शिक्षणापेक्षा लग्नांवर दुप्पट खर्च! अंबानींपासून-कर्जबाजारी बापापर्यंत, लग्नांवर एवढा खर्च का करतात भारतीय?

फोटो स्रोत, ANI
- Author, नंदिनी वेल्लाईसामी
- Role, बीबीसी तामिळ
सध्या देशभरात एका लग्नाची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे अनंत अंबानीच्या.
महागडे डिझायनर कपडे आणि स्टायलिश दागिने घातलेल्या केलेल्या सेलिब्रिटींच्या फोटोंनी सोशल मीडिया सध्या ओसंडून वाहत आहे.
पॉप आयकॉन जस्टिन बिबर, बॉलिवूडचे स्टार्स, प्रसिद्ध क्रिकेटपटू, मोठे उद्योजक आणि इतर अनेक दिग्गज सध्या यासाठी मुंबईत पोहोचले आहेत. शहरात सगळीकडं हीच गजबज आहे.
कारण रिलायन्स समुहाचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या राधिका मर्चंटबरोबरच्या लग्नाचे विधी सध्या इथं सुरू आहेत.
शुक्रवारी 12 जुलै रोजी हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत.
भारतामध्ये विवाहसोहळे हे कौटुंबिक उत्सव म्हणून साजरे केले जातात. त्यात परंपरा आणि प्रचंड खर्च दोन्ही पाहायला मिळतं. भारतीय कुटुंबांमध्ये या विवाहाच्या माध्यमातून त्यांची श्रीमंती, दर्जा आणि समाजातली प्रतिष्ठा वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.

लग्नातल्या भपकेबाजपणासाठी कर्जही काढावे लागले तरी बेहत्तर
हिंदू विवाहांमध्ये संगीत आणि हळदीसारखे लग्नाचे विधी अत्यंत गाजावाजा करत साजरे केले जातात.
अनंत अंबानी आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्यात तर याच्या सेलिब्रेशननं एक वेगळीच पातळी गाठल्याचं पाहायला मिळालं आहे.
त्याचप्रमाणे मुस्लीम विवाहांमध्ये 'मेहंदी', 'निकाह' आणि 'वलिमा' अशा विधींचा समावेश असतो. ख्रिश्चन विवाहांमध्ये एंगेजमेंट, लग्न आणि रिसेप्शन असे सोहळे रंगतात.
अनंत आणि राधिका यांच्या विवाह सोहळ्यांच्या खर्चानंही माध्यमांना चर्चेसाठी अनेक विषय दिले. या विवाहाविषयी आलेल्या बातम्यांनुसार या विवाह सोहळ्यावर काही हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, ANI
पण फक्त अंबानींच्या घरचाच विवाह सोहळा नव्हे तर भारतीय समाजामध्ये प्रत्येक विवाह सोहळा हा एकप्रकारे अभिमानाचं प्रतिक समजला जातो.
प्रत्येकजण त्यांच्या ऐपतीनुसार विवाह सोहळ्यांचं नियोजन करतात. प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त भव्य-दिव्य सोहळा करायची इच्छा असते. मग या भपकेबाजपणासाठी कर्ज काढायलाही लोक मागं-पुढं पाहत नाहीत.
भारतात वेगवेगळ्या धर्म, जाती आणि संस्कृतींमध्ये विवाह सोहळे आणि त्यासाठी केला जाणारा खर्च हा जणू जीवनात अनिवार्य असतो.
मित्र, नातेवाईक किंवा सामाजिक वर्तुळासमोर अशा विवाहाच्या माध्यमातून कुटुंबाचं आर्थिक सामर्थ्य दाखवण्याचा एकप्रकारचा सांस्कृतिक दबाव यामुळं तयार होतो.
विवाहाची अब्जावधी डॉलरची बाजारपेठ
इनव्हेस्टमेंट बँकिंग आणि कॅपिटल मार्केट फर्म जेफरीजमध्ये विवाह सोहळ्यांवर करण्यात येणाऱ्या प्रचंड खर्चाबाबत माहिती देण्यात आली आहे.
या रिपोर्टनुसार भारतातील विवाह सोहळ्यांशी संबंधित बाजारपेठ ही जवळपास 10.7 लाख कोटींची आहे.
यामुळं बाजारपेठेत प्रचंड आर्थिक घडामोडी घडतात. तसंच सामान्यपणे भारतीय शिक्षणाच्या तुलनेत विवाहांवर दुपटीनं खर्च करतात, असंही या अहवालात म्हटलं आहे.
देशातील खाद्य आणि किराणा साहित्याच्या बाजारपेठेनंतरची ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
भारतातील विवाह सोहळ्यांशी संबंधित बाजारपेठ ही अमेरिकेतील बाजापेठेच्या (5.8 लाख कोटी) जवळपास दुप्पट आहे. तर चीनच्या बाजारपेठेपेक्षा (14.1 लाख कोटी) ती लहान आहे.
विवाह सोहळ्यांच्या आकड्यांचा विचार करता भारतात दरवर्षी 80 लाख ते एक कोटी विवाह सोहळे होतात. तर चीनमध्ये हा आकडा वर्षाला 70 ते 80 लाख आणि अमेरिकेत 20-25 लाख एवढा आहे.

आकडेवारीचा विचार करता भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये कुटुंबावर निर्माण होणारा आर्थिक बोजा हा मोठा असतो. जेफरीजच्या अहवालानुसार भारतात विवाहांवर सरासरी 12.5 लाख रुपये खर्च होतात. तर थाटामाटात केल्या जाणाऱ्या विवाहांवर सरासरी 20-30 लाख रुपयांचा खर्च केला जातो.
पण सरासरी होणारा जो 12.5 लाख रुपयांचा खर्च आहे, तो भारताच्या जीडीपीतील दरडोई उत्पन्नाच्या (2.4 लाख) जवळपास पाच पटीनं अधिक आहे. तसंच भारतीय कुटुंबाच्या सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या (4लाख) तुलनेत ते तीनपटीनं जास्त आहे.
विशेष म्हणजे भारतात केजीपासून ते पीजीपर्यंतच्या शिक्षणासाठी येणारा जो सरासरी खर्च आहे, त्यातुलनेतही हा खर्च दुप्पट आहे. याच आकडेवारीचा विचार करता, अमेरिकेत विवाह सोहळ्यांवर होणारा खर्च हा त्याठिकाणी शिक्षणावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अर्धा असतो.
त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या संस्कृतीतील फरक यावरून पाहायला मिळतो. हा अभ्यास यापूर्वीची माहिती आणि विवाहांशी संबंधित संस्थांना दिलेल्या भेटींच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पण अशा प्रकारचे भव्य-दिव्य विवाह सोहळे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांवर एक वेगळं ओझं निर्माण करत असतात.
कर्जाच्या चक्राचा विळखा
चेन्नईतील कृतिका (नाव बदललेले) यांच्या आयुष्यात दहा वर्षांपर्यंत सर्वकाही सुरळीत होतं. पण या लग्नामुळं अडकलेल्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या आई वडिलांना जवळपास 10 वर्षे लागली असं त्यांनी सांगितलं.
2014 मध्ये त्यांचं लग्न झालं तेव्हा लग्नामध्ये फक्त मंडप आणि जेवण यावरच जवळपास 10 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. कृतिका त्यांच्या लव्ह मॅरेजच्या आठवणी सांगत होत्या.

कृतिका यांनी त्यांच्या लग्नातील खर्चावरून धडा घेतला. त्यामुळं त्यांच्या दोन मुलींना अशाप्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून त्यांचं लग्न साधेपणानं करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळं मुलींना या जाणीवेसह लहानाचं मोठं करण्याचा विचार त्यांनी केला आहे.
आलिशान सोहळ्यांकडे तरुणांचा ओढा
एकीकडं लग्नासाठी घेतलेल्या कर्जामध्ये अडकणारा एक वर्ग आहे, तर दुसरीकडं जमवलेल्या बचतीचा बहुतांश भाग लग्नावर खर्च करणाराही एक वर्ग आहे.
चेन्नईच्याच दिनेशला जवळपास 4-5 वर्षे बचत करून साठवलेल्या रकमेपैकी जवळपास 70 टक्के रक्कम स्वतःच्या लग्नावर खर्च करण्यात काहीही गैर वाटत नाही. दिनेश स्वतःच इव्हेंट प्लॅनर आहेत. त्यांनी विवाहासाठी दागिने, लग्नाचा हॉल आणि स्टेज तसंच डेकोरेशनवर जवळपास 30 लाख रुपये खर्च केले.
“आपल्या प्रथा परंपरांनुसार आपल्याला विवाहापूर्वी काही विधी करावे लागतात. आम्ही सर्वकाही अगदी आलिशान पद्धतीनं केलं. नवरी पाहण्याचा कार्यक्रम, निमंत्रण पाठवणे, साखरपुडा, लग्न, रिसेप्शन असं सगळं काही अगदी थाटामाटात केलं,” असं ते म्हणाले. दिनेश यांनी फक्त फोटोशूटसाठी 1.5 लाख रुपये खर्च केले.
दागिन्यांमुळे बिघडते खर्चाचे गणित
दागिन्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चामुळं विवाहावर होणाऱ्या एकूण बजेटवर परिणाम होत असतो. जेफरीजच्या रिपोर्टनुसार विवाह सोहळ्यांमध्ये फक्त दागिन्यांवरच 2.9 ते 3.3 लाख कोटींपर्यंत खर्च केला जातो.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या विवाहांमध्ये विवाहात सोन्याला जे महत्त्वं दिलं जातं, आलिशान विवाहांमध्ये ते महत्त्वं हिऱ्यांना दिलं जातं.
सोन्याचे दागिने हे दीर्घकाळापासून भारतीय विवाहांमधील अविभाज्य भाग राहिले आहेत. नवरीच्या कुटुंबाकडून नवरदेवाच्या कुटुंबाला हुंड्याच्या रुपात दिल्या जाणाऱ्या दागिन्यांमुळं कुटुंबाचं लग्नाचं आर्थिक गणित बिघडतं. पालक कर्ज काढून किंवा चिट फंडच्या माध्यमातून मुलींसाठी दागिने खरेदी करतात.
दागिन्यांनंतर विवाह सोहळ्यांत दुसरा सर्वाधिक खर्च हा जेवणावर होतो. साधारणपणे 1.9 ते 2.1 लाख कोटी रुपये लोकांना मेजवानी देण्यावर खर्च केले जातात. त्याशिवाय कपडे, मेकअप, फोटोग्राफी आणि इतर बाबींवर होणारे खर्च वेगळेच असतात.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात विवाहाला असलेल्या सांस्कृतिक महत्त्वामुळं भारताबाहेर भारतीय विवाहाशी संबंधित बाजारपेठेला चालना मिळाल्याचं पाहायला मिळतं. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच विवाह सोहळे साजरे करण्यावर जोर दिला होता.
भारतीय कुटुंबांनी विदेशात जाण्याऐवजी विवाह सोहळ्यांसाठी देशातील स्थळांचीच निवड करण्याची विनंती त्यांनी केली होती.
भारताचा विचार करता प्रामुख्यानं जयपूर आणि उदयपूरमध्ये असलेले पॅलेस आणि हॉटेल तसंच गोव्यातील बीच याठिकाणी श्रीमंतांचे किंवा बॉलिवूड सेलिब्रिटीजचे विवाह सोहळे आयोजित केले जातात.
'मॅरेज कलर्स'चे क्रिएटिव्ह डायरेक्टर असलेले प्रदीप चंदेर यांनी, सेलिब्रिटीजचा दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळ अशा राज्यांत विवाह करण्याकडं ओढा वाढल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
“अंबानींनी रिकाम्या जागांवर भव्य दिव्य सेट उभारून विवाहपूर्व कार्यक्रमांचे आयोजन करत नवा ट्रेंड सेट केला. तर बॉलिवूड सेलिब्रिटीज आता बीच वेडिंग किंवा हिट चित्रपटांवर आधारित अनोख्या थीमकडे वळत आहेत. काहीजण तर ‘पोन्नियन सेलव्हन’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटांसारख्या थीमच्या सेटची मागणीही करत आहेत.”
याबरोबरच साधेपणानं विवाह करून खर्चावर कपात करण्याकडं ओढा असलेल्या तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील मनोज त्यापैकीच एक.
"मी लव्ह मॅरेज केले. काही मोजके नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत सोहळा केला,” असं त्यांनी सांगितलं. अगदी साधेपणानं रिसेप्शनचं आयोजन कल्याचं ते म्हणाले. 50 हजारांच्या आत खर्च करून फक्त महत्त्वाच्या लोकांनाच विवाहाबाबत त्यांनी माहिती दिली.
“लग्नासाठी कर्ज काढून लाखो रुपये खर्च करण्याऐवजी आम्ही त्याच पैशातून घरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतला,” असं मनोज यांनी अभिमानानं सांगितलं.
सामाजिक दबाव आणि ग्राहक संस्कृती
दिल्लीतील महिला विकास अध्ययन केंद्राचे संचालक मणिमेकालाइ यांच्या मते, धनाढ्यांच्या भव्य दिव्य विवाह सोहळ्यांचं मध्यम वर्गाला आकर्षण निर्माण होतं.
“पण, अशा प्रकारच्या महागड्या विवाह सोहळ्यांमुळं समाजामध्ये आर्थिक तणाव निर्माण होत असतो. अनेक लोकांना कोणत्याही परिस्थितीत थाटामाटात सोहळा करावा लागेल, असा दबाव वाटू लागतो.
मग त्यासाठी वेळ पडली तर कर्ज काढायची तयारी असते. ग्राहक संस्कृतीच्या प्रभावामुळं तरुण पिढीला जीवनाचा मनसोक्त आनंद लुटायची इच्छा असते,” असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
व्यक्तीच्या वर्तनामध्ये झालेल्या बदलामुळं अशा प्रकारचे आलिशान विवाह सोहळे आयोजित करण्याकडं ओढा वाढतो. इतरांनी केलेलं वर्तन आणि त्याचे होणारे परिणाम याच्या निरीक्षणातून हे घडत असतं. त्याला प्रदर्शनाचा परिणाम (डेमोस्ट्रेशन इफेक्ट) म्हणतात.
“विवाह सोहळ्यांमध्ये नवरीचे कुटुंब दागिने, भांडी, इलेक्ट्रीक उपकरणे आणि इतर गृहोपयोगी वस्तू खरेदीचा खर्च उचलत असते. त्यासाठी त्यांना कर्जही काढावे लागते. पण, नोकरी करणाऱ्या मुलींच्या लग्नानंतर मात्र आर्थिक सहाय्य नसल्यामुळं वृद्ध आई-वडील मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात,” अशी व्यथा मणिमेकालाइ यांनी मांडली.











