You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोविंदा विरोधात सुनीता आहुजा पोहोचल्या न्यायालयात, काय आहे प्रकरण?
- Author, रवी जैन
- Role, बीबीसी हिंदीसाठी
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचं 38 वर्षांचं सहजीवन संकटात आल्याची चिन्हे दिसत आहेत.
या दोघांमधील घटस्फोटाचं प्रकरण मुंबई फॅमिली कोर्टापर्यंत पोहोचलं आहे.
या प्रकरणातील पहिली सुनावणी गेल्या गुरुवारी मुंबईतील फॅमिली कोर्टात सुरू झाली आहे. फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोट प्रकरणातील या सुनावणीदरम्यान सुनीता आहुजा उपस्थित होत्या.
या सुनावणीदरम्यान गोविंदा स्वत: प्रत्यक्षात उपस्थित नव्हता. मात्र, व्हीडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे त्याने या सुनावणीमध्ये सहभाग घेतला.
कोर्टाने त्याला पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान गोविंदाचे वकील आणि सल्लागार ललित बिंदल यांनी सांगितलं की, सुनीता यांनी गेल्या वर्षी घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला होता.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन महिन्यांनंतर नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
घटस्फोटासाठी अर्ज
गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी बीबीसी हिंदीबरोबर बोलताना म्हटलं की, "सुनीता आहुजा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घटस्फोटासाठी विविध कलमांखाली याचिका दाखल केली होती."
हे प्रकरण जुनं आहे आणि लवकरच दोघंही तडजोडीपर्यंत पोहोचतील, असंही ललित बिंदल म्हणाले.
सुनीता यांनी याचिका दाखल करण्याचे कारण काहीही असो, पण आता हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
ललित बिंदल यांनी या प्रकरणात अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसंच सध्या समुपदेशनाची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं.
दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान ते स्वतः गोविंदाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी कुटुंब न्यायालयात उपस्थित होते, याला त्यांनी दुजोरा दिला.
या प्रकरणाशी संबंधित वकिलांच्या मते, सुनीता आहुजा यांनी अवैध संबंध, क्रौर्य आणि पत्नीला सोडून देणं अशा कारणांवरून कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.
सुनीता आहुजा यांनी हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13(1)(i), (ia), (ib) अंतर्गत खटला दाखल केला आहे.
बीबीसी हिंदीने सुनीता आहुजा आणि गोविंदा दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
सुनीता आहुजांचे आरोप
सुनीता आहुजांनी आठवडाभरापूर्वीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त यूट्यूब चॅनेल सुरू करून आयुष्यात नवं पाऊल टाकत असल्याचं म्हटलं होतं.
या व्हिडिओमध्ये सुनीता आहुजांनी व्लॉगिंगच्या जगात पाऊल ठेवण्यामागची कारणं सांगितली. तसंच, गोविंदासोबतच्या दुराव्याबद्दलही उघडपणे त्या बोलल्या.
त्यांनी गोविंदासोबतचे संबंध बिघडवण्यासाठी अज्ञात लोकांवर आरोप केले.
गोविंदा आणि सुनीता यांचं 11 मार्च 1987 रोजी लग्न झालं होतं. असं म्हटलं जातं की, गोविंदा स्टार होण्यापूर्वीपासूनच सुनीता आणि त्यांची ओळख होती.
संघर्षाच्या काळात गोविंदा मुंबईलगत असलेल्या विरारमध्ये (आता पालघर जिल्ह्यात) आपला मामा आनंद सिंग यांच्यासोबत राहत होता. सुनीता यांच्या मोठ्या बहिणीचं आनंद सिंग यांच्याशी लग्न झालंय.
यामुळे सुनीता यांचं आनंद सिंग यांच्या घरी येणं-जाणं होत असे. याच घरात गोविंदा आणि सुनीता यांची पहिली भेट झाली होती.
62 वर्षांचे गोविंदा आणि 57 वर्षांच्या सुनीता आहुजांना एक मुलगी (36 वर्षे) आणि एक मुलगा (28 वर्षे) आहे. मुलीचं नाव नर्मदा आहे. मात्र, सिनेसृष्टीत त्या टीना आहुजा म्हणून परिचित आहेत.
टीना यांनी 2015 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी काही हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र, दीर्घकाळ संघर्ष करूनही त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात अद्याप उल्लेखनीय यश मिळवता आलेलं नाहीय.
गोविंदाचा मुलगा यशोवर्धन आहुजा सध्या अभिनेता म्हणून पदार्पणाच्या तयारीत आहे. गुरुवारी (21 ऑगस्ट) फॅमिली कोर्टात यशोवर्धन आई सुनीता यांच्यासोबत दिसला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)