अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, दोन्ही देशांमध्ये वादाची ठिणगी कशी पडली?

    • Author, ईफा वॉल्श
    • Role, वॉशिंग्टन

अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यामध्येच आता व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये अनेक भागांत स्फोट झाल्याची बातमी मिळत आहे. ज्या परिसरांमध्ये स्फोट झाले आहेत त्यात लष्करी तळांचाही समावेश आहे.

हे स्फोट प्रत्यक्ष पाहाणाऱ्या लोकांच्या माहितीनुसार, या शहराच्या मध्यवर्ती भागी असलेल्या लष्करी हवाई तळ ला कार्लोटा आणि मुख्य लष्करी तळ फिएर्ते तिऊनालाही स्फोटांची झळ बसली आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या कथित स्फोटांचे व्हीडिओ प्रसिद्ध होत आहेत.

तिकडे अमेरिकास्थित सीबीएस न्यूजने सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलंय की, ट्रम्प यांनी व्हेनेझुएलात लष्करी तळांवर हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. व्हेनेझुएला सरकारने या हल्ल्याचा निषेध केला असून या आक्रमणाचा विरोध केला आहे.

दरम्यान, व्हेनेझुएला सरकारने या हल्ल्याचा निषेध केला असून या आक्रमणाचा विरोध केला आहे..

व्हेनेझुएला सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे की, "अमेरिकेच्या सध्याच्या प्रशासनाने व्हेनेझुएलाविरुद्ध केलेल्या अत्यंत गंभीर लष्करी आक्रमकणाला व्हेनेझुएला आंतरराष्ट्रीय समुदायासमोर फेटाळून लावतो, त्याचा विरोध आणि तीव्र निषेध करतो."

ही घडामोड ट्रम्प प्रशासनाकडून गेल्या अनेक आठवड्यांपासून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर टाकल्या जात असलेल्या दबावानंतर समोर आली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप आहे की व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी पसरवण्यात सहभागी आहेत.

व्हेनेझुएलाच्या राजधानीत अनेक स्फोटांची नोंद

व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर व्हेनेझुएलाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाने केली आहे.

देशभरातील हवाई क्षेत्र बंद करण्याचा विचार केला पाहिजे, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर व्हेनेझुएलाकडून हा आरोप करण्यात आला आहे.

व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या टिप्पण्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "ही व्हेनेझुएलाच्या लोकांविरुद्ध आणखी एक अतिरेकी, बेकायदेशीर आणि अन्याय्य आक्रमकता आहे."

खरं तर अमेरिकेला कायदेशीररीत्या दुसऱ्या देशाचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा अधिकार नाहीये. पण, ट्रम्प यांच्या ऑनलाईन पोस्टमुळे हवाई प्रवासामध्ये अनिश्चितता नक्कीच निर्माण होऊ शकते.

तसेच, त्यांच्या पोस्टमुळे विमान कंपन्यांना तिथे काम करण्यापासून रोखता येऊ शकतं, अशीही शक्यता निर्माण झाली आहे.

खरं तर, अमेरिका कॅरिबियनमध्ये आपली लष्करी उपस्थिती वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ही लष्करी उपस्थिती ड्रग्ज तस्करीला रोखण्यासाठी आहे, असं त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी ड्रग्ज तस्करीचे अमेरिकेचे दावे फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात की, हे दावे म्हणजे त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न आहे.

'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिलंय की, "सर्व एअरलाइन्स, वैमानिक, ड्रग्ज विक्रेते आणि मानवी तस्करांनो, कृपया व्हेनेझुएलाच्या वरील आणि आजूबाजूचं सर्व हवाई क्षेत्र त्याच्या संपूर्ण परिसरात बंद आहे, असं समजा."

यावर बीबीसीने व्हाईट हाऊसला प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर व्हाईट हाऊसने त्वरित प्रतिसाद दिलेला नाही.

"व्हेनेझुएला आणि त्याच्या आसपास लष्करी हालचाली वाढल्या आहेत," असा इशारा अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) विमान कंपन्यांना दिल्यानंतर काही दिवसांनी ट्रम्प यांचं हे वक्तव्य आलेलं आहे.

शनिवारी एका निवेदनात, व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, अमेरिकेने त्यांच्या 'वीकली मायग्रंट्स'ना मायदेशी परत आणणारी उड्डाणं 'एकतर्फीपणे स्थगित' केलेली आहेत.

या निवेदनात व्हेनेझुएलानं पुढे म्हटलं आहे की, "आम्ही थेट आंतरराष्ट्रीय समुदायाला, जगातील सार्वभौम सरकारांना, संयुक्त राष्ट्रांना, तसेच आम्ही संबंधित बहुपक्षीय संघटनांना आवाहन करतो की, त्यांनी आक्रमकतेच्या या अनैतिक कृत्याला ठामपणे नकार द्यावा."

व्हेनेझुएलाने बुधवारी सहा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांवर बंदी घातली. त्यामध्ये, आयबेरिया, टॅप पोर्तुगाल, गोल, लाटम, एवियान्का आणि तुर्की एअरलाइन्स या विमान कंपन्यांचा समावेश आहे. उड्डाणं पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना 48 तासांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यानंतर त्यांना तिथे उतरण्यापासून रोखण्यात आलं.

अमेरिकेने जगातील सर्वात मोठी विमानवाहू जहाज म्हणजेच यूएसएस जेराल्ड फोर्ड आणि सुमारे 15 हजार सैन्य व्हेनेझुएलाच्या जवळ तैनात केलेलं आहे.

1989 मध्ये पनामावर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने या प्रदेशात केलेली ही सर्वात मोठी तैनाती आहे. ही तैनाती अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी आहे, असा आग्रह अमेरिकेनं धरलेला आहे.

गुरुवारी, ट्रम्प यांनी असा इशारा दिला की, "जमिनीद्वारे" व्हेनेझुएलाच्या अमली पदार्थांची तस्करी थांबवण्याचे अमेरिकेचे प्रयत्न "लवकरच" सुरू होतील.

अमेरिकन सैन्याने बोटींवर किमान 21 हल्ले केले आहेत. या बोटींमधून ड्रग्ज वाहून नेलं जात असल्याचा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यांमध्ये 80 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, बोटी ड्रग्ज वाहून नेत असल्याचा पुरावा मात्र अमेरिकेने दिलेला नाही.

अमेरिकेच्या या कारवायांचा उद्देश मादुरो यांना पदच्युत करणं हाच आहे, असं व्हेनेझुएलाच्या सरकारला ठामपणे वाटतं. गेल्या वर्षी मादुरो यांच्या पुनर्निवडणुकीला व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षाने आणि अनेक परदेशी राष्ट्रांनी घोटाळा असल्याचं ठरवत निषेध केला होता.

अमेरिकेने 'कार्टेल डे लॉस सोल्स' किंवा 'कार्टेल ऑफ द सन'ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे. या गटाचे नेतृत्व मादुरो करत आहेत, असा अमेरिकेचा आरोप आहे.

जेव्हा एखाद्या संघटनेला दहशतवादी गट म्हणून घोषित केलं जातं, त्यानंतर अमेरिकेच्या कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अशा गटांना लक्ष्य करण्यासाठी व्यापक अधिकार मिळतात. त्यासोबतच, अमेरिकन लष्करालाही असे गट नष्ट करण्यासाठीचे व्यापक अधिकार मिळतात.

मात्र, व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्रालयानं या गटांना दहशतवादी ठरवण्याची ही घोषणा "स्पष्टपणे, ठामपणे आणि पूर्णपणे नाकारलेली" आहे.

व्हेनेझुएलाचे अंतर्गत आणि न्यायमंत्री डिओसदाडो कॅबेलो हे कार्टेलच्या उच्चपदस्थ सदस्यांपैकी एक असल्याचा आरोप आहे. त्यांनी दीर्घकाळापासून कार्टेलला "इन्व्हेन्शन" असं म्हटलेलं आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं असा आग्रह धरला आहे की कार्टेल डे लॉस सोल्स केवळ अस्तित्वातच नाहीये तर, या कार्टेलने "व्हेनेझुएलाचं सैन्य, गुप्तचर, कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था देखील भ्रष्ट करून टाकलेली आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)