पायावर पाय ठेवून बसणं आरोग्यासाठी धोकादायक आहे का?

    • Author, क्लॉडिया हॅमंड
    • Role, बीबीसी फ्यूचर

तुम्ही खुर्चीवर कसे बसता? अनेकांना आपला एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बसण्याची सवय असते. कदाचित तुम्हीही कधी-कधी अशा पद्धतीने बसत असाल.

पण आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारे खुर्चीवर बसणं चांगलं नाही, असं मानलं जातं.

एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बराच काळ बसून राहिल्यास विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असंही म्हटलं जातं.

यामध्ये रक्तदाब वाढणे, व्हेरिकोज व्हेन्स (रक्तवाहिन्यांवरील दबाव वाढून त्यांना दुखापत होणे) अशा प्रकारच्या समस्यांचा उल्लेख केला जातो.

अमेरिकेत डाएट सप्लिमेंट बनवणाऱ्या एका कंपनीने तर 1999 मध्ये एक मोहीमच चालवली होती.

यामध्ये त्यांनी लोकांना पायावर पाय ठेवून बसण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.

पण खरंच पायावर पाय ठेवून बसणं आरोग्याला धोकादायक आहे का? यामुळे आरोग्याला नेमक्या कोणत्या समस्यांना तोंड फुटू शकतं?

एका पायावर दुसरा पाय ठेवून बराच काळ बसल्यास पाय सुन्न पडतो (मुंग्या येणे) हे आपल्याला माहीत आहे.

असं होण्यामागचं कारण म्हणजे, अशा पद्धतीने बसल्यामुळे गुडघ्याच्या मागील बाजूच्या रक्तवाहिनीवर दबाव वाढतो. त्यामुळे पायाच्या खालील भागाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

सर्वसाधारणपणे, असं बसण्याची सवय तुम्हाला लागली तर 'फुट ड्रॉप'सारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असं काही जण मानतात.

फुट ड्रॉप म्हणजे तुम्ही तुमच्या पायाच्या समोरील भाग आणि अंगठ्याची हालचाल करू शकत नाही.

दक्षिण कोरियामध्ये यासंदर्भात एक संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये फुट ड्रॉपची समस्या पायावर पाय ठेवून बसल्यामुळे होत नाही, असा निष्कर्ष मांडण्यात आला होता.

कारण, असं बसल्याने काही त्रास होत असल्यास आपण लगेच ती स्थिती बदलून आरामदायक पद्धतीने बसतो, असा तर्क त्यामागे मांडण्यात आला.

आता राहिला प्रश्न ब्लड प्रेशर वाढण्याचा. 2010 पर्यंत झालेल्या 7 वैद्यकीय संशोधनांमध्ये समोर आलं की अशा प्रकारे बसल्याने ब्लड प्रेशर वाढतं. पण त्याचवेळी तसं होत नाही, असं सांगणारंही एक संशोधन आहे, हे विशेष.

या सर्व अभ्यासांमध्ये ब्लड प्रेशर एकदाच नोंदवण्यात आलं होतं. इस्तांबूलच्या एका प्रयोगशाळेत याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात आला होता.

या अभ्यासामध्ये तज्ज्ञांनी अनेकवेळा प्रयोग केल्यानंतर निष्कर्ष काढला की पायावर पाय ठेवून बसल्याने ब्लड प्रेशर वाढतो.

आधीपासूनच ब्लड प्रेशर जास्त असलेल्या व्यक्तीबाबत ही समस्या होणं स्वाभाविक आहे.

दुसऱ्या एका अभ्यासानुसार, पायाच्या मांसपेशी दबल्या गेल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहात बाधा निर्माण होते. सांधे न हलवल्यामुळे दबाव वाढीस लागतो.

या दोन्ही संशोधनांपैकी कोणत्या संशोधनात तथ्य आहे, हे जाणून घेण्यासाठी नेदरलँड्समध्ये काही मानसिक प्रयोग करण्यात आले.

या प्रयोगांमध्ये नोंदवण्यात आलं की हृदयाची क्रिया कमी असेल आणि पायावर पाय ठेवून बसलेले असल्यास रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होत नाही.

पण हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचं प्रमाण मात्र यावेळी वाढतं. त्यामुळेच रक्तदाब वाढतो.

अशा स्थितीत पायावर पाय चढवून बसल्यामुळे ब्लड प्रेशर वाढत असला तरी त्याचे दीर्घकालीन नुकसान नसतात.

केवळ तीन मिनिटांत रक्तदाब पुन्हा सामान्य होऊन जातो. मात्र, ज्या लोकांमध्ये आधीपासूनच रक्तदाबाची समस्या आहे, त्यांना रक्तदाब वाढण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं.

मात्र, पायावर पाय ठेवून तीन तासांपेक्षा जास्त वेळ कधीच बसू नये. असं केल्यास रक्त गोठण्याचा धोका निर्माण होतो.

आता पाहूया की पायावर पाय ठेवून बसल्याने रक्तवाहिन्यांना दुखापत होण्याचा धोका किती वाढतो?

आता हे सुद्धा व्यक्तिनुसार बदलू शकतं. याबाबतचं गूढ कायम आहे.

पण रक्तवाहिन्यांचं नुकसान होणं हे पायावर पाय चढवून बसण्यापेक्षाही गुणसूत्रीय कारणांवर जास्त अवलंबून असतं, हेसुद्धा समोर आलं आहे.

म्हणजे, पायावर पाय ठेवून बसल्याने रक्तवाहिन्या, रक्तदाब यांच्यावर दीर्घकालीन कोणतेही परिणाम होत नाहीत. तर मग यामुळे शरीराच्या सांध्यांवर काही परिणाम दिसू शकतो का?

एका अभ्यासानुसार, 3 तासांपेक्षा जास्त वेळ अशा प्रकारे बसलेल्या व्यक्तींमध्ये पुढे वाकून चालण्याची शक्यता वाढते.

अर्थात, अशी शक्यताही वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रमाणात असू शकते. कारण प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही वेगळी असते.

वाकून चालणं योग्य नसल्याचं लोक मानतात. पण रोटरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये एक संशोधन झालं होतं. त्यामध्ये वाकून चालण्याचे काही फायदे असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

नुकतेच एका संशोधनात समोर आलं होतं की पायावर पाय चढवून बसल्याने काही व्यक्तींना सांधेदुखीपासून काही काळ आराम मिळतो.

पायावर पाय ठेवण्याबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे.

यानुसार, डावा पाय उजव्या पायावर ठेवून बसणाऱ्यांपेक्षा उजवा पाय हा डाव्या पायावर ठेवून बसणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट आहे.

गुडघ्यावर गुडघा ठेवून बसल्याने पार्श्वभागातील मांसपेशींमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. पण अशा प्रकारे बसून पुन्हा उभे राहिल्यास 21 टक्क्यांनी ही वाढ पाहायला मिळते.

शिवाय, अशा प्रकारे बसल्याने पेल्व्हिक जॉईंट्समध्ये (मणक्याच्या खालील भागातील सांधे) स्थैर्य वाढतं, असं हा प्रयोग करणाऱ्या संशोधकांनी म्हटलेलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)