कतारकडून विमानाची भेट स्वीकारण्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांचे कट्टर समर्थकही का चिडले?

    • Author, माइक वेंडलिंग
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कतार या देशाकडून भेट रुपानं विमान घेण्यासाठी औत्सुक्यानं तयारी दर्शवली असल्यानं बरीच चर्चा होते आहे. किंबहुना, ही गोष्ट नेहमीपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणातील दोन्ही बाजूची मंडळी या मुद्द्यावरुन एकत्र आली आहेत.

त्यामुळे, या मुद्द्यावरुन समर्थक आणि विरोधक दोघांचंही एकमत घडतंय, ही ट्रम्प सरकारसमोरची सध्याची सर्वांत मोठी अडचण ठरते आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कतारच्या राजघराण्याकडून आलिशान जेट स्वीकारण्याचे संकेत दिल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

इथवर ठीक होतं. पण ट्रम्प यांच्यासाठी याहून आणखी आश्चर्याची आणि चिंताजनक बाब म्हणजे त्यांच्या काही निष्ठावंत समर्थकांनाही या कराराबद्दल पुरेसा विश्वास वाटत नाहीये किंवा ट्रम्प यांनी हा करार केल्याबाबत ते त्यांच्यावर नाराज आहेत.

खरं तर हा करार अद्याप अंतिमत: स्वीकृत झालेला नसला तरी विरोधाबाबतच्या या सगळ्या गोष्टी त्याआधीच घडताना दिसत आहेत.

ट्रम्प समर्थक (ज्यांना बहुतेकदा MAGA (Make America Great Again) इन्फ्लूएन्सर्स म्हणतात) या कराराबाबतच्या हालचालींना 'लाच घेणं' किंवा 'हा एकप्रकारचा घोटाळा असल्याचं' ठरवत आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थकच असं म्हणत आहेत की, ते नेहमीच ज्या प्रकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार असल्याची दवंडी पिटतात, त्याच प्रकारचा हा भ्रष्टाचार ते स्वत: करत आहेत.

कतारच्या राजघराण्याला अमेरिकेच्या संरक्षण विभागाला एक आलिशान बोईंग 747-8 हे विमान द्यायचं आहे.

या विमानाची किंमत सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स आहे. ते विमान 'एअर फोर्स वन' नावाच्या विमानांपैकी एक म्हणून वापरलं जाईल.

'एअर फोर्स वन' म्हणजे असं विमान ज्यांमधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उड्डाण करतात.

सध्या, 'एअर फोर्स वन'च्या ताफ्यात 1990 पासून वापरात असलेली दोन जुनी 747-200 विमाने आहेत. त्यात काही लहान आणि काहीशी गुप्त अशी 757 विमानंदेखील समाविष्ट आहेत.

नवीन विमान अपग्रेड करण्यासाठी खूप वेळ आणि पैसा लागेल, असं व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे. शिवाय, ट्रम्प यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, हे विमान त्यांच्या प्रेसिडेन्शियल लायब्ररीमध्ये समाविष्ट केलं जाईल.

रविवारी या कराराबाबतची बातमी येऊन धडकताच, त्यावर अनेकांनी तीव्र आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'डेली वायर'चे कट्टर कंझर्व्हेटिव्ह कॉमेंटेटर बेन शापिरो यांनी त्यांच्या पॉडकास्टवर या करारावरुनच विनोद केला आणि त्यांनी या कराराला "स्कीझी" (ज्याचा अर्थ अस्पष्ट किंवा संशयास्पद असा होतो) असं संबोधलं आहे.

शापिरो पुढे म्हणाले की, कतार कथितरित्या ट्रम्प यांना फक्त चांगलं वाटावं, यासाठी म्हणून 400 दशलक्ष डॉलर्सचं जेट देण्याचा मनाचा मोठेपणा दाखवत नाहीये."

"ते पूर्णपणे द्विपक्षीय पद्धतीने खिशात पैसे भरण्याचा प्रयत्न करत आहेत."

कॉमेंटेटर शापिरो यांनी कतारने दहशतवादी गटांना गुप्तपणे निधी दिल्याच्या आरोपांचा उल्लेख केला आहे.

कतारने हे आरोप नाकारले असले तरीही अशा प्रकारच्या आरोपांचा उल्लेख शापिरो यांच्यासमवेतच इतर अनेकांनीही केला आहे. "कतार आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कोणत्याही देशापेक्षा दहशतवादाला सर्वाधिक पाठिंबा देतो", असंही ते म्हणाले आहेत.

ट्रम्प समर्थक इन्फ्लूएन्सर लॉरा लूमर या नेहमीच ट्रम्प यांचं जोरदार समर्थन करताना दिसतात.

त्या कटाच्या सिद्धांतांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्फ्लूएनर म्हणूनच ओळखल्या जातात. पण त्यांनीदेखील जेट कराराच्या मुद्द्यावरुन ट्रम्प यांच्या विरोधातील भूमिका घेतली आहे.

लूमर म्हणाल्या की, त्या अजूनही ट्रम्प यांना पाठिंबा देतात. पण या जेट कराराला त्यांनी "एक प्रकारचा डाग" असं संबोधलं आहे.

त्यांनी विमानाच्या आकाराच्या ट्रोजन हॉर्सचं एक व्यंगचित्र देखील शेअर केलं आहे. हे विमान सशस्त्र इस्लामी सैनिकांनी भरलेलं आहे, असं या व्यंगचित्रात दिसतं.

ट्रम्प यांच्या जेट स्वीकारण्याच्या योजनेला मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही पाठिंबा दिलेला नाही.

डोनाल्ड ट्रम्प आणि MAGA चळवळीला अनेकदा पाठिंबा देणाऱ्या 'न्यू यॉर्क पोस्ट'ने देखील या करारावर जोरदार टीका केली आहे. कतारचे 'पॅलेस इन द स्काय' जेट ही काही 'मोफत भेट' नाहीये, आणि ट्रम्प यांनी हे जेट एक भेटवस्तू म्हणून स्वीकारू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

फॉक्स न्यूज टीव्ही आणि रेडिओ टॉक शोवरील ट्रम्प समर्थक मार्क लेविन यांनीही कतारवर टीका केली. त्यांनी 'एक्स'वरुन टीका करताना कतारला "दहशतवादी राष्ट्र" असं संबोधलं आहे.

"अमेरिकेला जेट देणं आणि इतर गोष्टी खरेदी करणं यामुळे कतारला ते खरोखर काय करत आहेत हे लपवण्यास किंवा त्यांची प्रतिमा सुधारण्यास मदत करणारं ठरणार नाहीये."

पहिल्या कार्यकाळात, ट्रम्प यांनी स्वतः कतारवर दहशतवादी गटांना निधी पुरवल्याचा आरोप केला होता.

बीबीसीने संपर्क साधला असता, वॉशिंग्टनमधील कतार दूतावासाने कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल-थानी यांनी विमानाबद्दल सीएनएनला दिलेल्या मुलाखतीकडे लक्ष वेधलं.

कतारच्या पंतप्रधानांनी सांगितलं की, "विमान करार अमेरिका आणि कतार सरकारमध्ये होतो आहे. त्याचा वैयक्तिक संबंधांशी काहीही संबंध नाही, ना अमेरिकेच्या बाजूने, ना कतारच्या बाजूने. हा करार दोन्ही संरक्षण मंत्रालयांमधील आहे."

"आम्ही अमेरिकेमध्ये आमचा इन्फ्लूएन्स कशाला खरेदी करु?" असंही त्यांनी म्हटलं. पुढे त्यांनी याबाबत प्रतिवाद करताना म्हटलं की, "कतार हा नेहमीच एक विश्वासार्ह आणि खात्रीलायक साथीदार राहिला आहे. हे काही एकतर्फी चालणारं नातं नव्हे."

लोकांनी या करारावर टीका केली तेव्हा व्हाईट हाऊसदेखील मागे हटलेलं नाही. ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, प्रशासन "पूर्ण पारदर्शकतेसाठी वचनबद्ध आहे."

"कतारसारख्या परदेशी सरकारनं दिलेली कोणतीही भेटवस्तू नेहमीच सर्व लागू असलेल्या कायद्यांचे पूर्ण पालन करून मगच स्वीकारली जाते," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

कतारच्या राजघराण्याने विमानाच्या बदल्यात काहीही मागितलेलं नाही. पण अनेक टीकाकारांनी असं म्हटलं आहे की, कतारचं राजघराणं कोणत्याही अटीशिवाय एवढी मोठी वस्तू देईल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचं ठरेल.

राजकीय रणनीतीकार आणि रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे माजी कम्यूनिकेशन डायरेक्टर डग हे यांनी बीबीसीला सांगितलं की, "कतारला कदाचित असं वाटतं की ट्रम्प यांना भेटवस्तू दिल्यानं त्यांना भविष्यात मदत होऊ शकते." ते पुढे म्हणाले की ट्रम्प यांची स्तुती करणं आणि त्यांना चांगल्या गोष्टी देणं हे अनेकदा काम करतं आणि आपण हे यापूर्वी अनेकदा घडताना पाहिलंही आहे."

अमेरिकन संविधानात अधिकाऱ्यांना "कोणत्याही राजा, राजपुत्र किंवा परदेशी राज्याकडून कोणत्याही प्रकारची भेटवस्तू, मानधन, पद किंवा पदवी" स्वीकारण्यास प्रतिबंध करणारं एक कलम समाविष्ट आहे.

पण व्हाईट हाऊसनं वरकरणी असं निदर्शनास आणून दिलं आहे की, हे विमान ट्रम्प यांना वैयक्तिकरित्या नाही तर अमेरिकन सरकारला दिलं जात आहे.

वृत्तानुसार, अ‍ॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी या कराराच्या कायदेशीरतेची चौकशी केली आणि असं ठरवलं की, विमानाच्या बदल्यात कोणत्याही स्पष्ट अटी जोडलेल्या नसल्यामुळे, ती कृती लाच ठरणार नाही.

ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यापूर्वी पाम बोंडी या कतारसाठी लॉबीस्ट म्हणून नोंदणीकृत होत्या. त्या कतारी सरकारसाठी काम करायच्या आणि या कामातून त्यांना दरमहा $115,0000 (£87,000) पर्यंत कमाई होत होती, असं कंझर्व्हेटिव्ह आणि इतरांनी काही ठिकाणी लगेचच निदर्शनास आणून दिलं आहे.

मात्र, ट्रम्प ऑर्गनायझेशननं कतारशी आपले संबंध कायम ठेवले आहेत आणि गेल्या महिन्यात त्यांनी कतारमध्ये एक लक्झरी गोल्फ रिसॉर्ट बांधण्याचा करारही जाहीर केला आहे.

व्हाईट हाऊसमध्ये मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकाराला सुनावलं. त्यानं व्यवहारातील नैतिकतेच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला होता.

"आलिशान जेट ही तुम्हाला दिलेली वैयक्तिक भेट आहे, असं लोकांना वाटतं. तुम्ही त्यावर काय म्हणाल?" असा प्रश्न ABC चे रिपोर्टर रेचेल स्कॉट यांनी विचारला होता.

त्यावर, "तुम्हाला असा प्रश्न विचारताना लाज वाटायला पाहिजे," असं उत्तर देत ट्रम्प यांनी 'फेक न्यूज'च्या मुद्द्यावरून टोमणा मारला.

ट्रम्प म्हणाले की, "ते आम्हाला मोफत जेट देत आहेत. आम्ही नाही, नाही... असं म्हणू शकतो. किंवा खूप, खूप धन्यवाद, म्हणू शकतो. "

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी Truth Social वर काही पोस्ट शेअर केल्या. त्यात त्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीही फ्रान्सकडून भेट मिळालं होतं, याकडं लक्ष वेधलं. त्यानंतर मंगळवारी त्यांनी पोस्ट केलं की, "हे बोईंग 747 अमेरिकेच्या एअर फोर्स/डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सला दिला जात आहे, मला नाही!"

"देशाच्या वतीनं अशी भेट न स्वीकारणारा मूर्ख असेल," असं त्यांनी लिहिलं.

दरम्यान, असं असलं तरी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील काही सदस्यही या प्रकरणी चिंतित आहेत.

"हे चुकीचं असेल किंवा नसेल पण तरीही त्याचं चूक असणं भासणं चुकीचं आहे," असं केंटकीचे रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी Fox News ला सांगितलं.

"मला वाटतं, कतारच्या मानवाधिकाराच्या मुद्द्यावर आपण न्याय्य भूमिका घेऊ शकू का? हा प्रश्न निर्माण होतो," असंही पॉल म्हणाले.

तसंच टेक्सासचे रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूझ म्हणाले की, ही भेट स्वीकारल्याने हेरगिरीची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

त्याचवेळी काहींनी ट्रम्प यांना पाठिंबाही दर्शवला. "मोफत म्हणजे चांगलं आहे. अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत," असं सिनेटर टॉमी ट्युबेरव्हिल यांनी CNN शीबोलताना म्हटलं.

रिपब्लिकन पक्षाचे सल्लागार, डग हेय यांनी याचा ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम होणार नसल्याचं म्हटलं.

"एखाद्या राजकारण्याला उध्वस्त करेल अशा घोटाळ्यांनाही लोक विसरतील अशा पद्धतीनं झाकून टाकणं ट्रम्प यांनी अनेक वर्षं करून दाखवलं आहे. त्यांना ते चांगलं जमतं," असंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.