You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'डासांचे मिलन थांबवले तर डेंग्यू-मलेरियाला आळा बसवता येईल', वैज्ञानिकांचा नवा प्रयोग
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजिटल हेल्थ एडिटर, बीबीसी न्यूज
डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू, यलो फिव्हर आणि झिकासारख्या आजारांना रोखण्यासाठी संशोधकांनी एक अनोखा मार्ग शोधून काढलाय. नर डासांना कर्णबधीर केल्यास त्यांचं मादीसोबत मिलन होऊ शकत नाही आणि परिणामी पैदास होत नसल्याचं संशोधनात आढळलंय.
डास हवेमध्ये उडत असतानाच शरीरसंबंध प्रस्थापित करतात आणि मादी डास शोधण्यासाठी नर डास हे त्यांच्या आवाज ऐकण्याच्या शक्तीवर अवलंबून असतात. मादी डासांच्या पंखांच्या आवाजावरून - wingbeats वरून नर डास त्यांच्याकडे आकर्षित होतात.
हा प्रयोग करताना संशोधकांनी नर डासांमधील ऐकण्यासाठीचा जनुकीय मार्ग (Genetic Pathway) बदलला. परिणामी तीन दिवस एकाच पिंजऱ्यात असूनही या नर डासांचा माद्यांशी शारीरिक संबंध आला नाही.
डासांद्वारे माणसांमध्ये पसरणारे आजार हे मादी डासांमुळे पसरत असतात. त्यामुळेच दर मादी डासांद्वारे होणारी पैदास कमी झाली, तर डासांची एकूण संख्या कमी व्हायला मदत होईल.
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या अर्व्हिनमधल्या टीमने एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांवर हे संशोधन केलं. या डासांमुळे दरवर्षी 40 कोटी लोकांना विषाणूंची बाधा होते.
या प्रजातीच्या डासांचं हवेतच मिलन कसं होतं याचा या संशोधकांनी बारकाईने अभ्यास केला. ही प्रक्रिया काही सेकंदांपासून ते मिनिटभरापर्यंत चालते.
जेनेटिक्सच्या मदतीने यामध्ये काय बदल करता येतील, याचा शोध या शास्त्रज्ञांनी लावला. trpVa नावाच्या प्रोटीनवर डासांमधली ऐकण्याची क्षमता अवलंबून असते. शास्त्रज्ञांनी यामध्येच बदल केले. यामुळेच मादी डासांच्या पंखांच्या ध्वनीलहरी किंवा उडतानाचे इतर आवाज नर डासांना ऐकू आले नाहीत आणि परिणामी त्यांनी यावर कोणती प्रतिक्रियाही दिली नाही.
याउलट ज्या डासांमध्ये असे जनुकीय बदल करण्यात आले नव्हते, ते मात्र मादी डासांकडे आकर्षिक झाले आणि त्यातून या प्रयोगासाठीच्या पिंजऱ्यामध्ये पैदासही झाली.
सँटा बार्बरामधल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन अमेरिकेतल्या 'प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस' PNAS पत्रिकेत प्रसिद्ध केलंय. या जनुकीय बदलांच्या प्रयोगाला संपूर्ण यश मिळाल्याचं यात म्हटलंय.
जर्मनीतल्या युनिव्हर्सिटी ऑफ ओडेनबर्गमधले डॉ. जोएर्ग अल्बर्ट हे डासांवरच अभ्यास करतात. ते म्हणतात "डासांच्या पैदाशीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेत बदल करणं हा एक चांगला मार्ग असू शकतो. पण याचा अभ्यास व्हायला हवा आणि नियमनही व्हायला हवं.
या अभ्यासातून हे लक्षात येतंय की ऐकू येण्याची क्षमता ही डासांच्या प्रजननासाठी फक्त महत्त्वाचीच नाही तर अतिशय गरजेची आहे. नर डासांना ऐकूच येत नसेल, ते मादीचा वेध घेऊ शकणार नसतील, तर मादी डास नामशेष होण्याची शक्यता आहे."
डासांची पैदास रोखण्यासाठीचा पर्यायी मार्ग म्हणजे ज्या भागांमध्ये डासांद्वारे पसरणाऱ्या आजारांचं प्रमाण अधिक आहे, अशा भागांमध्ये 'sterile' म्हणजे प्रजनन क्षमता नसणारे डास सोडणं.
डास हे आजार पसरवत असले, तरी ते अन्नसाखळीतला एक अतिशय महत्त्वाचा घटक आहेत. मासे, पक्षी, वटवाघुळ, बेडूक अशा प्राण्यांसाठी डास त्यांचं अन्न आहेत. शिवाय परागीकरण करणाऱ्या काही कीटकांसाठीही डास हे त्यांचं भक्ष्य आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)