You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेनं रशियन ध्वज असलेलं व्हेनेझुएलाशी संबंधित तेलवाहू जहाज अटलांटिक महासागरात केलं जप्त
उत्तर अटलांटिक महासागरात व्हेनेझुएलाच्या तेलाशी संबंधित असलेले एक टँकर जप्त केल्याचे अमेरिकेनं म्हटलं आहे.
अमेरिकेच्या युरोपियन कमांडने दिलेल्या माहितीनुसार, "अमेरिकेच्या न्याय विभाग आणि होमलँड सिक्युरिटी विभागाने आज अमेरिकन निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी M/V Bella 1 या जहाजाची जप्ती केल्याचे जाहीर केले."
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, "अमेरिकन कोस्ट गार्डचे जहाज USCGC मुनरोने या जहाजावर लक्ष ठेवल्यानंतर, अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटनुसार उत्तर अटलांटिक महासागरात या जहाजाची जप्ती करण्यात आली."
पूर्वी Bella 1 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जहाजाचे नाव बदलून 'मरिनेरा' करण्यात आले आहे आणि गयानाचा ध्वज काढून ते आता रशियन जहाज म्हणून नोंदवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
अमेरिकी दलं त्याचा पाठलाग करत असताना रशियाने एक पाणबुडी आणि इतर जहाजे अटलांटिक ओलांडण्यासाठी या तेलवाहू जहाजाच्या सुरक्षेसाठी तैनात केल्याची माहितीही समोर आली होती.
हे जहाज सध्या आइसलँड आणि ब्रिटिश बेटांच्या दरम्यान आहे. अमेरिकन निर्बंधांचे उल्लंघन करून इराणी तेलाची वाहतूक केल्याचा आरोप आहे.
इतिहासात या जहाजाने व्हेनेझुएलाचे क्रूड तेल वाहून नेले आहे, परंतु सध्या ते रिकामे असल्याचे नोंदवले जात आहे.
कॅरेबियन सागरात गेल्या महिन्यात अमेरिकेने 'मरिनेरा' या टँकरवर चढाई करण्याचा पहिला प्रयत्न केला होता. तेव्हा हे जहाज व्हेनेझुएलाकडे जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता.
अमेरिकन कोस्ट गार्डकडे हे जहाज जप्त करण्यासाठी वॉरंट होते, कारण त्याच्यावर अमेरिकन निर्बंधांचे उल्लंघन करून इराणी तेलाची वाहतूक केल्याचा आरोप होता. त्यानंतर या टँकरने आपला मार्ग बदलला, नाव बदलले, आणि स्वतःची रशियन जहाज म्हणून पुन्हा नोंदणी केली.
याआधी हे जहाज खोट्या पद्धतीने गयानाच्या ध्वजाखाली नोंदवले गेले होते. तत्पूर्वी ते व्हेनेझुएलाचे क्रूड तेल वाहून नेत आले आहे, परंतु सध्या ते रिकामे असल्याचे सांगितले जात आहे.
24 डिसेंबरला प्रवासातच अमेरिकेकडून पाठलाग होत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या टँकरने नोंदणीसाठी वापरला जाणारा ध्वज गयाना वरून रशियाचा केला.
निर्बंधित असलेल्या इतर अनेक टँकर्सनी गेल्या काही आठवड्यांत अशाच प्रकारे आपली नोंदणी रशियाकडे बदलून घेतली आहे. विंडवर्डचे समुद्री गुप्तचर तज्ज्ञ मिशेल बॉकमन यांनी सांगितले की, जहाजे कधीकधी प्रवासादरम्यान ध्वज बदलतात, परंतु हे अत्यंत दुर्मिळ असून "हे साधारणपणे डार्क फ्लीट टँकरमध्येच पाहिले जाते".
गेल्या महिन्यात अमेरिकन कोस्ट गार्डने कॅरिबियनमध्ये Marinera/Bella 1 वर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा हे जहाज व्हेनेझुएलाकडे जात असल्याचा संशय होता. हे जहाज अमेरिकन निर्बंधांच्या यादीत होते.
बॉकमन पुढे सांगतात, "मरिनेरा जहाज आधी खोट्या पद्धतीने गयानाच्या ध्वजाखाली नोंदवले गेले होते. संयुक्त राष्ट्रांच्या कायद्याच्या समुद्रविषयक करारानुसार (UNCLOS) कलम 110 मध्ये अशी तरतूद आहे की 'ध्वजविरहित' जहाजांवर अधिकारी चढाई करू शकतात. परंतु रशियन ध्वजाखाली पुन्हा नोंदणी केल्यामुळे, आता या तरतुदीनुसार त्यावर चढाई करता येत नाही."
10 डिसेंबरला अमेरिकेने स्किपर हे जहाज जप्त केले. अमेरिकन कोस्ट गार्डने जप्त केलेले हे पहिले तेलवाहू जहाज होते. त्यानंतर एकूण 18 अमेरिकन-निर्बंधित तेलवाहू जहाजांनी आपली नोंदणी रशियाकडे बदलली आहे, ज्यातील अनेक जहाजं आधी खोट्या ध्वजाखाली चालत होती, असं बीबीसी व्हेरिफायला लक्षात आलं आहे.
व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना ताब्यात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याच्या पाठिंब्याच्या जोरावर, त्यांच्या इच्छाशक्तीवरील त्यांचा विश्वास यापूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे दाखवून दिला आहे.
ट्रम्प यांच्या आदेशानं अमेरिकेनं मादुरो यांना तुरुंगात टाकलं आहे.
व्हेनेझुएलाच्या उप-राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए-लागो या क्लब आणि निवासस्थानी हे जाहीर केलं. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर जगभरात गंभीर, व्यापक परिणाम करणाऱ्या या कारवाईची माहिती ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत तिथे दिली.
याआधी ट्रम्प म्हणाले होते की, "जोपर्यंत, आपण तिथे एक सुरक्षित, योग्य आणि न्याय्य सत्तांतर करू शकत नाही, तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचा कारभार चालवेल."
ते म्हणाले की, "अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी बोलले आहेत. त्यांनी रुबिओ यांनी सांगितलं होतं की, तुम्हाला जे लागेल, ते आम्ही करू. मला वाटतं की त्या खूपच नम्र होत्या, मात्र त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता."
ट्रम्प यांनी यासंदर्भात फारशा तपशीलात माहिती दिली नाही. ते म्हणाले की, "जर आवश्यकता असेल तर तिथे प्रत्यक्ष सैन्य पाठवण्यास आम्ही घाबरत नाही."
या घडामोडींनंतर रॉड्रिग्ज यांनी हंगामी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)