लक्ष्मी नावाची तरुणी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या प्रेमात पडली आणि 'लॅक्मे'चा जन्म झाला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
गेल्या काही दिवसांपासून पॅरिसमध्ये हिंसक आंदोलनं सुरू आहेत मात्र पॅरिसच्या रस्त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक आणि संस्मरणीय क्षणही पाहिले आहेत. असाच एक क्षण म्हणजे भारताच्या स्वदेशी कॉस्मेटिक ब्रँड 'लॅक्मे'चा जन्म.
'लॅक्मे' ही कंपनी सध्या यूके मध्ये असलेल्या 'हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी'च्या मालकीची असून लॅक्मे हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड झाला आहे. मात्र त्या कंपनीची स्थापना तत्कालीन पंतप्रधानांच्या आग्रहावरून एका भारतीय व्यावसायिकाने त्याची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांच्यावर त्यांच्याच मुलीनेच दबाव टाकल्याचंही बोललं जातं.
त्यावेळी ते उद्योगपती आणि पंतप्रधान यांच्यात काही मुद्द्यांवर वैचारिक मतभेद होते, तरीही ते उद्योगपती सौंदर्यप्रसाधने उत्पादन क्षेत्रात उतरले. नावीन्यपूर्ण ब्रँडला हिंदू देवीच्या नावावर आधारित पॅरिसच्या रस्त्यांवरील ऑपेरापासून त्याचे नाव मिळाले. ते पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू आणि उद्योगपती होते जेआरडी टाटा.
पुढे रतन टाटा यांनी तो ब्रँड विकला. मात्र ज्या कल्पनेने लॅक्मेचा जन्म झाला ती संकल्पना पुन्हा बाजारात आली आहे आणि औद्यागिक क्षेत्र देखील त्यावर पुन्हा विचार करत आहे.
नेहरू, इंदिरा आणि टाटा
स्वातंत्र्यानंतर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कम्युनिस्ट छटा असलेली अर्थव्यवस्थेची समाजवादी पद्धत स्वीकारली होती. त्यात विमा, बँकिंग, खाणकाम, नागरी विमान वाहतूक यासारख्या क्षेत्रातील कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं.
1949 मध्ये सरकारने टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीत 49 टक्के समभाग विकत घेतले. जेआरडी टाटा यांचा जीव विमानसेवेत होता आणि ते स्वतः परवानाधारक पायलट होते. त्यामुळे अशा प्रकारच्या सरकारी हस्तक्षेपावर त्यांनी संताप व्यक्त केला.
जेआरडींना टाटा एअर इंडियाचा आंतरराष्ट्रीय एअरलाइन ब्रँड बनवायचा होता, जे सरकारी प्रशासनात राहून शक्य नव्हतं. त्यांना वाटलं की कंपनीचे भागधारक आणि इतर लाभार्थींचे नुकसान झाले आहे. अखेर 1953 मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण झालं . यामुळे जेआरडींना मोठा धक्का बसला.
जेआरडी आणि नेहरूंमध्ये या मुद्द्यावर मतभेद असताना, बैठक आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून नेहरू सरकारकडून टाटा समूहाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. गिरीश कुबेर यांनी त्यांच्या ‘द टाटाज' (मराठीत टाटायन) या पुस्तकातील 11 व्या प्रकरणात संपूर्ण घटनेची उकल केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळी भारताला सौंदर्यप्रसाधने आयात करावी लागली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पत वाढली आणि डॉलरचं मूल्यही वधारलं होतं. त्यामुळे परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारने सौंदर्यप्रसाधनांच्या आयातीवर निर्बंध लादले त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसला कारण सगळ्यात जास्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर स्त्रिया करायच्या.
महिला संघटनांनी तत्कालीन पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी या विषयावरच्या त्यांच्या समस्या मांडल्या. त्या नेहरूंच्या कन्या इंदिरा यांनी ऐकून घेतल्या. मुलीने या प्रकरणी काहीतरी करावे म्हणून वडिलांकडे हजेरी लावली.
एकदा नेहरू त्यांच्या कार्यालयात जात असताना, महिलांच्या एका गटाने त्यांना निवासस्थानाबाहेर थांबवलं आणि आयात केलेल्या सौंदर्यप्रसाधनांरपासून त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत असा प्रश्न उपस्थित केला.
नेहरूंबरोबर त्यांचे खासगी सचिव एम. ओ. मथाई यांना या प्रश्नात लक्ष घालण्यास सांगितलं. मथाई यांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. जेव्हा इंदिरा यांनी हा मुद्दा उचलून धरला तेव्हा मथाई यांनी विचारलं, 'त्यात इतकं महत्त्वाचं काय आहे?' त्यावर इंदिरा म्हणाल्या की कोणत्याही भारतीय कंपनीने अशी उत्पादने तयार केलेली नाहीत.
मथाई यांनी टाटाचे दिल्ली येथील प्रतिनिधी ए.डी. नौरोजी यांच्याशी संपर्क साधला आणि टाटा समूहाला कॉस्मेटिक्स कंपनी स्थापन करण्याचा विचार करण्यास सांगितलं. एवढेच नव्हे तर यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
हे ऐकून जेआरडी टाटा आश्चर्यचकित झाले, कारण एकीकडे नेहरू सरकार एअर इंडिया ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत होते.
नंतर नेहरू सरकारने एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण केलं आणि जेआरडी यांना एअर इंडियाचं अध्यक्ष केलं. पुढे इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी जेआरडींचं एअर इंडियाचं अध्यक्षपदही कायम ठेवलं.
इंदिरा गांधीचेचे पुत्र राजीव गांधी यांनी जेआरडी अध्यक्षपदावरून जेआरडीची हकालपट्टी केली, पण त्यांच्या जागी रतन टाटा यांना नियुक्त केले, त्यामुळे जेआरडी नाराज झाले नाही.
लॅक्मे कंपनीची मुहूर्तमेढ
टाटांनी भारतीय हवामान आणि त्वचेला साजेशी सौंदर्यप्रसाधने विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या वेळी टाटा समूहाची मुंबईत हॉटेल्स, बिहारमध्ये स्टील, गुजरातमध्ये रसायने अशा देशाच्या विविध भागात औद्योगिक युनिट्स होती. असंच एक युनिट कोचीनला (सध्याचे कोची) होतं.
या युनिटचे नाव 'टाटा ऑईल मिल्स' कंपनी होतं .
ही कंपनी 1920 पासून कार्यरत होती. त्याचं प्रामुख्याने खोबरेल तेल काढण्याचं आणि त्याची निर्यात करण्याचं काम होतं. नंतर, कंपनीने साबण, डिटर्जंट, शाम्पू, खाद्यतेल, सुगंधी तेल इत्यादींचे उत्पादन सुरू केलं. हमाम, 501, ओके आणि मॅजिक हे या कंपनीचे प्रमुख ब्रँड होते. गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचे उत्पादन युनिट होते.
टॉमकोचे उप युनिट म्हणून लॅक्मेची स्थापना 5 डिसेंबर 1952 रोजी झाली. कंपनीने रॉबर्ट पिगॉट आणि रेनॉर सारख्या फ्रेंच कंपन्यांकडून आणि कोलमार सारख्या अमेरिकन कंपन्यांकडून तेल काढण्याचा फॉर्म्युला मिळवला. त्यासाठी परदेशी कंपन्यांना टाटा युनिटमध्ये कोणतीही इक्विटी दिली गेली नाही, परंतु फॉर्म्युलासाठी योग्य शुल्क दिलं गेलं.

फोटो स्रोत, Twitter
1961 मध्ये, सिमॉन टाटा (रतन टाटा यांची सावत्र आई) कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक झाल्या. फ्रान्समध्ये जन्मलेल्या आणि स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या सिमॉन यांना लॅक्मेच्या उत्पादनांची सखोल माहिती होती. नंतर त्यांना टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहभागी करून घेण्यात आलं आणि 1982 मध्ये त्या चेअरपमन पदापर्यंत पोहोचल्या.
त्यावेळेच्या मुंबईतील पेडर रोड येथील भाड्याच्या जागेतून उत्पादन सुरू करण्यात आलं. या दशकात कंपनीची उत्पादन श्रेणीही वाढली आणि उत्पादनही वाढले.
त्यानंतर उत्पादन युनिट मुंबईजवळील शिवडी येथे हलवण्यात आलं. ते पेडर रोडच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट होते. मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त जागेची खरेदी करण्यात आली आणि दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आलं.
आकर्षक पॅकेजिंग, उच्च दर्जा, जाहिराती, बाजारपेठेचा अभ्यास यामुळे या उत्पादनाला चांगले ग्राहक मिळाले. बाकीचं काम सेल्स, वितरक यांनी केलं. वीस हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांनाही त्यांनी टार्गेट केलं.
भारतीयांसाठी तयार केलेली नावीन्यपूर्ण उत्पादनं आधुनिक प्रयोगशाळांमध्ये विकसित केली गेली आणि त्यांची चाचणी केली. महिलांच्या स्किनकेअर, मेकअप आणि टॉयलेटरीजमध्ये यश मिळवल्यानंतर लॅक्मेने पुरुषांसाठीही उत्पादनं काढली.
जर एखादा ब्रँड यशस्वी झाला तर त्याच नावाखाली त्याचा एक उपब्रँड तयार होतो. उदा. अंघोळीचा साबण तयार केला तर त्याच नावाखाली डिओड्रंट तयार करण्यात येतो. त्यामुळे लॅकमे इतर उद्योगात येणं अतिशय स्वाभाविक होतं.
1980 मध्ये लॅक्मने ब्युटी सलून सुरू केले. याशिवाय लॅक्मेचं ब्युटी स्कूल असून तेथे ब्युटीशियन्सना सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिले जात होते. त्यानंतर त्यांना डिप्लोमाही देण्यात येतो.
तसंच भारतातील प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनाचा ब्रँड लॅक्मेचं नाव पॅरिसच्या रस्त्यावर ठेवण्यात आलं आणि त्यामागे एक रंजक कथा आहे.
लक्ष्मीपासून लॅक्मे
टाटाचे प्रतिनिधी फ्रान्समध्ये असताना त्यांनी नवीन ब्रँडला काय नाव द्यावे याबद्दल सूचना मागवल्या. त्या काळी फ्रान्समध्ये 'लॅक्मे' नावाने ऑपेरा लोकप्रिय होता. ते लक्ष्मी नावाचे फ्रेंच रूप होते. त्यात भारतीयत्वाचा अंश होता, पण त्यावर फ्रान्सचा प्रभाव होता.
या फ्रेंच ऑपेराने 19व्या शतकात आकार घेतला. ही कथा नीलकंठ नावाचा पुजारी, त्याची मुलगी लक्ष्मी, दासी मल्लिका आणि फ्रेडरिक आणि गेराल्ड नावाच्या दोन ब्रिटिश सैन्य अधिका-यांभोवती फिरते.
एकदा लक्ष्मी आणि तिची दासी मल्लिका फुले वेचायला नदीकाठी जातात. एका ठिकाणी दागिने काढण्यापूर्वी लक्ष्मी आंघोळीसाठी पाण्यात उतरते. तेवढ्यात दोन ब्रिटिश सैन्याधिकारी तिथे पोहोचतात.
ब्रिटिश सैन्याधिकारी दागिने पाहून तिच्या प्रेमात पडतो. त्याचवेळी लष्करी अधिकारी गेराल्ड तिचं स्केच तयार करू लागतो.
अचानक गेराल्डला पाहून लक्ष्मी किंचाळते. गेलाराल्ड कशीतरी तिची समजूत घालतो. त्यामुळे जे बचावासाठी पुढे आले असतात, त्यांना लक्ष्मी परत पाठवते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, जेव्हा नीलकंठला कळते की एका ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याच्या मुलीची भेट घेतली तेव्हा तो त्याचा सूड उगवण्याचं ठरवतो.
नीलकंठ लक्ष्मीला बाजारात गाणं म्हणायला सांगतो आणि ते ऐकताच गेराल्ड तिथे येतो आणि लक्ष्मी बेशुद्ध पडते. त्यामुळे नीलकंठ चिडतो आणि त्या ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्यावर हल्ला करून त्याला जखमी करतो.
लक्ष्मी त्या अधिकाऱ्याला जंगलातील एका गुप्त ठिकाणी घेऊन जाते आणि त्याच्यावर उपचार करते.गेराल्ड सावरतो. पुढच्या जन्मी त्यांची जोडी मजबूत रहावी म्हणून लक्ष्मी पवित्र पाणी आणण्यासाठी जाते.
त्यावेळी इंग्रज सैन्य अधिकारी फ्रेडरिक परत येतो आणि तो त्याचा मित्र गेराल्डला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतो. लक्ष्मीला गेराल्डच्या वागण्यात झालेला बदल तिच्या लक्षात येतो आणि आपण प्रेम गमावलं आहे हे तिच्या लक्षात येतं.
बदनामी होऊन जगण्यापेक्षा मरण बरं, असा विचार करून लक्ष्मी धोतऱ्याचं फुल खाऊन प्राणत्याग करते. त्याचबरोबर लक्ष्मी आणि गेराल्डच्या प्रेमकहाणीचा अंत होतो.
लक्ष्मी ही या ऑपेरा व्यतिरिक्त समृद्धीची आणि सौंदर्याची देवी असल्याने, 'लॅक्मे' नावाचे फ्रेंच रूप ब्रँड नेम म्हणून स्वीकारलं गेलं.
टॉमकॉनला रतन यांचा 'टाटा'
पुढे दरबारी शेठ नावाच्या टाटा समूहाच्या शक्तिशाली अधिकाऱ्याने टॉमकोची कमान हाती घेतली. ते टाटा केमिकलशीही संबंधित होते, त्यामुळे एक प्रकारे समूहात परस्पर समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला.
1980 च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा शास्त्रज्ञ होमी भाबा अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले, तेव्हा दरबारी शेठ यांना त्यांच्यासाठी TOMCO चे अध्यक्षपद सोडण्यास सांगण्यात आलं, जे त्यांनी आनंदाने केलं.
1991 मध्ये, रतन टाटा यांनी त्यांचे पूर्वसूरी जेआरडी यांच्याकडून समूहाची सूत्रे हाती घेतली. तरुण रतनला ग्रुपमध्ये मोठा बदल घडवून आणायचा होता. त्यामुळे त्यांनी संचालक मंडळात निवृत्तीची वयोमर्यादा लागू केली. दरबारी सेठ, अजित केरकर (टाटाचा हॉटेल उद्योग), रुसी मोदी (टाटाचा पोलाद उद्योग) आणि नानी पालखीवाला (सिमेंट) यांसारख्या ज्येष्ठांनी त्यांच्या विरोधात बंड केलं.
जेआरडींच्या काळात टाटा कंपन्यांची स्वतंत्र ओळख होती, आणि जेआरडींनी त्यांना काम करण्यासाठी मोकळीक दिला, तर रतन टाटा यांना सर्व कंपन्या टाटा ब्रँडशी एकरुप झाल्या पाहिजेत आणि त्यांची 'एकत्रित ओळख' असावी अशी त्यांची इच्छा होती. याशिवाय कंपन्यांच्या मालकीमध्ये टाटा सन्सचे वर्चस्व वाढवायचे होते.
कंपनीचा दारूचा व्यवसाय विकला गेला. त्या काळात मार्च-1992 मध्ये टॉमकोला 13 कोटी रुपयांचा तोटा झाला. रतन टाटा यांना वाटले की टॉमको काळाशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरली आहे आणि संगणकीकरण, वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण न केल्याने ती काळाच्या तुलनेत 10 वर्षे मागे आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रतन टाटा यांनी टेटली, जग्वार, लँड रोव्हर, देवू आणि कोरस यासारखे महत्त्वाच्या कंपन्यांचं अधिग्रहण केलं.
1993 मध्ये, टॉमकोने त्याची प्रतिस्पर्धी कंपनी हिंदुस्तान लीव्हर (आता हिंदुस्तान युनिलिव्हर) मध्ये विलीनीकरण केले. टॉमकोच्या भागधारकांना त्यांच्या समभागांच्या बदल्यात HUL चे सुमारे एक टक्के समभाग मिळाले.
1996 मध्ये, लॅक्मे आणि हिंदुस्तान लीव्हर यांच्यात 50:50 च्या भागीदारीत एक संयुक्त प्रकल्प तयार करण्यात आला. त्यानंतर 1998 मध्ये हे युनिट हिंदुस्थान लिव्हरला विकण्यात आले. प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि आणखी एक पारशी उद्योगपती गोदरेज यांनी याआधीही असेच काही केले होते त्यामुळे बाजाराला या प्रकरणाचे आश्चर्य वाटले नाही.
विक्रीतून मिळालेले पैसे किरकोळ विक्री युनिट Trant मध्ये गुंतवले गेले. तीच कंपनी आज आज स्टार बाजार, वेस्टसाईड आणि झोडिओ सारख्या चेन चालवते. त्या कंपनीचा बिगर-कार्यकारी अध्यक्ष रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा आहे.
आज लॅक्मे हिंदुस्तान युनिलिव्हरच्या एक हजार कोटींहून अधिक ब्रँडपैकी एक आहे. कंपनी लिपस्टिक, काजळ, आय शॅडो, मेकअप, नेल कलर, फेस मास्क, सनस्क्रीन लोशनसह उत्पादने तयार करते. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅशन वीक आयोजित केला जातो. त्याचे लॅक्मे प्रायोजक आहे.
लॅक्मे ग्रुपचा भारतीय सौदर्यप्रसाधनाच्या मार्केटमध्ये (2022 पर्यंत) १० टक्के वाटा आहे. मेबेलाइनचा वाटा सात टक्के, तर मायग्लॅम आणि शुगरचा वाटा प्रत्येकी चार टक्के आहे.
शुगर कॉस्मेटिक्सच्या विनिता सिंग सांगतात की, कंपनी स्थापन करण्यामागील त्यांचा हेतू भारतीय महिलांना त्यांच्या त्वचेच्या स्वरुपानुसार आणि वातावरणाला साजेशा लिपस्टिक आणि मेकअप उपलब्ध करून देण्याचा होता.
वेस्टसाईडच्या नोएल टाटांनी सांगितलं आहे की कंपनी येत्या काळात सौंदर्यप्रसाधनाच्या व्यापारात उतरणार आहे. अगदी अंडरवेअरपासून फुटवेअरपर्यंत त्यांचा फोकस असणार आहे. आई सिमोन सारखे नोएल टाटा यशस्वी होताहेत की नाही हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरेल असं मार्केट तज्ज्ञांना वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








