You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Sunita Williams: 'अंतराळातून सुरक्षित परत याव्यात', सुनिता विल्यम्स यांच्या गावात प्रार्थना
- Author, रॉक्सी गागडेकर छारा
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
सुनिता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर तीन महिने उलटले तरी अजूनही अंतराळातच अडकले आहेत. आता ते फेब्रुवारी 2025 मध्येच पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.
दोन्ही अंतराळवीर 5 जून रोजी बोईंग स्टारलायनरने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले. परंतु, स्टारलायनरमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर परतायला उशीर होतोय.
या दोघांचीही कुटुंबं आणि अमेरिकेतील नागरिकही NASA च्या या मोहिमेकडे लक्ष ठेवून आहेत.
सुनिता विल्यम्स यांचे मूळगावी म्हणजे गुजरातमधल्या झुलासन गावातले त्यांचे नातेवाईक आणि शुभचिंतक; सुनिता सुरक्षित परत याव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत.
तसेच आज 19 सप्टेंबर रोजी हे सगळेजण सुनिता यांना इथूनच वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत.
‘’आम्हाला हे सुद्धा माहीती नाही की सुनितासोबत काय होत आहे. काही म्हणतात ती चांगली आहे. काही म्हणतात, ती सुरक्षित परत येणार नाही. तिच्यासोबत नेमकं काय होत आहे? याची खरी माहिती आम्हाला कोणीही देत नाही. ती कधी आणि कशी परत येणार आहे, याबद्दलही कोणी सांगत नाही’’, असं सुनिता यांचे चुलत भाऊ नवीन पांड्या म्हणाले.
झुलासन हे गाव गुजरातची राजधानी गांधीनगरपासून 40 किलोमीटरवर वसलेलं असून या गावात वेगवेगळ्या जाती-समूहाचे 7000 लोक राहतात. सुनिता यांनी त्यांच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेनंतर झुलासन या गावाला भेट दिली. याआधी त्या 2007 आणि 2013 मध्ये इथं येऊन गेल्या.
पण, सुनिता यांचा नेमका झुलासन गावासोबत काय संबंध आहे?
सुनिता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या यांचा जन्म गुजरातमधल्या झुलासन गावात झाला. त्यानंतर 1957 मध्ये ते एमबीबीएससह इतर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तिथे त्यांचं उर्सूलिन बोन्नी यांच्यासोबत लग्न झालं आणि त्यांच्यापोटी 1965 मध्ये सुनिता यांचा जन्म झाला. त्यामुळे गुजरातमधलं झुलासन गाव हे सुनिता यांचं मूळ गाव आहे.
आता याच गावातील ग्रामस्थ आणि सुनिता यांचे नातेवाईक त्या अंतराळातून सुरक्षित परत याव्या यासाठी प्रयत्न करत आहेत.
सुनिता यांनी 2013 मध्ये भेट दिलेल्या, हिंदू डोला माता मंदिरात ग्रामस्थ प्रार्थना करताना दिसत आहेत. डोला माता सुनितांची सुरक्षा करेल, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. तसेच याठिकाणी सुनिता विल्यम्स यांचा फोटोही लावण्यात आला आहे.
मंदिराचे पुजारी आणि विल्यम्स यांचे नातेवाईक दिनेश पांड्या म्हणाले ‘’आम्ही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू. पूजा आणि हवन आयोजित करायचं ठरवलं आहे. त्यासाठी सर्व ग्रामस्थांना निमंत्रणही देण्यात आलं आहे.’’
सुनिता सुरक्षित परत याव्यात, या आशेनं जुलै 2024 पासून इथं घडाळ्याच्या आकारात दिवे लावण्यात आले आहेत. प्रार्थना करताना मी या दिव्यांची स्वतः काळजी घेत असतो, असं दिनेश पांड्या सांगतात.
इतकंच नाहीतर गावातल्या महिलासुद्धा सांयकाळी मंदिरात एकत्र येऊन प्रार्थना करतात. “आम्हाला आमच्या देवीवर पूर्ण विश्वास आहे. ती देवीच तिला परत घेऊन येईल” असं या मंदिरात प्रार्थनेसाठी आलेल्या गोमती पटेल सांगतात. सोबतच याच गावातल्या मधु पटेल म्हणतात, “आम्हाला सुनिता यांच्या कामगिरीचा अभिमान आहे. आमच्या मुलीला सुखरुप परत आणण्यासाठी नासा आणि अमेरिका सरकारनं जे काही करता येईल ते करावं.”
मधु पटेल या नुकत्याच अमेरिकेतून परतल्या असून त्या पुढे म्हणाल्या सुनिता विल्यम्स यांच्यामुळे गावाला आणि आमच्या समाजाला मान-सन्मान मिळाला आहे.
सुनिता विल्यम्स यांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या स्थानिक शाळेनं सुद्धा एक प्रदर्शन आयोजित केलं असून यामध्ये विल्यम्स यांचे फोटो आणि स्पेस शटल मॉडेल ठेवण्यात आलं आहे.
तसेच त्यांच्यावर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन सुद्धा केलं जाणार आहे. इथंच एक मोठं बॅनर लागलं असून तिथं गुजरातीमध्ये सुनिता (पांड्या) विल्यम्स असं मोठ्या अक्षरात लिहिण्यात आलं आहे.
कसं आहे गाव?
झुलासल गावात जाताच सिमेंट रस्ते, सुसज्ज बंगले आणि काही पारंपरिक घरं असं चित्र नजरेस पडतं. याठिकाणी परकीय पैसा मोठ्या प्रमाणात असल्याचं गावात जाताच या घरांकडे पाहून लक्षात येतं.
या गावातले जवळपास 2 हजार नागरिक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. सुनिता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या अमेरिकेला गेल्यानंतर इथून लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं.
1972 मध्ये दीपक पांड्या आणि त्यांचं कुटुंब अमेरिकेवरून पहिल्यांदा गावात आले तेव्हा मोठी मिरवणूक निघाल्याच्या आठवणी गावातले लोक सांगतात. याच गावात सुतार म्हणून काम करणारे भरत गज्जर (68) सांगतात, मला अजूनही आठवते सुनिता आणि तिच्या कुटुंबाची उंटावरून मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक पाहून अनेकांना अमेरिकेत जायचा मोह झाला.’’
सध्या सुनिता विल्यम्स यांच्या चुलत कुटुंबातले नवीन पांड्या (64) या गावात राहत असून ते सुनिता सुरक्षित परत याव्यात, यासाठी प्रार्थना करत आहेत. मी सध्या त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात नाही. पण आम्हाला तिच्याबद्दल काळजी वाटते, असं नवीन म्हणतात.
कौटुंबिक वारसा
विल्यम्स यांच्या कुटुंबाच्या नावानं इथं काही संपत्ती आहे. इथं सुनिता विल्यम्स यांच्या आजी-आजोबांच्या नावानं वाचनालय आहे. तसेच दीपक पांड्या यांचं वडिलोपार्जित घर जीर्ण अवस्थेत आहे. वाचनालयाचा खर्च निघावा आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी तिथला एक विभाग डिपार्टमेंटल स्टोअर म्हणून भाड्यानं देण्यात आला आहे. काही विद्यार्थी अजूनही वाचनालयाचा वापर करतात.
सुनिता विल्यम्स यांनी इथल्या शाळेला देणगी दिली असून त्या शाळेच्या हॉलमध्ये त्यांच्या आजी-आजोबांचे फोटो लावले आहेत. त्या गावात भेट द्यायला आल्या तेव्हा त्यांनी 2.50 लाख रुपये आमच्या शाळेला दान केल्याचं शाळेचे मुख्याध्यापक अंबालाल पटेल सांगतात.
तसेच सुनिता विल्यम्स यांचा 2007 मध्ये या शाळेच्या मैदानावर सत्कार देखील करण्यात आला होता.
त्यांची 2007 ची आठवण सांगताना त्यांचा भाऊ किशोर पांड्या म्हणतात, “मी त्यांच्याकडे गेलो आणि माझ्या मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये मी तुमचा भाऊ आहे असं सांगितलं. तेव्हा त्यांनी हस्तांदोलन केले आणि म्हणाल्या, अरे माझा भाऊ. हे क्षण मला आठवणीत राहतील.”
आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, सगळं काही व्यर्थ आहे. जोपर्यंत दीपक काका म्हणजे सुनिता विल्यम्स यांचे वडील जिवंत होते तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत सहज संवाद साधू शकत होतो. पण, त्यांच्या मृत्यूनंतर संवाद साधणं कठीण झालंय, असंही किशोर यांनी सांगितलं.
प्रत्येकजण सुनिता विल्यम्स सुरक्षित परत याव्यात यासाठी प्रार्थना करत असताना त्यांचं कार्य अनेकांना प्रेरणा देण्याचं काम करतंय.
“त्या त्यांच्या भाषणात म्हणाल्या होत्या, आपण जे काही करतोय त्यावर प्रेम करायला हवं म्हणजे आपल्याला यश मिळतं. त्या अमेरिकेत वाढल्या असल्या तरी त्या आम्हाला आमच्या गावातल्या स्थानिक नागरिकाप्रमाणे वाटतात. त्यामुळे त्यांच्यामुळे आमच्यापैकी अनेकांना प्रेरणा मिळतेय. त्यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव हे जागतिक स्तरावर झळकलंय”, असं या गावातले वकील तरुण लेवा म्हणतात.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)