'800 हून अधिक ड्रोन, 13 क्षेपणास्त्रं'; रशियाचा युक्रेनच्या मुख्य सरकारी इमारतीवर हल्ला, जाणून घ्या 7 मोठे मुद्दे

फोटो स्रोत, X/Andrii Sybiha
रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील एका मुख्य सरकारी इमारतीवर ड्रोन हल्ला केला. कीवमधील या हल्ल्यादरम्यान बीबीसी टीमने धूर आणि स्फोट पाहिले.
कीवच्या इतर भागातील अनेक बहुमजली निवासी इमारतींचंही या हल्ल्यांमध्ये नुकसान झालं. या इमारती अंशतः कोसळल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, युक्रेनच्या अनेक भागांवर रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 44 जण जखमी झाले आहेत.
या हल्ल्यांनंतर पहिली प्रतिक्रिया देताना युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी याला 'निर्दयी' हवाई हल्ले म्हटलं. ते म्हणाले, "युक्रेनवर 13 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यातील 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे होती. यासाठी 800 हून अधिक ड्रोनचा वापर करण्यात आला."
मित्र राष्ट्रांनी "पॅरिसमध्ये जे ठरवण्यात आले होते ते पूर्णपणे अमलात आणावं", असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलं.
दुसरीकडे, रशियन संरक्षण मंत्रालयाने दावा केला की, युक्रेननं रात्री रशियावर हल्ला केला होता. त्यातील किमान 69 ड्रोन रोखण्यात आले.
त्यांनी युक्रेनच्या लष्करी उत्पादन आणि वाहतूक सुविधांना लक्ष्य केले आणि या हल्ल्यांमुळे शस्त्रे, लष्करी उपकरणे आणि गोदामांचे नुकसान झाले, अशीही माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली.
यापूर्वी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इशारा दिला होता की, जर युद्धबंदीनंतर पाश्चात्य देशांनी त्यांचे सुरक्षा दल युक्रेनमध्ये पाठवले, तर ते 'वैध लक्ष्य' असतील.
कीवमध्ये असलेल्या बीबीसी प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांच्या मते, शहराच्या मध्यभागी असे हल्ले दुर्मिळ आहेत. कारण येथे हवाई सुरक्षा सर्वात मजबूत आहे, असं मानलं जातं.
साराने याचे वर्णन 'मोठा हल्ला' असं केलं. त्या म्हणाल्या की, इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती आणि तिथून धूर निघताना दिसत होता.
1. कीवच्या सरकारी इमारतीला पहिल्यांदाच लक्ष्य करण्यात आले
युक्रेनच्या पंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांनी रशियाच्या हल्ल्यात कीवच्या कॅबिनेट इमारतीचे नुकसान झाल्याबद्दल अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.

फोटो स्रोत, Reuters
त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटलं, "शत्रूच्या हल्ल्यात पहिल्यांदाच सरकारी इमारतीचं नुकसान झालं आहे."
कीवमध्ये उपस्थित असलेल्या बीबीसी टीमला रविवारी (7 सप्टेंबर) सकाळी आकाशात धूर दिसला. त्यानंतर, दोन रशियन क्रूझ क्षेपणास्त्रं खूप वेगानं जाताना दिसली आणि त्यानंतर आणखी एक स्फोट झाला.
2. हल्ल्यात 805 ड्रोन आणि 13 क्षेपणास्त्रांचा वापर
कीवमध्ये एका गोदामावर, 16 मजली निवासी इमारतीवर आणि 4 मजली इमारतीवर हल्ला करण्यात आला आहे.
स्थानिक महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, यात 20 लोक जखमी झाले आहेत. त्यात एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरितांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले.
महापौर म्हणाले, "आतापर्यंत एक महिला आणि तिचा दोन महिन्यांचा मुलगा अशा दोघांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे."

फोटो स्रोत, Reuters
युक्रेनच्या हवाई दलानं म्हटलं की, रात्रीच्या हल्ल्यात रशियानं 805 ड्रोन आणि १३ क्षेपणास्त्रं डागली. त्यापैकी 751 ड्रोन पाडण्यात आले.
37 ठिकाणी 9 क्षेपणास्त्रे आणि 56 ड्रोन पडले आणि 8 ठिकाणी ड्रोनचा कचरा पडला. त्यामुळे नुकसान झालं, अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलानं दिली.
3. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की काय म्हणाले?
रशियाच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना युक्रेनचे व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले, "युक्रेनवर रात्रभर हल्ला झाला. शत्रूनं 13 क्षेपणास्त्रांचा मारा केला, त्यातील चार क्षेपणास्त्र बॅलिस्टिक प्रकारातील होती."
ते वृत्तांचा संदर्भ देत म्हणाले की किव्हमध्ये "32 वर्षांची महिला आणि तिच्या दोन महिन्याच्या बाळाचा" मृत्यू झाला.
ते म्हणाले की, "खरी डिप्लोमसी खूप आधीच सुरू होऊ शकली असती, याप्रकारच्या हत्या म्हणजे जाणुनबुजून करण्यात आलेला गुन्हा आहे आणि युद्ध दीर्घकाळ लांबवण्याचा प्रयत्न आहे."
झेलेन्स्की यांनी त्यांच्या युरोपियन मित्रांना आवाहन केलं की काही दिवसांपूर्वी "पॅरिसमध्ये जे ठरलं, ते लागू करण्यात आलं पाहिजे."
या आठवड्यात पॅरिसमध्ये झालेल्या एका परिषदेत युक्रेनला देण्यात आलेली संरक्षणाची हमी आणि सहकार्य मजबूत करण्याबाबत एकमत झालं होतं. यात युरोपियन देशांनी संरक्षणविषयक मदत वाढवण्याचं आणि रशियावर दबाव वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं.
4. झेलेन्स्की यांचं शहरही लक्ष्य
राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या क्रिवी रीह शहरावर बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसह ड्रोन हल्ला करण्यात आले.

फोटो स्रोत, Reuters
स्थानिक अधिकारी म्हणाले की, या हल्ल्यांमध्ये वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, व्यवसाय, एक औद्योगिक युनिट, एक शैक्षणिक संस्था आणि अनेक निवासी ब्लॉक्सचं नुकसान झालं. हल्ल्यात तीन लोक जखमी झाले.
निकोपोलमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झाला, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दक्षिण भागातील बंदर शहर ओडेसा आणि आसपासच्या भागातील ड्रोन हल्ल्यांमध्ये नागरी पायाभूत सुविधा आणि निवासी इमारतींचेही नुकसान झाले.
5. ब्रायंक्समध्ये कच्चा तेलाच्या पाईपलाईनवर ड्रोन हल्ला, रशियाचा दावा
युक्रेनच्या ड्रोन फोर्सेसचे प्रमुख रॉबर्ट 'माग्यार' ब्रोवडी म्हणाले की युक्रेननं रशियाच्या पश्चिम ब्रायंस्क प्रदेशातील कच्चा तेलाच्या एका पाईपलाईनवर हल्ला केला.

फोटो स्रोत, Reuters
ते म्हणाले, "बेलारूसच्या रिफायनरींमधून रशियापर्यंत तेलाची उत्पादनं नेण्यात हे ठिकाण व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाचं आहे."
ब्रोवडीनुसार, युक्रेनच्या सैन्यानं तिथल्या ऑईल पंपचं 'कॉम्प्लेक्स फायर डॅमेज' केलं आहे.
तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे की त्यांनी रात्रभर झालेल्या हल्ल्यात युक्रेनकडून आलेले किमान 69 ड्रोन पाडले आहेत.
6. पुतिन यांचा संदेश आणि प्रवक्त्यांचं वक्तव्य
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या आठवड्यात पाश्चात्य देशांचा प्रस्ताव फेटाळला. त्यात शस्त्रसंधीनंतर युक्रेनमध्ये 'रीअश्युरन्स फोर्स' पाठवण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले होते की, अशी कोणतीही फौज 'नवी मोठी आक्रमक कारवाई' रोखण्यासाठी असेल आणि ती युद्धआघाडीवर नसेल.
पुतिन यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, युक्रेनमध्ये पाठवण्यात आलेले कोणतेही सैनिक त्यांच्यासाठी 'वैध लक्ष्य' असतील.
पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी बीबीसीशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, कोणतंही परदेशी सैन्य, "मग ते नाटोचं असो की आणखी कोणाचंही, तो रशियासाठी धोका आहे. कारण आम्ही नाटोचे शत्रू आहोत."
7. युरोपमधील नेत्यांनी काय म्हटलं?
किव्हमध्ये हल्ला झाल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लिहिलं, "आम्ही युक्रेन आणि त्याच्या जनतेच्या पाठीशी आहोत."
त्यांनी रशियानं केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा निषेध केला आहे. ते म्हणाले की "रशिया स्वत:ला युद्ध आणि दहशतीच्या विचारांमध्ये गुरफटून घेतो आहे."
लॅटव्हियाचे राष्ट्राध्यक्ष एडगार्स रिन्केविच्स म्हणाले की रशिया नागरी ठिकाणांवर आक्रमक हल्ले करून संघर्ष आणखी वाढतो आहे. ते म्हणाले, "यातून मिळणारा संदेश स्पष्ट आहे. रशियाला युद्ध हवं आहे, शांतता नाही."
ते म्हणाले की "युक्रेनला आणखी शस्त्रास्त्रं देण्याची आणि रशियावरील दबाव वाढण्याची" प्रतिक्रिया दिली पाहिजे.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन म्हणाल्या की "रशिया मुत्सद्देगिरीची टिंगल करतो आहे, आंतरराष्ट्रीय कायदे पायदळी तुडवतो आहे आणि बेछूटपणे हत्या करतो आहे."
त्या म्हणाल्या, "युरोप युक्रेनबरोबर उभा आहे आणि यापुढेदेखील पूर्णपणे युक्रेनच्या पाठिशी उभा राहील."

फोटो स्रोत, VALENTYN OGIRENKO/REUTERS
युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा यांनी पुतिन यांच्यावर आरोप केला की त्यांनी फक्त युद्धच सुरू केलं नाही, तर ते पुढे सुरू ठेवण्याचा निर्णयदेखील घेतला.
ते म्हणाले, "आम्हाला युक्रेनची संरक्षण फळी आणखी मजबूत करावी लागेल. त्याचबरोबर आमच्या मित्रांबरोबर मिळून रशियावर आणखी निर्बंध घालून दबाव वाढवावा लागेल."
युकेचे संरक्षण मंत्री जॉन हेली यांनी बीबीसीला सांगितलं की एका बाजूला पुतिन शस्त्रसंधी करण्यासाठी ट्रम्प यांची अलास्कामध्ये भेट घेत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला ते युक्रेनवरील हल्ले आणखी वाढवत आहेत.
फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वॉल्टोनेन म्हणाल्या की "रशिया-युक्रेन शस्त्रसंधी होणं अत्यंत आवश्यक असल्याचं या हल्ल्यांमधून दिसून येतं."
शांततेचं ढोंग, हल्ल्यांमध्ये वाढ
किव्हमधील बीबीसी ईस्टर्न युरोपच्या प्रतिनिधी सारा रेंसफोर्ड त्यांच्या विश्लेषणात म्हणतात की युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यांना लागलेलं हे नवं वळण आहे.
त्या म्हणाल्या की आतापर्यंत युक्रेनच्या कोणत्याही सरकारी इमारतीवर हल्ला झाला नव्हता. किव्हचा मध्यवर्ती भाग अत्यंत सुरक्षित मानला जातो. सुरुवातीपासूनच तिथली हवाई संरक्षण प्रणाली अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे या हल्ल्याचं लोकांना आश्चर्य वाटतं आहे.
हा एक प्रतीकात्मक हल्ला आहे. यातून हे स्पष्ट दिसतं की व्लादिमीर पुतिन यांची शांततेची बोलणी हे फक्त ढोंग आहे. ते हल्ले रोखण्याऐवजी, हल्ल्यांमध्ये आणखी वाढ करत आहेत.
आम्हाला कॅबिनेट बिल्डिंगच्या जवळ जाऊ देण्यात आलं नाही. या सर्व परिसराला चेकपाईंट आहे. कारण इथेच सरकार, संसद आणि राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान यासारखी महत्त्वाची कार्यालयं आहेत.
मात्र सकाळी आम्ही हेलिकॉप्टर आगीवर पाणी टाकत असल्याचं पाहिलं. शहरावर एक धूराचा लोट दिसत होता. तो खूपच मोठा होता.
इथे कोणताही मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली नाही. कारण ती रविवारी सकाळची वेळ होती. मात्र किव्ह आणि युक्रेनच्या उर्वरित भागांमध्ये लोक मारले गेले आहेत आणि जखमी झाले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











