ममदानी-ट्रम्प यांच्या भेटीनंतर का होत आहे चर्चा? नेमकं काय अनपेक्षित घडलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोहरान ममदानी यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली.

त्यांच्या भेटीदरम्यान तणाव दिसेल, असा अंदाज होता. परंतु, भेटीनंतर दोघेही एकमेकांची स्तुती करताना दिसले.

ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल'वर ममदानी यांच्यासोबतच्या भेटीचे अनेक फोटो पोस्ट केले आणि लिहिलं, "न्यूयॉर्कचे नवे महापौर झोहरान ममदानी यांना भेटणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता."

ममदानी यांनीही भेटीदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेतील एक छोटी व्हीडिओ क्लिप पोस्ट केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये ममदानी म्हणाले, "न्यूयॉर्कच्या राजकारणात कामगार वर्ग मागे राहिला आहे. जगातील सर्वात श्रीमंत शहरातसुद्धा पाचपैकी एक जण 2.90 डॉलरचं रेल्वे किंवा बसचं भाडंही देऊ शकत नाही.

या लोकांना पुन्हा आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याची आता वेळ आली आहे, असं मी आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सांगितलं आहे."

भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

एका पत्रकाराने त्यांना निवडणुकीच्या वेळी ट्रम्प यांनी ममदानी यांना 'कम्युनिस्ट' म्हटलं होतं आणि ममदानी यांनी ट्रम्प यांना 'हुकूमशहा' म्हटल्याची आठवण करून दिली.

परंतु, या वेळी दोन्ही नेते आपल्या जुन्या वक्तव्यांवरील अनेक प्रश्नं टाळताना आणि एकमेकांची प्रशंसा करताना दिसले.

फॅसिझमवरच्या प्रश्नावर काय म्हणाले ममदानी?

तुम्ही राष्ट्राध्यक्षांना फॅसिस्ट मानतात का?, असा प्रश्न ममदानींना विचारण्यात आला.

ममदानी हे या प्रश्नाचं उत्तर देण्यास सुरुवात करतच होते, तितक्यात ट्रम्प यांनी त्यांना थांबवत त्यांच्या हातावर हलकंसं थोपटलं आणि हसत म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही फक्त 'हो' म्हणू शकता. ते समजावण्यापेक्षा खूप सोपं आहे."

काही दिवसांपूर्वी ममदानी यांनी ट्रम्प यांना हुकूमशहा म्हटलं होतं आणि त्यांच्यावर फॅसिस्ट अजेंडा राबवण्याचा आरोप केला होता.

आता आपलं हे वक्तव्य मागे घेण्याचा तुम्ही विचार करत आहेत का? असा प्रश्न पत्रकाराने ममदानी यांना विचारला.

या प्रश्नाचं उत्तर देताना ममदानी म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष आणि मी दोघंही आपल्या भूमिकांबद्दल आणि विचारांबद्दल अगदी स्पष्ट आहोत. मला त्यांच्यातील सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे आमची भेट मतभेदांच्या मुद्यांवर नाही, तर आमच्या समान उद्दिष्टांवर केंद्रित होती."

ते म्हणाले, "हे महत्त्वाचं आहे, कारण याचा 85 लाख लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपण महागाईच्या आव्हानाला तोंड देत आहोत, चारपैकी एक जण गरिबीत आहे.

लोकांचं आयुष्य कसं सुधारता येईल आणि एकत्र येऊन काय करता येईल, याविषयी बैठकीत आम्ही बोललो. महागाईची चिंता न करता निर्धास्तपणे जगू शकतील, असं शहर लोकांना द्यायचं आहे."

यानंतर ट्रम्प म्हणाले, "मला हुकूमशहापेक्षाही वाईट म्हटलं गेलं आहे, त्यामुळे हे काही इतकं अपमानास्पद नाही. कदाचित आम्ही दोघांनी मिळून काम केलं तर त्यांचं माझ्याबद्दलचं मतं बदलेल."

'जिहादी' प्रश्नावर ट्रम्प यांचं उत्तर

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांना विचारलं गेलं की, त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील महिला खासदार एलिस स्टेफनिक यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ममदानी यांना 'जिहादी' म्हटलं होतं.

"ओव्हल ऑफिसमध्ये तुम्ही एखाद्या जिहादीच्या शेजारी उभे आहात, असं तुम्हाला वाटतं का?", असा प्रश्न पत्रकाराने ट्रम्प यांना विचारला.

स्टेफनिक यांचं हे वक्तव्य ट्रम्प यांनी नाकारलं आणि ममदानी हे खरोखर एक 'समंजस' व्यक्ती आहेत, असं म्हटलं.

स्टेफनिक न्यूयॉर्कच्या गव्हर्नर पदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार होत्या. त्यांनी सोशल मीडियावर न्यूयॉर्क पोस्ट वृत्तपत्राच्या पहिल्या पानाचा फोटो टाकला आणि लिहिलं, "जर ते जिहादीसारखं चालत असतील, जिहादीसारखं बोलत असतील, जिहादीसारखा उपदेश करत असतील आणि जिहाद्यांना पाठिंबा देत असतील…तर ते जिहादीच आहेत."

याच मुद्द्यावर ट्रम्प यांना प्रश्न विचारला गेला होता. त्यावर ट्रम्प म्हणाले, "नाही, मी तसं मानत नाही. निवडणूक प्रचारादरम्यान कधी कधी काही गोष्टी बोलल्या जातात."

स्टेफनिक यांच्याबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, "त्या खूप सक्षम आहेत, याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. पण मी ज्यांना भेटलो, ते एक समंजस व्यक्ती आहेत आणि त्यांना न्यूयॉर्कच्या विकासासाठी काम करायचं आहे."

ममदानींचं कौतुक

ट्रम्प आणि ममदानी यांची आधी एक खासगी बैठक झाली. त्यानंतर दोघेही पत्रकारांसमोर आले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

या भेटीदरम्यान दोघांमध्ये चांगला ताळमेळ असल्याचे दिसून आले.

ममदानी दोन्ही हात जोडून ट्रम्प यांच्या शेजारी उभे दिसले. दोघांची, खास करून ट्रम्प यांची, देहबोली खूपच आरामशीर आणि नैसर्गिक वाटत होती.

या वेळी ट्रम्प यांनी ममदानींवर कोणत्याही प्रकारची टीका केली नाही. उलट त्यांनी त्यांची अनेकदा प्रशंसा केली. तसेच ते 'चांगले महापौर ठरतील' अशी आशाही व्यक्त केली.

"ते चांगलं काम करतील असा विश्वास आहे," असं ते म्हणाले.

ट्रम्प आणि ममदानी यांच्यात काही साम्य आहे. दोघंही न्यूयॉर्कचे आहेत आणि दोघंही क्वीन्सलाच आपलं घर मानतात.

ट्रम्प यांचं लहानपणीचं घर जमैका एस्टेट्सजवळ आहे, आणि ममदानी सध्या एस्टोरिया येथे राहतात.

दोघांचंही न्यूयॉर्क शहरावर प्रेम असल्याचे ममदानी यांनी सांगितले.

सध्या ट्रम्प न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमधील घरात फार कमी वेळ घालवतात. परंतु, पत्रकारांशी बोलताना त्यांनी शहराबद्दल आनंदाने बरंच काही सांगितलं.

"हे शहर कमाल करू शकतं. या शहरानं पुन्हा मोठं यश मिळवलं तर मला खूप आनंद होईल. मला खूपच आनंद होईल," असं ते म्हणाले.

एकवेळ तर ट्रम्प म्हणाले की, त्यांना पुन्हा राजकारणाची संधी मिळाली असती, तर त्यांना न्यूयॉर्कचं महापौर व्हायला आवडलं असतं.

शुक्रवारी (21 नोव्हेंबर) झालेल्या भेटीत दोघांनी महागाईवर चर्चा केली.

2024 मध्ये ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात महागाईचा मोठा मुद्दा बनवला होता. अलीकडे अमेरिकेत दैनंदिन वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे लोक त्रस्त झाले आहेत. या काळात ट्रम्प सतत आर्थिक स्थैर्याबद्दल लोकांना आश्वासन देत आले आहेत.

पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महागाईच्या मुद्द्यावर रिपब्लिकन मागे पडले आणि विजय डेमोक्रॅट्सच्या हाती आला.

आता सर्वसामान्य लोक आणि नेते पुढच्या वर्षीच्या मध्यावधी निवडणुकांची वाट पाहत आहेत. अमेरिकन काँग्रेसवर कोणाचं नियंत्रण राहील, हे या निवडणुका ठरवतील.

प्रचारादरम्यान ममदानी यांनी महागड्या घरांच्या समस्येचा मुद्दा मांडला होता आणि काही अपार्टमेंट्सचे भाडे स्थिर ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता.

ममदानी म्हणाले की, त्यांनी याबाबत राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे, जेणेकरून "न्यूयॉर्कमधील लोकांसाठी गोष्टी स्वस्त, परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होतील."

रिपब्लिकनच्या रणनितीसाठी नवा पेच?

अजूनही काही मुद्दे असे आहेत की, ज्यामुळे दोघे पुन्हा दोन महिन्यांपूर्वीसारखं एकमेकांवर जोरदार टीका करू लागतील, असं मानलं जातं.

एका पत्रकाराने ट्रम्प आणि ममदानी यांना फेडरल इमिग्रेशन धोरणाबद्दल प्रश्न विचारलं. या धोरणामुळं न्यूयॉर्कमधील डेमोक्रॅट समर्थक आणि काही स्थलांतरित समुदाय नाराज आहेत.

न्यूयॉर्कमध्ये ही प्रवर्तन नीती जशी लागू केली जात आहे, त्याबद्दल ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असल्याचे ममदानी यांनी सांगितले.

ट्रम्प म्हणाले की, ते इमिग्रेशनबद्दल कमी आणि गुन्हेगारीबद्दल जास्त बोलले. "ना त्यांना गुन्हेगारी वाढताना पाहायचं आहे ना मला," असंही त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले की, या मुद्द्यावर दोघांमध्ये सहमती होईल याबद्दल त्यांना 'कमी शंका' होती.

सर्वांना आश्चर्यचकित करत ट्रम्प यांनी, ममदानींच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्कमध्ये राहून त्यांना सुरक्षित वाटेल असं सांगितलं.

पण ट्रम्प प्रशासन अवैध स्थलांतराबाबत (इमिग्रेशन) कडक धोरणं राबवत आहे आणि डिपोर्टेशनसाठी (हद्दपार) जास्त लक्ष्य निश्चित केलं जात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही नेते या मुद्द्यावर पुन्हा एकमेकांविरुद्ध उभे राहण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय आणखी एक अडचण येऊ शकते, जी दोघांच्या राजकारणापेक्षा वेगळी आहे.

रिपब्लिकन म्हणतात की, 2026 मधील मध्यावधी निवडणुकीत ते ममदानींना राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून वापरून त्याचा फायदा घेऊ इच्छितात.

परंतु, शुक्रवारी ममदानींशी झालेल्या भेटीनंतर ट्रम्प यांनी न्यूयॉर्कचे नवे महापौर 'काही कंजर्व्हेटिव लोकांना आश्चर्यचकित करू शकतात,' असं म्हटलं.

यामुळे येत्या काळात रिपब्लिकन पक्षाची रणनिती थोडी गुंतागुंतीची होऊ शकते, असं अशा परिस्थितीत मानलं जात आहे.

तीव्र टीका ते 'सामायिक हिता'पर्यंत

महापौर निवडणूक जिंकल्यानंतर भाषणात स्वतःला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणवणाऱ्या ममदानी यांनी ट्रम्प यांना 'एक हुकूमशहा' असं म्हटलं होतं.

त्याचवेळी, ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी नागरिकांना झोहरान ममदानी यांना मतदान करू नका असं आवाहन केलं होतं.

शुक्रवारी, ममदानी यांची ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्याशी भेट होण्यापूर्वी, राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्या कॅरोलीन लेविट यांनी "व्हाईट हाऊसमध्ये एक कम्युनिस्ट येत आहे. कारण डेमोक्रॅट पक्षाने त्यांना देशातील सर्वात मोठ्या शहराचा महापौर म्हणून निवडलं आहे," असं म्हटलं होतं.

गेल्या काही दिवसांपूर्वीच्या एकमेकांबद्दलच्या तिखट वक्तव्यांमुळे पहिल्या भेटीत तणाव दिसेल असं वाटत होतं. परंतु, दोघांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. भेटीत दोघांनी मैत्रीपूर्ण सूर ठेवला.

न्यूयॉर्कमधील महागाईच्या समस्येवर एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं दोन्ही नेत्यांनी वारंवार सांगितलं.

भेटीदरम्यान दोघेही हसत होते. या वेळी पत्रकारांनी ट्रम्प यांना निवडणुकीत ममदानी यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल विचारलं, तरी ट्रम्प रागावलेले दिसले नाहीत.

बैठकीचा अंदाज पाहून राजकीय निरीक्षकही आश्चर्यचकित झाले. पण या भेटीने हे स्पष्ट केलं की, दोन्ही नेते महागाईच्या समस्येचं महत्त्व समजतात आणि आपल्या राजकीय यशासाठी यावर लक्ष देत आहेत.

ममदानी हे पुढील वर्षी 1 जानेवारीला महापौरपदाचा भार स्वीकारणार आहेत. ट्रम्प आणि त्यांच्यातील हा ताळमेळ किती काळ टिकेल, हे पाहावं लागणार आहे.

"मी तोपर्यंत त्यांना सतत प्रोत्साहन देत राहीन," असं ट्रम्प भेटीनंतर म्हणाले.

9/11 हल्ला झाला तेव्हा झोहरान ममदानी हे अवघ्या नऊ वर्षांचे होते आणि मॅनहॅटनमध्ये राहत होते. कंजर्व्हेटिव्ह युवक गट 'टर्निंग पॉइंट यूएसए'चे संस्थापक चार्ली क्रिक यांनी देखील झोहरान ममदानींना 9/11 हल्ल्याशी थेट जोडलं होतं.

चार्ली क्रिक यांनी 25 जूनला 'एक्स'वर लिहिलं होतं, ''24 वर्षांपूर्वी मुस्लीम लोकांच्या एका गटाने 2,753 लोकांचा जीव घेतला. आता एक मुस्लीम समाजवादी न्यूयॉर्क शहर चालवण्याच्या दिशेने पुढे येत आहे.''

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)