एकनाथ शिंदेंची आज नवा दिवस नवी जाहिरात, कोण देतंय या जाहिराती?

नवीन जाहिराती

फोटो स्रोत, Google

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने सुरू झालेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक आज (14 जून) ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीच्या रुपाने पाहायला मिळाला.

13 जूनच्या सकाळी मराठी वर्तमानपत्रं घरोघरी पोहोचली, ती एका नाट्याची नांदी घेऊनच. या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पानभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जाहिरात दिली होती. या जाहिरातीचा मथळा होता – ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’

भाजप कार्यकर्त्यांकडून गेल्या काही वर्षात ‘केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा दिली गेली आहे. मात्र, जेव्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ही नव्या घोषणेसह दिलेली जाहिरात पाहिल्यानंतर मात्र अनेक तर्क वितर्क सुरू झाले. राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागल्या.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी या जाहिरातीवर बोलताना म्हटलं की, आजच्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी (शिंदे गट) काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी.

“वर्तमानपत्रात जी जाहिरात छापून आली आहे, त्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाशी (शिंदे गट) कसलाही संबंध नाही. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या हितचिंतकांनी कदाचित ही जाहिरात दिली असेल. पण एक गोष्ट समाधानकारक आहे की, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना-भाजपाचेच नेते आहेत,” असं शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

काल (13 जून) घेतलेल्या या यू टर्ननंतर आज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर बदललेली जाहिरातच पाहायला मिळाली.

नवीन जाहिरातीतही ‘जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच’ असं म्हटलंय. पण यावेळी जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र फोटो आहे, जो पहिल्या जाहिरातीत नव्हता. जुन्या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच फोटो होता. शिवसेनेची जाहिरात असूनही त्यात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नव्हता.

13 जूनच्या जाहिरातीत काय मजकूर होता?

मोदी-शिंदे

फोटो स्रोत, Twitter

  • एका सर्वेक्षणाचा हवाला देत, या जाहिरातून दावा करण्यात आला होता की, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी 26.1 टक्के, तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदासाठी 23.2 टक्के पसंती आहे.
  • महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी उत्सुक आहे.
  • महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला एकनाथ शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पाहायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती आहे.
  • महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेनं पुन्हा या जोडीला पसंती दर्शवली आहे.

महत्त्वाचं म्हणजे या जुन्या जाहिरातीत सर्वेक्षण कोणी केलं हा स्रोत ठळकपणे सांगितला नव्हता.

नवीन जाहिरातीत काय बदल केले आहेत?

  • जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच असल्याचं म्हटलं आहे.
  • देशाला विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला 84 टक्के नागरिकांची पसंती
  • 49.3 टक्के लोकांची पसंती ही शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाला आहे. प्रमुख विरोधकांना 26.8 टक्के आणि इतरांना 23.9 टक्के लोकांची पसंती आहे.
  • डबल इंजिन सरकारमुळेच राज्याला विकासाला गती येत असल्याचं 62 टक्के नागरिकांचं मत
  • 46.4 नागरिकांची भाजप-शिवसेनेला पसंती

या जाहिरातीमध्ये सर्वेक्षणाचा स्रोत नमूद केला आहे. Zee Tv-Matrize यांनी हे सर्वेक्षण केल्याचा उल्लेख आहे.

'या जाहिराती देणारा हितचिंतक कोण?'

सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images

'आजच्या जाहिरातीचं डिझाईन दिल्लीतून आल्याचं दिसतंय,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

या जाहिराती देणारा हितचिंतक कोण आहे, असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीसुद्धा आजच्या जाहिरातीवर टीका केली आहे.

'जो बुंदसे गयी, वो हौदसे नही आती,' अशी टीका त्यांनी केलीय.

तसंच या जाहिरातींवरून स्पष्ट होतंय की सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, असंसुद्धा राऊत यांनी म्हटलंय.

'यांच्या जाहिरातीच पाहात बसायचं का?'

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या जाहिरातीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे कार्यक्रम रद्द दिले. सायनसचा त्रास होत असल्याने हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं.

पण अनेकांनी हे आजारपण ‘राजकीय’ नाही ना असा प्रश्न उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी या जाहिरात प्रकरणावर ट्वीट करून म्हटलं की, इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो!

जाहिरात

फोटो स्रोत, twitter

“सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का?”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)