You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, 9 जणांचा मृत्यू; आतापर्यंत काय समोर आलं?
- Author, माजिद जहांगीर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवारी (14 नोव्हेंबर) रात्री उशिरा एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 27 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 32 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांनी दिली आहे.
डीजीपी नलिन प्रभात यांनी पत्रपरिषदेत माहिती देताना सांगितलं, "एफएसएल टीमद्वारे सँपलिंगची प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक, सावधगिरीने पार पाडली. परंतु दुर्दैवाने या रात्री 11:20 च्या सुमारास अपघात घडला."
या घटनेबाबत इतर कोणत्याही प्रकारचा अर्थ काढणं अनुचित आहे, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना डीजीपी म्हणाले, "या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 एफएसएल टीम कर्मचारी, 2 महसूल अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
याशिवाय 27 पोलीस, 2 महसूल अधिकारी आणि 3 नागरिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे."
डीजीपी म्हणाले, "घटनेत पोलीस ठाण्याच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय शेजारच्या इमारतींचंही नुकसान झालं आहे. या घटनेमागील कारणांचा तपास केला जात आहे."
अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की, हा स्फोट त्यावेळी झाला, जेव्हा 'व्हाइट-कॉलर' टेरर मॉड्यूल प्रकरणाशी संबंधित स्फोटकांमधून नमुने काढण्याचं काम सुरू होतं. ही स्फोटके हरियाणातील फरीदाबाद येथून आणण्यात आली होती.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा स्फोट शुक्रवारी (14 नोव्हेंबर) रात्री उशिरा झाला. यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 27 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 32 जण जखमी झाले. या स्फोटात पोलीस ठाण्यातील वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे.
या घटनेबद्दल स्थानिक रहिवासी तारिक अहमद यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितलं की, "शुक्रवारी (14 नोव्हेंबर) रात्री 11 वाजून 22 मिनिटांच्या सुमारास अचानक स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो."
"काय घडलं हे समजण्यासाठी आम्हाला 15-20 मिनिटे लागली. जेव्हा लोक बाहेर आले, तेव्हा आम्हाला कळले की, पोलीस ठाण्यात काहीतरी घडलं आहे."
"आम्ही तिकडे धावत गेलो, तेव्हा चारही बाजूला धूर पसरलेला होता, तर काही ठिकाणी मृतदेह होते. या स्फोटात मृत्यू झालेल्यांमध्ये काही आमचे सोबती-शेजारीही होते," असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)