You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'लोक बदलत गेले, पण धर्मेंद्र बदलले नाहीत,' अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल काय म्हटलं?
सोमवारी (24 नोव्हेंबर) सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
'शोले' सिनेमात धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी जय आणि वीरू ही अविस्मरणीय जोडी साकारली होती.
सोमवारी रात्री उशीरा अमिताभ बच्चन यांनी 'एक्स'वर लिहिले,
"अजून एक दिग्गज आपल्याला सोडून गेले. रंगमंच सोडून गेले आहेत आणि मागे राहिली आहे असह्य अशी शांततेची पोकळी...धरम जी..."
"ते महान होते. ते केवळ आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वासाठीच नाही, तर मोठ्या मनासाठी आणि साधेपणासाठीही ओळखले जायचे. पंजाबच्या ज्या गावातून ते आले, त्या गावाच्या मातीचा सच्चेपणा त्यांनी नेहमी जपला."
"त्यांच्या शानदार अशा कारकिर्दीत त्यांनी हा स्वभाव जपला. प्रत्येक दशकात बदलणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतही ते आपल्या उत्तुंग कारकिर्दीसह स्थिर राहिले...लोक बदलत गेले, पण ते बदलले नाहीत."
"त्यांचं हास्य, त्यांचा सोज्वळपणा आणि त्यांचा स्नेह सर्वांपर्यंत पोहोचायचा. या क्षेत्रात हे क्वचितच पाहायला मिळतं. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे... अशी पोकळी जी कधीही भरून निघणार नाही.
प्रार्थना."
सोमवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी मुंबईतील विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
या वेळी त्यांच्या जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या. धर्मेंद्र 89 वर्षांचे होते आणि बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.
गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती अस्थिर होती आणि त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
त्यांच्या निधनानंतर आता विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रतिक्रिया आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांनी म्हटलंय की, "धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ते चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय असं व्यक्तिमत्व होते. ते एक असाधारण असे अभिनेता होते, ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये एक खोली आणि आकर्षकता आणली.
त्यांनी विविध भूमिका ज्या पद्धतीने साकारल्या त्या असंख्य लोकांच्या मनाला भिडल्या. धर्मेंद्रजी त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि आपलेपणासाठी तितकेच प्रशंसनीय होते.
या दुःखाच्या वेळी, माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती."
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सोशल मीडिया साइट 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलंय की, "ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्रजी यांचं निधन भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान आहे.
सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या त्यांनी त्यांच्या दशकांच्या शानदार कारकिर्दीत अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या."
'तडफदार नायक' - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे.
त्यांनी म्हटलंय की, "1960 च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.
आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती.
'शोले'मध्ये त्यांनी साकारलेला 'वीरू' आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे."
वाखाणण्याजोगा प्रामाणिकपणा-जावेद अख्तर
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर, बीबीसी हिंदीने जावेद अख्तर यांच्याशी विशेष संवाद साधला.
धर्मेंद्र यांच्यासाठी अनेक चित्रपट लिहिणारे जावेद अख्तर यांनी त्यांच्याविषयीच्या आपल्या आठवणी जागवताना म्हटलं की, "मी एक साधा सहाय्यक दिग्दर्शक होतो, तेव्हापासून धर्मेंद्रजी यांच्यासोबत काम केलंय. त्या काळात ते मोठे हिरो होते आणि मी त्यांच्यासमोर क्लॅप मारायचो.
सामान्यत: असं असतं की माणूस आपल्या बरोबरीच्या माणसांसोबतच चांगला वागत असतो, मात्र, धर्मेंद्रजी त्याला अपवाद होते. ते माझ्यासारख्या सामान्य सहाय्यक दिग्दर्शकाशीही तेव्हा पार चांगलं वागायचे.
त्यांच्यातली नम्रता, प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा होता, जो मी त्या काळात काहीही नसताना अनुभवला आहे.
नंतर काळ सरला, मी त्यांच्यासाठी अनेक चित्रपटही लिहिले, पण मला ते त्या काळातल्या चांगल्या वर्तनासाठीच आज जास्त आठवतात. त्यांचं हे लाघवीपण हीच त्यांची खासियत होती. त्यांच्यासोबत नेहमीच प्रेमाचं नातं राहिलं."
सायरा बानो यांनीही धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.
दिलीप कुमार हे धर्मेंद्र यांचे आदर्श होते.
सायरा बानो यांनी धर्मेंद्र यांच्याबद्दल आपल्या आठवणी जागवताना म्हटलंय की, "एक माणूस म्हणून त्यांचं व्यक्तीमत्त्व फारच चांगलं होतं. दिलीपसाहेबांचंही त्यांच्यावर फार प्रेम होतं. माझे सारे कुटुंबिय त्यांना आमच्याच घरचा सदस्य मानायचो. ते रात्री एक वाजता येवोत, वा कधीही, त्यांच्यासाठी आमच्या घरचे दरवाजे नेहमीच खुले असायचे. त्यांच्यासोबत काम करतानाही आमचं नातं फारच चांगलं राहिलेलं आहे.
मी सुरूवातीला त्यांच्यासोबत काम केलेलं नव्हतं, पण नंतर काम केल्यानंतर कळालं की, ते फारच चांगले होते. दिलीपसाहेबांबद्दल ते भरभरून बोलायचे. ते दिलीपसाहेबांकडूनच चित्रपटात येण्यासाठी प्रेरित झालेले होते. ते त्यांच्यावर प्रचंड प्रेम करायचे."
'एका युगाचा अंत'-करण जोहर
चित्रपट निर्माता करण जौहरने अभिनेता धर्मेंद्र यांना इन्स्टाग्रामवर आदराजंली वाहिली आहे.
त्यानं म्हटलंय की, "हा एका युगाचा अंत आहे."
पुढे त्याने म्हटलंय की, "आज आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. ही जागा कुणीही कधीही भरून काढू शकणार नाही. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो धर्मेंद्रजी. आम्हाला तुमची खूप आठवण येईल."
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलंय की, "ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात 'सुपरस्टार' म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी.
एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं."
विनोदी अभिनेता कपिल शर्मानं धर्मेंद्र यांच्या निधनानंतर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. जणू दुसऱ्यांदा पिता गमावल्याची भावना मनात असल्याचं कपिल शर्मानं फेसबूकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं.
अभिनेता संजय दत्तने 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलंय की, "काही लोक तुमच्या आयुष्याचा फक्त एक भाग नसतात, तर ते तुमच्या हृदयात कायमस्वरूपी राहतात. धरम जी अशा लोकांपैकी एक होते. ही एक अशी पोकळी आहे जी कधीही भरून निघणार नाही."
अक्षय कुमारने देखील इंस्टाग्रामवर धर्मेंद्र यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
त्याने लिहिलंय की, "धर्मेंद्रजी असे एक हिरो होते ज्यांच्यासारखं प्रत्येक तरुणाला बनावंसं वाटायचं. आमच्या इंडस्ट्रीचे खरे हि-मॅन. अनेक पिढ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)