You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अशोक चव्हाण : 'कुणावरही दोषारोप करायचा नाहीय, विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश'
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात हा सोहळा पार पडला.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित होते. तसंच, नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेही हजर होते.
अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशामुळे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अशोक चव्हाण, राजूरकर यांचं भाजपमध्ये स्वागत करतो. त्यांच्या येण्याने भाजप, महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे.
"देशभरात पंतप्रधान मोदी भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं. जे परिवर्तन देशात दिसू लागलं. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांना मोदींच्या नेतृत्त्वात काम करावं, आपणही यात वाटा उचलावा असा विचार आला. यात अशश चव्हाण सुद्धा आहेत. त्यांनी केवळ एवढेच सांगितले की विकासाच्या योग्य धारेत काम करण्याची संधी द्या. माझी कुठलीच लालसा नाही असं त्यांनी सांगितलं."
महाराष्ट्रात येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला विशेष बळ मिळेल, असंही फडणवीस म्हणाले.
सकारात्मक दृष्टीने भाजपमध्ये काम करेन - चव्हाण
भाजप प्रवेशावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, "राजकारणाच्या पलिकडे आम्ही आतापर्यंत एकमेकांना साथ दिलेलीआहे. मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. 38 वर्षांचा माझा राजकीय प्रवास राहिलेला आहे. मोदींच्या कामातून प्रेरणा घेऊन मी राज्यात काम करण्यासाठी पक्षात प्रवेश करत आहे."
"मी जिथे राहिलो तिथे आजपर्यंत काम केलेले आहे. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागेवर यश मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे," असं अशोक चव्हाण म्हणाले.
मला कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही आणि मला कोणावरही दोषारोपही करायचे नाहीत, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण यांनी काल (12 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे."
पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र अशोक चव्हाणांनी ज्या लेटरहेडवर लिहिलंय, त्या लेटरहेडवरील 'विधानसभा सदस्य' या शब्दांपुढे 'माजी' असे पेनाने लिहिलं होतं. त्यानंतर ट्वीट करून त्यांनी स्पष्टही केलं की, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला.
काल (12 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षातून बाहेर पडताना अशोक चव्हाणांनी म्हटलं होतं की, दोन दिवसात पुढची दिशा ठरवेन. आज (13 फेब्रुवारी) सकाळी त्यांनी भाजप प्रवेशाची माहिती दिली.
काल अशोक चव्हाण म्हणाले होते की, "मला काँग्रेसमधील कुठल्याही गोष्टीची वाच्यता बाहेर करायचं नाहीय. मला कुणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. ते माझ्यात स्वभावात नाही."
"अशोक चव्हाणांना काँग्रेस पक्षानं खूप दिलं, तसंच पक्षालाही अशोक चव्हाणानं खूप दिलं. दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात," असंही चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली होती. ते म्हणाले होते, "ज्या पद्धतीने पक्ष भाजप फोडत आहेत त्याला राज्यातील मतदार वैतागले आहे. आगामी काळात भाजपाला धडा शिकवण्याची संधी मतदार सोडणार नाही."
तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्वीटवर आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, "जे गेले ते का गेले याचे कारण स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाने आता जी श्वेता पत्रिका काढली आहे त्या श्वेतापत्रिकेच्या माध्यमातून काही लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच परिणाम आपल्याला दिसतो आहे. भारतीय जनता पक्षात आता अन्य पक्षातीलच नेते अधिक झाले आहेत तरीही ते अजूनही असुरक्षित आहेत ते केवळ सत्तेसाठी काहीही करण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र, काहीही असले तरी आम्ही विचारधारेशी एकनिष्ठ आहोत. सर्वधर्मसमभावाच्या विचाराशी जोडले गेलेले आहोत. आम्ही कधीही विचारांशी प्रतारणा करणार नाही. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत आणि असणार आहोत."