एक असा विवाह सोहळा ज्याची चर्चा संपतच नाहीये: ब्लॉग

एक असा विवाह सोहळा ज्याची चर्चा संपतच नाहीये : ब्लॉग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मोहम्मद हनिफ
    • Role, वरिष्ठ पत्रकार आणि लेखक

बॉलिवूडच्या जुन्या चित्रपटांमध्ये लग्नाचा सीन हमखास असायचा.

लग्नाची वरात वाजत-गाजत यायची. लग्नाची वेळ झाली की जेव्हा वधू-वर सप्तपदी घालायचे, तेव्हा दु:खानं व्याकूळ झालेलं एक पात्र यायचं.

ते पात्र लग्नमंडपात येऊन संवाद म्हणायचं, "हे लग्न होऊ शकत नाही."

काळ बदलला तसे चित्रपट आधुनिक झाले. दिग्दर्शकांच्या लक्षात आलं की लग्न, वरात, बँड, नाचणं-गाणं इत्यादीशिवायसुद्धा चित्रपटांची निर्मिती होऊ शकते.

काही लोकांनी चित्रपटाच्या कथेवर विचार केला. त्यांना वाटलं की खरी महत्त्वाची कथा लग्नानंतर सुरू होते आणि त्यावर देखील चित्रपट बनले पाहिजेत.

आता वर्षाचे पहिले सहा महिने सरले आहेत. या अर्ध्या वर्षभरात इस्रायलनं गाझावर हल्ला करत हजारो मुलांची हत्या केली आहे. भारत, युके आणि फ्रान्समध्ये देखील निवडणुका पार पडल्या आहेत.

क्रिकेटची टी20 विश्वचषक स्पर्धादेखील संपन्न झाली आहे. मात्र अंबानींच्या मुलाचं लग्न अजूनही सुरूच आहे.

ग्राफिक्स

सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

पूर्वीपासूनच श्रीमंत लोक लग्नात बडेजाव, श्रीमंतीचं प्रदर्शन करत आले आहेत. आधी मेहंदी, मग वरात आणि नंतर लग्नाची मेजवानी असायची.

गावातील किंवा परिसरातील सर्वांना आमंत्रण दिलं जायचं. जर शहरातील शेठ किंवा धनाढ्य व्यक्ती असला तर तो मोठे अधिकारी, राजकारणी यांनादेखील आमंत्रण द्यायचा. एखादा अभिनेता किंवा गायक यांना पैसे देऊन बोलवायचा. या सर्वांबरोबर फोटो काढायचा.

लग्न लागल्यानंतर मेजवानीचा बेत असायचा. सर्वांना आग्रहानं जेवू घालायचं. त्यानंतर मंडप आणि सर्व सामानाची आवराआवर व्हायची आणि सर्व जण आपापल्या घरी जायचे.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जानेवारी 2024 मध्ये अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्यात सहभागी झालेले सेलिब्रिटी.

मात्र अंबानींची गोष्ट वेगळी आहे. अंबानी एक जागतिक स्तरावरील शेठ किंवा उद्योगपती आहेत. त्यामुळे त्यांच्या घरच्या लग्नकार्याचे विधी लांबलचक आहेत. त्यांच्या घरच्या लग्नकार्यात मार्क झुकरबर्ग आणि बिल गेट्ससारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्ती पाहुणे म्हणून आल्या आहेत.

अंबानींच्या लग्नकार्यात जवळपास सगळं बॉलीवूड लोटलं. बॉलीवूडमधील खानांनी भांगडासुद्धा केला. जस्टिन बीबरनं तर बनियान घालून डान्स केला. रिहाना आणि दिलजीत दोसांज सुद्धा नाचले आणि त्यांनी इतरांनाही नाचवलं.

स्वत: अंबानी आणि त्यांची पत्नी, मुले देखील गाताना, नाचताना दिसले. जणूकाही ते आपल्याला सांगत होते की आम्ही श्रीमंतांचे श्रीमंत बनलो आहोत, मात्र अंतरंगाने आम्ही तुमच्यासारखेच आहोत, तुमच्या सारखाच विचार करतो. आम्हाला देखील मिरवायला आवडतं.

आपल्याला देखील असंच वाटतं की आपण शाहरुख खान आणि करीन कपूर व्हावं. कॅमेरासमोर गाणी म्हणावी.

'आपल्या पैशांवर मुलाचं लग्न करत आहेत'

जुन्या काळातील शेठ सुद्धा मजूरांच्या कष्टाद्वारे पैसे कमवायचे. मात्र आता महाशेठांचा जमाना आला आहे.

अलीकडे तर असं वाटतं की काहीजण अंबानींचे कर्मचारी आहेत आणि उर्वरित लोक त्या कर्मचाऱ्यांचे कर्मचारी आहेत.

हा लेख तुम्ही मोबाइलवर किंवा कॉम्प्युटरवर वाचत असाल. त्यासाठी तुम्हाला वाय-फाय, मोबाईल डेटा किंवा इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असेल. कदाचित अंबानींच्या एखाद्या कंपनीकडून त्याचं बिल तुम्हाला पाठवलं जाईल.

तुम्ही कदाचित सकाळी मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरलं असेल, ते पेट्रोल देखील अंबानींच्या रिफायनरी मधून आलं असेल.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

ज्या रस्त्यावर तुम्ही मोटरसायकल किंवा वाहन चालवून आला आहात त्या रस्त्याचं कंत्राट देखील कदाचित त्यांच्याकडेच असू शकेल.

घरातील स्वयंपाक घरात गेल्यास तिथे गॅसचं सिलिंडर दिसेल. ते सिलिंडर देखील त्यांचं आहे. अलीकडे तर ऐकलं आहे की ते पीठ, डाळ, बटाटा आणि टोमॅटोसुद्धा (रिटेलच्या माध्यमातून) विकत आहेत.

तुमच्या बाथरुमच्या सफाईसाठी जे सामान लागतं तेसुद्धा अंबानींच्या एखाद्या कंपनीनं तुम्हाला विकलं असेल.

आता अंबानींच्या घरच्या लग्नकार्य पाच-सहा महिन्यांपासून सुरू आहे. ते पाहून असं वाटतं आहे की, अंबानी एका हाताने तुमच्या-आमच्या खिशातून पैसे काढत आहेत आणि दुसऱ्या हाताने त्याच पैशांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च करत आहेत.

अंबानी कुटुंब.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अंबानी कुटुंब.

लग्नाचा सोहळा इतके दिवस का सुरू आहे हे माहित नाही. तो भारताला सॉफ्ट पॉवर दाखवण्यासाठी आहे की फक्त आपल्याला मुलाला खूश करण्यासाठी आहे, हेच कळत नाही.

की काही लोक म्हणतात, त्याप्रमाणे त्यातून आपल्याला असा संदेश दिला जातो आहे की, "अरे गरीबांनो, हा सोहळा पाहा आणि जळफळाट करून घ्या. आमचा हेवा करा."

मात्र असं देखील होऊ शकतं की अंबानींच्या कुटुंबाला या गोष्टीची जाणीव असेल की लग्नकार्यात जितक्या मिलियन डॉलर्सचा खर्च झाला, त्यामध्ये तुम्ही-आम्ही देखील रुपयांनी योगदान दिलं आहे. त्यामुळेच ते आपल्याला सांगत असतील की तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहा आणि त्याचा आनंद घ्या.

याला आमच्या घरचं नाही, तर तुमच्याच घरचं लग्नकार्य समजा.

'सरकारपेक्षा कदाचित अंबानींचा अधिक दबदबा'

काही लोकांचं असंही म्हणणं आहे की भारत सरकारचा जितका दबदबा नाही तितका दबदबा अंबानींचा आहे.

त्यामुळेच या प्रकारे लग्न सोहळा चालवला जाऊ शकत नाही किंवा हे लग्नकार्य लगेचच आटोपण्यात यावं, असं म्हणण्याची कोणाचीही हिंमत नाही.

मात्र गरीब लोक हात जोडून परमेश्वर चरणी प्रार्थनाच करू शकतात की देवा, या जोडप्याला सुखानं ठेव. मात्र हा लग्न सोहळा लगेच संपू दे.

प्रत्यक्ष लग्न कार्याआधी प्री-वेडिंग झालं आणि आता लग्न कार्य आटोपल्यानंतर पोस्ट वेडिंगचा जल्लोष सुरू झाला नाही म्हणजे झालं. नाहीतर असं दिसायचं की हनीमूनसाठी गेलेल्या हॉटेलच्या बाहेर सुद्धा कॅमेऱ्यांची गर्दी झाली आहे आणि दलेर मेहंदी लग्नाचं एखादं गाणं गातो आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

यानंतर देखील हे थांबणार आहे की नाही, हे आपल्याला माहित नाही.

कारण नव्या जोडप्याला मुलं सुद्धा होतीलच नाही का. मग ती मोठी सुद्धा होतील. त्यांचंही लग्न होईल. त्याचं ओझं कोण उचलणार आहे?

जर तुमच्याकडे मजूरी करण्यासाठी वेळ नसेल आणि तुम्हाला मोबाईल डेटाचं बिल देण्यात आलं नाही तर या पुढील पिढ्यांच्या लग्नाचा खर्च कुठून येईल? परमेश्वरा तूच सांभाळ.

(डिस्क्लेमर: या लेखात व्यक्त करण्यात आलेले विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. यामध्ये देण्यात आलेली माहिती आणि विचार बीबीसीचे नाहीत. बीबीसी याची कोणतीही जबाबदारी घेत नाही आणि याला उत्तर देण्यास बांधिल नाही.)