मादी अ‍ॅनाकोंडा मिलनानंतर नराला का खाऊन टाकते?

अ‍ॅनाकोंडा

फोटो स्रोत, Getty Images

सेक्स ही जगातील सर्वात गुंतागुंतीची गोष्ट आहे. निसर्गाने त्यात इतकी व्यामिश्रता आणली आहे, की दरवेळी त्यात जितकं संशोधन होत राहील, तितक्या नवीन आणि धक्कादायक गोष्टी समोर येत राहतील.

लैंगिकतेबद्दलचा दृष्टिकोन, समजुती, क्रिया-प्रतिक्रिया प्रत्येक सजीवानुसार बदलतात...मग तो माणूस असो, पक्षी असोत की साप.

ज्येसुस रिवास हे अमेरिकेतील मेक्सिको हायलँड विद्यापीठात काम करणारे सर्पतज्ज्ञ आहेत. इंग्रजीत या तज्ज्ञांना हर्पेटोलॉजिस्ट म्हणतात.

दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या अ‍ॅनाकोंडा या महाकाय सापाच्या लैंगिक जीवनाबद्दल ज्येसुस यांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अ‍ॅनाकोंडामध्ये संभोगानंतर मादी चक्क नराला खाऊन टाकते.

पूर्वी शास्त्रज्ञांना असं वाटायचं की, संभोगावेळी सापांमध्ये नर वर्चस्व गाजवतात आणि मादी ही केवळ नराच्या इशाऱ्यांना प्रतिसाद देते. मात्र अ‍ॅनाकोंडाबद्दलची ही विचित्र माहिती त्यांच्यासाठी धक्कादायक आहे.

मिलनादरम्यान मादीचं वर्चस्व

मिलनाच्या काळात मादीचं वय जास्त असेल, तर तिच्या शरीरातून स्रवणाऱ्या रसायनांचं प्रमाणही अधिक असतं.

इतर प्रजातींमध्ये नर आकाराने मोठे, अधिक शक्तिशाली असतात. परंतु सापांच्या बाबतीत ते उलट आहे. त्यामुळे अनेकवेळा सेक्स केल्यानंतर मादीने नराला गिळल्याचं आढळतं.

अ‍ॅनाकोंडा प्रजातींमध्ये मादी नरापेक्षा पाचपट मोठी असते. त्यामुळे ती नराला सहज गिळू शकते.

सरडे, पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये नर सामान्यतः मादीपेक्षा मोठे असतात. पण सापांमध्ये नरासाठी मादी आकाराने मोठी असणं हे फायदेशीर ठरत नाही.

संभोगावेळी नर साप हा जोडीदाराला शेपटीने ढकलत मादीच्या गुप्तांगापर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्यांचा आकार हा मादीपेक्षा मोठा असायलाच हवा असं नाहीये.

मादीकडून व्यक्त केली जाते मिलनाची उत्सुकता

साप

फोटो स्रोत, Getty Images

मादी सापाचा मोठा आकार तिला अधिक अंडी घालण्यास आणि पिलांना जन्म देण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यामुळे लहान नर साप आकाराने मोठ्या मादींना सेक्स पार्टनर म्हणून शोधतात.

पण जर सापांना नीट दिसत नाही, तर ते मिलनासाठी मोठ्या आकाराच्या मादीचा शोध घेतात तरी कसा?

संशोधनात असे आढळून आले आहे की, सापांच्या प्रजातींमध्ये मिलनाची उत्सुकता प्रथम मादीद्वारे व्यक्त केली जाते. मादी साप जेव्हा थंडीत किंवा उष्णतेमध्ये सुप्तावस्थेतून बाहेर पडतो, तेव्हा आपली कात टाकतो.

या काळात मादी कात टाकत असतानाच फेरोमोन नावाचं हार्मोनही सोडते. त्याच्या वासामुळे

नर साप आकर्षित होतात. त्याच संप्रेरकाच्या मदतीने नर सापही मादीच्या आकाराविषयी जाणून घेतो.

नर साप लहान मादींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत नाही असे नाही, पण हे क्वचितच होतं. जर एखादी आकाराने मोठी मादी आजूबाजूला असेल, तर नर साप पटकन तिच्याकडे सरकतो.

सापांबद्दल असा समज आहे की, नर साप अनेक माद्यांसोबत सोबत करतात, परंतु नवीन संशोधनात याच्या उलट माहिती समोर आली आहे.

एकाच मादीच्या प्रेमात असलेला अ‍ॅनाकोंडा

अ‍ॅनाकोंडा प्रजातींमध्ये मादी नरापेक्षा पाचपट मोठी असते. त्यामुळे ती नराला सहज गिळू शकते.

ब्रिटनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ वोल्व्हरहॅम्प्टनचे मार्क ओ'शीया यांना आढळलं की, मलेशियामध्ये सापडलेला पॅराडाइज फ्लाइंग साप मात्र जरा वेगळं वागतो.

या सापांमध्ये अनेक नर एका मादीला आकर्षित करण्याचा प्रयक्न करताना आढळले.

साप

फोटो स्रोत, Getty Images

किल-बेलीड व्हिप स्नेक या प्रजातीमधे तर नर साप टीम बनवून मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.

एकाच ठिकाणी अनेक जोडीदारांशी मिलन करणंही सापाच्या काही प्रजातींमध्ये दिसून येतं.

उदाहरणार्थ-अ‍ॅनाकोंडामध्ये मादी चिखलात एका जागी असते. नर अ‍ॅनाकोंडा तिच्याभोवती फिरू लागतात,तिच्या जवळ जातात आणि तिला आपल्याकडेच आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मिलनाचा हा काळ काही महिनेही चालतो.

ज्येसुस रिवास यांनी एक वेगळा किस्सा सांगितला. एकदा त्यांनी हिरव्या रंगाचा एक नर अ‍ॅनाकोंडा मादीच्या मागे जात होता. त्यावेळी तिथे इतरही मादी अ‍ॅनाकोंडा होत्या. तो त्यांच्यासोबतही संग करू शकत होता. मात्र, कदाचित त्याला त्या विशिष्ट मादीतच रस असावा. तो खरंच तिच्या प्रेमात असावा.

एका मादीला आकर्षून घेण्याचा प्रयत्न करणारे 100 नर

कॅनडामध्ये आढळणाऱ्या गार्टर जातीच्या सापांमध्ये मादीला आकर्षून घेण्यासाठी तीव्र स्पर्धा दिसून येते. 100-100 नर साप एका मादीचा पाठलाग करतात.

कॅनडातील मॅनिटोबाच्या जंगलात सापांच्या मिलनाच्या हंगामात असे दृश्य बऱ्याचदा पाहायला मिळते.

मात्र, सापांची ही प्रजाती अमेरिकेच्या इतर भागांमध्ये असं करताना दिसत नाही. याचा अर्थ लैंगिक वर्तन प्रदेशानुसार बदलते. उदाहरणार्थ- न्यू मेक्सिकोमध्ये आढळणारे गार्टर साप कॅनडातील गार्टर सापांप्रमाणे वर्तन करत नाहीत.

सापांच्या या ‘स्वयंवरा’मध्ये सहसा मादीच आपला जोडीदार निवडते. मिलनाच्या संपूर्ण प्रक्रियेत मादी नेहमीच वरचढ असते. अगदी जोडीदार निवडीपासून मिलनाचा काळ किती असावा, हेही मादीच ठरवते.

साप

फोटो स्रोत, Getty Images

जर समाधान झालं नाही, तर दुसरा जोडीदार निवडा

जर नराकडून लैंगिक संबंधांमुळे समाधान झालं नसेल, तर ती लगेच त्याला दूर ढकलून दुसरा जोडीदार शोधते.

कोणता नर आपल्याशी संबंध ठेवायला योग्य आहे, हे मादी कसं ठरवते? हा प्रश्न आहे.

या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आजपर्यंत शास्त्रज्ञांना सापडलेले नाही. हे नर सापाच्या क्षमतेवर आणि वासनेवर अवलंबून असू शकते. किंवा मादीला तिच्या स्पर्शावरून पुरुषाच्या ताकदीचा अंदाज येत असावा.

अ‍ॅनाकोंडा

फोटो स्रोत, Getty Images

मादी दुसऱ्यावेळेसही त्याच नर सापासोबत मिलन करेलच असं नाही. मादी वेगवेगळ्या नरांसोबत मिलन करताना दिसते.

दुसरीकडे, मादी मिलनासाठी उत्सुक असेल तर नर मात्र एकनिष्ठ राहतो. अगदी मादी झोपली, तरी तो तिच्याभोवती फिरत राहतो.

दुसरीकडे, नर साप सहसा मादीशी एकनिष्ठ असतो जेव्हा ती लैंगिक संबंध ठेवण्यास सहमत असते. मादी साप झोपला तरी नर साप तिच्याभोवती फिरत राहतो.

मादी एकावेळी अनेक नरांची निवड का करते?

कदाचित मादीची सेक्सची इच्छा तीव्र असेल किंवा अनेक नरांशी मिलन केल्यानंतरच कोणत्या सापाकडून सक्षम पिलाला जन्म देता येईल, हे ती ठरवते.

शेवटी सेक्सचा उद्देश हा पुढच्या पिढीला जन्म देणं हाच असतो.

मादीमध्ये नर सापाचे शुक्राणू काही दिवस शरीरात ठेवण्याची क्षमता असते. कदाचित म्हणूनच ती अनेक नर सापांशी संभोग करून नराच्या शुक्राणूंचे जतन करत असेल आणि सर्वांत निरोगी पिलाला जन्म देण्याची शक्यता आहे.

मादी साप अनेकदा सेक्स केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचे फेरोमोन हार्मोन सोडते. तो नर सापासाठी संदेश असतो की, आता यापुढे मिलन होणार नाही.

साप

फोटो स्रोत, Getty Images

शास्त्रज्ञ याला ‘मेटिंग प्लग’ असं म्हणतात. म्हणजेच मादी आपली जननेंद्रिय आंकुचित करून घेते. त्यामुळे नर सापाची इच्छा असली तरीही तो संबंध ठेवून पिलांना जन्म देऊ शकत नाही. कारण त्याचे शुक्राणू मादीच्या जननेंद्रियात जाऊ शकत नाहीत.

पण हे मेटिंग प्लग नेहमीच यशस्वी होतं असं नाही. नरांमध्येही काही शुक्राणू असे असतात, जो हा प्लग भेदून हळूहळू मादीच्या बीजांडापर्यंत प्रवास करतात. म्हणजेच नरही आपला वंश वाढविण्याचं काम करतो.

मादी अ‍ॅनाकोंडा मिलनानंतर नराला गिळून टाकते, त्यामुळे नर मिलनानंतर लगेचच तिथून निसटण्याचा प्रयत्न करतो.

मिलनानंतर मादी नराला खाते

मादी अ‍ॅनाकोंडा नराला संभोगानंतर कधी खाऊन टाकते, हे नेमकं माहीत नाही. शिवाय हे प्रत्येक वेळी घडतंच असं नाही.

पण नराच्या मृत्यूमुळे मादीला पौष्टिक आहार मिळाला असावा. कारण मादी गर्भवती राहिल्यानंतर सात महिने काहीही खात किंवा पीत नाही.

सापांच्या आणि कोळ्यांच्या लैंगिक पद्धतींमध्येही बरंच साम्य असतं. कोळ्यांमध्येही नर आकाराने मोठे असतात आणि मादीला आकर्षिक करण्यासाठी नरांमध्ये प्रचंड स्पर्धा असते.

मिलनादरम्यान वर्चस्व मादीचं असतं आणि ती पण मिलनानंतर नराला खाते.

कोळी आणि साप यांच्यात प्रजाती म्हणून विशेष साधर्म्य नाही. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या विकासाच्या प्रक्रियेत दोघेही लाखो वर्षांपूर्वी एकमेकांपासून विभक्त झाले होते, मग त्यांच्या लैंगिक पद्धतींमध्ये इतके साम्य का आहे?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे. शेवटी सेक्स हा जगातला सर्वांत गुंतागुंतीचा विषय आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)