You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चहाबिस्किटाची सवय पडली महागात, 9 वर्ष फरार आरोपी असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
- Author, भार्गव पारिख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
चहा आणि बिस्किट हे समीकरण नवं नाही. कित्येक लोकांना बिस्किटाशिवाय चहा पिता येत नाही. पण याच बिस्किटामुळे अनेक महिने फरार असलेला गुन्हेगाराचा माग पोलिसांना काढता आलाय.
वाचायला विचित्र वाटत असलं तरी असंच घडलं आहे. पत्नीची हत्या केल्याच्या आरोप असलेल्या एका व्यक्तीस आजन्म कारावासाची शिक्षा झाली होती.
या शिक्षेदरम्यान तो एकदा पॅरोलवर बाहेर आला आणि जवळपास 9 वर्षं फरार झाला होता. याच काळात त्यानं दुसरं लग्न केलं आणि नवं बिऱ्हाडही केलं.
पण बिस्किटच्या पुड्यामुळं पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला पकडून पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलं.
नक्की काय घडलं?
हे सगळं घडलं सुरेंद्र वर्मा नावाच्या माणसाच्या बाबतीत.
सुरेंद्र हा सुरतच्या एका इंजिनियरिंग कंपनीत काम करत होता. सुरतच्या सचिन नावाच्या भागात तो पत्नीसह भाड्याच्या घरात राहात होता. त्याचे आणि पत्नीचे सतत भांडण होत असे.
2007 साली सुरेंद्रने पत्नीची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि ठोस पुरावे आणि साक्षींच्या आधारावर त्याला सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
तेव्हापासून तो लाजपूर कारागृहात शिक्षा भोगत होता.
सुरतचे एसीपी नीरव गोहिल म्हणाले," 2016 साली सुरेंद्र वर्मानं पॅरोलसाठी अर्ज केला. त्याची विनंती स्वीकारली गेली आणि 28 दिवसांचा जामिन मंजूर झाला.
पॅरोलच्या काळात सुरेंद्र फरार झाला. त्यामुळे सचिन पोलीस ठाण्यात कारागृह अधिनियमांतर्गत त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली."
सुरेंद्र वर्माचे एक नातलग रवींद्र कुमार म्हणाले, "सुरेंद्रच्या कुटुंबाची उत्तर प्रदेशात थोडी जमीन होती खरी, पण त्यातून फारसं काही उत्पन्न येत नव्हतं. सुरेंद्रही काही फारसा शिकलेला नव्हता.
शेतातून मनाजोगतं उत्पन्न मिळत नसल्यामुळं तो बेओहरा गावापासून 10 किमी अंतरावर अशलेल्या करवीमध्ये रिक्षा चालवायचा. तिथून तो लोकांना रिक्षातून चित्रकूटला घेऊन जायचा."
रवींद्र सांगतात, "2005 साली त्यानं आपल्याच जातीतल्या एका मुलीशी विवाह केला. काही काळानंतर ते काम शोधण्यासाठी गावातल्या काही लोकांबरोबर सुरतला गेले आणि एका कारखान्यात काम करु लागले. काम करत करत रात्री तो रिक्षाही चालवायचा."
सुरेंद्र आपल्या बायकोकडं हुंड्याची मागणी करायचा आणि त्या पैशातून स्वतःची रिक्षा घ्यायची असा त्याचा मानस होता.
या सगळ्यातच त्यानं पत्नीला मारल्याचं नातलगांना कळलं.
9 वर्षे फरार गुन्हेगाराला कसं पकडलं?
पॅरोलवर असलेल्या 42 वर्षिय सुरेंद्रला पकडण्यासाठी पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरू केली होती.
एसीपी गोहिल सांगतात, सर्वात आधी सुरेंद्रच्या गावकऱ्यांकडून थोडी माहिती मिळाल्यावर आम्ही एक टीम तयार केली.
तपासासाठी ही टीम सुरेंद्रच्या गावाकडे पाठवली. आम्ही युपी पोलिसांच्या संपर्कातही होतो.
पोलीस आपल्याला कधीतरी पकडतीलच ही भीती सुरेंद्रला होती त्यामुळे पॅरोलचा भंग केल्यावर आपले आई-वडील आणि भावाशी कसलाच संपर्क ठेवला नव्हता.
पोलिसांच्या माहितीनुसार सुरेंद्रचं उत्तर प्रदेशातलं गाव एकदम लहान आहे. त्यांनी तिथं त्याच्या नातलगांकडे चौकशी केली.
तिथं तो कारवीमध्ये रिक्षा चालवतो असं समजलं. मग पोलिसांनी तिथल्या रिक्षा चालकांकडे चौकशी केली.
पोलिसांनी त्याचा फोटो रिक्षाचालकांना दाखवल्यावर सुरेंद्र तिथं इलेक्ट्रिक रिक्षा चालवत असे आणि आता त्यानं दुसऱ्या महिलेशी लग्न केलंय असं समजलं.
त्यानं एका भाड्याच्या घरात बिऱ्हाड केलं असून त्यांना एक मुलगाही आहे असं समजलं.
सहा महिन्यांपूर्वी सुरेंद्र शंकरपूर गावात आपल्या मेहुण्याच्या लग्नात आला होता अशी माहिती मिळाली.
पोलिसांनी सुरेंद्रच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाकडे चौकशी केल्यावर तो गुरुग्राममध्ये मजुरी करतो असं समजलं. आता पोलिसांकडे सुरेंद्रच्या पत्नीचा फोन नंबरही होता.
सुरेंद्रला रोज चहाबरोबर बिस्किट खाण्याची सवय होती. त्यामुळे त्याच्या घराजवळ दोन दिवस साध्या वेशातल्या पोलिसांनी लक्ष ठेवलं.
सुरेंद्र 14 नोव्हेंबर रोजी आपल्या मुलाबरोबर बिस्किट विकत घ्यायला आला तेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं.
गुरुग्राममध्ये अटक करुन त्याला सुरतला आणलं गेलं आणि न्यायालयासमोर उभं करण्यात आलं.
कसा मिळाला होता पॅरोल?
सुरेंद्रनं पहिल्या पत्नीची हत्या केल्यामुळं त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्याला पॅरोलवर काही दिवसांसाठी सोडण्यात आलं होतं.
हत्येसाठी दोषी ठरलेल्या लोकांना पॅरोल कधी मिळतो याबद्दल आम्ही विधिज्ञ आशीष शुक्ला यांना विचारलं.
ते म्हणाले, "हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या लोकांना दोनप्रकारे पॅरोल मिळू शकतो. जर त्याच्या कुटुंबात कोणी गंभीर आजारी असेल किंवा काही ठोस कारण असेल तर तो वकिलांच्या मदतीने उच्च न्यायालयाकडे अर्ज करू शकतो.
न्यायालयाने अर्ज स्वीकारला तर पॅरोल मिळू शकतो. दुसरा मार्ग म्हणजे शिक्षेची काही वर्षं भोगल्यावर एक विशिष्ट अर्ज भरुन संबंधित गुन्हेगार पॅरोलसाठी अर्ज करू शकतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)