गर्भनिरोधाची गोळी बाजारात आणण्याआधी जेव्हा महिला आणि मनोरुग्णांवर फसवून चाचण्या करण्यात आल्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रोनाल्ड अव्हिला-क्लॉडिओ
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
पोर्तो रिकोच्या सॅन जुआन शहरात एके ठिकाणी दोन महिला गोंधळलेल्या अवस्थेत एकमेकांकडे पाहत उभ्या आहेत. दोघीही घाबरलेल्या दिसत आहेत. पण तरीही धीर एकवटून त्या आपला अनुभव लोकांना सांगू लागतात.
एकीने म्हटलं, “माझं आयुष्य आता संपलं, मला आता अंधुक दिसू लागलं आहे. व्हर्जिन डेल कार्मेन, माझ्या मुलांची काळजी घ्या.” (व्हर्जिन डेल कार्मेन म्हणजे पोर्तो रिकोमध्ये पूजली जाणारी एक देवता)
हे बोलत असताना एकीच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती पुढे म्हणाली, “ते नकळत आपल्यावर प्रयोग करत होते."
हे दृश्य 1982 सालच्या ‘ला ऑपरेशन’ या डॉक्युमेंटरीचा भाग आहे. गर्भनिरोधक गोळ्यांच्या चाचण्यांसाठीच्या प्रयोगात महिलांचा वापर कशा प्रकारे करण्यात आला, हे या माहितीपटात दाखवण्यात आलेलं आहे.
1950 च्या दशकात ज्यावेळी पहिल्यांदा गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव तपासण्यात येत होता, तेव्हाचा हा काळ आहे.
या चाचण्यांचा आपण भाग होतो, हे या महिलांना माहीतच नव्हतं, हे डॉक्युमेंटरीमधून दाखवण्यात आलं आहे.
वरील दोन महिलांप्रमाणेच पोर्तो रिको येथील इतर शेकडो महिला नकळतपणे दोन अमेरिकन शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा भाग बनल्या होत्या.
या प्रयोगानंतरच पुढच्या काळात 1960 च्या दशकात गर्भनिरोधक गोळ्यांचा व्यावसायिक वापर सुरू झाला.
या गर्भनिरोधक गोळ्याची चाचणी अमेरिकेच्या ताब्यातील बेट पोर्तो रिको येथे करण्यात आली होती. त्यामुळे येथील लोकसंख्येचं नियंत्रणही करण्यात आलं.
20 व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तो रिको येथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली होती. त्यानंतर अमेरिकेतील नेत्यांनी येथील लोकांना मुले होऊ नयेत, यासाठी जबरदस्ती केल्याचं आढळून येतं.

फोटो स्रोत, Getty Images
पोर्तो रिको विद्यापीठातील प्रोफेसर आणि ‘ला ऑपरेशन’ डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक एना मारिया गासरिया यांच्या मते, गरीब समुदायातील नागरिकांची लोकसंख्या कमी करण्यासाठी त्यावेळी अनेक मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या.
“या प्रकल्पांमध्ये देशातील सर्वांत गरीब आणि मोठ्या प्रमाणात अशिक्षित असलेल्या महिलांना लक्ष्य करण्यात आलं होतं,” असा आरोप पोर्तो रिको येथील स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या लुडस एओना यांनी केला.
याचं कारण म्हणजे गरीब घटकातील लोकांना अशा प्रयोगांमध्ये सहभागी झाल्याचे दुष्परिणाम समजण्याची शक्यता ही अत्यंत कमी असते, असं त्या म्हणतात.
त्याचवेळी, चाचण्या घेण्यापूर्वी त्यांच्याकडून संमती मिळवणे हे मोठे आव्हान असतं, असंही त्यांनी सांगितलं.
गासरिया यांच्या मते, "सार्वजनिक आणि खाजगी अर्थसहाय्याच्या मदतीने पोर्तो रिको येथे एक प्रकारे अत्याधुनिक जन्म- नियंत्रण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली होती."
या प्रयोगासाठी महिलांना एखाद्या ‘गिनी पीग’ सारखा प्रयोगांसाठी वापर करण्यात आला, असंही एओना यांनी म्हटलं.
दोन शास्त्रज्ञ, दोन कार्यकर्ते
युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, सध्या जगातील दीड कोटी महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा नियमितपणे वापर करतात.
या गोळ्यांचा जन्म पोर्तो रिकोपासून जवळच असलेल्या मॅसॅच्युसेट्स येथील जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात झाला आहे. येथील जॉन रॉक आणि ग्रेगरी पिंकस या दोन नामवंत प्राध्यापकांनी या गोळ्या विकसित केल्या.

फोटो स्रोत, Getty Images
तसंच त्यांना वैद्यकीय क्षेत्रात नर्स म्हणून काम करत असलेल्या मार्गारेट सँगर यांचंही सहकार्य लाभलं. मार्गेरेट यांनी पुढे अमेरिकेतील पहिलं गर्भनिरोधक क्लिनिक स्थापन केलं. नंतर त्याचं एका NGO मध्येही रुपांतर करण्यात आलं.
गर्भनिरोधक गोळ्यांच्या कामात सहकार्य करणाऱ्या चौथ्या व्यक्तीचं नाव आहे कॅथरीन मॅककॉर्मिक. कॅथरीन ही एका राजघराण्याची वारसदार होती. तिच्या कुटुंबानेच गर्भनिरोधक गोळीसाठी आवश्यक असणारा वित्तपुरवठा केला.
सर्वप्रथम मार्गारेटच्या माध्यमातून कॅथरीनची भेट ग्रेगरी पिंकस यांच्यासोबत झाली. ते करत असलेलं संशोधन मनोरंजक वाटल्याने तिने यासाठी निधी देण्यात पुढाकार घेतला.
एओना म्हणतात, “महिलांना समाजातील विविध क्षेत्रांमध्ये सहभागी करून घेतल्यास त्यांना सक्षम बनवता येऊ शकतं. पण त्यासाठी त्यांना सर्वप्रथम माता होण्यापासून रोखणे आवश्यक आहे.”
न्यू जर्सीच्या रॉजर्स विद्यापीठात प्राध्यापक प्रजनन विषयक तज्ज्ञ मार्गारेट मार्श यांच्याशीही यावेळी चर्चा करण्यात आली. त्या म्हणतात, “लोकसंख्या नियंत्रण चळवळीचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे महिलांना मुले कधी जन्माला घालायची हे ठरवता आलं पाहिजं. तसंच दुसरं म्हणजे गरीब महिलांमध्ये प्रजनन दर कमी असला पाहिजे.”
पहिला अभ्यास
अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांचं प्राथमिक संशोधन उंदीर आणि इतर प्राण्यांवर करण्यात आलं. मात्र नंतर यामध्ये चुकीचा मार्ग अवलंबण्यात आला.
मार्गारेट मार्श सांगतात, “हे औषध मॅसॅच्युसेट्समधील काही जणांना देण्यात आलं. हे रुग्ण आपल्या मानसिक आरोग्याच्या समस्येवर उपचार घेत होते.”

फोटो स्रोत, Getty Images
मार्गारेट मार्श यांनी सांगितलं, “या रुग्णांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी परवानगी दिली होती. पण, मुळातच ते एका मनोरुग्णालयात असल्याने नैसर्गिकरित्या त्यांची संमती घेण्यात आली नव्हती. तेव्हाच्या काळात हे कायदेशीर होतं.”
जॉन रॉक आणि ग्रेगरी पिंकस यांनी तयार केलेलं एक रासायनिक संयुग महिलेच्या शरीरातील स्त्रीबीज निर्मिती थांबवेल, हे त्यांनी शोधून काढलं होतं.
पण त्याची खात्री पटवण्यासाठी त्यांना हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करायचा होता. त्यातही निकाल अनुकूल आल्यानंतरच अमेरिकन प्रशासनाकडून या गोळीला मान्यता मिळू शकणार होती.
प्राध्यापक गाररिया म्हणतात, “मॅसॅच्युसेट्समध्ये जन्म-नियंत्रण हे बेकायदेशीर होतं, तसंच इथे मानवांवर प्रयोग करण्यास कायदेशीर बंधनेही होती.”
याच कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेली वैद्यकीय चाचणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी योग्य ठिकाणाचा शोध घेणं सुरू केलं.
‘बेटावरची प्रयोगशाळा’
अखेरीस, आपल्या औषधांचा प्रयोग करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पोर्तो रिको येथे जाण्याचा निर्णय घेतला. पोर्तो रिकोमध्ये 1937 पासून जन्म-नियंत्रणाचे प्रयत्न कायदेशीररित्या करण्यात येत होते.

फोटो स्रोत, Getty Images
गासरिया यांच्या मते, तेथे त्यासाठीचा कायदा असल्यामुळे त्यांच्यासाठी ते सोयीचं ठरलं. विशेष म्हणजे, त्यावेळी अमेरिकेसह इतर कोणत्याही देशात अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात नव्हता.
न्यूयॉर्क टाईम्समधील एका लेखानुसार, तत्कालीन गव्हर्नर ब्लँटन सी. विनशिप यांनी युजेनिक्सला आपला पाठिंबा जाहीरपणे जाहीर करून या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.
पोर्तो रिको विद्यापीठाच्या माहितीनुसार, 1950 च्या दशकात गर्भनिरोधक गोळ्यांचे संशोधक बेटावर दाखल झाले, त्यावेळी 41 टक्के पोर्तो रिकन महिलांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या गर्भनिरोधकाचा वापर करून पाहिलेला होता.
पोर्तो रिकोच्या कायद्यानुसार, येथे कुटुंब नियोजनासाठीचे केंद्र स्थापन करण्याची परवानगीही देण्यात आलेली होती. अगदी दुर्गम भागातही सरकारी अनुदानावर दवाखाने उभारता येत असत. गर्भनिरोधकांचा प्रचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलाही त्यावेळी कार्यरत होत्या.
पिंकस आणि रॉक पोर्तो रिकोमधील दवाखान्यांच्या या नेटवर्कमुळे आश्चर्यचकित झाले. त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रयोग करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, THE NEW YORK TIMES
शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगासाठी पोर्तो रिकोची राजधानी सॅन जुआन या शहरावर लक्ष केंद्रीत केलं. 1955 साली या पिंकस आणि रॉक यांच्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या प्रकल्पाचे प्रयोग सुरू झाले.
सुरुवातीला या प्रयोगात अनेक वैद्यकीय आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पण, हा अभ्यास खूप गुंतागुंतीचा आणि वेदनादायक असल्याने अनेकांना हा प्रयोग पूर्ण करता आला नाही.
पोर्तो रिकन महिलांवर त्यावेळी सध्या वापरात असलेल्या गोळ्यांच्या तुलनेत उच्च डोसचा वापर करण्यात आला. त्यामुळे या महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागलं.
"महिला प्रजननक्षम आहेत किंवा नाही हे शोधण्यासाठी त्यांना लघवीच्या चाचण्या, एंडोथेलियल बायोस्पीसीज आणि इतर चाचण्या कराव्या लागल्या. ही एक अतिशय अवघड प्रक्रिया आहे. ज्या विद्यार्थ्यांना गर्भनिरोधकांची गरज नाही, त्यांचीही यावेळी चाचणी करण्यात आली,” असं मार्श यांनी सांगितलं.
प्रयोगादरम्यान घेतलेल्या औषधांमुळे महिलांना प्रचंड थकवा, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. पण पिंकस यांनी मात्र असा कोणताही त्रास झाल्याचं नाकारलं आहे.
मात्र, 'सायकोसोमॅटिक' स्थितीमुळे (मानसिक स्थितीमुळे) त्यांच्यासोबत असं घडतं, असं पिंकस यांचं म्हणणं होतं.
त्यांच्या आत्मचरित्रातील माहितीनुसार, या गोळ्या आपण आपल्या कुटुंबातील महिला आणि मित्रमंडळींनाही देत होतो, असा दावा त्यांनी केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्व आरोग्याच्या समस्या असूनही त्यांनी प्रयोग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढे, आपल्या प्रयोगांचा विस्तार त्यांनी जवळच्या रिओ पिएड्रास या उपनगरापर्यंतही केला.
कोणतीही आर्थिक भरपाई न देता त्यातील काहींचा डेटा गोळा करण्यासाठी चाचण्याही घेण्यात आल्या.
पोर्तो रिकन समाजातील अनेक क्षेत्रांतून याला तात्काळ विरोध सुरू झाला. हे संशोधन धोकादायक असल्याचं संबोधून एक प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलं.
ज्या डॉक्टरांनी या संशोधनासाठी महिलांची भरती केली होती, त्यांनाही दुष्परिणामांचा गांभीर्याने विचार करण्यास सांगण्यात आलं.
दुष्परिणामांमुळे अभ्यासात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी नंतर ही औषधे घेणं थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय, वैद्यकीय चाचणीत सहभागी झालेल्या तीन महिलांचा मृत्यू झाला. त्यांचं शवविच्छेदनही झालं नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कळू शकलं नाही.
दरम्यान, काही गरीब महिलांनी पैशांसाठी हा प्रयोग स्वतःवर करण्यास परवानगी दिली होती.
मंजुरी
यात काही महिलांचा मृत्यू झाला तरी गर्भधारणा रोखण्याच्या संदर्भात ही गोळी चांगलं काम करते, हे शास्त्रज्ञांना दिसून आलं.
पुढील काळात शास्त्रज्ञांनी पोर्तो रिकोतील इतर शहरांसह हैती, मेक्सिको, न्यूयॉर्क, सिएटल आणि कॅलिफोर्निया या शहरातही चाचण्या केल्या.

फोटो स्रोत, Getty Images
गर्भनिरोधक गोळ्यांसाठीच्या प्रयोगात एकूण 900 महिलांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 500 या एकट्या पोर्तो रिकोतील होत्या.
अखेरीस, अमेरिकेच्या फुड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने गर्भनिरोधनाची पहिली गोळी म्हणून एनोव्हिड (Enovid) या गोळीला 1960 मध्ये मान्यता दिली. त्यानंतर पुढच्या 7 वर्षांतच सुमारे 1.3 कोटी महिलांनी त्याचा वापर केल्याची नोंद आहे.
मान्यता मिळाल्यानंतरही पुढील काही वर्षे गर्भनिरोधक गोळ्यांचा अभ्यास सुरू होता. अमेरिकेच्या अनेक भागांतून त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. पण तसं काही झालं नाही. 1964 पर्यंत हा अभ्यास चालू राहिला.
आजही गर्भनिरोधक गोळ्यांचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण, या गोळीचे दुष्परिणाम गंभीर आहेत.
दरम्यान, पुरुष गर्भनिरोधक औषध शोधण्यासाठीचे प्रयोगही 30 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहेत. पण आजपर्यंत त्यासाठीचे प्रयोग अयशस्वी ठरलेले आहेत.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








