब्दांत संजय राऊतांनी सोमय्या यांच्यावर टीका केली. ही बातमी लोकसत्ताने दिली.
3. केजरीवाल यांच्या बंगला सजावटीवरून वाद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या सजावटीसाठी 45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
यामध्ये तब्बल 8 लाख रुपयांचे पडदे बसवण्यात आले असून 1 कोटींपेक्षाही जास्त किंमतीचे मार्बल लावण्यात आले आहेत, असा दावा करण्यात येत आहे.
केजरीवाल यांच्या निवासस्थानी करण्यात आलेल्या या सजावटीवरून वाद निर्माण झाला असून त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.
नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार, कोरोना साथीच्या काळात ही रक्कम खर्च करण्यात आली. यासाठी पहिली मंजुरी सप्टेंबर 2020 मध्ये, तर दुसरी मंजुरी मे 2021 मध्ये मिळाली.
या अंतर्गत बंगल्यातील मॉड्युलर किचन, लॉन्ड्री आणि पॅन्ट्री आदींचं नूतनीकरण करून घेण्यात आलं. त्यासाठी प्रमाणाबाहेर खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना म्हटलं की हा बंगला सरकारी आहे, खासगी नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याचं ऑडिटही केलं आहे.
4. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा उद्याचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. उद्या दोन दिवसांसाठी शहा नागपूरमध्ये येणार होते.
नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार होते. पण अचानक दौरा रद्द झाल्यानं आता हा उद्घाटन कार्यक्रम शाह यांच्या अनुपस्थितीतच होईल, अशी माहिती मिळाली आहे.
अमित शाह यांचा दौरा रद्द होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. रोहित शर्माने IPL मधून ब्रेक घ्यावा, सुनील गावस्कर यांचा सल्ला
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने काही काळ IPL मधून ब्रेक घ्यावं, असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. य हंगामात रोहित शर्माने सात सामन्यात फक्त 181 धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे.
रोहित शर्माच्या खराब फॉर्माचा फटका मुंबई इंडियन्सलाही बसत आहे. हाच खराब फॉर्म टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतो.
त्यामुळे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रोहित शर्माने आयपीएलमधून ब्रेक घ्यावा, असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे. ही बातमी दैनिक भास्करने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)