You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टेलर स्विफ्ट थीम डान्स पार्टीतील 3 मुलींच्या मृत्यूवरुन युकेमध्ये गदारोळ, 90 जणांना अटक
- Author, अॅलेक्स बिनले (बीबीसी न्यूज) आणि डॅन जॉन्सन
- Role, प्रतिनिधी
युकेमधील अनेक शहरांमध्ये शनिवारी कट्टर उजव्या विचारसरणीच्या आंदोलकांच्या गटानं हिंसाचार केल्याचं पाहायला मिळालं. त्या पार्श्वभूमीवर 90 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी मर्सिसाईडधील साऊथपोर्टमध्ये प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट- ची थीम असणाऱ्या डान्स पार्टीमध्ये तीन लहान मुलींची हत्या झाल्यानंतर तणाव वाढला आहे.
हल, लिव्हरपूल, ब्रिस्टॉल, मँचेंस्टर, स्टोक-ऑन-ट्रेंट, ब्लॅकपूल आणि बेलफास्ट या शहरांमध्ये शनिवारी निदर्शनं झाली. काही ठिकाणी दुकानं लुटण्यात आली आणि पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मात्र सर्वच ठिकाणी निदर्शनं हिंसक झाली नाहीत.
द्वेष पसरवणाऱ्या 'कट्टरवाद्यांच्या' विरोधात कारवाई करण्यासाठी सरकार पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी म्हटलं आहे.
लिव्हरपूलमध्ये पोलिसांवर विटा, बाटल्या फेकण्यात आल्या. एका पोलीस अधिकाऱ्यावर तर खुर्ची फेकण्यात आली. त्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाली. मोटरसायकलवरुन जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला लाथ मारून खाली पाडण्यात आलं.
स्थलांतर विरोधी आणि समर्थक आमने-सामने
स्थलांतराला विरोध करणारे जवळपास एक हजार आंदोलक जमा झाले होते. त्यातील काही जण इस्लाम विरोधात घोषणा देत होते.
त्यांना विरोध करण्यासाठी शेकडो अँटी-फॅसिस्ट निदर्शक लिव्हरपूलच्या लाइम स्ट्रीट स्टेशनमध्ये दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस जमा झाले होते. त्यांनी एकता आणि सहिष्णुतेचं आवाहन केलं.
"स्थलांतरितांचं इथं स्वागत आहे" आणि "नाझीवाद्यांना आमच्या रस्त्यांवरून निघून जा" अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.
दोन्ही बाजूचे आंदोलक संघर्षाच्या पावित्र्यात होते. त्यामुळे त्यांना आवरताना पोलिसांना बराच संघर्ष करावा लागला.
युकेमध्ये पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष
हिंसक आंदोलनामुळे पोलीस सर्व तयारीनिशी उतरले होते. तसेच पोलिसांकडे कुत्रे देखील होते. पोलिसांच्या मदतीसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी कुमक देखील मागवण्यात आली होती.
रविवारी सकाळपर्यंत ही आंदोलनं सुरू होती. या सर्व अशांततेच्या काळात पोलिसांवर फटाखे देखील फेकले गेले.
शहरातील वाल्टन परिसरात एका ग्रंथालयाला आग लावण्यात आली होती आणि ती आग विझवू पाहणाऱ्या अग्निशमन दलाला देखील निदर्शकांनी विरोध केला होता, असं मर्सिसाइड पोलिसांनी सांगितलं.
दुकानं फोडण्यात आली आणि त्यातील सामानाला आग लावण्यात आली.
या बातम्याही वाचा -
हिंसाचारात पोलीस कर्मचारी जखमी
या हिंसक आंदोलनात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दोन पोलीस कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यातील एकाच्या नाकाचं हाड मोडलं आणि दुसऱ्याचा जबडा मोडल्याची शंका आहे.
असिस्टंट चीफ कॉन्स्टेबल जेनी सिम्स म्हणाले, "सोमवारी साउथपोर्टमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनांनंतर, मर्सीसाइडमध्ये हिंसाचार, तोडफोड आणि अस्थिरतेला कोणतंही स्थान नाही. जे लोक या प्रकारची कृत्ये करत आहेत ती फक्त या शहरासाठीच नाही तर त्यांच्या स्वत:साठी देखील लाजिरवाणी बाब आहे."
रविवारी आणखी आंदोलनं होण्याची शक्यता आहे.
गृह सचिवांची आंदोलकांना दिला इशारा
शनिवारी सरकारच्या मंत्र्यांची एक बैठक झाली. त्यात पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं की "बैठकीत जमलेल्या पंतप्रधानांनी सांगितलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अधिकार आणि आपण जी हिंसक अशांतता पाहत आहोत, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत."
ते पुढे म्हणाले, "कोणत्याही प्रकारच्या हिंसेला इथे स्थान नाही. आपले शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची कारवाई करण्यासाठी सरकार पोलिसांच्या पाठीशी आहे."
शनिवारी गृहसचिव इव्हेट कूपर यांनी यासंदर्भात चेतावनी दिली आहे. त्या म्हणाल्या की या प्रकारच्या अशांतता पसरवणाऱ्या कारवाया करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल आणि प्रवासावर देखील बंदीला सामोरं जावं लागेल. यासाठी तुरुंगांमध्ये पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
इव्हेट कूपर म्हणाल्या, गुन्हेगारी हिंसा आणि अशांततेला ब्रिटनच्या रस्त्यांवर कोणतंही स्थान नाही.
त्या पुढे म्हणाल्या, या प्रकारची गुंडगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारचा पोलिसांना पूर्ण पाठिंबा आहे. कारवाई करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार आहे.
ब्रिस्टलमध्ये निदर्शक आणि त्यांना विरोध करणारे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.
एक गट रुल ब्रिटानिया, "इंग्लंड टिल आय डाय आणि वी वाँट अवर कंट्री बॅक" हे गात होता. तर दुसरा गट "इथं स्थलांतरितांचं स्वागत आहे", गात होता.
वंशवादाला विरोध करणाऱ्यांवर बीअरचे कॅन फेकण्यात आले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या निदर्शकांवर लाठीहल्ला देखील केला.
एवॉन अँड सॉमरसेट काउंटीच्या पोलिसांनी सांगितलं की शहरात 14 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य इन्स्पेक्टर विक्स हेवर्ड-मेलेन यांनी येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
युकेच्या विविध भागात निदर्शनं आणि हिंसाचार
मँचेस्टरमध्ये निदर्शकांचा पोलिसांशी संघर्ष झाला. तिथे किमान दोघांना अटक झाली.
तर बेलफास्टमध्ये दोन जणांना अटक करण्यात आली. तिथे निदर्शकांनी मशिदीच्या बाहेर पत्रकारांवर वस्तू फेकल्या. एका कॅफेच्या खिडक्या फोडल्या.
हल शहरात, निदर्शकांनी एका हॉटेलच्या खिडक्या फोडल्या. या हॉटेल राजकीय शरण घेऊ इच्छिणाऱ्यांना ठेवलं जातं. इथं पोलिसांवर बाटल्या आणि अंडी फेकण्यात आली.
सिटी हॉलमध्ये लॉकडाउन करण्यात आलं होतं. कारण तिथे ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपचा सामना होत होता.
हंबरसाइड पोलिसांनी सांगितलं की सिटी सेंटरमधील संघर्षानंतर तीन पोलीस अधिकारी जखमी झाले. 20 जणांना अटक करण्यात आली.
इथे काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि काही सामानाला आग लावण्यात आली.
ब्लॅक पूलमध्ये रिबेलियन फेस्टिवलमध्ये निदर्शकांची काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी चकमक उडाली.
दोन गटात संघर्ष सुरू झाला त्यावेळेस तिथे थोड्या संख्येनं पोलीस हजर होते. दोन्ही गटांनी एकमेकांवर बाटल्या आणि खुर्च्या फेकल्या.
लँकेशायर पोलिसांनी सांगितलं की 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली. त्यांचं लक्ष ब्लॅकपूलवर केंद्रित आहे. मात्र ब्लॅकबर्न आणि प्रीस्टनमध्ये देखील काही किरकोळ घटना घडल्या.
स्ट्रोक-ऑन-ट्रेंटमध्ये पोलिसांवर विटा फेकण्यात आल्या. स्टॅफर्डशायर पोलिसांनी सांगितलं की सोशल मीडियावर दोन लोकांवर चाकूने हल्ला झाल्याच्या चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यावर काही वस्तू फेकण्यात आल्या आणि त्यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा देखील झालेल्या नाहीत.
पोलिसांनी सांगितलं की तीन पोलीस अधिकाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांनी 10 जणांना अटक केली आहे.
तर लेस्टरशायरच्या पोलिसांनी लेस्टर शहरात दोन जणांना अटक केली आहे. वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी सांगितलं की लीड्समधील हेरो मध्ये निदर्शनं झाली आहे. मात्र तिथे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झालेला नाही.
शनिवारी युकेमध्ये निदर्शनं झाली, मात्र ती सर्वच हिंसक नव्हती. काही ठिकाणी संध्याकाळपर्यत निदर्शनं थांबलेली होती.
शनिवारी रात्री संडरलॅंडमध्ये हिंसाचाराच्या घटना झाल्या. त्यात चार पोलीस अधिकारी जखमी झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
तिथे शेकडो लोक मशीदीच्या बाहेर जमा झाले. त्यांनी मशीदीच्या बाहेर पोलिसांवर बिअरच्या कॅन, विटा फेकल्या. त्याचबरोबर एका नागरी सल्ला कार्यालयाला देखील आग लावली.
या हिंसाचाराच्या संदर्भात 12 जणांना अटक करण्यात आली.
हिंसाचाराविरोधात सरकारची कडक भूमिका
बीबीसीनं वीकेंडच्या काळात युकेच्या विविध भागात कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांनी नियोजन केलेल्या किमान 30 निदर्शनांची ओळख पटवली आहे. यामध्ये साउथपोर्टमधील एका नवीन निदर्शनाचा देखील समावेश आहे.
हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात अटक करण्यात आलेल्या लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी या आठवड्याच्या शेवटी 70 अतिरिक्त वकिलांना तयार ठेवण्यात आलं आहे.
शॅडो गृह सचिव जेम्स क्लेव्हरली यांनी केएर स्टार्मर आणि गृह सचिवांना म्हटलं आहे की "त्यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेत आणि गुंडांना स्पष्ट संदेश दिला पाहिजे."
(संपूर्ण इंग्लंडमधील बीबीसी न्यूजच्या रिपोर्टर्सच्या अतिरिक्त रिपोर्टिंगसह)