सापांमुळे मिळाली होती नोकरी, सापामुळेच गेला जीव; गळ्यात साप गुंडाळला अन् अनर्थ घडला

    • Author, शुरेह नियाजी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी भोपाळहून

घरात किंवा परिसरात साप दिसला की, आपण लगेच सर्पमित्राला फोन करतो. सर्पमित्र ही लगेचच आपल्याला प्रतिसाद देतात आणि घटनास्थळी येतात. साप पकडतात आणि तो सुरक्षितस्थळी सोडून येतात.

साप पकडताना हे सर्पमित्र पुरेशी काळजीही घेतात. परंतु, अनेकवेळा छोटंसं दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावरही बेतू शकते. अशीच एक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली.

मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यातील राघोगडमध्ये दीपक महावर नावाच्या सर्पमित्राचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला.

पकडलेला साप जंगलात सोडण्याऐवजी त्यांनी गळ्यात घातला आणि त्याच वेळी सापाने त्यांना दंश केला. त्यांची ही कृतीच त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली.

सुरुवातीला त्यांनी सर्पदंशाला फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. प्राथमिक उपचार करून ते घरी परतले. पण हळूहळू विषाचा परिणाम होऊ लागला आणि रात्री त्यांची तब्येत खालावली. त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

दीपक हे त्यांच्या परिसरात साप पकडण्यासाठी प्रसिद्ध होते. जेपी कॉलेजमध्येही त्यांना खास साप पकडण्याच्या कामासाठीच ठेवण्यात आलं होतं.

सोमवारी (14 जुलै) दुपारी सुमारे बाराच्या सुमारास राघोगडमधून दीपक यांना एका घरात साप शिरल्याचा फोन आला. ते लगेच तिथे गेले आणि त्यांनी सापाला सुरक्षितपणे पकडलं.

त्याचवेळी त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाच्या शाळेतून फोन आला की शाळा सुटली आहे, आणि त्याला घेण्यासाठी या.

घाईघाईत त्यांनी सापाला डब्यात बंद न करता तो थेट आपल्या गळ्यात घातला आणि दुचाकीवरून शाळेत मुलाला घ्यायला गेले.

मुलाला मागे बसवून ते घरी परतत असताना, वाटेत गळ्यात लटकलेल्या सापानं अचानक त्यांच्या उजव्या हाताचा चावा घेतला.

साप चावल्यानंतर रुग्णालयात गेले

साप चावल्यानंतर दीपक यांनी लगेचच आपल्या एका मित्राला बोलावलं. त्या मित्राने त्यांना राघोगडच्या जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे प्राथमिक उपचार झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी गुना येथे जाण्यास सांगितलं.

सायंकाळी तब्येत थोडी सुधारली म्हणून दीपक रुग्णालयातून घरी आले आणि जेवण करून झोपी गेले. पण रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

राघोगडच्या प्राथमिक उपचार केंद्राचे डॉ. देवेंद्र सोनी यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, "जेव्हा दीपक आमच्याकडे आले, तेव्हा त्यांची तब्येत ठीक होती. त्यांचे महत्त्वाचे अवयव नीट काम करत होते, बोलणंही सामान्य होतं आणि ते शुद्धीत होते."

"आम्ही लगेच प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांना सलाईन लावलं, सापाच्या विषविरोधी इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधं दिली. त्यानंतर त्यांना गुना येथे पाठवलं, कारण इथे सर्व सुविधा उपलब्ध नव्हत्या," असं डॉक्टरांनी सांगितलं.

डॉ. सोनी यांनी सांगितलं की, गुना रुग्णालयात काही तास राहिल्यानंतर दीपक यांना बरं वाटू लागलं, त्यामुळे ते घरी परतले.

ते पुढे म्हणाले, "तो साप कोब्रा असल्यासारखं वाटत होता, त्याचं विष हळूहळू परिणाम करतं. अशा प्रकरणांमध्ये रुग्णाने किमान 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणं फार गरजेचं असतं. जर ते रेफरल सेंटरमध्येच थांबले असते आणि घरी परतले नसते, तर त्यांचा जीव वाचू शकला असता."

साप पकडण्याच्या कौशल्यामुळेच मिळाली होती नोकरी

दीपक महावर गेल्या अनेक वर्षांपासून राघोगडमधील जेपी कॉलेजमध्ये 'सर्पमित्र' म्हणून काम करत होते. आसपासच्या गावांत साप दिसल्याची माहिती मिळाली, की ते तिथे नियमितपणे जायचे आणि साप पकडायचे.

त्यांच्या कुटुंबात दोन मुलं आहेत. एकाचं वय 14 वर्षे आहे आणि दुसऱ्याचं 12 वर्षे. त्यांच्या पत्नीचं सुमारे 10 वर्षांपूर्वी निधन झालं आहे.

ही घटना घडली, तेव्हा दीपक आपल्या लहान मुलाला शाळेतून आणायला गेले होते.

दीपक यांचे लहान भाऊ नरेश महावर यांनी 'बीबीसी'ला सांगितलं, "दीपक गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत होते. त्यांनी एका व्यक्तीकडून साप पकडण्याचं कौशल्य शिकलेलं होतं.

काही वर्षांतच ते या कामात चांगले निपुण झाले होते, त्यामुळेच त्यांना जेपी कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. हे कॉलेज शहराच्या बाहेर आहे. तिथे सापांचे प्रमाण जास्त आहे."

नरेश म्हणाले, "याआधीही दीपक यांना अनेकदा साप चावले होते, आणि ते अनेक वेळा स्वतःच्या औषधी वनस्पतींनीच उपचार करत असत. एकदा मात्र त्यांना रुग्णालयात जावं लागलं होतं.

या वेळीही त्यांना वाटलं की, फक्त थोडी सूज आली आहे आणि लवकर बरं होतील, त्यामुळे त्यांनी हे प्रकरण फारसं गांभीर्यानं घेतलं नाही."

ते म्हणाले, "आमची फक्त हीच विनंती आहे की, जेव्हा तुम्ही या घटनेबद्दल लिहाल, तेव्हा त्यात माणुसकीची भावना ठेवा. भाऊ आता आमच्यात नाही, त्यांच्या मागे दोन लहान मुलं उरली आहेत.

सरकारनेही जर या प्रकरणाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर कदाचित काही मदत मिळू शकेल, ज्यामुळे या मुलांचं भवितव्य सुरक्षित राहिल."

नरेश म्हणाले, "दीपक खरोखरच एक चांगले व्यक्ती होते. त्यांनी अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांची मदत केली होती."

भारतामध्ये साप चावल्यामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो

भारत साप चावून होणाऱ्या मृत्यूंसाठीही जगभरात ओळखला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार, भारतात दरवर्षी साप चावण्याचे सुमारे 50 लाख प्रकरणं नोंदवली जातात.

या 50 लाख सर्पदंशांपैकी सुमारे 25 लाख लोकांच्या शरीरावर विषाचा परिणाम होतो.

डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी साप चावल्याने सुमारे एक लाख लोकांचा मृत्यू होतो. तर सुमारे चार लाख लोक असे असतात, ज्यांच्या शरीराचा एखादा अवयव कायमचा बिघडतो किंवा काम करणं थांबवतो.

'बीबीसी'च्या 2020 मधील एका अहवालातही असंच सांगितलं गेलं होतं की, भारतात दरवर्षी एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू केवळ साप चावल्यामुळे होतो.

मध्यप्रदेशला सर्पदंशग्रस्त भागांपैकी एक मानलं जातं. रुग्णालय आणि पोस्टमार्टमच्या अहवालांच्या आधारे संबंधित व्यक्तीचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला होता, हे सिद्ध झालं की अशा कुटुंबांना इथलं सरकार नुकसानभरपाई देतं.

'द रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीन' या जर्नलमध्ये 2024 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात नुकसानभरपाईबाबत विश्लेषण करण्यात आलं होतं.

या अभ्यासात 2020-21 आणि 2021-22 या वर्षांतील मध्यप्रदेश आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीचा आढावा घेण्यात आला होता.

अभ्यासात असं आढळून आलं की, या दोन वर्षांमध्ये एकूण 5,728 कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यात आली. साप चावून मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारनं एकूण 229 कोटी रुपये मदत वाटप केली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)