हवामान बदलामुळे डोळ्यांच्या आजारात वाढ, शेतकरी-कामगार वर्गाला मोठी झळ - संशोधन

    • Author, गणेश पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"अर्धा-पाऊण तास जरी मी उन्हात काम केलं, तरी माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येते. एका डोळ्याने तर दिसायचंच बंद होतं. लगेच झाडाखाली बसावंसं वाटतं."

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रांझणीच्या पद्मिनी इंदलकर गेल्या तीन दशकांपासून शेती करतात. त्यासोबत अनेक वर्षे त्यांनी रोज माळरानात जाऊन शेळ्यादेखील राखल्या आहेत.

2008 मध्ये त्यांच्या पहिल्या डोळ्यावर मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले, तेव्हा त्यांचं वय 40 वर्षे होतं. त्यानंतर दोन वर्षांतच त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावरही मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागलं.

सतत उन्हात काम केल्याने पद्मिनी यांच्या डोळ्यांत लवकर मोतीबिंदू वाढला असावा, असं त्यांच्यावर उपचार करणारे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. आनंद खडके सांगतात.

"माझ्याकडे डोळ्यांवर उपचार घेणारे बहुतेक रुग्ण हे शेतकरी आणि कामगार आहेत. त्यांना दिवसभर उन्हात काम करावं लागतं. शिवाय अशावेळी ते डोळ्यांच्या सुरक्षेसाठी क्वचितच काळजी घेतात. त्यामुळे वयस्कर व्यक्तींसोबत तरुण रूग्णही मोतीबिंदूच्या सर्जरीसाठी येत आहेत," असं खडके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

खरंतर डोळ्यांचे आजार होण्यामागे वाढतं वय, अनुवांशिकता, हवेचं प्रदूषण, अतिनील किरणांशी अधिक संपर्क अशी अनेक कारणं आहेत.

पण गेल्या काही वर्षांत, यात आणखी एका कारणाची भर पडलीये, ते म्हणजे - हवामान बदल.

खरंतर हवामान बदल म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर वितळणारे हिमनग, आटणाऱ्या नद्या, जमिनीचं वाळवंटीकरण, वादळं आणि पूर यांचं चित्र दिसतं.

पण आपल्या नाजूक डोळ्यांवरही हवामान बदलाचा परिणाम होत असल्याचं वैद्यकीय संशोधनातून समोर आलं आहे.

हवामान बदल आणि डोळ्यांचं आरोग्य

हवामान बदलामुळे कमी काळात अभूतपूर्व पाऊस पडणे, तीव्र दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, अचानक हवेतील आर्द्रता वाढणे किंवा कमी होणे, वादळी वारे, अशा घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढते आहे. यामुळे डोळ्यांच्या आजाराचं, विशेषतः संसर्गाचं प्रमाण बदलू शकते.

जून 2025 मध्ये 'Ophthalmology and Therapy' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनपर लेखात, सिंगापूरमधील 'ली कोंग चियान स्कूल ऑफ मेडिसिन'चे प्राध्यापक रुपेश अगरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही याच विषयावर संशोधन केलं.

त्यात त्यांनी डोळ्यांच्या संसर्गजन्य आजारांवर हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा काय परिणाम होतो, याविषयीच्या आजवरच्या संशोधनांचा आढावा घेतला आहे.

हवामानातील तीव्र घटनांमुळे असे आजार वाढत असल्याचं त्यांचं विश्लेषण सांगतं.

बेसुमार पर्जन्यमान, तापमानातील अचानक चढ-उतार, आर्द्रता, वादळी वारे आणि वायू प्रदूषण हे डोळ्यांच्या संसर्गावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकू शकतात.

याच संदर्भात चीनमध्ये अलीकडे एक अभ्यास झाला. तापमानात प्रत्येक अंशाच्या वाढीमागे देशात मोतीबिंदूच्या संख्येत 4 % वाढ झाल्याचं त्यात दिसून आलं.

तर स्पेनमधील 'हॉस्पिटल ऑफ ला अक्सार्किया' इथल्या नेत्ररोगतज्ज्ञ लुसिया इचेव्हेरिया-लुकास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत दक्षिण स्पेनमध्ये तापमान वाढीचा तिथल्या लोकांच्या डोळ्यांवर कसा परिणाम होतोय, याचा अभ्यास केला.

गेल्या काही काळात, कमाल सरासरी तापमानात वाढलेल्या प्रत्येक अंश सेल्सिअससोबत इथल्या रहिवाशांमध्ये मोतीबिंदूचं प्रमाण वाढलं आहे, असं त्यांना दिसून आलं.

तसंच, मोतीबिंदू होण्याचे सामान्य वय 60 किंवा त्याहून अधिक असले तरी, स्पेनच्या शेतीत काम करणाऱ्या 15 ते 49 वयोगटातील लोकांमध्येही मोतीबिंदूचे प्रमाण आढळल्याचं या अभ्यासात दिसून आलं आहे.

हे दोन्ही अभ्यास महत्त्वाचे आहेत. कारण जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आज सुमारे 2.2 अब्ज लोकांना डोळ्यांच्या आजारांचा सामना करावा लागतोय.

यामध्ये दृष्टीदोष (Refractive errors) आणि मोतीबिंदू (Cataract) यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे.

दृष्टीदोष असलेल्या व्यक्तीला जवळचं किंवा दूरचं दिसत नाही. तर मोतीबिंदू झाल्यावर डोळ्याच्या लेन्समधील फायबर पांढरट होऊ लागतात किंवा डोळ्याच्या बुबुळावर ठिपका येतो, त्यामुळे रूग्णांना धुसर दिसू लागतं.

दृष्टीदोष आणि मोतीबिंदूशिवाय हवामान बदलामुळे डोळ्यांच्या इतर आजारांमध्येही वाढ होतेय.

उष्णतेचा डोळ्यांवर परिणाम

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, 'नासा'च्या विश्लेषणानुसार, 2024 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान आतापर्यंतच्या सर्व विक्रमी पातळीवर पोहोचले.

त्यामुळे उष्णकटिबंधीय देशात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उकाडा, धूळ, वाऱ्यात वाढ, आणि हवेतील आर्द्रतेत घट होत आहे. परिणामी, Dry Eye Syndrome, डोळ्यांतील चुरचुर, सतत पाणी येणं, ॲलर्जी, डोळ्यांची जळजळ अशा समस्या वाढू लागल्या आहेत.

उन्हाळ्यात तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढल्यास उष्माघाताचा धोका वाढतो.

उष्माघात झाल्यास शरिरातील इतर यंत्रणांप्रमाणे डोळ्यांची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा कमकुवत होते, ज्यामुळे डोळ्यांना 'रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेशीज्' (Reactive Oxygen Species - ROS) नावाच्या हानिकारक रेणूंशी लढणे कठीण होते, असं 'युके'मधील 'एनएचएस' फाउंडेशन ट्रस्टच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये सिनिअर क्लिनिकल फेलो म्हणून काम करणाऱ्या सागनिक सेन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

याशिवाय, डोळ्यातील लेन्स (भिंग) प्रथिने पुन्हा तयार करू शकत नसल्यामुळे, जी व्यक्ती उष्णतेमध्ये जास्त वेळ घालवते, त्यांना मोतीबिंदू होण्याची शक्यता दाट असते.

पद्मिनी इंदलकर यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं असल्याचं त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. आनंद खडके यांनी सांगितलं.

तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना डोळ्यांच्या स्ट्रोकचा (Eye Stroke) सामना करावा लागतो. वैद्यकीय भाषेत ज्याला रेटिनल आर्टरी ऑक्लूजन (Retinal Artery Occlusion) म्हणतात.

उष्णतेमुळे डोळ्यांच्या रेटिनाचा रक्तपुरवठा थांबतो, तेव्हा डोळ्यांचा स्ट्रोक होतो. यात अचानक दृष्टी कमी होते. रेटिनाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा सतत पुरवठा आवश्यक असतो, जो रक्तप्रवाहाद्वारे होतो, पण या प्रणालीत कोणताही अडथळा आला तर काही मिनिटांत डोळ्यांचे गंभीर नुकसान होते.

केवळ वाढतं तापमानच नाही तर पावसाच्या बदलत्या पॅटर्नचाही डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय.

नोव्हेंबर 2022 मध्ये, भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई या जिल्ह्यात एक लाखाहून अधिक लोकांनी डोळे येण्याच्या (Conjunctivitis) त्रासावर उपचार घेतले.

या काळात तामिळनाडूमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेत वाढ होते आणि डोळे येण्याची साथ पसरते, हे पूर्वीपासून होत आहे.

पण हवामान बदलांमुळे या संसर्गाची गती आणि व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढतेय.

असाच प्रकार पुण्यातील आळंदी गावातही घडला होता.

हवामानातील बदलामुळे केवळ डोळ्यांच्या संसर्गजन्य रोगांचा जागतिक प्रसारच होत नाही, तर अंधत्व कमी करण्याच्या जागतिक पातळीवरच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे.

तीव्र हवामानाचा डोळ्यांवर परिणाम

डोळ्यांचे आजार आधीपासून अस्तित्वात आहेत. पण डोळ्यांसंबंधित संसर्गजन्य आजारांचं प्रमाण आणि त्यांच्या भौगोलिक वितरणावर हवामान बदल लक्षणीय परिणाम करताना दिसत आहेत. तसंच कमी कालावधीत त्यांचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

तापमान, आर्द्रता, पाऊस आणि वायू प्रदूषणामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागाचे आजार (Ocular surface diseases) वाढू शकतात, ज्यात डोळे येण्याचा (Conjunctivitis) समावेश आहे.

डॉ. सागनिक सेन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आणखी एक बाब सांगितली, ते म्हणाले, "हवामान बदलांच्या परिणामांमुळे केराटायटिस (डोळ्याच्या बाहेरील थराची सूज), टेरिजियम (डोळ्याच्या पांढऱ्या भागावर गुलाबी मांसल वाढ) आणि कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे) हे आजार वाढू लागले आहेत."

'यूके'मधील मँचेस्टर रॉयल आय हॉस्पिटलमधील नेत्ररोगतज्ज्ञ यी लिंग वोंग यांच्या मते, धूळ, अतिनील किरणांचा संपर्क आणि वायू प्रदूषण अशा हवामानाशी निगडीत पर्यावरणीय घटकांमुळे डोळ्यांचे आजार वाढू शकतात. यांमुळे डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची जळजळ, डोळ्यांतून जास्त पाणी येणे, ॲलर्जी आणि डोळ्यांत आग होणे यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.

सागनिक सेन यांच्या मते, वाढता उन्हाळा आणि पावसाळा यांच्याशिवाय दुष्काळ आणि पूरही डोळ्यांचं आरोग्य धोक्यात आणू शकतात.

जागतिक तापमान वाढीमुळे दुष्काळांची वारंवारता आणि त्यांची दाहकता वाढत आहे.

या काळात लोकांना पुरेसं अन्न मिळत नाही. यामुळे शरीरात प्रोटिन्स, व्हिटॅमिन, A, B12, यांसारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता होते आणि डोळ्यांच्या नसांना (Optic nerve) इजा होण्याचा धोका असतो.

पूर आणि दुष्काळात लोकांना अनेकदा खराब पाणी प्यावं लागतं, ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो.

येत्या काळात विकसनशील देशातील लोकांना या गोष्टींचा तुलनेने जास्त सामना करावा लागेल, असं मत सेन यांनी नोंदवलं आहे.

विशेषतः शेतकरी, शहरी भागातील रिक्षा चालक, ट्रॅफिक पोलीस, बांधकाम मजूर आणि बेघर लोक या लोकांना याचा जास्त सामना करावा लागतो.

पद्मिनी यांचंच उदाहरण घ्या. मोतीबिंदू काढल्यावर पद्मिनी यांची दृष्टी सुधारली असली, तरी अजूनही त्यांच्या डोळ्यांना उन्हाचा त्रास होत आहे.

"उन्हाचा त्रास होतोच, पण रोज शेतात काम केल्याशिवाय मला पर्याय नाही. त्यामुळे आता मी सकाळी लवकर आणि दुपारी ऊन उतरल्यावर काम करते," असं त्या सांगतात.

त्या आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतात.

पद्मिनी इंदलकर यांनी कधीही शाळेची पायरी चढली नाही, त्यांना लिहिता-वाचता येत नाही. यामुळे, जेव्हा त्या दवाखान्यात जातात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांना नेमके काय झाले आहे, याची माहिती त्यांना सोप्या भाषेत कोणीही समजावून सांगत नाही.

शिवाय, डॉक्टरांसमोर इतर अनेक रुग्ण असल्याने, ते प्रत्येकाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.

भारतासारख्या देशात रुग्णांची संख्या वाढत असताना डोळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची तीव्र कमतरता जाणवत आहे. याचा परिणाम अनेक स्तरांवर होत आहे, असे विवेकानंद नेत्रालय, देहरादून येथील डॉ. अलंकरिता मुरलीधर सांगतात.

त्या म्हणतात, "कामाचा ताण वाढल्यामुळे आम्हाला अधिक वेळ काम करावे लागते. तिसरे म्हणजे, आमच्या क्षेत्रात नवीन संशोधन करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी, जागतिक हवामान बदलांचा आपल्या देशातील लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होत आहे, याकडे लक्ष देणे, माझ्यासारख्या अनेक इच्छुक डॉक्टरांना शक्य होत नाहीये."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)