You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येविरोधात हिंदू संघटनांचं आंदोलन, मुंबईसह दिल्लीत जमावाची निदर्शनं
बांगलादेशमध्ये हिंदू युवक दीपू चंद्र दासची हत्या आणि तेथील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदू संघटनांनी बांगलादेश उच्चायुक्तलयाबाहेर आंदोलन केलं.
वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओनुसार उच्चायुक्तलयाबाहेर आंदोलकांचा मोठा जमाव दिसला.
आंदोलनामुळे बांगलादेश उच्चायुक्तालयात आणि परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले. त्याचबरोबर तिथे कसून चौकशी करण्यात आल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.
तसंच मुंबईतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिरसात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स काढून फेकल्याचं पाहायला मिळालं.
एएनआयच्या एका व्हीडिओमध्ये पोलिसांच्या बॅरिकेडिंगजवळ आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की होताना दिसत आहे.
तर दुसऱ्या व्हीडिओत मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते हातात फलक घेऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यात धर्माचा अपमान केल्याच्या आरोपावरून जमावाने एका हिंदू युवकाला बेदम मारहाण केली होती.
या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला होता. ही घटना 18 डिसेंबर रोजी घडली.
पोलिसांनी सांगितलं की, युवकाला मारहाण करून ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला बांधून पेटवून देण्यात आला होता.
मृत युवकाची ओळख दीपू चंद्र दास अशी करण्यात आली होती.
माध्यमांवरील हल्ल्यांचा निषेध
दरम्यान, बांगलादेशातील माध्यमांना लक्ष्य केल्याबद्दल एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने एक निवेदन जारी केले आहे.
त्यात म्हटले आहे की , "बांगलादेशातील प्रमुख माध्यम प्रतिनिधी आणि माध्यम संस्थांवरील हल्ले, तोडफोड आणि जाळपोळीचा एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया तीव्र निषेध करते."
या निवेदनात इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र न्यू एजचे संपादक आणि संपादक परिषदेचे अध्यक्ष नुरुल कबीर यांच्यावरील हल्ल्याचा आणि प्रथम आलो वृत्तपत्र आणि द डेली स्टार यांच्या कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या हल्ल्यांचे वर्णन 'बांगलादेशातील माध्यमांविरुद्ध हिंसाचार आणि धमकीमध्ये गंभीर आणि प्राणघातक वाढ' असे करण्यात आले आहे.
बांगलादेशातील वाढत्या तणावावर रशियाच्या राजदूतांनी भारताबद्दल काय म्हटलं?
बांगलादेशमधील रशियाचे राजदूत अलेक्झांडर ग्रिगोरीविच खोझिन यांनी सोमवारी (22 डिसेंबर) ढाका येथे पत्रकारांशी पहिल्यांदाच संवाद साधला. यावेळी त्यांनी शेजारी देश भारतासोबतचा तणाव कमी करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
"बांगलादेश भारतासोबतचा तणाव जितक्या लवकर कमी करेल, तितके ते अधिक चांगले ठरेल," असं ते म्हणाले.
रशियाचे राजदूत ढाका येथील रशियन दूतावासात पत्रकारांशी बोलत होते.
एका प्रश्नाच्या उत्तरात रशियाचे राजदूत म्हणाले की, तणाव कमी करणं दोन्ही देशांसाठी आणि संपूर्ण दक्षिण आशियासाठी महत्त्वाचं आहे.
रशियाच्या राजदूतांनी 1971 मध्ये बांगलादेशच्या मुक्ती संघर्षात भारत आणि रशियाची भूमिका अधोरेखित केली.
ते म्हणाले, "1971 मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य प्रामुख्याने भारताच्या मदतीमुळे मिळाले. रशियानेही त्याला पाठिंबा दिला होता."
रशिया दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये हस्तक्षेप करत नाही, पण असा मार्ग शोधणं शहाणपणाचं ठरेल ज्यामुळे तणाव आणखी वाढणार नाही, असं त्यांनी म्हटलं.
राजदूत अलेक्झांडर ग्रिगोरीविच म्हणाले की, संबंध परस्पर विश्वास आणि विश्वासावर आधारित असले पाहिजेत.
रशियाच्या राजदूतांचे हे विधान महत्त्वाचं आहे, कारण भारत आणि बांगलादेशमधील वाढत्या तणावात आतापर्यंत रशियाने मौन बाळगले होते.
खरं म्हणजे, बांगलादेशमध्ये पाश्चात्य देशांचे दूतावास युवा नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत असतानाच, रशियाने बांगलादेशच्या स्वातंत्र्यातील भारताच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)