जेईई मेन आणि ॲडव्हान्स्डमध्ये नेमका फरक काय? समजून घ्या आयआयटी प्रवेशाचे संपूर्ण गणित

    • Author, प्रियांका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनीअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जेईई (JEE) म्हणजेच 'जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन' ही परीक्षा देतात.

परंतु, एक प्रश्न जो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसह अनेकांना सतावतो, तो म्हणजे जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स्डमध्ये नेमका फरक काय असतो?

तसेच, कोणत्या परीक्षेद्वारे कुठे प्रवेश मिळतो आणि त्यांच्या तयारीची योग्य स्ट्रॅटेजी काय असावी, याबद्दलही संभ्रम असतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेईई ही कोणतीही साधीसुधी परीक्षा नाही, तर ही मर्यादित जागांसाठी अतिशय तीव्र स्पर्धा असलेली परीक्षा आहे. अशा परिस्थितीत योग्य माहिती असणे आणि त्यानुसार नियोजन करणे अत्यावश्यक ठरते.

या लेखामध्ये आपण जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स्डमधील फरक आणि त्या संबंधित सर्व पैलू समजून घेणार आहोत.

इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा असलेल्या जेईईचे 2 टप्पे असतात. जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स्ड. दोन्ही परीक्षांचे स्वरूप, आराखडा आणि काठिण्य पातळी वेगवेगळी असते.

जेईई मेन ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) घेते. तर, जेईई ॲडव्हान्स्डची जबाबदारी दरवर्षी आलटून पालटून देशातील विविध आयआयटी सांभाळतात.

जेईईची तयारी करून घेणाऱ्या ACE4 इन्स्टिट्यूटचे को-फाऊंडर गणेश पांडे सांगतात की, जेईई मेन ही जेईई ॲडव्हान्स्डसाठी एक प्रकारची स्क्रीनिंग टेस्ट (चाळणी परीक्षा) आहे. जेईई ॲडव्हान्स्डद्वारे देशातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो.

तर जेईई मेनद्वारे 31 एनआयटी (NIT), 26 आयआयआयटी (IIIT), सुमारे 26 सरकारी अनुदानित टेक्निकल संस्था आणि इतर अनेक सरकारी किंवा खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश मिळतो.

जेईई मेन 2026 साठी 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गणेश पांडे म्हणतात की, यापैकी केवळ अडीच लाख विद्यार्थीच जेईई ॲडव्हान्स्ड देण्यासाठी पात्र ठरतात.

परीक्षा किती वेळा देता येते?

  • जेईई मेन : एकूण 3 वेळा. 12 वी मध्ये असताना आणि त्यानंतर सलग दोन वर्षे.
  • जेईई ॲडव्हान्स्ड: केवळ 2 वेळा. 12 वीमध्ये असताना आणि त्याच्या पुढच्या वर्षी.

आणि यासाठी पात्रता काय लागते?

जेईई देण्यासाठी 12 वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय असणे अनिवार्य आहे.

सामान्य प्रवर्गासाठी 75 टक्के गुण किंवा बोर्डाच्या 'टॉप 20 पर्सेंटाईल'मध्ये असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गासाठी ही मर्यादा 65 टक्के आहे.

गणेश पांडे यांच्या मते, "पर्सेंटाईलचा नियम यासाठी आहे की, समजा एखाद्या बोर्डाच्या निकालात टॉपरलाच 75 टक्के गुण असतील आणि बाकी विद्यार्थी त्याच्या मागे असतील; पण हे विद्यार्थी जर टॉप 20 पर्सेंटाईलमध्ये येत असतील, तर ते जेईई मेन देण्यासाठी पात्र ठरतात."

या परीक्षेचा पॅटर्न काय असतो?

जेईई मेन:

  • 3 तासांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT).
  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या तिन्ही विषयांना समान वेटेज.
  • बहुपर्यायी (MCQ) आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू (संख्यात्मक) आधारित प्रश्न.
  • MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, तर न्यूमेरिकल प्रश्नांमध्ये नसते.

जेईई ॲडव्हान्स्ड:

  • दोन पेपर (पेपर-1 आणि पेपर-2), दोन्ही परीक्षा प्रत्येकी 3 तासांच्या असतात.
  • MCQ, न्यूमेरिकल आणि मॅट्रिक्स-मॅच प्रकारचे प्रश्न.
  • प्रश्नांची संख्या आणि मार्किंग पद्धत दरवर्षी बदलत असते.

दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम मुख्यत्वे 11 वी-12 वी च्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितावर आधारित असतो.

फरक फक्त कठीणतेच्या पातळीचा म्हणजेच 'डिफिकल्टी लेव्हल'चा असतो. जेईई ॲडव्हान्स्डमधील प्रश्न अधिक वैचारिक (Conceptual) आणि सखोल असतात.

जेईई मेन वर्षातून दोनदा होते. पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा एप्रिलमध्ये. विद्यार्थी या दोन्ही परीक्षांना बसू शकतात आणि दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील, त्या आधारावर रँक ठरवली जाते. रँक एप्रिलच्या सत्रानंतर जाहीर केली जाते.

स्ट्रॅटेजी कशी असावी?

जेईई ही एकदाच किंवा मर्यादित वेळा देता येणारी परीक्षा आहे, म्हणूनच विद्यार्थ्यांना पहिल्याच अटेम्प्टमध्ये उत्तम रँक मिळवावी लागते.

तन्मय अग्रवाल आयआयटी बीएचयूमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे आणि याच वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्याने जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत पहिल्या 1 हजारांमध्ये रँक मिळवली.

त्यामागे त्याची काय स्ट्रॅटेजी होती, यावर तो सांगतो की, सर्वात आधी मॉक टेस्ट देत राहा आणि त्याच्या निष्कर्षाच्या आधारे स्वतःच्या तयारीचे विश्लेषण करत राहा.

तो म्हणाला, "आता मेन परीक्षेसाठी सुमारे 1 महिन्याचा वेळ उरला आहे. अशा वेळी जे विद्यार्थी ही परीक्षा देण्याच्या तयारीत आहेत, त्यांचा सिलॅबस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाला असेल. आता वेळ आहे उजळणीची. फक्त मॉक टेस्ट देत राहणे पुरेसे होणार नाही, तर प्रत्येक विषयात आपल्या काय त्रुटी किंवा कमतरता आहेत, त्याचे विश्लेषण करा आणि त्या सुधारण्यावर भर द्या. अन्यथा कितीही मॉक टेस्ट दिल्या तरी त्या निरर्थक आहेत."

'टाइम मॅनेजमेंट'च्या प्रश्नावर तन्मय सांगतो, "असेही होऊ नये की, संपूर्ण दिवस फक्त अभ्यासातच निघून जाईल. त्याऐवजी मध्ये ब्रेक घेऊन अभ्यास करा, एखादे टास्क हातात घ्या आणि ते किती तासात पूर्ण करायचे आहे हे निश्चित करा. मागील वर्षांचे जेईई मेनचे पेपर सोडवा, तेही अगदी प्रत्यक्ष परीक्षेप्रमाणे वेळेचे भान ठेवून."

स्ट्रॅटेजीबद्दल तो पुढे म्हणतो की, ती प्रत्येकाच्या सोयीनुसार असू शकते, फक्त प्रयत्न हाच असावा की तुमची जी काही स्ट्रॅटेजी आहे, ती परीक्षेच्या दिवशीही कामी येईल.

शिक्षक - मार्गदर्शक गणेश पांडे देखील विद्यार्थ्यांना सातत्याने मॉक टेस्ट देण्याचा सल्ला देतात.

ते म्हणाले, "ही गोष्ट खूप सारखी सांगितली जाते की, इतक्या मॉक टेस्ट द्या की जेव्हा प्रत्यक्ष पेपर समोर येईल, तेव्हा तो देखील एक मॉक टेस्टच वाटेल."

त्यांच्या मते, बहुतांश मुलांना स्वतःवर शंका असते. त्यांना नेहमी ही भीती वाटते, अस्वस्थता येते की आपल्याला सर्व येते की नाही, आपण सर्व वाचले आहे की नाही, आपल्याला सर्व आठवेल की नाही.

मॉक टेस्टमध्ये कमी गुण आले तर काय करावे?

गणेश पांडे यांच्या मते, "या प्रश्नांचे कोणतेही ठाम उत्तर नाही. उत्तर फक्त इतकेच आहे की, सराव पूर्ण असावा आणि या मुलांचे समुपदेशन (Counseling) करत राहावे."

ॲडव्हान्स्ड क्लिअर झाले पण जागा मिळाली नाही तर काय करावे?

2025 सालचे उदाहरण घेतले तर एकूण 54 हजार 378 विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, देशभरातील 23 आयआयटीमधील सर्व शाखा मिळून एकूण जागा केवळ 18 हजार 160 आहेत.

अशा परिस्थितीत, ॲडव्हान्स्ड क्लिअर करणारे 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी यशस्वी होऊनही अधांतरी राहिले.

या विद्यार्थ्यांकडे काय पर्याय उरतात, असे आम्ही गणेश पांडे यांना विचारले.

ते म्हणाले, "अशा विद्यार्थ्यांसाठी जेईई मेनच्या कामगिरीच्या आधारावर एनआयटी, आयआयआयटी, जीएफटीआय, डीटीयू, एनएसयुटी यांसारख्या अनेक चांगल्या कॉलेजांचे पर्याय असतात. ज्या विद्यार्थ्यांना संशोधनात करिअर करायचे आहे, ते IISER, NISER मध्ये प्रवेश घेऊ शकतात."

त्यांचे म्हणणे आहे की, अनेकदा आयआयटीमध्येही संधी मिळते, कारण अनेक विद्यार्थी चांगली ब्रांच किंवा टॉप आयआयटीसाठी मिळालेली संधी सोडून देतात, तेव्हा त्यांनी सोडलेल्या जागेवर पुढच्या रँकिंगवाल्याला प्रवेश मिळू शकतो. परंतु हे सर्व कौन्सिलिंग पूर्ण होण्यापूर्वीच शक्य असते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)