उत्तर कोरिया सीमेवर भिंत बांधत आहे, सॅटेलाईट छायाचित्रांमधून समोर आलं सत्य

- Author, जेक हॉर्टन, यी मा, डेनिएल पालुम्बो
- Role, बीबीसी वेरीफाय
दक्षिण कोरियाला लागून असलेल्या आपल्या सीमेजवळ अनेक ठिकाणी उत्तर कोरिया भिंतीसारखं कुंपण बांधत आहे. सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.
बीबीसी व्हेरिफाईच्या माध्यमातून सॅटेलाईट इमेज बघण्यात आल्या. यात नागरी क्षेत्राच्या आजूबाजूची जमीन रिकामी करण्यात आल्याचं दिसत आहे.
तज्ज्ञांच्या मते, हे दक्षिण कोरियासोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धविराम कराराचं उल्लंघन ठरू शकतं.
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया दरम्यानचा चार किलोमीटर रुंद बफर झोन हा डिमिलिटराइज्ड झोन आहे.
तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालंच तर ते आजही युद्धाच्या स्थितीत आहे, कारण त्यांच्यात कधीही शांतता करार झालेला नाही.
हा झोन दोन भागांमध्ये विभागलेला आहे, ज्यामध्ये दोन्ही देश आपापल्या भागांवर नियंत्रण ठेवतात.
सुमारे एक किलोमीटर पर्यंत बदल
अलीकडचा बदल असामान्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असताना ही माहिती समोर येत आहे.
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये राहणारे एनके न्यूजचे प्रतिनिधी श्रेयस रेड्डी सांगतात, "उत्तर कोरियाला आपली लष्करी उपस्थिती आणि सीमेवर तटबंदी मजबूत करायची आहे हाच अंदाज आपण यावेळेस लावू शकतो."
उत्तर कोरिया करत असलेल्या बदलांची तपासणी करण्याचा एक भाग म्हणून, बीबीसी व्हेरिफायने सीमेच्या सात किलोमीटर पर्यंत हाय - रिझोल्युशन उपग्रह प्रतिमा घेतल्या आहेत.

या प्रतिमा पाहिल्यावर अंदाज येतो की, डिमिलिटराइज्ड झोन जवळ किमान तीन ठिकाणी भिंतीसदृश बांधकाम केलं आहे. हा भाग सीमेच्या पूर्वेकडील टोकाचे सुमारे एक किलोमीटर अंतर व्यापतो.
अशीच बांधकामं सीमेच्या इतर भागातही झाली असण्याची शक्यता आहे. या भागाची छायाचित्रं उपलब्ध नाहीत. त्यामुळे उत्तर कोरियाने हे बांधकाम कधी सुरू केलं हे स्पष्ट झालेलं नाही.
मात्र, नोव्हेंबर 2023 मध्ये घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हे बांधकाम दिसत नव्हतं.

किम जोंग उन यांना नेमकं काय हवंय?
सेऊल स्थित आसन इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजमधील लष्करी आणि संरक्षण तज्ज्ञ डॉ. यूके यांग यांनी बीबीसीला सांगितलं की, "माझ्या मते त्यांनी आपले भाग वेगळे दाखवण्यासाठी अशा प्रकारचा अडथळा निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ आहे."
डॉ. यांग म्हणतात, "1990 च्या दशकात, उत्तर कोरियाने युद्धाच्या वेळी रणगाड्यांचा हल्ला थांबवण्यासाठी रणगाडाविरोधी भिंती बांधल्या होत्या. पण अलीकडेच उत्तर कोरिया 2 ते 3 मीटर उंच भिंती बांधत आहे आणि त्यामुळे या भिंती रणगाडे थांबवू शकतील असं वाटत नाही."
उपग्रह प्रतिमांचे समीक्षा करणारे डॉ. यांग म्हणतात, "भिंतींच्या आकारावरून असं दिसून येतं की त्या भिंती केवळ अडथळे निर्माण करण्यासाठी नाहीत तर त्यांचा उद्देश क्षेत्राचे विभाजन करणे देखील आहे."
याशिवाय उत्तर कोरियाने आजूबाजूला असलेलं नागरी क्षेत्र रिकामं केल्याचे पुरावे मिळाले आहेत.

सीमेच्या पूर्वेकडील टोकाचे नवीन सॅटेलाईट छायाचित्र समोर आले आहे. यात उत्तर कोरियाने वाहतुकीसाठी रस्ते बांधल्याचे दिसून येते.
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ (जेसीएस) च्या अधिकाऱ्याने नुकतीच एक मुलाखत दिली.
त्यात ते म्हणाले की, लष्कराने रस्ते मजबूत केले आहे, भूसुरुंग टाकले आहेत आणि नापीक जमिनी मोकळ्या केल्या आहे. या कामांना धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातंय.

फोटो स्रोत, Reuters
कोरिया विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय सुरक्षेचे प्राध्यापक किल जु बान म्हणतात, "जमिनीची साफसफाई लष्करी आणि गैर-लष्करी दोन्ही हेतूंसाठी असू शकते."
ते म्हणाले, "या कामांमुळे उत्तर कोरियाला दक्षिण कोरियातील लष्करी हालचालींवर लक्ष ठेवणं सोपे जाईल. तसेच सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचीही सहज ओळख पटेल."
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल रिलेशन्सचे आशिया आणि कोरियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्राध्यापक व्हिक्टर यांच्या म्हणण्यानुसार, "नागरी क्षेत्रातील बांधकाम असामान्य आहे आणि ते युद्धविरामाचे उल्लंघन असू शकते."
उत्तर कोरियाच्या धोरणात मोठा बदल
1953 साली युद्धविरामाने कोरियन युद्ध संपलं. यात दोन्ही बाजूंनी निशस्त्रीकरण करण्यात आले. शिवाय दोन्ही बाजूंनी कोणतीही प्रतिकूल कृती न करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली पण शांतता करार झाला नाही.
हे दोन्ही देश एकत्र होतील याची शक्यता फारच क्षीण आहे. मात्र उत्तर कोरियाचे सगळे नेते अशा घोषणा करताना दिसतात. मात्र आता किम जोंग उन यांनी ही कल्पना सोडल्याचे जाहीर केले आहे आणि ते त्याचा पाठपुरावा करणार नाहीत.
काही तज्ज्ञांनी किम जोंग उन यांच्या या घोषणेला अभूतपूर्व असं म्हटलंय. या वर्षाच्या सुरुवातीला किम जोंग यांनी दक्षिण कोरियाला आपला सर्वांत मोठा शत्रू म्हटलं. तज्ज्ञांनीही याला उत्तर कोरियाच्या धोरणातील मोठा बदल म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर उत्तर कोरियाने दोन्ही देशांची एकता दर्शवणारी चिन्हे हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये स्मारके पाडणे आणि एकच देश निर्माण करण्याबाबत बोलणाऱ्या सरकारी वेबसाईट्सवरून संदर्भ काढून टाकणे अशा गोष्टी सुरू आहेत.
किंग्स कॉलेज लंडनमधील युरोपियन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे प्रमुख डॉ. रॅमन पाशेको पारडो म्हणतात, "दक्षिण कोरियाकडून होणारा हल्ला रोखण्यासाठी उत्तर कोरियाला फारशा अडथळ्यांची गरज नाही, परंतु सीमेवर अशा प्रकारच्या संरचना बांधून आता तो एकात्मतेवर विश्वास ठेवत नाही, असे संकेत देत आहे."
काही तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की सीमेवर अलीकडेच झालेले बदल किम जोंग यांच्या व्यापक कारवायांशी मेळ खातात.
ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरियन द्वीपकल्पावर संशोधन करणारे डॉ. एडवर्ड हॉवेल म्हणतात, "उत्तर कोरिया, अमेरिका किंवा दक्षिण कोरियाशी वाटाघाटी करण्याचा आव आणत नाही. त्यांनी अलीकडेच जपानशी चर्चेचे प्रयत्नही नाकारले आहेत."
ते म्हणतात, "उत्तर कोरियाचे रशियासोबतचे संबंध दृढ झाल्यामुळे, या वर्षाच्या अखेरीस उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील धुसफूस वाढल्यास कोणाला आश्चर्य वाटू नये."











