सिडनी चाकू हल्ला करणाऱ्या इसमाने का केल्या 6 हत्या ? पोलिसांना तपासात काय हाती लागले?

जोएल कॉचीनं केलेल्या चाकू हल्ल्यात पाच महिला आणि एक पुरुषाचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Rohan Anderson

फोटो कॅप्शन, जोएल कॉचीनं केलेल्या चाकू हल्ल्यात पाच महिला आणि एक पुरुषाचा मृत्यू झाला होता.
    • Author, जे सॅव्हेज
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, सिडनीहून

सिडनीत झालेल्या चाकू हल्ल्यामुळं जगभर खळबळ उडाली. एका व्यक्तीने केलेल्या चाकू हल्ल्यात 6 निरपराध नागरिकांचा बळी गेला, अनेक जखमी झाले. या हल्ल्यामुळं सर्वांनाच धक्का बसला असून जगभरातून या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सिडनीतील शॉपिंग सेंटरमध्ये चाकू हल्ला करून सहा लोकांचा जीव घेणाऱ्याची ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ओळख पटली आहे. त्याच्यावर गोळी झाडल्यानंतर तो मृत पावला होता.

जोएल कॉची असं त्या व्यक्तीचं नाव आहे. कॉची या 40 वर्षाच्या व्यक्तीनं वेस्टफिल्ड बॉंडी जंक्शन कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी चाकू हल्ला केला. त्याने एका लांब धारदार सुऱ्याने लोकांना भोसकण्यास सुरूवात केल्यानंतर तिथं एकच गोंधळ उडाला होता.

कॉचीनं केलेल्या चाकू हल्ल्यात पाच महिला आणि एक पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर इतर अनेक जण जखमी झाले होते. यात एक छोटं बाळ देखील जखमी झालं होतं.

पोलिसांनी सांगितलं की हा हल्ला कॉचीच्या मानसिक आजाराशी निगडित होता.

कॉचीकडून फक्त महिलांवरच हल्ला केला जात होता का? या प्रश्नाला उत्तर देताना न्यू साऊथ वेल्स पोलिस आयुक्त केरन वेब म्हणाल्या आम्हीदेखील याच गोष्टीचा तपास करत आहोत.

त्यांनी पुढं सांगितलं की या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणता येणार नाही. कारण त्यात कोणत्याही विचारधारेचा संबंध नव्हता.

हल्लेखोर कॉची हा मूळचा क्वीन्सलँडचा आहे. कॉचीबद्दलची माहिती क्वीन्सलँड पोलिसांकडे आधीच आहे. मात्र याआधी पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती किंवा त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवला नव्हता.

वयाच्या 17 वर्षीच त्याला मानसिक आजार असल्याचं निदान झालं होतं, अशी माहिती क्विन्सलॅंड पोलिसांनी दिली.

कॉचीच्या कुटुंबीयांनी त्याने केलेलं कृत्य खूपच भयानक असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की तो किशोरवयीन असल्यापासूनच त्याला मानसिक आजार होते.

कॉचीच्या कुटुंबीयांनी पुढं सांगितलं की ''सिडनीमध्ये काल झालेल्या या भयानक प्रकारामुळं आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे.''

''ज्या लोकांचा मृत्यू झाला आणि ज्यांच्या अद्याप उपचार सुरू आहेत अशा सर्वांबद्दल आम्हाला संवेदना वाटते आणि आमची सदभावना त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत आहे.''

''जोएलचं कृत्य खरोखरंच अत्यंत भयानक होतं आणि जे काही घडलं ते समजून घेण्याचा अद्याप आम्ही प्रयत्न करत आहोत.''

हल्लेखोराला गोळी मारणारी अधिकारी कोण ?

जोएल कॉचीच्या कुटुंबीयांनी पुढं सांगितलं की ते पोलिसांच्या संपर्कात आहेत आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यानं त्याला गोळी मारली त्याच्याबद्दल त्यांच्या मनात कोणाताही राग किंवा नकारात्मक भावना नाहीत.

''ती पोलीस अधिकारी इतरांचं संरक्षण करण्याचं तिचं कर्तव्य बजावत होती आणि ती व्यवस्थित असेल अशी आम्हाला आशा वाटते.''

सिडनीत कॉचीच्या मालकीच्या छोट्या खोलीची पोलिसांनी झडती घेतली आहे. मात्र या प्रारंभिक तपासातून त्यानं हे कृत्य करण्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

अॅमी स्कॉट

फोटो स्रोत, NSW Police

फोटो कॅप्शन, अॅमी स्कॉट

पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की मृतांच्या कुटुंबियांपर्यंत या घटनेची माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

यातील दोन जणांचे ऑस्ट्रेलियामध्ये कोणीही नातेवाईक नसल्याचं आढळून आलं आहे.

अॅशली
फोटो कॅप्शन, अॅशली गुड

अॅशली गूड या महिलेचा यात मृत्यू झाला आहे. तिचं बाळदेखील या हल्ल्यात जखमी झालं आहे अशी माहिती अॅशलीच्या कुटुंबीयांनी दिली.

या घटनेच्या साक्षीदारांनी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की अॅशली गूड जेव्हा या हल्ल्यात जखमी झाली होती तेव्हा तिनं जाणीवपूर्वक आपल्या बाळाला दूर लोटलं होतं.

एका व्यक्तीनं नाईन न्यूजला सांगितलं की ''त्या महिलेवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तिनं बाळ आपल्या पाठीशी लपवलं आणि त्याला माझ्या दिशेनं भिरकावलं आणि मी त्या बाळाला पकडलं होतं.''

त्या नऊ महिन्यांच्या मुलीवर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि अजूनही ते आयसीयूमध्ये गंभीर स्थितीत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री रायन पार्क यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

ते पुढं म्हणाले की ''आम्हाला आशा आहे की ती मुलगी नक्कीच यातून बरी होईल. मात्र आता तिच्या समोर सर्व आयुष्य आहे.''

पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक

अॅशली गूडच्या कुटुंबीयांनी सांगितलं की ''अॅशलीला गमावल्यामुळं ते प्रचंड दु:खात आहेत. ती एक सुंदर आई, मुलगी, बहिण, पत्नी, मैत्रीण आणि अष्टपैलू व्यक्ती होती आणि त्यापेक्षाही अधिक होती.''

''ऑस्ट्रेलियातील ज्या नागरिकांनी अॅशली आणि तिच्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे त्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सद्भावनांबद्दल आम्ही धन्यवाद देतो,'' असं तिच्या कुटुंबीयांनी एका पत्रकाद्वारे म्हटलं आहे.

या चाकू हल्ल्यात मृत झालेल्या फराझ ताहिर या 30 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीनं वर्षभरापूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये आसरा घेतला होता, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील अहमदिया मुस्लीम समुदायाने दिली आहे.

''ताहिर एक सुरक्षा रक्षक होता आणि स्थानिक समुदायात तो लाडका होता. त्याच्या दयाळूपणामुळं तो सर्वांना आवडायचा'' असं एका पत्रकात म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलिया चाकू हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉन सिंगलटन या 25 वर्षाच्या तरुणीचा देखील मृत्यू झाला आहे. ती नोकरी करत असलेल्या व्हाईट फॉक्स बुटीकनं म्हटलं आहे की ''तिला गमावल्यामुळं आम्हाला खूपच धक्का बसला आहे. डॉन खूपच गोड आणि सह्रदयी व्यक्ती होती. तिच्यासमोर तिचं सर्व आयुष्य होतं. ती खरोखरच अद्भुत होती.''

पंतप्रधान अॅंथन अल्बानीस म्हणाले की जे काही घडलं त्यामुळं बसलेल्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन नागरिक करत आहेत.

अल्बानीस यांनी या हल्ल्याचा वर्णन शब्दापलीकडचा आणि कल्पनेपलीकडचा असं केलं आहे. ज्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एकट्याने मॉलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कॉचीचा मुकाबला केला आणि त्याला गोळी घातली, तिचं पंतप्रधान अल्बानीस यांनी कौतुक केलं आहे.

''त्या पोलीस इन्स्पेक्टरनं तिचा स्वत:चा जीव धोक्यात घालून तिथं धाव घेतली आणि इतरांच्या जीवावर आलेलं संकट दूर केलं. असं करताना तिनं तिच्या जीवाला असलेल्या धोक्याचा थोडासादेखील विचार केला नाही,'' या शब्दात पंतप्रधान अल्बानीस यांनी त्या पोलिस अधिकाऱ्याचे आणि आपत्कालीन टीमला धन्यवाद दिले.

ज्या पोलीस अधिकाऱ्याने चाकू हल्ल्याच्या वेळी धाव घेत अनेकांचे जीव वाचवले तिचं नाव अॅमी स्कॉट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेबद्दल सार्वजनिकरित्या काही बोलण्याची किंवा प्रतिक्रिया देण्याची अॅमीची सध्यातरी इच्छा नाही.

सिडनी चाकू हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

या घटनेत शौर्य दाखवणाऱ्या इतरांचंदेखील कौतुक करण्यात आलं आहे. यात खांब पकडलेला एक माणूस जो इलिव्हेटहून कॉचीकडं पाहत असल्याचं दिसून आलं, त्याचाही समावेश आहे.

पोलिसांनी माहिती दिली की या हल्ल्यात चाकूनं भोसकल्यामुळं जखमी झालेल्या नऊ लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

तर इतर तीन जणांवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. ही घटना घडल्यानंतर जवळपास 40 वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

सिडनीच्या पूर्व भागातील शॉपिंग सेंटर रविवारी बंद होतं आणि घटना स्थळाला फोरेन्सिक पथकाचा गराडा पडला होता.

असंख्य नागरिकांनी या घटनास्थळी येऊन आदरांजली वाहिली, तेव्हा त्यांच्याडोळ्यात पाणी तरारलं होतं.

दुपार होईपर्यंत शेकडो पुष्पगुच्छांचा ढीग शॉपिंग सेंटरच्या प्रवेशद्वारासमोर लागला होता.

जर मानसिक आरोग्य किंवा आजारासंदर्भात कोणाला मदत हवी असेल तर ते उपलब्ध असल्याचं म्हणत हिरव्या रंगाच्या पोशाखातील असंख्य स्वयंसेवी कार्यकर्ते उभे होते.

सिडनी चाकू हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

घटनास्थळी हजर असणाऱ्यांमध्ये योन रसेल देखील होत्या. त्या 35 वर्षांपासून त्याच परिसरात राहत आहेत. मला धक्का बसला आहे, असं त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.

ही खूपच धक्कादायक घटना आहे. हे ठिकाण आमच्या घराच्या अंगणाशेजारी असल्यासारखंच आहे. आम्ही सोमवार ते शुक्रवार काम करतो आणि मग शनिवारी शॉपिंगसाठी बाहेर पडतो. हे आमच्या कोणाच्याही बाबतीत सहजपणे घडू शकलं असतं.

जागतिक पातळीवर अनेक राष्ट्राध्यक्षांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करताना धक्का बसल्याचं म्हटलं आहे. न्यूझीलॅंडच्या ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी सांगितलं की या घटनेत सापडलेल्या लोकांबद्दल सर्व न्यूझीलॅंडवासिय विचार करत आहेत. तर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सूनक म्हणाले की ''घटनेत सापडलेल्या लोकांसोबत ब्रिटिश नागरिकांच्या सदभावना आहेत.''

पोप फ्रान्सिस म्हणाले की ''या क्रूर शोकांतिकेमुळं त्यांना प्रचंड दु:ख झालं असून त्यांनी यासंदर्भात प्रार्थना केली.'' किंग चार्लस म्हणाले की ''ते आणि राणी कॅमिला यांना प्रचंड धक्का बसला आणि या घटनेत मृत पावलेल्या कुटुंबीय आणि प्रियजनांसोबत आमच्या सदभावना आहेत.''

(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)