You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'गाडगे महाराजांनी महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून पिढ्यांना घडवलं', असं का म्हटलं जातं?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
(संपूर्ण जगाला शिक्षणाची आणि स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबा यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने 2020 मध्ये लिहिलेला हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)
महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभली आहे. या संतांपैकी एक डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच संत गाडगेबाबा.
संत गाडगेबाबा हे फक्त संतच नव्हते, तर ते समाजसुधारक आणि कीर्तनकार होते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते.
आज महाराष्ट्रात अनेक कीर्तनकार आहेत. नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन अशा अनेक पद्धतींद्वारे कीर्तन करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे.
पण, संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांना घडवलं असं म्हटलं जातं.
गाडगेबाबा यांची कीर्तनाची पद्धत आणि त्यातून समाजावर झालेला परिणाम आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
'गाडगेबाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवली'
डॉ. सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. गेल्या 44 वर्षांपासून त्यांचा संतपरंपरेचा अभ्यास आहे. त्यांनी 'लोकमान्य ते महात्मा', 'ज्ञानोबा तुकाराम', 'पालखी सोहळा-उगम आणि विकास', 'अमृतानुभवाची वासुदेवी टीका', 'तुकाराम गाथेची देहू प्रत' ही पुस्तकंही लिहिलं आहे.
डॉ. सदानंद मोरे यांची राजा कांदळकर यांनी 'रिंगण' या आषाढी विशेषांकासाठी घेतलेली मुलाखत घेतली होती.
त्यात त्यांनी गाडगेबाबांविषयी म्हटलं, "संत गाडगे महाराज देहूत येत असत. ते खरे वारकरी. त्यांना वारकर्यातलं क्रांतीकार्य पहिल्यांदा कळलं. बाबांना तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, शामराव देसाई हे मोठे शिष्य लाभले. गाडगे बाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवून आणली."
"हिंदू धर्माचा सामाजिक वारसा सांगण्याचं, त्यातलं क्रांतीकारत्व उजळून दाखवण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. तसंच काम गाडगे महाराजांनी वारकरी संप्रदायांच्या बाबतीत केलं."
'तुलना शक्य नाही'
गाडगेबाबांचं कीर्तन भौतिकवादी असल्याचं मत साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस व्यक्त करतात.
त्यांच्या मते, "गाडगेबाबांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. गाडगेबाबा अध्यात्म पचवलेले आणि देवत्वाचे मूल्य पचवलेले संत होते. गाडगेबाबांचा देव हा लोकांच्या कल्याणामध्ये रममाण होणारा आहे. तो दगडात नाहीये. माणसांमध्ये देव पाहणारे गाडगेबाबा संत परंपरेमध्ये वेगळा ठसा उमटवून जातात. पारंपरिक संतत्वाला चौकटीतून मुक्त करून एक मोकळेपणाचा अनुभव गाडगेबांनी लोकांना दिला."
"सर्व प्रकारची विषमता, अंधश्रद्धा यांना गाडगेबाबांच्या कीर्तनात फाटा मिळालेला आहे. गाडगेबाबा निमित्तमात्र अध्यात्मवादी आहेत. त्यांचं कीर्तन पूर्णत: भौतिकवादी आहे. गाव साफ करणारे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करतात. माणूस भौतिकदृष्ट्या सुखीसंपन्न व्हावा, अशाप्रकारची परिवर्तनवादी भूमिका गाडगेबाबा आहे. त्यांचं कीर्तन प्रबोधनकारी आहे, कल्याणकारी आहे."
'काळानुरुप बदल आवश्यक'
आज मात्र कीर्तनाचं स्वरुप बदललेलं दिसून येतं. कीर्तनकारांवर कॉमेडियन झाल्याची टीकाही करण्यात येते.
पण, कीर्तनाच्या स्वरूपात काळानुरुप बदल आवश्यक आहेत, असं मत संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक उदय जाधव मांडतात.
ते म्हणतात, "गाडगेबांबाचा काळ वेगळा होता. गाडगेबाबा कृतीशील संत होते. आधी केले, मग सांगितले, असे ते होते. चिंध्या पांघरूण सोन्यासारखा विचार देणारा संत म्हणजे गाडगे महाराज. पण, आता बदलणाऱ्या काळाप्रमाणे कीर्तन ऐकून मनाला आणि कानाला सुख वाटलं पाहिजे."
'चांगल्यावर भर द्यावा'
कीर्तनकारानं आपल्या कीर्तनातून चांगलं काय ते सांगावं. लोकांच्या उणीवा, त्यांच्या कमीपणाची खिल्ली उडवू नये. गाडगेबाबांनी कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश देशाला दिला. त्याप्रमाणे व्यसनमुक्ती, वासना यावर बोलावं, असं मत भारूडकार चंदाताई तिवाडी व्यक्त करतात.
त्या म्हणतात, "गाडगेबाबा ज्या गावात कीर्तनाला जायचे, त्या गावात जेवतसुद्धा नसत. आताचे कीर्तनकार मात्र कीर्तनाचे पैसे अॅडव्हान्स घेतात. दिनचर्यापुरते पैसे घेणं ठीक आहे, पण त्यातून मी शाळा चालवतो, आश्रम चालवतो, हे सगळं कशासाठी सांगावं लागतं?"
यारे सारे लहान थोर । याति भलते नारी नर।।
असं तुकाराम महाराज म्हणायचे. त्याप्रमाणे सगळ्यांचा आदर करून कीर्तन करायला हवं, असं त्या पुढे सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)