You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवराज सिंह चौहान यांचं राजकीय भविष्य काय असणार?
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, भोपाळ
बुधवारी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी मोहन यादव विराजमान झाले. तर सर्वाधिककाळ मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह चौहान यांना निरोप देण्यात आला. शिवराजसिंह तब्बल 18 वर्षं मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर होते.
मात्र 2018 मध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर ते या पदावरून पायउतार झाले. पुढे 2020 मध्ये त्यांनी पुन्हा पदभार स्वीकारला.
गुरुवारी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी राजकीय वर्तुळात शिवराजसिंह चौहान चर्चेचा विषय बनले होते. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेला त्यांचा बायो.
पूर्वी तिथे 'मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री' असं लिहिलं होतं. मात्र गुरुवारी त्यांनी त्यात बदल करत 'भाई आणि मामा' 'मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री' असं लिहिलं.
शपथविधीच्या एक दिवस आधी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी कबीरांच्या भजनातील एक कडवं वाचून दाखवत म्हटलं "जस की तस धर दीन्ही चदरिया."
राजकीय जाणकार म्हणतात, त्यांना असं सांगायचं होतं की, ज्याप्रमाणे त्यांना राज्य मिळालं ते त्यांनी तसंच परत केलं.
पण सर्वांत जास्त चर्चा झाली ती त्यांच्या एका विधानाची.
निरोपाच्या आधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना विचारलं की, "जेव्हा मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे सर्व दिग्गज दिल्लीच्या फेऱ्या मारत होते, तिथेच तळ ठोकून होते तेव्हा तुम्ही दिल्लीला गेला नाहीत, याचा अर्थ कसा घ्यायचा?"
यावर ते म्हणाले, "स्वतःसाठी काहीतरी मागायला जाण्यापेक्षा मी मरण पत्करेन. ते माझं काम नाही. म्हणूनच मी दिल्लीला जाणार नाही, असं म्हटलं होतं."
राजकीय अज्ञातवास
त्याआधी, म्हणजे निकालानंतर दुसऱ्या दिवशी राघोगढमध्ये ते कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या मेळाव्याला संबोधित करत होते.
त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानावरून हे तर स्पष्ट होतं की, त्यांनी राजकीय अज्ञातवासात जाण्याचा निर्णय घेतलाय.
ते म्हणाले होते, "मामा आणि भावापेक्षा कोणतं मोठं पद नाही. माझ्या भाच्यांनो, मी प्रत्येकाला कसं जवळ करता येईल याचाच विचार करत असतो. प्रत्येकाचं जीवन कसं चांगलं करता येईल याचा विचार करत असतो."
"24 तास मनात एकच विचार असतो. हे माझं कुटुंब आहे. मामा आणि भावाचं जे स्थान आहे ते जगातील इतर कोणत्याही पदापेक्षा मोठं आहे, यापेक्षा मोठं कोणतंही पद नाही."
राजकारणातून डावललं जाण्याची परिस्थिती?
21 ऑगस्ट रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह भोपाळ दौऱ्यावर आले होते तेव्हा एक घटना घडली होती. यावेळी त्यांनी शिवराज सरकारचं 'रिपोर्ट कार्ड' प्रसिद्ध केलं होतं.
या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?
यावर प्रतिक्रिया देताना अमित शाह जे काही बोलले, त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांना राजकारणातून डावललं जातंय का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
अमित शाह म्हणाले होते की, शिवराज जी अजूनही मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, हे पक्षाचे काम आहे आणि ते पक्षच ठरवेल."
मग इथूनच संकेत मिळू लागले की, भारतीय जनता पक्ष मध्यप्रदेशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंह चौहान यांना पर्याय शोधत आहे.
वरिष्ठ पत्रकार रवी दुबे यांच्या मते, उमेदवारांच्या पहिल्या तीन यादीत शिवराज सिंह चौहान यांचं नाव देखील नव्हतं.
चौथ्या यादीत त्यांचं नाव आलं आणि त्यांना त्यांच्या मूळ मतदारसंघ बुधनी येथून उमेदवारी देण्यात आली.
प्रचारादरम्यान त्यांनी महिलांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांचा प्रचार केला.
पोस्टरमधून नाव हटवलं
वरिष्ठ पत्रकार रवी दुबे सांगतात, "त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली असली तरी ते कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे संकेत मिळू लागले होते."
"म्हणून आपल्या सभांमध्ये ते लोकांना आणि विशेषत: आपल्या मतदारसंघातील महिलांना प्रश्न विचारायचे की, "मी निवडणूक लढवू की नको? मी पुन्हा मुख्यमंत्री बनावं का?"
दुबे म्हणतात, "एकदा बुधनी विधानसभा मतदारसंघातील एका सभेत ते भावूक झाले आणि म्हणाले, मी जाईन तेव्हा मला तुमची खूप आठवण येईल."
दुबे यांच्याप्रमाणेच काही राजकीय विश्लेषकांना वाटतं की, शिवराजसिंह चौहान यांनी असं बोलायला नको होतं.
पण भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या लक्षात आलेली घटना म्हणजे 13 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशिवाय भाजप शासित राज्यातील अनेक मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.
शिवराज सिंह चौहान जेव्हा या कार्यक्रमाला आले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी "मामा मामा" अशी घोषणाबाजी सुरू केली.
त्याचा परिणाम असा झाला की, मध्यप्रदेशातील बहुतांश ठिकाणी जे भाजपचे पोस्टर लावण्यात आले त्यात शिवराज सिंह चौहान यांचं नाव आणि छायाचित्र दिसलं नाही.
काही पोस्टर्सवर पराभूत झालेल्या गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे छायाचित्रे दिसले मात्र चौहान कुठेच नव्हते.
उत्सुकता किंवा प्रतीक्षा
'दैनिक संध्या प्रकाश'चे संपादक संजय सक्सेना यांना वाटतं की शिवराजसिंह चौहान यांनी घाई करू नये. ती त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी अडथळा ठरू शकते.
त्यामुळे, काही काळ आपली परिस्थिती स्वीकारून संघटना आपल्यावर कोणती जबाबदारी सोपवते आहे याची वाट पाहावी, असं ते सांगतात.
ते सांगतात की, "त्यांच्या सल्लागारांनीही काही दिवसांचा अवकाश घ्यावा आणि त्यांच्या वतीने सोशल मीडियावर अनावश्यक पोस्ट टाकू नये. हा काळ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण त्याच वेळी त्यांचं पुढचं भविष्य ठरणार आहे."
मात्र अनेक वरिष्ठ राजकीय विश्लेषक म्हणतात, शिवराजसिंह चौहान यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
सत्तरच्या दशकापासून अविभाजित मध्यप्रदेशात पत्रकारिता करणारे रमेश शर्मा म्हणतात की, त्यांनी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा सुवर्ण काळ आणि अधोगती पाहिली आहे.
शिवराज सिंह यांच्यासाठी दोन शक्यता
दोन शक्यतांवर चर्चा करताना रमेश शर्मा म्हणतात की, एक म्हणजे शिवराज सिंह चौहान यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कारण तीन ते चार केंद्रीय मंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला आहे.
त्यामध्ये मध्यप्रदेशचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आहेत. त्यांना आता विधानसभा अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असला तरी शिवराज सिंह यांना हे मंत्रिपद देऊन केंद्रीय राजकारणात आणण्याची शक्यता आहे.
शर्मा यांच्या मते, "कैलाश विजयवर्गीय सारखे काही मोठे नेते ही शक्यता नाकारू शकतात. परंतु भारतीय जनता पक्षाने छत्तीसगड आणि राजस्थान मधील आपल्या जाहीरनाम्यात मध्यप्रदेश सारख्या योजनांचा समावेश केला आहे."
जसं की छत्तीसगडमधील 'महतारी वंदना योजना' आणि राजस्थान मधील 'माता वंदना योजना'.
"शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात या योजना सुरू केल्यानंतर या योजना जाहीरनाम्यात आल्या."
ते म्हणतात की, "लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये जागा जिंकण्यासाठी लोकांमध्ये अशाच योजना घेऊन जाणं महत्त्वाचं आहे."
'उमा भारतींपेक्षा वेगळं व्यक्तिमत्व'
शिवराज सिंह यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेतील विधानाचा एक छोटासा भागच मीडियात व्हायरल झाला होता. मात्र यात त्यांनी बरंच काही सांगितल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे, "मी आज स्पष्ट करतोय की भारतीय जनता पक्षाने 18 वर्षं एका सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्रिपदावर बसवलं. पक्षाने सर्व काही दिलं. आता पक्षाला माझ्याकडून काहीतरी परत द्यायची वेळ आली आहे."
रमेश शर्मा म्हणतात की, नंतरच्या काळात पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत बहुतेक उमेदवारांची नावं शिवराज सिंह चौहान यांनी ठरवली होती.
त्यामुळे शिवराज सिंह यापुढेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. आणि उमा भारती यांच्यावर जशी परिस्थिती ओढावली तशी परिस्थिती चौहान यांच्यावर ओढवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वरिष्ठ पत्रकार रवी दुबे म्हणतात की, उमा भारतींची चूक ही होती की त्यांनी स्वतःला संघटनेपेक्षा श्रेष्ठ असल्याचं दाखवून दिलं आणि आपली बंडखोर वृत्ती कायम ठेवली.
त्यांनी 'भारतीय जनशक्ती पार्टी' हा वेगळा पक्ष स्थापन केला होता, पण त्यांना भाजपमध्येच परत यावं लागलं.
दुबे यांच्या म्हणण्यानुसार, "शिवराज सिंह चौहान यांचं व्यक्तिमत्त्व अगदी उलट आहे. ते स्वतःला एक नम्र व्यक्तिमत्व असलेला नेता म्हणून दाखवतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आहे
त्यामुळे त्यांना बाजूला सारण्याऐवजी पक्षाने त्यांची उपयुक्तता कायम ठेवली आहे."
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)