मोस्ट वॉन्टेड हॅकर टँक; एफबीआयला 15 वर्षे चकवणाऱ्या हॅकरची कहाणी

व्याचेस्लाव पेंचुकोव्ह
फोटो कॅप्शन, व्याचेस्लाव पेंचुकोव्ह याला सायबर जगतात 'टँक' म्हणून ओळखलं जातं. त्याने जगभरातील हजारो लोकांना सायबर फसवलं आहे.
    • Author, जो टायडी
    • Role, सायबरसुरक्षा प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

'टँक'बद्दल अनेक वर्षे वाचत आलो होतो. कोलोरॅडोमधील तुरुंगात जाऊन त्याची भेट घेण्याचं अनेक महिन्यांपासून नियोजनही केलं.

अखेर तो दिवस ठरल्यानंतर मी त्या तुरुंगात गेलो. तो आत येण्यापूर्वीच मला दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला.

सायबर गुन्हेगारी जगतातील जुन्या बॉसचं सन्मानपूर्वक स्वागत करण्यासाठी मी माझ्या जागेवरून उभा राहिलो.

पण एखाद्या खोडकर कार्टूनच्या पात्राप्रमाणे, तो एका खांबाच्या मागं उभा राहिला. तिथून तो डोकं बाहेर काढून स्मितहास्य करत, माझ्याकडे डोळे मिचकावत पाहत होता.

टँक, ज्याचं खरं नाव व्याचेस्लाव पेंचुकोव्ह आहे. तो सायबर गुन्हेगारीच्या जगात फक्त तांत्रिक कौशल्यामुळे नाही, तर आपल्या करिष्म्यामुळे शिखरावर पोहोचला.

"मी एक फ्रेंडली माणूस आहे, मी सहज मित्र बनवतो," स्मितहास्य करत 39 वर्षीय युक्रेनियन टँकनं स्वतःबद्दल सांगितलं.

मोठमोठ्या लोकांबरोबर मैत्री असल्यामुळे पेंचुकोव्ह बराच काळ पोलिसांपासून स्वतःला वाचवू शकला असं सांगितलं जातं. तो जवळजवळ 10 वर्षे एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता आणि सायबर गुन्हेगारीच्या दोन वेगवेगळ्या काळात दोन वेगळ्या टोळ्यांचा तो म्होरक्या होता.

इतक्या लोकांना त्रस्त करणाऱ्या हायलेव्हल सायबर गुन्हेगाराशी बोलणं क्वचितच शक्य होतं. पेंचुकोव्हने 2 दिवसांत 6 तास आमच्याशी संवाद साधला आणि सर्व सांगितलं. ही माहिती पॉडकास्ट 'सायबर हॅक: इव्हिल कॉर्प' सिरीजचा एक भाग आहे.

पेंचुकोव्हची ही विशेष आणि पहिलीच मुलाखत. यात मोठ्या सायबर टोळ्यांची अंतर्गत कामं, त्यामागील काही लोकांचे विचार आणि अद्याप पकडले गेले नाहीत अशा हॅकर्सविषयी, ज्यात परवानगी मिळालेल्या रशियन ग्रुप 'इव्हिल कॉर्प'चा प्रमुखही आहे, अशी माहिती उघड केली.

अखेर 2022 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये एका नाट्यमय कारवाईत पेंचुकोव्हला अटक झाली. तपासयंत्रणांना त्याला अटक करण्यासाठी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला.

"छतावर स्नायपर्स होते, पोलिसांनी मला जमिनीवर बसवलं. हातात बेड्या घातल्या आणि माझ्या डोक्यावर पिशवी टाकली, तेही माझ्या मुलांच्यासमोर. मुलं घाबरली होती," हे सांगताना मात्र त्याला प्रचंड राग आला होता.

प्रतिनिधी जो टायडी कोलोरॅडोमधल्या एंगलवुड सुधारगृहाबाहेर.
फोटो कॅप्शन, प्रतिनिधी जो टायडी कोलोरॅडोमधल्या एंगलवुड सुधारगृहाबाहेर.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अजूनही त्याला ज्या पद्धतीने अटक करण्यात आली, त्याबद्दल त्याला राग आहे. तो म्हणतो की कारवाई जरा जास्तच होती. पण त्याला बळी पडलेले जगभरातील हजारो लोक मात्र त्याच्या मताशी सहमत नसतील.

पेंचुकोव्ह आणि त्याच्या टोळ्यांनी किंवा ज्या टोळ्यांचा तो भाग होता, त्यांनी या लोकांचे लाखो पाउंड, डॉलर्स चोरले होते.

2000 च्या दशकातील शेवटच्या काळात, तो आणि कुख्यात 'जॅबर झ्यूस' टोळ्या, आधुनिक सायबर गुन्हेगारी तंत्र वापरून छोटे व्यवसाय, स्थानिक संस्था आणि धर्मादाय संस्था यांच्या बँक खात्यांमधून थेट पैसे चोरी करत असत.

त्यांच्या या कृत्यामुळे लोकांच्या बचती गायब झाल्या, त्यांचं आर्थिक गणित बिघडलं. फक्त यूकेमध्येच अवघ्या 3 महिन्यांत 600 पेक्षा जास्त लोकांनी एकूण 4 दशलक्ष पाउंड (सुमारे 5.2 दशलक्ष डॉलर) गमावले.

2018 ते 2022 दरम्यान, पेंचुकोव्हने मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीमध्ये लक्ष घातलं. मोठ्या कंपन्या आणि रुग्णालयांवर हल्ला करणाऱ्या रॅन्समवेअर टोळ्यांमध्ये सामील झाला.

पेंचुकोव्हला एंगलवुड सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. तिथे आम्हाला रेकॉर्डिंगचे कोणतेही उपकरण आत नेण्याची परवानगी नव्हती. म्हणून मी आणि एका निर्मात्याने एका सुरक्षा रक्षकाच्या देखरेखीखाली मुलाखतीदरम्यान नोंदी घेतल्या.

व्हीडिओ गेम्सपासून ते सायबर क्राइमपर्यंत

पेंचुकोव्हबद्दल लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे, तो तुरुंगातून सुटण्यास उत्सुक असला तरी तो तिथे आनंदी आणि चांगल्या मनस्थितीत दिसला. तुरूंगातील आपल्या वेळेचा तो पुरेपूर फायदा घेत आहे.

तो सांगतो की, तो खूप खेळ करतो. फ्रेंच आणि इंग्रजी शिकत आहे. आमच्या मुलाखतीदरम्यान त्याच्या जवळ एक जुना रशियन-इंग्रजी शब्दकोश होता आणि तो हायस्कूल डिप्लोमाही घेत आहे.

मी त्याला म्हटलं, "तू हुशार आहेस."

त्यावर त्यानं विनोदानं उत्तर दिलं आणि म्हणाला, "मी पूर्ण हुशार नाही. मी तर तुरुंगात आहे."

एंगलवुड हे कमी सुरक्षा असलेला तुरुंग असून इथे चांगल्या सुविधा आहेत. ही कमी उंचीची पण विस्तीर्ण इमारत कोलोरॅडोमधील रॉकी पर्वताच्या पायथ्याशी आहे.

तुरुंगाभोवती धुळीने माखलेल्या गवताळ कडांवर गोंगाट करणारी प्रेअरी कुत्रे दिसतात. तुरुंगातील ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे त्रास झाली की हे कुत्रे तेथून पळून जातात.

पेंचुकोव्ह
फोटो कॅप्शन, दिवसा हॅकिंगचं काम केल्यानंतर, पेंचुकोव्ह रात्री डीजे स्लाव्हा रिच नावाने काम करत असत.

डोनेस्तक, युक्रेनपासून खूप दूर आहे. तिथे त्याने आपली पहिली सायबर क्राइम टोळी चालवली. तो हॅकिंगमध्ये गेम्सच्या चीट फोरममधून आला होता. जिथे तो आपल्या आवडत्या व्हीडिओ गेम्ससाठी, जसं की फिफा 99 आणि काऊंटरस्ट्राइकसाठी चीट शोधायचा.

तो 'जॅबर झ्यूस' टोळीचा नेता झाला. या टोळीचं नाव हे त्यांच्या झ्यूस मालवेअर आणि आवडतं संवाद साधन 'जॅबर' प्लॅटफॉर्ममुळे देण्यात आलं.

पेंचुकोव्ह हॅकर्सच्या काही छोट्या गटासोबत काम करत होता. त्यात मॅक्सिम याकूबेट्स नावाचा रशियन हॅकरही होता. त्याला नंतर अमेरिकेच्या सरकारने प्रतिबंधित केलं. त्याच्यावर कुख्यात सायबर ग्रुप 'इव्हिल कॉर्प' चालवण्याचा आरोप होता.

पेंचुकोव्ह सांगतो की, 2000 च्या दशकाच्या उत्तरार्धात, 'जॅबर झ्यूस' टोळी डोनेस्तकच्या मध्यभागी असलेल्या एका ऑफिसमधून काम करत असत. परदेशात पीडित लोकांकडून पैसे चोरण्यासाठी दररोज तो 6 ते 7 तास काम करत असत.

पेंचुकोव्ह अनेकदा दिवस संपल्यावर शहरात 'डीजे स्लाव्हा रिच' या नावाने डीजेचं काम करत असत.

त्या काळात सायबर गुन्हेगारी म्हणजे 'इझी मनी' होतं, असं तो सांगतो. बँकांना याचा सामना कसा करायचा हे कळत नव्हतं आणि अमेरिका, युक्रेन आणि ब्रिटनमधील पोलीसही त्याला थांबवू शकत नव्हते.

महागड्या गाड्यांचा चाहता

वयाच्या विशीतच तो इतका पैसा कमावत होता की, तो स्वतःसाठी 'कपडे बदलल्याप्रमाणे नवीन कार' घेत असत. त्याच्याकडे एकूण सहा कार होत्या,'सर्व महागड्या जर्मन कार' होत्या.

'जॅबर'वरून गुन्हेगारांच्या मेसेजचा मागोवा घेताना पोलिसांना मोठं यश मिळालं. त्यावेळी टँकची खरी ओळख शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. त्याने आपल्या मुलीच्या जन्माबाबत दिलेल्या माहितीमुळे त्याची ओळख उघड झाली.

जॅबर झ्यूस टोळीवर जाळं विणलं गेलं आणि एफबीआयच्या 'ट्रायडेंट ब्रीच' कारवाईत युक्रेन आणि ब्रिटनमध्ये अटक झाली. पण पेंचुकोव्ह एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या गुप्त माहितीमुळे आणि आपल्या एका स्पोर्ट्स कारमुळे बचावला.

"माझ्याकडे ऑडी एस8 होती, ज्याला 500 हॉर्सपॉवरचं लॅम्बोर्गिनीचं इंजिन होती. जेव्हा मी रिअर व्ह्यू मिररमध्ये पोलिसांच्या लाईट्स पाहिल्या, तेव्हा मी सिग्नलवरील रेड लाइट ओलांडून तेथून सहज निसटलो. त्यामुळे मला माझ्या कारची पूर्ण ताकदही वापरून पाहता आली," असं त्यानं सांगितलं.

तो काही काळ एका मित्राकडे लपून राहिला. जेव्हा एफबीआयने युक्रेन सोडलं, तेव्हा स्थानिक अधिकाऱ्यांनाही त्याच्यामध्ये रस राहिला नाही.

म्हणून पेंचुकोव्ह लपून राहिला, आणि त्यानंतर तो सरळ मार्गावर आल्याचं त्यानं सांगितलं. त्याने कोळसा खरेदी-विक्रीची एक कंपनी सुरू केली, पण एफबीआय अजूनही त्याच्या मागावर होती.

पेंचुकोव्ह (उजवीकडे)

फोटो स्रोत, FBI

फोटो कॅप्शन, पेंचुकोव्ह (उजवीकडे) एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेंडपैकी एक होता. त्याचे दोन साथीदार अजून पकडले गेलेले नाहीत.

"मी क्रिमियामध्ये सुट्टीवर होतो. तेव्हा एका मित्राचा मला मेसेज आला की, माझा एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेंड यादीत समावेश आहे. मला वाटलं होतं की, मी तर सर्व काही सोडलंय. आता ही एक नवीन समस्या असल्याचे स्पष्ट झालं."

त्यावेळी त्याचे वकील शांत राहिले आणि काळजी करू नको असा सल्ला त्यांनी त्याला दिला. जोपर्यंत तो युक्रेन किंवा रशियाच्या बाहेर प्रवास करत नाही, तोपर्यंत अमेरिकन पोलीस फारसं काही करू शकणार नाहीत, असा दिलासा त्यांनी त्याला दिला.

अखेर युक्रेनचे अधिकारी त्याच्या घरी पोहोचले. परंतु, त्याला अटक करण्यासाठी नाही.

पेंचुकोव्ह हा पाश्चात्य देशांना हवा असलेला एक श्रीमंत हॅकर म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे अधिकारी जवळजवळ दररोज त्याच्याकडून खंडणी घेत असत, असा दावा त्याने केला.

त्याचा कोळसा खरेदी-विक्रीचा व्यवसाय चांगला चालला होता. परंतु, 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर केलेल्या आक्रमणामुळे तो बंद पडला.

अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या 'लिटिल ग्रीन मेन' निशाण न लावलेल्या युनिफॉर्ममधील रशियन सैनिकांनी त्याचा व्यवसाय उद्धवस्त केला आणि डोनेस्तकमधील त्याच्या अपार्टमेंटवर क्षेपणास्त्र हल्ला केला. ज्यामुळे त्याच्या मुलीच्या बेडरुमचं मोठं नुकसान झालं.

पुन्हा सायबर गुन्हेगारीत प्रवेश

व्यवसायातील अडचणी आणि युक्रेनमधील अधिकाऱ्यांना सतत द्यावी लागणारी लाच यामुळे त्याला पुन्हा आपला लॅपटॉप सुरू करावा लागला आणि त्याला पुन्हा सायबर गुन्हेगारीत शिरावं लागल्याचं पेंचुकोव्हने सांगितलं.

"मी ठरवलं की त्यांना पैसे देण्यासाठी पैसे कमवण्याचा हाच सर्वात वेगवान मार्ग आहे."

त्याचा एकंदर प्रवास हा आधुनिक सायबर गुन्हेगारीच्या बदलाचा मागोवा दाखवतो. सुरुवातीला बँक खात्यांमधील चोरी पासून-रॅन्समवेअरपर्यंत ते आजचा सर्वात धोकादायक सायबर हल्ला आणि युकेमधील प्रसिद्ध मार्क्स अँड स्पेन्सरसारख्या साखळी दुकांनावरील हल्ल्यांचा समावेश आहे.

तो म्हणाला की, रॅन्समवेअर हे कष्टाचं काम होतं, पण त्यात पैसे चांगले मिळायचे. "सायबर सिक्युरिटीमध्ये खूप सुधारणा झाली होती, पण तरीही आम्ही महिन्याला सुमारे 200,000 अमेरिकन डॉलर्स कमवू शकत होतो. यात नफा खूप होता."

यावेळी त्याला एक किस्सा आठवला. तो म्हणाला की, एका टोळीबद्दल अफवा पसरली होती की, रॅन्समवेअरने ठप्प झालेल्या रुग्णालयाकडून त्यांना 20 दशलक्ष डॉलर्स (15.3 दशलक्ष पाऊंड) दिले गेलेत.

पेंचुकोव्ह सांगतो की, या बातमीमुळे गुन्हेगारी जगतात असलेले शेकडो हॅकर्स उत्साहित झाले आणि अशा पद्धतीने भरपूर पैसा मिळेल या आशेने अमेरिकेतील रुग्णालयांवर हल्ले करू लागले.

या हॅकर ग्रुप्समध्ये 'कळपाची मानसिकता' असते, असं तो यावर म्हणतो. "कोणालाच रुग्णालयांबद्दल किंवा रुग्णांच्या जीविताबद्दल काहीही पडलेलं नसतं, त्यांच्या डोळ्यांना फक्त 20 दशलक्ष डॉलर दिसत असतात."

पेंचुकोव्हने आपलं नेटवर्क आणि कौशल्यं पुन्हा वाढवली आणि मेझ, एग्रेगर आणि प्रॉलिफिक कॉन्टी ग्रुप यांसारख्या मोठ्या रॅन्समवेअर टोळ्यांचा तो महत्त्वाचा साथीदार बनला.

या गुन्हेगारी टोळ्या रशियाच्या सुरक्षा यंत्रणेसोबत काम करतात का? असं त्याला विचारलं. पाश्चात्य देशांचा असा आरोप नेहमीच असतो. त्यावर खांदे उडवत पेंचुकोव्ह म्हणाला, 'नक्कीच.'

तो सांगतो की, काही रॅन्समवेअर टोळ्यांमधील लोक कधी-कधी एफएसबीसारख्या रशियन सुरक्षा यंत्रणांमधील त्यांच्या 'हँडलर्स'शी चर्चा करायचे.

पेंचुकोव्ह
फोटो कॅप्शन, पेंचुकोव्हच्या टोळीला अनेक लोक बळी पडले.

रशियन सरकार किंवा त्यांची गुप्तचर यंत्रणा सायबर हेरगिरीसाठी सायबर गुन्हेगारांशी संपर्क ठेवते का?, असा प्रश्न बीबीसीने लंडनमधील रशियन दुतावासाला पत्र लिहून विचारलं. परंतु, दुतावासाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

पेंचुकोव्ह लवकरच पुन्हा वरच्या पातळीवर पोहोचला आणि आयसिडआयडी नावाच्या टोळीचा प्रमुख बनला. या टोळीने 1,50,000 पेक्षा जास्त संगणकांमध्ये व्हायरस टाकला आणि रॅन्समवेअरसह अनेक प्रकारचे सायबर हल्ले केले.

पेंचुकोव्ह अशा एका टीमचा म्होरक्या होता, जी व्हायरस घुसलेले संगणक तपासून त्यातून पैसे कसं कमवता येतील याची योजना बनवत असत.

2020 मधील रॅन्समवेअर हल्ल्यातील पीडितांमध्ये अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट मेडिकल सेंटरचा समावेश होता. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, या हल्ल्यामुळे रुग्णालयाला 30 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त तोटा झाला आणि दोन आठवड्यांहून अधिक काळ त्यांना अनेक गंभीर रुग्णांना सेवा देता आली नाही.

या हल्ल्यात जरी कोणाचा मृत्यू झाला नसला, तरी यामुळे 5000 रुग्णालयांचे संगणक बंद झाले होते आणि रुग्णांचा मृत्यू किंवा गंभीर इजा होण्याचा धोका होता, असं वकिलांचं म्हणणं होतं.

या हल्ल्याची जबाबदारी पेंचुकोव्हने नाकारली. मी फक्त मला झालेली शिक्षा कमी व्हावी यासाठी गुन्हा कबूल केल्याचं त्यानं सांगितलं.

पेंचुकोव्हने आता आपलं आडनाव बदलून आंद्रेयेव केलं आहे. त्याला दोन वेगवेगळ्या नऊ वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. त्याने केलेल्या कृत्यासाठी या शिक्षा जास्त आहेत, असं त्याला वाटतं (तो लवकर सुटण्याची आशा करतो).

त्याला पीडितांना 54 दशलक्ष डॉलर्सची भरपाई देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

अविश्वास आणि भयावहता

अगदी कमी वयात सायबर क्राइममध्ये आलेल्या पेंचुकोव्हच्या मते, पाश्चिमात्य कंपन्या आणि लोक पैशांचा तोटा सहन करू शकतात. कारण, त्यांच्या सर्व गोष्टी विम्यामधून भरून निघतात, असं तो म्हणतो.

पण जेव्हा मी जॅबर झ्यूसच्या काळातील त्याच्या एका पहिल्या पीडितांपैकी एकाशी बोललो, तेव्हा स्पष्ट झालं की त्याच्या अशा हल्ल्यांमुळे निरपराध लोकांचे खरोखरच मोठं नुकसान झाले होते.

न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क येथे लेबर्स लगेज हा एका कुटुंबाकडून चालवला जाणारा व्यवसाय होता. या टोळीने एकाच हल्ल्यात त्यांच्याकडून 12,000 डॉलर्स लुटले. या व्यवसायाची मालकीण लेस्लीला अनेक वर्षांनंतरही ती घटना स्पष्टपणे आठवते, त्यांना तो धक्का होता.

"बँकेचा फोन आला तेव्हा आम्हाला काहीच समजलं नाही, आश्चर्य आणि भीती वाटत होती. नक्की काय झालंय हे आम्हाला माहीत नव्हतं, आणि बँकेलाही याची काहीच कल्पना नव्हती," असं त्या सांगतात

ती रक्कम फार मोठी नव्हती, परंतु व्यवसायासाठी तो खूप मोठा धक्का होता. कारण हेच पैसे भाडं, माल खरेदी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वापरले जाणार होते.

त्यांच्याकडे कोणतीच बचत शिल्लक नव्हती. त्यात भर म्हणजे, लेस्लीची वृद्ध आई कंपनीची सर्व खाती सांभाळत होती आणि चोरी उघडकीस येईपर्यंत ती यासाठी स्वतःलाच दोष देत होती.

"त्यावेळी आम्हाला राग, चीड, भीती, सगळं काही जाणवलं," असं त्या म्हणतात.

मी त्यांना या हॅकर्सना तुम्ही काय सांगू इच्छिता, असं विचारलं. तेव्हा त्यांनी अशा निर्दयी गुन्हेगारांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे, असं स्पष्टपणे सांगितलं.

"आपण काहीही बोललो तरी त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही," असं लेस्लींनी म्हटलं.

"मी त्यांना एक मिनिटही देणार नाही," असं त्यांचे पती फ्रँक म्हणतात.

आपण कधीही पीडित लोकांबद्दल विचार केला नाही आणि आताही करत नसल्याचं पेंचुकोव्ह सांगतो.

पण एकूण त्याच्याबरोबर झालेल्या संभाषणात एकदा पश्चातापाचा क्षण दिसून आला. तो म्हणजे, जेव्हा त्याने अपंग मुलांच्या मदतीसाठीच्या धर्मादाय संस्थेवर केलेला रॅन्समवेअर हल्ला.

त्याला फक्त एकच खंत वाटते की, त्याने आपल्या सहकारी हॅकर्सवर खूप विश्वास ठेवला. हाच विश्वास अखेरीस त्याच्या आणि इतर अनेक गुन्हेगारांना अटक करण्याचं कारण ठरलं.

तो म्हणतो, "सायबर क्राइममध्ये तुम्ही मित्र बनवू शकत नाही. कारण उद्या तुमचे हे मित्र पकडले जातील आणि मग ते पोलिसांचे खबरे बनतील."

तो म्हणतो, "हॅकर्सचा कायमचा सोबती म्हणजे शंका आणि भीती (पॅरानोईया)." परंतु, यश मिळालं की माणसाकडून चुका घडू लागतात, असंही तो म्हणतो.

तो हळू आवाजात म्हणाला, "जर तुम्ही सायबर-क्राइम दीर्घकाळ करत राहिलात, तर तुमची धार किंवा चपळपणा कमी होत जातो."

 एफबीआयच्या 'मोस्ट वॉन्टेंड' यादीतील याकुबेट्स

फोटो स्रोत, FBI

फोटो कॅप्शन, याकुबेट्स, याला 'अ‍ॅक्वा' म्हणून ओळखतात. त्याचा 2019 मध्ये एफबीआयच्या 'मोस्ट वॉन्टेंड' यादीत समावेश करण्यात आला.

सायबर गुन्हेगारी जगतातील बेईमानी किंवा अविश्वासूपणा अधोरेखित करताना पेंचुकोव्ह सांगतो की, 2019 मध्ये पाश्चात्य देशातील अधिकाऱ्यांनी त्याचा एकेकाळचा मित्र आणि जॅबर झ्यूसचा माजी सहकारी मॅक्सिम याकुबेट्सचा पर्दाफाश केला. तेव्हापासून त्याने जाणूनबुजून त्याच्याशी सर्व संपर्क तोडले.

पेंचुकोव्ह म्हणाला की, त्यानंतर हॅकर समुदायात मोठा बदल झाला. लोक याकुबेट्ससोबत आणि त्याच्या 'इव्हिल कॉर्प'मधील साथीदारांसोबत काम करणं टाळू लागले.

याआधी पेंचुकोव्ह आणि याकुबेट्स ज्याला 'अ‍ॅक्वा' म्हणून ओळखलं जात असत. ते मॉस्कोमध्ये एकत्र फिरायचे, महागड्या हॉटेलमध्ये खायचे-प्यायचे.

पेंचुकोव्ह म्हणतो, "त्याच्याबरोबर अंगरक्षक असायचे. मला ते विचित्र वाटायचं. जणू त्याला आपला पैसा आणि संपत्ती सर्वांना दाखवायची इच्छा आहे, असं वाटायचं."

सायबर गुन्हेगारी जगातून दूर ठेवण्यात आलं तरीही इव्हिल कॉर्प थांबला नाही. गेल्या वर्षी ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीनं याकुबेट्सच्या कुटुंबातील इतर लोकांवरही दहा वर्षे चाललेल्या या गुन्हेगारी कामांत सहभागी असल्याचा आरोप केला आणि एकूण 16 जणांवर निर्बंध लावले.

परंतु, याकुबेट्स किंवा त्याच्या टोळीतील इतरांना पकडण्याची पोलिसांची शक्यता खूपच कमी वाटते. त्याला अटक होण्यासाठी माहिती देणाऱ्यास 5 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस जाहीर आहे.

त्यामुळे याकुबेट्स आणि त्याचे साथीदार पेंचुकोव्हसारखी देशाबाहेर जाण्याची चूक पुन्हा करणार नाहीत, अशीच शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)