भूषण देसाई : भाजपचे आरोप ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, असा आहे प्रवास

भूषण देसाई

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, भूषण देसाई
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चिरंजीवाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी सोमवारी (13 मार्च) 'बाळासाहेब भवन' येथे शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या काही मोजक्या ज्येष्ठ नेत्यांपौकी सुभाष देसाई एक आहेत. परंतु त्यांच्या मुलानेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सुभाष देसाई हे ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत मानले जातात. मग त्यांच्या मुलाने, भूषण देसाईंनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय का घेतला?

सुभाष देसाईंचा मुलगा यापलिकडे भूषण देसाई यांची आणखी ओळख काय आहे? त्यांच्यावर यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी काय आरोप केले होते? जाणून घेऊया...

तुमच्यावर आरोप झाल्यानंतर आणि चौकशीचा ससेमिरा लागेल म्हणून तुम्ही प्रवेश केला का? असा प्रश्न देखील भूषण देसाई यांना विचारण्यात आला.

तेव्हा ते पत्रकार परिषदेत म्हणाले, "अजिबात नाही. तसं काही नव्हतं. तुम्हाला माहिती मिळेल तुम्ही माहिती काढायला गेल्यानंतर. साहेबांनी 5 दशकं काम केलं. पण माझा स्वतंत्र विचार असू शकतो ना."

कोण आहेत भूषण देसाई?

सुभाष देसाई पाच दशकांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

तसंच ते ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आहेत. 1990 पासून ते विधानसभा निवडणूक लढवतायत. 2004 आणि 2009 मध्ये ते सलग दोन वेळा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

विधिमंडळ नेते, शिवसेनेचे नेते अशा पदांवरही त्यांनी संघटनेत काम केले आहे. यानंतर दोन वेळा ते शिवसेनेकडून विधानपरिषदेत निवडून आले आहेत.

राज्याचं उद्योगमंत्रिपदही सुभाष देसाईंनी सांभाळलं होतं.

अशा परिस्थितीत सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सुभाष देसाई, भूषण देसाई, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेना
फोटो कॅप्शन, भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

भूषण देसाई, प्रबोध देसाई आणि सुबोध देसाई अशी सुभाष देसाई यांना तीन मुलं आहेत. यापैकी भूषण हे सुभाष देसाई यांचे कनिष्ठ पुत्र आहेत.

मी यापूर्वी पक्षात आणि समाजकारणात सक्रिय होतो, अशी माहिती भूषण देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोप काय झाले होते?

तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यकाळात उद्योगांसंदर्भात आणि MIDC च्या भूखंडासंदर्भात भाजप नेत्यांनी आरोप केले होते.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला गेले असा आरोप सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता.

याच दरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी भूषण देसाई कोण आहेत?, बैठका कुठे होत होत? असेही प्रश्न लाड यांनी उपस्थित केले होते.

प्रसाद लाड म्हणाले होते, "21 सप्टेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत सरकारने काय केलं याचं उत्तर सुभाष देसाईंनी दिलं पाहिजे. महाराष्ट्रात प्रकल्प येण्यापासून कोणी रोखले? त्यांचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? कुठे बैठका होत होत्या? दुबईमध्ये काय बैठका होत होत्या? रेडी रेकनर भाव काय मागितला जात होता." अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली होती.

सुभाष देसाई, भूषण देसाई, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेना
फोटो कॅप्शन, सुभाष देसाई आणि भूषण देसाई
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याशिवाय भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही MIDC ची कोट्यवधी रुपयांची जागा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खासगी वापरासाठी दिली तसंच भूषण देसाई 'डिल' मध्ये सहभागी होते का? असाही प्रश्न उपस्थित केला होता.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, ते म्हणाले होते, "उद्योगमंत्री असताना सुभाष देसाई यांनी MIDC ची 4.14 लाख स्क्वेअर मीटर जमीन ही खासगी वापरासाठी दिली. 3109 कोटी रुपये किंमत असलेले 4.14 लाखाचे प्लॉट्स ट्रांसफर केल्याचा आरोप केला होता आणि यासाठी सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई डिलमध्ये सहभागी होते आणि बीकेसी येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ते उद्योगपतींना भेटले होते."

ही 'डील' कोरोना आरोग्य संकटात मे आणि जून 2021 मध्ये झाली होती असाही आरोप होता.

तर 2020 मध्ये आणखी एका कारणासाठी भूषण देसाई चर्चेत आले होते. ऑक्टोबर 2020 मध्ये 'भूषण देसाई यांनी जुहू येथील एका मोठ्या प्रकल्पात फ्लॅट खरेदी केला असून या फ्लॅटची किंमत 33 कोटी रुपये आहे, 'असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी मंत्र्यांच्या मुलाला 33 कोटींचा फ्लॅट कसा परवडला अशी चर्चा झाली होती.

दरम्यान, सुभाष देसाई यांनी वरील सर्व आरोप वेळोवेळी फेटाळले होते.

तसंच, या आरोपांमुळे मी अजिबात पक्षात प्रवेश केलेला नाही, असं भूषण देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

'वाॅशींग मशीनमध्ये उडी मारायची असेल तर ते जाऊ शकतात'

भूषण देसाई यांचा शिवसेनेशी संबंध नव्हता अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

ते म्हणाले की, "मला वाटत नाही त्यांचा शिवसेनेशी काही संबंध होता. आता वाॅशींग मशीनमध्ये कोणाला उडी मारायची असेल तर ते कुठेही जाऊ शकतात. देसाई हे कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात. त्यांनी पक्षाला 24 तास दिले आहेत. कुठलंही पद नसलं तरी ते पक्षासाठी काम करत आहेत. आम्ही त्यांच्या आशीर्वादाने काम करत असतो."

त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होते असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, "आता तुम्ही बघा 1 प्लस 1 किती होतात तुम्ही विचार करा."

तर दुसऱ्या बाजूला भूषण देसाई यांनाही आदित्य ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेबाबत प्रश्न विचारला गेला.

यावर ते म्हणाले की, "असं अजिबात नाहीय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय माझा स्वतंत्र निर्णय आहे. आरोपांशी त्याचा काहीही संबंध नाही. मला वाॅशींग मशीन काही वाटत नाही. विकास कामं होत आहे म्हणून मी आलोय." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच याआधीही आपण समाज कार्य करत होतो पण कोणीही याची दखल घेतली नाही असंही भूषण देसाई म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

सुभाष देसाई काय म्हणाले?

आपल्या चिरंजीवांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर सुभाष देसाई यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणतात, "माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे."

हे वाचलंत का?

Facebook पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)