अंतराळवीरांच्या आहारात असतील अळ्या आणि माशा; 'स्पेस मेनू'मध्ये सामील होणार कीटक

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अंतराळ संशोधनामध्ये माशीचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

आता भविष्यात अंतराळवीरांच्या 'स्पेस मेनू'मध्ये अळ्या आणि कीटकांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

आता हे वाचून 'ईईई' करू नका. इथे पृथ्वीवरही अनेक देशांत लहान कीटक खाल्ले जातात. अगदी आपल्या गडचिरोलीतही लाल मुंग्यांची चटणी केली जाते.

युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांत मिळून 2000 पेक्षा अधिक प्रजातींचे कीटक खाल्ले जातात.

तर असे हे कीटक कदाचित लवकरच अंतराळवीरांच्या डाएटचा भाग असतील. पण असं का केलं जातंय? त्यामुळे नक्की काय होईल? आणि कीटकांचा अंतराळ मोहिमांना कसा फायदा होऊ शकतो?

सगळ्यात आधी तुम्हाला हे माहिती आहे का, की माणूस अंतराळात जाण्याच्या कित्येक वर्ष आधी एक कीटक अंतराळात गेला होता.

माणूस पहिल्यांदा अंतराळात पोहोचला ते 1961 साली. युरी गागारीन यांनी पहिल्यांदा अंतराळात भ्रमंती केली. त्यांच्या आधी 1957 साली लायका नावाच्या एका कुत्रीला अंतराळात पाठवण्यात आलं होतं.

पण त्याही आधी 1947 साली अंतराळात जाणारा आणि जगणारा प्राणी होता एक 'फ्रूटफ्लाय' अर्थात एक फळमाशी.

जिवंत प्राण्यांवर अंतराळ प्रवासाचा, किरणोत्सर्गाचा काय परिणाम होतो, हे तपासण्यासाठी ही माशी अंतराळात पाठवण्यात आली होती.

तेव्हापासूनच अंतराळात शरीरावर होणारा परिणाम, वागणूक आणि इतर विकासात्मक संशोधनासाठी फळमाशीचा आधार घेतला जातो.

या माश्या मायक्रोगॅव्हीटी म्हणजे अगदी कमी गुरुत्वाकर्षणातही गर्भधारणेपासून ते प्रजननक्षम माश्यांची वाढ होण्यापर्यंतचे सगळे टप्पे पार पाडत त्यांचं पूर्ण आयुष्य जगू शकतात.

यानंतर 'बम्बलबीज' म्हणजे मोठी मधमाशी, 'हाऊसफ्लाईज्' म्हणजे घरात आढळणारी माशी तसेच अळ्या-मुंग्या यांच्यावरही अंतराळात प्रयोग करण्यात आले.

"अंतराळातल्या वातावरणाशी कीटक चांगले जुळवून घेतात. त्यांच्यामध्ये शारीरिक तणाव सहन करण्याची चांगली क्षमता असते," असं स्वीडिश युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर सायन्सेच्या प्रा. आसा बेर्ग्रेन यांनी म्हटलंय.

खाण्यायोग्य कीटकांवर कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो, याविषयी प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या त्या प्रमुख होत्या.

ज्या गोष्टी माणसं खाऊ शकत नाहीत, त्यांचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करण्याची क्षमता या कीटकांमध्ये असते आणि त्यामुळे परिणामी आपल्याला पोषक अन्न मिळू शकतं, असंही या संशोधनातून समोर आलंय.

पोषक घटकांवर पुनर्प्रक्रिया करण्याचा आणि शाश्वत पद्धतीने प्रथिनं तयार करण्याचा हा एक मार्ग ठरू शकतो.

या सगळ्यानंतर आता युरोपियन स्पेस एजन्सनीने युरोपातल्या अन्न, जीवशास्त्र आणि अंतराळ या विषयातल्या संशोधकांना एकत्र आणत एक टीम स्थापन केलीय.

या कीटकांचा अंतराळवीरांच्या आहारात समावेश करता येईल का, याचा अभ्यास ही टीम करते आहे.

पण किड्यांना इतकं महत्त्वं का दिलं जातंय? कारण या 'सुपरफूड'मध्ये पोषणमूल्य आणि चव अशा दोन्ही गोष्टी असतात.

अळ्या आणि काही इतर किड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं, फॅटी अ‍ॅसिड्स, लोह, झिंक आणि ब जीवनसत्त्व असल्याचं आढळलं. अनेक कीटकांमधलं पोषणतत्वांचं हे प्रमाण मांस, मासे वा डाळींपेक्षाही जास्त वा त्यांच्याइतकंच होतं.

या अंतराळ संशोधनाचा भर आहे 'हाऊस क्रिकेट' आणि 'यलो मीलवर्म'वर.

युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीने 2023 साली या दोन्ही कीटकांचं सेवन आणि विक्री यासाठी परवानगी दिलेली आहे.

या क्रिकेट किड्याचं पीठ हे प्रथिन युक्त असतं आणि ब्रेड, पास्ता, बिस्किटं करण्यासाठी वापरलं जातं.

2022 साली अंतराळ मोहीमेवर गेलेल्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या अंतराळवीर समांथा क्रिस्टोफोरेट्टी यांनी त्यांच्यासोबत या 'क्रिकेट फ्लोअर'चा ब्लूबेरी सिरीयल बार नेला होता.

मग आता या किड्यांचा समावेश अंतराळवीरांच्या आहारात लगेच होणार का? तर इतक्यात नाही.

कारण अंतराळाचा किड्यांवर काय आणि कसा परिणाम होतो, याबद्दलचं संशोधन अजून अपुरं आहे. आता उपलब्ध असलेला डेटा जुना आहे. 1960 ते 2000 सालांदरम्यान करण्यात आलेल्या प्रयोगांबद्दलचा आहे.

आजवर जास्तीत जास्त 50 दिवस कीटक अंतराळात ठेवून त्यांवर प्रयोग करण्यात आले आहेत. यापेक्षा अधिक कालावधीत काय होतं, याबद्दलचं संशोधन व्हायचंय आणि नवीन प्रयोगांची आखणी केली जातेय.

या संशोधनाचा फायदा दीर्घकालीन, दूरचा पल्ला असणाऱ्या अंतराळमोहीमांना होईल. अंतराळ स्थानकात असणाऱ्या अंतराळवीरांसोबत अन्न पाठवलेलं असतं, कार्गो मिशन्सद्वारे त्यांना सतत अन्न पुरवठा केला जातो.

पण चंद्रावर जाणाऱ्या, मंगळ वा त्याहीपुढे जाणाऱ्या मोहीमांना असा पृथ्वीवरून सतत पुरवठा करता येणार नाही. त्यावेळी अंतराळयानात असणारं कमी जागा, कमी पाणी लागणारं 'इन्सेक्ट फार्म' त्यांच्यासाठी पोषक अन्नाचा स्त्रोत ठरू शकतं.

सस्टेनेबल फूड प्रोडक्शन सिस्टीम म्हणजे अन्न निमिर्ती करणाऱ्या शाश्वत यंत्रणा कशा तयार करता येतील, याबद्दल नासाही संशोधन करते आहे.

शिवाय, हे कीटक अंतराळात कसे जगू शकतात, कसे जुळवून घेतात यामागचं विज्ञान उलगडलं तर तो जैवविज्ञानातला मोठा टप्पा असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)