निमिषा प्रियाच्या आधी किती भारतीयांना आखाती देशात फाशीची शिक्षा देण्यात आली?

- Author, सय्यद मोझीज इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला येत्या 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे.
निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी ही माहिती 'बीबीसी'ला दिली आहे.
दुसऱ्या देशात फाशीची शिक्षा होणारी निमिषा प्रिया ही पहिली भारतीय नाही.
मार्च 2025 मध्ये भारत सरकारने संसदेत सांगितलं होतं की, जगभरात आठ देशांमध्ये एकूण 49 भारतीय नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
त्यापैकी एकट्या संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्येच 25 भारतीयांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
काय आहे निमिषा प्रियाचं प्रकरण
येमेनमधील हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात राहणारी केरळमधील प्रशिक्षित नर्स निमिषा प्रिया हिला 16 जुलै 2025 रोजी फाशी देण्यात येणार आहे.
हे प्रकरण सध्या भारतात चर्चेचा आणि मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांबाबतचा विषय बनलं आहे.
निमिषा प्रिया 2008 साली येमेनची राजधानी सना इथं गेली आणि तिथल्या एका सरकारी रुग्णालयात काम करू लागली.
तिचे पती टॉमी थॉमस देखील 2012 मध्ये येमेनला गेले होते. पण तिथे नोकरी न मिळाल्यामुळे 2014 मध्ये ते आपल्या मुलीला घेऊन कोचीला परत आले.
यानंतर निमिषानं तिथे एक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक व्यापारी तलाल अब्दो महदीला आपला भागीदार बनवलं.

त्यात तलाल महदीला नशेचं इंजेक्शन देऊन त्याची हत्या केल्याचा आरोप निमिषा प्रियावर आहे.
येमेनमधील स्थानिक न्यायालयानं 2020 मध्ये निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तिच्या कुटुंबानं या निर्णयाला येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं, पण 2023 मध्ये त्यांचं अपील फेटाळण्यात आलं.
जानेवारी 2024 मध्ये हुती बंडखोरांच्या सर्वोच्च राजकीय परिषदचे अध्यक्ष महदी अल-मशात यांनी निमिषा प्रियाच्या फाशीला मंजुरी दिली.
यूएईमधील भारतीयांना मृत्यूदंड झाल्याची प्रकरणं
- शहजादी (बांदा, उत्तर प्रदेश)
- व्यवसायः घरगुती मदतनीस
- आरोपः चार महिन्यांच्या बाळाची हत्या
- अटकः 10 फेब्रुवारी 2023
- शिक्षाः 31 जुलै 2023 रोजी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, फेब्रुवारी 2025 मध्ये फाशी देण्यात आली.
शहजादी डिसेंबर 2021 मध्ये अबू-धाबीला गेली होती. ऑगस्ट 2022 पासून ती तिथे घरगुती मदतनीस म्हणून काम करत होती.
तिच्यावर चार महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याचा आरोप होता. या बाळाजी काळजी घेण्याची जबाबदारी तिच्याकडे होती.
शहजादीच्या नातेवाईकांच्या मते, त्या चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू चुकीचं इंजेक्शन (लस) दिल्यामुळे झाला होता. त्यामुळंच सुरुवातीला या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.
परंतु, सुमारे दोन महिन्यांनंतर बाळाच्या कुटुंबीयांनी खटला दाखल केला आणि त्यामुळे शहजादी अडचणीत सापडली.

शहजादीचे वडील शब्बीर यांच्यानुसार, त्यांची मुलगी 15 डिसेंबर 2021 रोजी अबू धाबीला गेली होती. ती ज्या बाळाची देखभाल करत होती, त्या बाळाचा मृत्यू 7 डिसेंबर 2022 रोजी झाला. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2023 रोजी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जेव्हा शहजादी तुरुंगात होती, त्यावेळी 'बीबीसी'ने मृत बाळाचे वडील फैज अहमद यांच्याशी संपर्क साधला होता.
फैज अहमद यांनी उत्तरात लिहिलं होतं, "शहजादीने माझ्या मुलाला क्रूरपणे आणि जाणूनबुजून मारलं, आणि ही गोष्ट यूएईच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत सिद्ध झाली आहे. एक पालक म्हणून मी माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी आमच्या वेदना समजून घ्याव्यात."
तर दुसरीकडे शहजादीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला फसवण्यात आल्याचा आरोप केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
मोहम्मद रिनाश (थलासेरी, केरळ)
- व्यवसायः ट्रॅव्हल एजंट
- आरोपः अरबी सहकाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
- शिक्षाः 15 फेब्रुवारी 2025 रोजी फाशी
रिनाश यूएईमध्ये ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करत होता. 2021 पासून तो अल ऐन शहरात नोकरी करत होता. त्याला अरबी नागरिक अब्दुल्ला झियाद अल राशिदच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
रिनाश आणि अब्दुल्ला यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. दोघंही एकाच ट्रॅव्हल एजन्सीत काम करत होते. या वादातून रिनाशने धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर रिनाश काही वर्षे अल ऐनमधील तुरुंगात कैद होता.
पीव्ही मुरलीधरन (कासारगोड, केरळ)
- व्यवसायः ड्रायव्हर
- आरोपः 2009 मध्ये खून करून मृतदेह वाळवंटात पुरला
- शिक्षाः 15 फेब्रुवारी 2025 रोजी फाशी
केरळच्या कासरगोड येथील मुरलीधरनला भारताचा नागरिक मुईद्दीनच्या खुनाच्या आरोपाखाली यूएईमध्ये फाशी देण्यात आली. मुरलीधरन 2006 पासून अल ऐनमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता, तिथे त्याचे वडीलही नोकरी करत होते.
2009 मध्ये मुईद्दीनचा खून करून त्याचा मृतदेह वाळवंटात पुरल्याचा आरोप त्याच्यावर होता. 14 फेब्रुवारीला मुरलीधरननं घरी शेवटचा फोन करून आपल्या शिक्षेविषयी माहिती दिली होती.
सौदी अरेबियातही भारतीयांना देण्यात आली मृत्यूदंडाची शिक्षा
- अब्दुल कादिर अब्दुररहमान (पलक्कड, केरळ)
- वयः 63 वर्ष
- आरोपः सौदी नागरिक युसूफ बिन अब्दुल अझीझची हत्या
- शिक्षाः ऑगस्ट 2024
ही घटना 2021 सालातील आहे. अब्दुर रेहमान याच्यावर आरोप होता की, वाद झाल्यानंतर त्यानं तिथल्या एका नागरिकावर हल्ला केला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
2024 मध्ये सौदी अरेबियाने एकूण 101 जणांना फाशीची शिक्षा दिली, ज्यामध्ये तीन भारतीयांचा समावेश होता.
संपूर्ण जगातील मृत्यूदंडाच्या शिक्षेची आकडेवारी
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, 2024 मध्ये 1,518 जणांना फाशी देण्यात आली, जी 2023 च्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक आहे. ही संख्या 2015 नंतरची सर्वात जास्त आहे.
सर्वाधिक मृत्यूदंड इराणमध्ये (किमान 972) देण्यात आले, ज्यामध्ये 30 महिला होत्या. सौदी अरेबियात 345 आणि इराकमध्ये 63 जणांना फाशी देण्यात आली.
चीन, व्हिएतनाम आणि उत्तर कोरियामधील आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु तिथं मृत्यूदंडाची शिक्षा सामान्य असल्याचे मानले जाते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











