सुरेश कोटक : भाजपला 30 कोटी रुपयांची देणगी देणारे व्यावसायिक कोण आहेत?

फोटो स्रोत, Getty Images/YT
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजराती
2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पार्टीला 6,000 कोटी रुपयांची देणगी मिळाली. त्यापैकी 3,689 कोटी रुपये ( एकूम रकमेच्या 62 टक्के) हे इलेक्टोरल बाँड्समधून आले.
तर उरलेले हे वैयक्तिक किंवा संस्थेच्या स्वरूपातून आले आहेत. त्यामुळे इलेक्टोरल बाँड व्यतिरिक्त वैयक्तिकरीत्या देणगी देणारे भाजपचे देणगीदार कोण आहेत याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.
वैयक्तिक देणगीदारांच्या यादीत प्रथम क्रमाकांवर असलेले सुरेश अमृतलाल कोटक यांनी भाजपला एका वर्षात 30 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
त्यानंतर सुरेश कोटक हे नेमके कोण आहेत, त्यांचा व्यवसाय काय आणि त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी यावर सोशल मीडियावर देखील चर्चा सुरू आहे.
'कॉटनमॅन' सुरेश कोटक
सुरेश कोटक यांना 'कॉटनमॅन' म्हणून देखील ओळखलं जातं. कोटक कुटुंबीय हे मूळचे गुजरातमधील राजकोटचे आणि ठक्कर समुदायातील आहेत.
सुरेश कोटक यांचे वडील अमृतलाल यांनी 1927 मध्ये त्यांच्या भावंडांसह कोटक अँड कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी कापूस खरेदी-विक्री, निर्यात व्यवसायात होती.
अमृतलाल हे कराचीतून व्यवसाय सांभाळत. स्वातंत्र्यपूर्व काळात कराची हे गुजराती समुदायासाठी महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कच्छमधील समुद्रीमार्गे व्यापारात घसरण झाल्यानंतर कराची हे निर्यात आणि खरेदी-विक्रीसाठी एक मोठे केंद्र बनले होते.
सुरेश कोटक यांचे बालपण कराचीतच गेले. या काळात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला होता. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि त्याचवेळी देशाची फाळणी देखील झाली. कराचीतील अनेक हिंदू कुटुंबांनी स्थलांतर केलं. अनेक गुजराती-कच्छी कुटुंब मुंबईत वास्तव्याला आली. त्यात कोटक यांचे देखील कुटुंब होते.
सिडनहॅम कॉलेजमधून शिक्षण
सुरेश कोटक यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित सिडनहॅम कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते कुटुंबाच्या कापूस व्यवसायात उतरले. या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले.

फोटो स्रोत, Getty Images
सुरेश कोटक यांचे चिरंजीव उदय कोटक हे यशस्वी बँक व्यावसायिक आहेत. उदय कोटक यांनी त्यांचे वडील सुरेश कोटक यांच्याविषयी ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांना मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
उदय यांनी दिलेल्या माहितीनुसार -
बाबूलनाथ मंदिराजवळ कोटक कुटुंबीय राहत असे. या कुटुंबात एकूण 60 सदस्य राहत होते. हे कुटुंब केवळ एकत्रच राहत नव्हतं तर संपूर्ण कुटुंबाची एकच चूल होती. त्यानंतर सुरेश कोटक आणि त्यांचे भाऊ हे नव्या घरात राहण्यासाठी गेले. आमचं कुटुंब हे मध्यमवर्गीय होतं पण राहणीमानाच्या दृष्टीने पाहिलं तर आम्ही उच्च-मध्यमवर्गीय होतो.
पुढे उदय कोटक सांगतात, जर माझ्या कुटुंबाला वाटलं असतं की मला शिक्षणासाठी एखाद्या प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत टाकावं तर ते त्यांच्यासाठी शक्य होतं. पण माझ्या राष्ट्रीय विचारसरणीमुळे त्यांनी मला मरीन ड्राइव्ह येथे असलेल्या हिंदी विद्या भवन या शाळेत टाकलं.
सुरेश कोटक हे आपल्या कापसाच्या निर्यातीसाठी अनेक देश फिरून आले. या काळात त्यांना 'मर्चंट बँकिंग'चं महत्त्व लक्षात आलं. आणि या धरतीवर भारतातही व्यवसाय सुरू करावा असे त्यांना वाटू लागले होते.
मर्चंट बँक सुरू करण्याचा मुलाला सल्ला
कोटक कुटुंबीयाच्या व्यवसायाचे कार्यालय मुंबईतील नवसारी बिल्डिंगमध्ये होते. या ठिकाणचे वातावरण कसे होते याबाबत उदय कोटक सांगतात, की एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं की 14 जणांची परवानगी आवश्यक असे. त्यामुळे माझ्या मनात कापूस व्यवसाय सोडून काहीतरी वेगळं करण्याचा मनात येत होतं.
त्यानंतर उदय कोटक यांनी एका खासगी कंपनीचं नेतृत्व केलं. पुढे त्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करायचे होते. पण उदय कोटक यांचे वडील सुरेश कोटक यांनी त्यांना स्वतःची फायनान्स कंपनी सुरू करण्याचा सल्ला दिला.
त्यातून उदय यांनी जी कंपनी सुरू केली त्या कंपनीला आपण कोटक महिंद्रा बँक या नावाने ओळखतो. ही कंपनी सुरू करण्यासाठी कोटक कुटुंबीयांकडून उदय कोटक यांना 30 लाख रुपयांचे भांडवल मिळाले. त्याच सोबत त्यांच्या मित्र परिवाराचे सहकार्य लाभले. आनंद महिंद्रा हे देखील सुरुवातीच्या काळातील कंपनीतील गुंतवणूकदार होते.
हितेश महिंद्रा यांनी सल्ला दिल्यानंतर उदय यांनी नरीमन पॉइंटला नवं ऑफिस सुरू केलं.
निवृत्तीनंतरही सक्रिय
सुरेश कोटक 1955 ते 1985 या काळात कापूस व्यवसायात सक्रिय होते. जेव्हा घरातील नवी पिढी व्यवसायात आली त्यानंतर सुरेश कोटक यांनी व्यवसायाहून अधिक समाजसेवा आणि उद्योग या गोष्टीसाठी आपला वेळ देऊ लागले.

फोटो स्रोत, Facebook
सुरेश कोटक यांना कॉटनमॅन ऑफ इंडिया असंही ओळखलं जातं. सुरेश कोटक हे भारताच्या कापूस महासंघाचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व देखील केले.
2022 मध्ये केंद्र सरकारने कॉटन काउन्सिल ऑफ इंडियाची सुरेश कोटक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली होती. सध्या त्यांचे नातवंडं देखील उद्योग-व्यवसायात आले आहेत.
एका मुलाखतीदरम्यान सुरेश कोटक यांनी सांगितलं होतं की "जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याशी कापूस उद्योगाचा प्रतिनिधी मी नियमितपणे भेटत असे. शंकर कॉटनच्या वाणाचा विकास आणि विस्तार करण्यासाठी त्यांनी उत्सुकता दर्शवली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गुजरातमध्ये कृषी क्रांती घडली."
सध्या 'शंकर' हे कापसाचे वाण गुजरात आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

राजकोटमधील एका प्रसिद्ध कापूस व्यावसायिकाने सांगितले की "शंकर कापसाची 'फार्म टू फॅब्रिक' म्हणजेच शेतातील उत्पन्न ते धागा बनण्याची प्रक्रिया ही अत्यंत सुलभ आहे. यात मानवी हस्तक्षेप देखील तुलनेनी कमी असतो. प्रक्रियेसाठी जर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तर शंकर कॉटन अमेरिका, ब्राझील आणि चीनच्या कापसाच्या तोडीचा आहे."
राजकोटमधील हे व्यावसायिक सुरेश कोटक यांना जागतिक कापूस उद्योगाचे 'भीष्म पितामह' असं संबोधतात.
भारतातील नोंदणीकृत पक्ष कंपनी, संस्था आणि नागरिकांकडून देणगी स्वीकारू शकतात. पण त्या बाबतची विस्तृत माहिती निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे.
2024-25 मध्ये सुरेश कोटक यांनी भाजपला 30 कोटी रुपयांची देणगी दिली आहे तसेच त्यांनी काँग्रेसला देखील 7.5 कोटी रुपयांची देणगी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











