'वरातीत उधळलेल्या खोट्या नोटा उचलल्यानं सीआयएसएफ जवानानं आमच्या 14 वर्षांच्या मुलावर गोळ्या झाडल्या'; हे प्रकरण नेमकं काय?

    • Author, प्रेरणा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"रात्रीचे 9 वाजले की असं वाटतं, जणू साहिल दारात उभा आहे आणि म्हणतोय, 'अम्मी, दरवाजा उघड, मी आलोय.' आम्हाला माहीत आहे की, तो आता या जगात नाही, पण मन अजूनही हे मानत नाही. त्याची वाट पाहता पाहता रात्री 1 वाजतात तरी झोप येत नाही."

हे शब्द आहेत दिल्लीतील शाहदरा येथे राहणाऱ्या 42 वर्षीय निशा अन्सारींचे.

आपल्या लेकराला गमावण्याच्या वेदनेतून जाण्याची निशा यांची ही पहिलीच वेळ नाही.

गेल्या 5 वर्षांत त्यांनी आपल्या 2 मुलांना गमावलं आहे.

वर्ष 2020 मध्ये एका गंभीर आजाराने त्यांचा 18 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला होता. आता 29 नोव्हेंबरला सीआयएसएफचा हेड कॉन्स्टेबल मदन गोपाल तिवारीच्या पिस्तुलातून सुटलेल्या गोळीने त्यांच्या 14 वर्षांच्या साहिलचाही जीव घेतला.

आरोपीच्या कुटुंबीयाने जाणूनबुजून गोळी झाडल्याचा आरोप फेटाळला. तसेच 'गोळी चुकून झाडली गेली', असं म्हटलं आहे.

भावाच्या लग्नातील वरातीत उडवलेले पैसे साहिल उचलत होता, म्हणून मदन गोपाल तिवारीने त्याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.

निशा अन्सारी म्हणतात, "वरातीत पैसे का उडवतात? लोकांनी उचलावेत म्हणूनच ना. शिवाय ते पैसे खरेही नव्हते. खोट्या पैशांसाठी माझ्या मुलावर गोळी झाडली. अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकारच नाही. यासाठी सरकार त्यांना बंदूक देते का? गोळी चालवायचीच असेल, तर सीमेवर चालवावी, दहशतवाद्यांवर चालवावी. निष्पाप मुलानं काय चूक केली होती?"

साहिल अवघ्या 14 वर्षांचा होता. 6 महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांना अर्धांगवायू झाल्यानंतर, घराला हातभार लावण्यासाठी तो जवळच्या किराणा दुकानात कामाला जाऊ लागला होता. 29 नोव्हेंबरच्या रात्री काम संपवून तो घरी निघाला, पण तो घरी येऊच शकला नाही.

त्याचे वडील सिराजुद्दीन अन्सारी सांगतात, "29 नोव्हेंबरला रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास माझा धाकटा मुलगा साजिम आणि त्याच्यासोबत आणखी दोन मुलं धावत घरी आली."

"'पप्पा, साहिलला गोळी मारली!', असं त्यांनी मला सांगितलं. मला वाटलं ते मस्करी करत आहेत. पण ते हे सर्व रडत सांगत होते, 'नाही, खरंच गोळी मारली.'"

"मला चालण्यात थोडी अडचण असल्याने मी हळू चालतो, म्हणून साहिलची आई लगेच धावत तिथे गेली. घरापासून थोड्याच अंतरावर, कम्युनिटी हॉलजवळ तिला साहिल जमिनीवर पडलेला दिसला. त्याचा मृत्यू झाला होता."

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्या रात्री साहिल घरी येत असताना त्याची नजर वरातीत पैसे उडवत असलेल्या मदन गोपाल तिवारींवर गेली. तेवढ्यात तो त्याच्या समोरच रस्त्यावर पडलेले पैसे उचलू लागला.

कुटुंबीयांचा आरोप आहे की, मदन गोपाल तिवारीला हे आवडलं नाही. त्यानं आधी साहिलला मारहाण केली आणि नंतर त्याच्यावर गोळी झाडली.

'मुलाला पाहताच आई बेशुद्ध पडली'

या घटनेशी संबंधित एक व्हीडिओ समोर आला आहे. त्यात साहिल रस्त्यावर पडला असून त्याचं डोकं रक्ताने माखलेलं दिसत आहे.

निशा अन्सारी म्हणतात, "त्याला पाहताच मी बेशुद्ध पडले. एका शेजाऱ्याने मला उठवलं. माझा मुलगा तिथेच पडलेला होता. लोकांची मोठी गर्दी होती, पण कोणीही त्याला रुग्णालयात नेण्याची तसदी घेतली नाही. आम्ही त्याला जवळच्या हेडगेवार रुग्णालयात नेलं, पण त्याचा आधीच मृत्यू झाला होता."

साहिलचे कुटुंबीय मुळचे झारखंडमधील गोड्डा जिल्ह्याचे आहेत. सध्या ते शाहदरा येथील एका 4x4 पेक्षा लहान खोलीत राहतात.

वडील सिराजुद्दीन अन्सारी हे मजुरी करतात. 6 महिन्यांपूर्वी आलेल्या शारीरिक समस्येमुळे ते आता फार कमी काम करू शकतात. त्यामुळे घराची मोठी जबाबदारी साहिलने आपल्या लहान खांद्यावर घेतली होती.

आपल्या मुलाबद्दल निशा अन्सारी म्हणतात, "माझा मुलगा मुंगीदेखील मारू शकत नव्हता. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारा, कोणाशी भांडणं नाही की वाद नाही. इतकंच काय त्याला शिवीदेखील देता येत नव्हती."

"तो नेहमी शांत असायचा, लोकांना तो मुका आहे, असं वाटायचं. त्याचं लक्ष फक्त वडिलांच्या औषधासाठी आणि घरखर्चासाठी पैसे कसे मिळवता येईल याकडेच असायचं."

या प्रकरणातील आरोपी सीआयएसएफचा हेड कॉन्स्टेबल मदन गोपाल तिवारीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

पोलीस काय म्हणतात?

मदन गोपाल तिवारी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शाहदराचे उपायुक्त प्रशांत गौतम यांनी सांगितलं , ''घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीमापुरीचे एसीपी आणि मानसरोवर पोलीस ठाण्याचे एसएचओ यांच्या देखरेखीखाली टीम तयार करण्यात आली होती."

"स्थानिक पातळीवरील चौकशी आणि विवाहस्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहून 30 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशमधील इटावा येथून आरोपीला अटक करण्यात आली.''

चौकशीदरम्यान आरोपीने गोळी झाडल्याची कबुली दिल्याचे उपायुक्तांनी सांगितलं.

"जेव्हा मुलांनी वरातीत उडवलेले पैसे उचलले, तेव्हा त्याला राग आला आणि त्याने एका मुलावर गोळी झाडली," असं आरोपीने कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

गोळी झाडण्यासाठी आरोपीने जी पिस्तूल वापरली ती परवानाधारक .32 बोअरची पिस्तूल होती.

'खोटे आरोप केले जात आहेत'

इटावा येथे राहणारा आरोपीचा भाऊ सोनूने त्याच्या भावावर खोटे आरोप केले जात असल्याचं म्हटलं आहे.

त्यानं बीबीसीला सांगितलं, "माझ्या भावाने गोळी जाणूनबुजून चालवली नाही, सगळे लोक चुकीचं दाखवत आहेत. वरातीत गर्दी होती आणि पिस्तूल लोडेड होतं. गोळी चुकून मुलाला लागली."

"काही लोक म्हणत आहेत की, तो दारूच्या नशेत होता. पण तुम्ही त्याचा रेकॉर्ड तपासा, त्याने कधीही दारू घेतलेली नाही. आम्ही वकिलांच्या माध्यमातून कायदेशीर लढा लढू," असं मत त्यांनी व्यक्त केलं.

मदन गोपाल तिवारीचं कुटुंब इटावामध्ये असतं. त्यांच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुले आहेत. तो सध्या कानपूर येथे कार्यरत होता. या प्रकरणात सीआयएसएफची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांच्या जनसंपर्क विभागाने अशा प्रकरणांवर ते भाष्य करू शकत नसल्याचं सांगितलं.

सीआयएसएफने काही कारवाई केली का?

"एखादा जवान सुट्टीवर असताना जर अशा घटनेत सामील असेल, तर आमच्याकडून अधिकृत वक्तव्य दिलं जात नाही," असं सीआयएसएफने स्पष्ट केलं आहे.

परंतु, सीआयएसएफच्या नियमपुस्तकात स्पष्ट लिहिलं आहे की, एखादा जवान जर फौजदारी गुन्ह्यात 48 तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिला, तर त्याला निलंबित केलं जातं.

सध्या हे प्रकरण न्यायालय आणि पोलीस तपासाच्या कक्षेत आहे. दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, एवढीच इच्छा असल्याचं पीडित कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

"आम्ही गरीब लोक आहोत, कसंही करून आम्हाला न्याय हवा आहे. आम्हाला फक्त आमच्या मुलासाठी न्याय हवा आहे," असं साहिलची आई म्हणते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)