कोईम्बतूरध्ये बिगर मुस्लीम महिलांच्या हिजाब चॅलेंज संदर्भातील व्हीडिओचे प्रकरण नेमके काय?

- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी
तामिळनाडूतल्या कोईम्बतूरमध्ये बिगर मुस्लीम महिलांना हिजाब घालायला लावून व्हीडिओ युट्यूबवर पोस्ट केल्याचा प्रकार घडला आहे. सायबर क्राइम विभागाच्या पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून हा वादग्रस्त व्हीडिओ युट्यूबवरून काढण्यात आला आहे.
या अटकेवरून आता चर्चेला उधाण आलं आहे. केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनीही अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते काय म्हणाले? आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊया.
नेमकं काय घडलं?
कोईम्बतूरमध्ये शहराच्या मध्यभागी रेस कोर्स हा भाग आहे. सकाळी आणि संध्याकाळी अनेक लोक तिथं फिरायला येतात. या भागात अनेक महाविद्यालयं असल्यामुळं कायम वर्दळ असते. विशेषत: कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांची इथं गर्दी असते.
याच ठिकाणी 3 सप्टेंबरला हा वादग्रस्त व्हीडिओ रेकॉर्ड करण्यात आला. तरुण मुलींसाठी हिजाब चॅलेंज या नावाने हा व्हीडिओ ‘अल कसवा’ या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित करण्यात आला.
या व्हीडिओत बिगर मुस्लीम मुली हिजाब घालून त्यांचा अनुभव सांगताना दिसतात. या व्हीडिओच्या थंबनेलवर त्यांनी एका मुलीचा ट्रॅक सूट आणि टी-शर्ट आणि त्यावर हिजाब असा फोटो लावला आहे. त्याला ‘बिफोर आणि आफ्टर’ असं कॅप्शन दिलं आहे.


हिंदू संघटनांनी केला विरोध
हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेक हिंदू संघटनांनी त्याविरुद्ध कमेंट्स केल्या. 'भारत सेना' या संघटनेचे पदाधिकारी एस. आर. कुमारसन यांनी कोईम्बतूर सायबर क्राईम युनिटकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारावर ‘अल कसवा’ या यूट्यूब चॅनेलचे पार्टनर अनस अहमद याला 6 सप्टेंबरला अटक करण्यात आली.

सध्या वादग्रस्त व्हीडिओ यूट्यूबवरून हटवण्यात आला आहे. पण संबंधित चॅनल चालवणारे इतर काही जण आणि हिजाब चॅलेंजशी संबंधिक कार्यक्रम करणारे, शुटिंग करणारे अशा संबंधितांविरोधात नेमकी काय कारवाई केली जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं सायबर क्राइम इन्स्पेक्टर शिवकुमार यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
‘हा फक्त सायबर गुन्हा नाही’
या अटकेविरोधात दोन दिवसांनंतर निदर्शनं करण्यात आली. सोशल डेमोक्रॅटिक पक्षाने या अटकेचा निषेध केला.
पक्षाच्या कोईम्बतूर विभागाचे प्रमुख मुस्तफा बीबीसी तामिळशी बोलताना म्हणाले की, “या व्हीडिओसाठी महिला हिजाब घालायला स्वत:हून तयार झाल्या होत्या. त्यामुळं या प्रकरणी अटक करणं निषेधार्ह आहे.”
मात्र, कुमारसन यांच्या मते हा धर्मांतर करण्याचा प्रयत्न आहे.
बीबीसी तामिळशी बोलताना ते म्हणाले की, “वरकरणी हा एखाद्या यूट्यूब चॅनेलसाठी केलेला व्हीडिओ वाटतो. पण बारकाईने पाहिल्यावर या मागचा उद्देश लक्षात येतो.
त्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांना बुरखा घातला आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही या पोशाखात किती छान दिसता. आधी इतक्या सुंदर का दिसत नव्हत्या? या वाक्यांचे अनेक अर्थ निघतात. यामागे एक वेगळा उद्देश आहे. हा धर्मांतर करण्याचा भ्याड प्रयत्न आहे.”

या बातम्याही वाचा:

महिलांचे मत काय?
ज्या ठिकाणी हा व्हीडिओ रेकॉर्ड केला त्या भागाला बीबीसी तामिळने भेट दिली. 9 सप्टेंबरला आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे मुलं मुली नेहमीप्रमाणे बसले होते. आम्ही काही मुलींशी या घटनेबद्दल बोललो. तेव्हा त्या म्हणाल्या की, हा व्हीडिओ केला म्हणून पोलिसांनी अटक केली हे ऐकून आम्हाला धक्का बसला.
प्रिता आणि मुबिना या दोन विद्यार्थिनींनी बीबीसी तामिळशी बोलताना म्हटलं की, “त्या मुलींनी स्वतः हिजाब परिधान केला आणि व्हीडिओ काढण्यास परवानगी दिली होती. त्यांनी ते इतकं गांभीर्याने घेतलं नाही, यासाठी कोणाला अटक होईल असं त्यांनाही वाटलं नसेल.
कोण आहे अनस अहमद ?
या प्रकरणात अटक झालेले अनस अहमद कुन्नूरचे आहेत. या व्हीडिओसारखेच इतर अनेक व्हीडिओ त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित केले आहेत. विविध विषयांवर त्यांनी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.
एका व्हीडिओत ते ‘दारू हेच सर्वनाशाचं कारण’ या विषयावर चर्चा करताना दिसतात. त्यामध्ये त्यांनी तामिळनाडूत ड्रग्समुळं झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची यादी केली आहे. एका व्हीडिओमध्ये ते काही बिगर मुस्लीम लोकांकडे जातात आणि त्यांना विचारतात की, “तुम्हाला मुस्लीम लोकांमध्ये काय आवडतं किंवा काय आवडत नाही?” ते काही लोकांना स्पष्टीकरण देऊन त्यांचं मत बदलण्याची विनंतीही करताना दिसतात.
हिजाब प्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 352,353(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 66F या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदेतज्ज्ञांचं मत काय?
अनस यांना ज्या कलमांखाली अटक करण्यात आली आहे, त्यांचा अर्थ काय आणि आता काय होईल असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ वकील शण्मुगाथन यांना विचारला.
ते म्हणाले की, “सार्वजनिक जागी शांतता भंग करणे, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणं या आरोपांखाली खटला दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा व्हीडिओ करण्याचा काही वेगळा उद्देश होता का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

इतक्या मुलींची मुलाखत घेतल्यावर कोणीही केस दाखल करायला आलं नाही याचा अर्थ केस फार काळ टिकणार नाही. मात्र एखाद्या महिलेने तक्रार दाखल केली तर, खटल्याला बळ मिळेल, असं ते म्हणाले.
“हे फक्त करमणुकीसाठी केलं आहे याचा अर्थ त्यामागे काही उद्देश नव्हता, असं मानता येणार नाही,” असंही ते पुढे म्हणाले.
नवीन कायद्याची गरज
ही अटक झाल्यानंतर दोन दिवसांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी कोईम्बतूरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“सध्या कोणीही युट्यूब चॅनेल सुरू करतो आणि कशाबद्दलही काहीही बोलतो. हे टाळण्यासाठी एक विधेयक लवकरच संसदेत सादर केलं जाईल. या विधेयकाचा मसुदा जनतेसमोर ठेवून त्यांच्या सूचनाही लक्षात घेतल्या जातील,” असंही ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











