गाझामध्ये हवाई मार्गाने अन्न पुरवल्याची इस्रायलची माहिती, मदत संस्थांची टीका

गाझा उपासमार

फोटो स्रोत, Reuters

गाझापट्टी भागामध्ये हवाई मार्गाने अन्न सामग्री टाकण्यात आली असल्याचं इस्रायलच्या लष्करानं जाहीर केलं आहे.

पॅलेस्टिनी नागरिक असलेल्या भागातील लोकांची उपासमारी आणि त्या पार्श्वभूमीवर वाढणारा आंतरराष्ट्रीय दबाव यामुळं ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलं आहे.

इस्रायलच्या लष्करानं (IDF) रविवारी सकाळी एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, "विमानातून खाली टाकण्यात आलेल्या सात पॅकेजेसमध्ये मैदा, साखर आणि डबाबंद अन्नपदार्थ" यांचा समावेश आहे.

त्याआधी, संयुक्त राष्ट्रांच्या ताफ्यांना गाझामध्ये प्रवेश देण्यासाठी मानवतावादी मार्ग खुले करण्याची तयारी असल्याचं इस्त्रायलनं म्हटलं होतं.

गाझामधील सुमारे 20 लाख लोकसंख्या असलेल्या भागाला असलेल्या मर्यादित पुरवठ्यामुळं उपासमारीचं संकट निर्माण झालं असून, त्यासाठी अधिक मदत पुरवण्यासाठी परवानगी देण्याचं आवाहन इस्त्रायलला करण्यात येत होतं. पण इस्त्रायलनं "उपासमारीचं हे संकट निर्माण केल्याचा" आरोप फेटाळून लावला आहे.

हवेतून टाकण्यात आलेली ही मदत, आंतरराष्ट्रीय संस्थांनी समन्वय साधून कोगाटच्या नेतृत्वात पुरवली असल्याचंही इस्रायलच्या लष्करानं सांगितलं.

IDF नं एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मदतीसाठी उचललेल्या पावलांविषयी माहिती दिली आहे. ही मदत टाकतानाचा एक व्हीडिओही इस्रायलच्या लष्करानं प्रसिद्ध केला आहे. पण अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही.

पॅलिस्टिनी अधिकाऱ्यांकडून मात्र या हवाई मदतीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

"गाझामधील मदतीसंदर्भात सुधारणेसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसंच दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये अशा प्रकारची मदत पोहोचवण्यास सज्ज असल्याचंही," IDF नं शनिवारी उशिरा सांगितलं.

तसंच गाझामधील एका पाणी शुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठाही पुन्हा सुरू केला असून, त्याचा फायदा 9 लाख लोकांना होईल, असं सांगण्यात आलं आहे.

मदतीवरूनही आरोप प्रत्यारोप

इस्रायलनं मार्च महिन्यापासून गाझामधील सर्व मदतीचा पुरवठा बंद केला होता. मे महिन्यात त्यांनी काही अटींसह पुन्हा पुरवठा सुरू केला. अमेरिकेसह त्यांनी GHF (Gaza Humanitarian Foundation) या संस्थेला गाझामध्ये काम करण्यास परवानगी दिली.

मे महिन्याच्या अखेरीपासून GHF ने मदत साहित्य द्यायला सुरुवात केली तेव्हापासू जवळपास दररोज गाझामध्ये मदत साहित् घेण्यासाठी येणाऱ्या पॅलिस्टिनी लोकांवर गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या.

यापैकी बहुतांश गोळीबार इस्रायली सैनिकांनी केले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी BBC ला सांगितलं. तर, इस्त्रायलनं ते फक्त इशारा देण्यासाठी गोळीबार करतात, तसंच मृतांची संख्या चुकीची आहे, असं सांगितलंय.

हमास मदत पुरवली जात असल्याच्या ठिकाणी अराजकता निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मदत साहित्य

फोटो स्रोत, Reuters

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गाझामध्ये निर्माण झालेल्या उपारमारीच्या संकटासाठी संयुक्त राष्ट्र, मदत संस्था आणि इस्त्रायलचे काही मित्रदेशही इस्त्रायलला जबाबदार ठरवत आहेत. तसंच गाझामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्बंध न घालता मदत साहित्य पुरवण्यासाठी प्रवेश दिला जावा असं आवाहन केलं जात आहे.

गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या काही दिवसांत कुपोषणामुळं 125 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 85 लहान मुलांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रायसिस यांनी गाझामधील ही परिस्थिती म्हणजे 'मानवनिर्मित' उपासमारी असल्याचं म्हटलं आहे.

तर, गाझामधील मदत किंवा अन्न वाटपाची जबाबदारी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांची आहे. त्यांनीच ही मदत हमासपर्यंत पोहोचू नये याचीही काळजी घ्यावी, असं IDF नं म्हटलं आहे.

इस्त्रायलनं शनिवारी जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या हवेतून मदत साहित्य टाकण्याच्या योजनेला मान्यता दिली. ब्रिटननेही त्याला पाठिंबा दिला. पण गाझामध्ये निर्माण झालेल्या उपासमारीच्या तुलनेत हे प्रयत्न फार तोकडे असल्याचं काही, मदत संस्थांनी म्हटलं आहे.

गाझा उपासमार

फोटो स्रोत, Reuters

संयुक्त राष्ट्रांची पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करणारी संस्था UNRWA चे प्रमुख फिलिप लाझारिनी यांच्या मते, हवाई मार्गाने टाकली जाणारी मदत महागडी, अपुरी आणि उलट उपासमारीचं संकट असलेल्यांसाठी जीवघेणी ठरू शकते.

त्यांच्या संघटनेची जॉर्डन आणि इजिप्तमध्ये 6000 ट्रक एवढी मदत तयार आहे. त्यामुळं गरजूंपर्यंत ती पोहोचवण्यासाठी दरवाजे उघडण्याचं आवाहन त्यांनी केलं.

BBC ने गाझामधील काही लोकांशी चर्चा केली, तेव्हा हवेतून टाकले जाणारे मदतीचे पॅकेट धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं. कधी कधी हे साहित्य थेट तंबूंवर पडतं आणि त्यामुळं लोक जखमी होतात, असं एकानं सांगितलं.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटीच्या किरॉन डोनेली यांनी, हवाई मार्गाने टाकलेली मदत ही कधीही पुरेशी आणि उपयोगी ठरत नाही, असं म्हटलं.

उपासमारी बरोबरच गाझामधील लोकांसमोर पाण्याचाही मोठा प्रश्न आहे. एका आईनं BBC बरोबर बोलताना म्हटलं की, "आमच्याकडं अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही".

हमासनं 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्त्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले आणि 251 लोकांना ओलीस म्हणून नेण्यात आलं होतं.

त्याच्या प्रत्युत्तरात इस्त्रायलनं गाझावर मोठा हल्ला केला आणि हमासविरोधात युद्ध सुरू केले. गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार तेव्हापासून आतापर्यंत 59000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.