गर्भात 15 महिन्यांचं पिल्लु, पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा; गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूला कोण जबाबदार?

- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी तमिळ
कोइम्बतूरमधील मरुथमलाई टेकडीच्या पायथ्याशी एका गर्भवती हत्तीणीचा प्रकृती खालावल्यामुळे मृत्यू झाला. परंतु, या हत्तीणीच्या मृत्यूचं समोर आलेलं कारण धक्कादायक आहे. प्लास्टिक कचरा खाल्ल्याने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
मरुथमलाई आणि वेल्लियांगिरी सारख्या वनक्षेत्रात असलेल्या आध्यात्मिक पर्यटन स्थळांमध्ये प्लास्टिकचा अतिरेकी वापर हत्तींसह वन्यजीवांसाठी एक मोठा धोका बनत चाललाय.
यामुळे उटी आणि कोडाईकनालसारख्या डोंगराळ भागातील पर्यटन स्थळांमध्ये प्लास्टिक आणि पॉलिथिन पिशव्यांवर ज्याप्रमाणे बंदी घालण्यात आली आहे, त्याचप्रमाणे वनक्षेत्रातील आध्यात्मिक केंद्रांमध्येही या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या संदर्भात वन विभागाच्या अधिकार्यांनी तमिळनाडू सरकारला शिफारस केली असल्याचे सांगितलं आहे.
कोइम्बतूर शहराजवळील पश्चिम घाटातील पर्वतरांगांचा एक भाग म्हणजे मरुथमलाई. या टेकडीवर असलेले सुब्रह्मण्यम स्वामी मंदिर धार्मिकदृष्ट्या भगवान मुरुगन यांचं सातवं निवासस्थान मानलं जातं.
हे मंदिर जिथं बांधलं आहे, तो परिसर आणि आजूबाजूच्या टेकड्या कोइम्बतूर वन राखीव क्षेत्रात आहेत.
गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूचं कारण काय?
हे वनक्षेत्र हत्ती, बिबट्या आणि रानडुकरांसह विविध वन्य प्राण्यांचे निवासस्थान आहे. आशियाई हत्तींचे निवासस्थान आणि स्थलांतर मार्ग असलेल्या या पर्वतीय भागाजवळ भारतीय भाषाशास्त्र विद्यापीठ देखील आहे आणि ते सुमारे 100 एकर क्षेत्रावर पसरलेले आहे.
17 मे रोजी, या परिसरात एक हत्तीणी बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या जवळच एक हत्तीचे पिल्लूही उभे होते.
वन विभागाचे अधिकारी आले. त्यांनी क्रेनच्या मदतीने बेशुद्ध हत्तीणीला उचलले आणि तिच्यावर उपचार केले. वन विभागात काम करणाऱ्या 5 पशुवैद्यांनी एकत्रितपणे उपचार केले.
परंतु, हत्तीणीचा मृत्यू झाला. जेव्हा शवविच्छेदन करण्यात आले, तेव्हा हत्तीणीच्या पोटात 15 महिन्यांचं पिल्लु होतं. तिच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, पॉलिथिन आणि कागदी कचरा देखील आढळून आला.

हत्तीण गर्भवती आहे, हे जाणून न घेताच पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, तिच्या पोटावर पाय ठेवले, असं वृत्त विविध प्रसार माध्यमात आलं आहे.
हे सर्व आरोप वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, उपचार करणाऱ्या आणि शवविच्छेदन करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी नाकारले आहेत.
शवविच्छेदन करणारे वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुकुमार यांनी बीबीसीला सांगितलं, "हत्तीणीला शारीरिक दुखापती झाल्या होत्या आणि तिचे अनेक अवयव निकामी झाले होते."
"हत्तीणीच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा होता. तिथल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील अन्न खात असतानाच प्लास्टिक आणि पॉलिथिनही पोटात गेले. यामुळेच तिला आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या."
"हत्ती पडलेल्या परिसरातील मातीत 10 पेक्षा जास्त लोणच्याचे प्लास्टिक रॅपर होते. हत्तीने ते सर्व खाल्ले होते. मी यापूर्वी अनेक हत्तींचे शवविच्छेदन केले आहे, तेव्हा प्लास्टिक किंवा पॉलिथिनचे एक किंवा दोन तुकडे मिळत. पण या हत्तीइतका प्लास्टिक कचरा मी कधीच पाहिला नव्हता," असं डॉ. सुकुमार म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
मृत हत्तीण गर्भवती असल्याची माहिती न घेता उपचार केल्याचे आरोप फेटाळताना दुसरे पशुवैद्यकीय डॉ. कलाईवनन म्हणाले, "मादी जंगली प्राण्यावर उपचार करताना ती गर्भवती असण्याची शक्यता गृहीत धरूनच उपचार केले जातात."
"याशिवाय, गर्भवती हत्तीणीसाठी वेगळी आणि इतर हत्तीणींसाठी वेगळी उपचार पद्धत देणे शक्य नाही. सर्वांना समान उपचार पद्धती दिली जाते."
गर्भवती असतानाही तिच्या पोटावर पाय ठेऊन उपचार केल्याचा आरोप फेटाळताना ते म्हणाले की, "हत्तीसाठी दिले गेलेले उपचार नेहमीच प्रमाणित असतात."
"हृदयविकाराचा झटका आल्यास, मानवांसाठी दिल्या जाणाऱ्या सीपीआरप्रमाणेच त्यांच्या छातीवर दाब देऊन उपचार केले जातात. हत्तीणीच्या मृत्यूचे मुख्य कारण हे खराब झालेले अन्न आणि प्लास्टिक कचरा आहे."
'हत्तीच्या विष्ठेमध्ये 70 टक्के प्लास्टिक कचरा'
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मृत हत्तीणीच्या गुदाशयात, लहान आतड्यात आणि मोठ्या आतड्यात प्लास्टिक, पॉलिथिन आणि ॲल्युमिनियम फॉइलसह विविध कचरा होता. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, मृत हत्तीणीच्या 70 टक्के विष्ठेत, तसेच परिसरातील सर्व हत्तींच्या विष्ठेत प्लास्टिकचा कचरा होता.
"हरीण आणि गुरंढोरं यांसारख्या वन्य प्राण्यांचे पोट चार भागांमध्ये असतात, त्यामुळे त्यांनी प्लास्टिक कचरा खाल्ला तरी ते कुठेतरी अडकतं आणि पोट फुगू शकतं."
"पण हत्ती हा एकच पोट असणारा प्राणी असल्याने, त्यानं प्लास्टिक खाल्लं तरी ते बाहेर पडेल. पण ते खाल्ल्याने होणारे नुकसान जीवघेणं ठरू शकतं," असं डॉ. सुकुमार म्हणाले.
वन विभागाच्या पशुवैद्यकांनी सांगितलं की, प्लास्टिक कचऱ्याचे सतत सेवन केल्याने हत्तीणीच्या तोंडाला आणि घशाला इजा झाली असावी, तिच्या पोटात संसर्ग झाला असावा आणि ती खाऊ शकत नव्हती.
त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्यामुळे कचऱ्याचे नैसर्गिकरित्या विष्ठा बाहेर काढण्यासही अडथळा आलेला असावा, असंही त्यांनी सांगितलं.

या मृत हत्तीसह, त्या परिसरात राहणाऱ्या इतर अनेक वन्य हत्तींनी देखील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा सेवन केल्याचे त्यांच्या विष्ठेच्या तपासणीमध्ये दिसून आले आहे.
दोन वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका हत्तीच्या पोटात किलोभर प्लास्टिक कचरा सापडला होता. याचे कारण, वनक्षेत्राच्या जवळ असलेल्या एका रिकाम्या जागेत सोमय्यमपलयम ग्रामपंचायतीमध्ये संकलित केलेला कचरा टाकण्यात येत होता.
विविध माध्यमांनी आणि वन्यजीव कार्यकर्त्यांनी या घटनेचे असंख्य फोटो आणि व्हीडिओ प्रकाशित केले आहेत. पंचायत प्रशासनाला कचराकुंडी हटविण्याची विनंती केली आहे, परंतु अद्याप त्यांनी तसं केलेलं नाही.
आता, या हत्तीणीच्या मृत्यूनंतर, कोइम्बतूरचे जिल्हाधिकारी पवन कुमार यांच्या आदेशानुसार, कचराकुंडी हटवून तेथे माती टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, मरुथमलाई मंदिर आणि त्याच्या पायथ्याशी प्लास्टिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
"हत्तींसह वन्य प्राण्यांना बाहेर ठेवण्यासाठी परिसराभोवती एक आधुनिक कुंपण उभारलं जाईल आणि 'पेव्हर्स ब्लॉक' साइट बांधण्यासाठी आणि बायो-मायनिंग वापरून कचरा नष्ट करण्यासाठी पावलं उचलली जातील."
"कचरा दिसू नये म्हणून परिसरात झाडे लावली जातील," असं कोइम्बतूरचे जिल्हाधिकारी पवन कुमार यांनी सांगितलं.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार, कचराकुंडी त्या ठिकाणाहून हलवली जाणार नाही, हे उघड झालं आहे. परंतु, अनेक पर्यावरणवादी आणि वन्यजीव कार्यकर्ते सोशल मीडियाद्वारे त्याचे कायमचे स्थलांतर करण्याची मागणी करत आहेत.
बीबीसी तमिळने कचराकुंडी असलेल्या भागात आणि मरुथमलाईच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात संशोधन केलं, तेव्हा असं आढळून आलं की, डोंगराळ भागातील दुकानामध्ये चंदन, कुंकुवासारख्या वस्तू बहुतेकवेळा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विकल्या जात नाहीत.
परंतु, पायथ्याशी असलेल्या दुकानांमध्ये वडे, अप्पमसारखे खाद्यपदार्थ आणि पारंपारिक खेळण्यापर्यंत सगळ्याच वस्तू प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विकले जातात. हॉटेलसह इतर दुकानांमध्ये प्लास्टिक आणि पॉलिथिन कॅरीबॅग्जचा वापर मोठ्या प्रमाणात आढळून आला.
भाविकांनी खरेदी केलेले अन्नपदार्थ आणि इतर वस्तू डोंगराच्या माथ्यावर आणि डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्यांवर टाकल्यामुळे तिथे खूप कचरा होता. त्याचप्रमाणे, मरुथमलाई बसस्थानकावर आणि जंगलाशेजारील रिकाम्या जागेत, प्लास्टिक कचऱ्याचे ढीग साचले होते आणि त्याच्या बाजूला गायी चरताना दिसत होत्या.

बीबीसी तमिळशी बोलताना, सोमय्यम्पलयम ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सेंथिलकुमार म्हणाले, "जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, त्या ठिकाणचा कचरा काढून टाकण्यात आला आहे. तेथे दगड बसवण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत."
"मरुथमलाईला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कचरा लवकर जमा होतो. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या खूपच मर्यादित आहे, त्यामुळे त्यांना नियमितपणे काढून टाकणं शक्य नाही," असंही ते म्हणाले.
बीबीसी तमिळशी बोलताना, धर्मादाय विभागाचे उपायुक्त सेंथिलकुमार म्हणाले, "डोंगरमाथ्यावरील मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी 20 सफाई कर्मचारी काम करत आहेत."
"ते वेळोवेळी पायऱ्यांवरील आणि मंदिराभोवतीचा कचरा गोळा करतात आणि पिशव्यांमध्ये टाकतात. मंदिर महामंडळाच्या ताब्यात असल्याने ते दररोज ते काढून घेतात. खालील कचऱ्याचा मंदिर प्रशासनाशी काहीही संबंध नाही," असं ते म्हणाले.

वन विभाग दरवर्षी प्लास्टिक आणि कॅरीबॅगच्या वापराला मर्यादा घालण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवतो, पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. यामध्ये इतर वन्य प्राण्यांपेक्षा हत्तीच सर्वाधिक प्रमाणात प्रभावित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका अहवालात असं म्हटलं आहे की, यामुळे वन्यजीवांना न्यूरोलॉजिकल नुकसान होत आहे आणि पुनरुत्पादनावर परिणाम होत आहे. नेचर कॉन्झर्व्हेशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात आशियाई हत्तींना प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या धोक्यांचा तपशीलवार अभ्यास केला आहे.
त्यात म्हटलं आहे की, प्लास्टिक कचऱ्यामुळे प्राण्यांमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या पुनरुत्पादनावर परिणाम होतो.
डोंगरालगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे समस्या
खरं तर, तमिळनाडूमध्ये आशियाई हत्तींना प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे नुकसान आणि धोका वर्षानुवर्षे वाढत आहे, असे फ्रेंड्स ऑफ द अर्थचे इंजिनियर गो. सुंदरराजन म्हणतात.
ज्याप्रमाणे ऊटी आणि कोडाईकनाल सारख्या डोंगराळ भागात प्लास्टिक आणि पॉलिथिन कॅरीबॅग्जवरील बंदी कडकपणे लागू केली जाते, त्याचप्रमाणे मरुथमलाई आणि वेल्लियांगिरी सारख्या आध्यात्मिक पर्यटन स्थळांमध्ये देखील प्लास्टिक आणि पॉलिथिनवर पूर्ण बंदी घातली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

सुंदरराजन म्हणाले की, आम्ही या आध्यात्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर चौक्या उभारू, त्या वन विभागाकडे सोपवू आणि प्लास्टिक वस्तू बंद करण्यासाठी कारवाई करण्याचा आग्रह धरू. वन विभागाला वाहनांची तपासणी करून दंड आकारण्याचे अधिकार दिल्यास यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
तमिळनाडू सरकार काय म्हणतं?
याबाबत बीबीसी तमिळशी बोलताना राज्याच्या वन विभागाच्या सचिव सुप्रिया साहू म्हणाल्या, "तमिळनाडूमध्ये आधीच 14 प्रकारच्या सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे."
"या समस्ये संदर्भात, जंगलाच्या जवळ असलेल्या भागांमध्ये कचरा टाकणं हे जंगली प्राण्यांसाठी मोठं संकट ठरतंय. अशाप्रकारे जंगलाजवळ असलेला सर्व कचरा इतर कचरा गोळा करणाऱ्या स्थळी हलवणं हे स्थानिक प्रशासनाचं कर्तव्य आहे."
"मी याबाबत कोइम्बतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले आहे. सर्व जिल्हा वन अधिकाऱ्यांना तमिळनाडूमधील जंगलांना लागून असलेल्या कचराकुंड्यांचे जीपीएस सर्वेक्षण करण्याचे आणि ते हटवण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत."
"मी या संदर्भात स्थानिक प्रशासन सचिवांना पत्रही लिहिलं आहे. आता पुन्हा असं घडणार नाही," असंही सुप्रिया साहू म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











