तीन अफगाण खेळाडूंचा हल्ल्यात मृत्यू, क्रिकेटविश्वात खळबळ; ICC ने काय म्हटलं?

अफगाणिस्तानमधील पक्तीका प्रांतातील अरघुन जिल्ह्यात झालेल्या एका हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन तरुण क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे.

या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं पुढील महिन्यापासून होणाऱ्या तीन देशांच्या टी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

ही मालिका पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये खेळली जाणार होती. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं या मालिकेत अफगाणिस्तानऐवजी झिम्बाब्वेचा समावेश झाल्याचं जाहीर केलं आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं (एसीबी) या हल्ल्याला 'भ्याड हल्ला' म्हटलं आहे. तसंच या हल्ल्यात कबीर आगा, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

पाकिस्तानचं म्हणणं आहे की, सुरक्षा दलांनी अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर आणि दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यातील सीमेलगतच्या प्रदेशात 'दहशतवादी छावण्यां'ना लक्ष्य केलं आहे.

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तारड यांनी एक्स या सोशल मीडियावरील एका वक्तव्यात म्हटलं आहे की सीमेवर हाफिज गुल बहादूर या 'दहशतवादी' गटाच्या तळांवर हल्ला करण्यात आला आहे.

अफगाण तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं की संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब यांच्या नेतृत्वाखाली एक अफगाण शिष्टमंडळ दोहा येथील चर्चेत सहभागी होण्यासाठी कतारला गेलं आहे.

एक्सवर केलेल्या वक्तव्यात मुजाहिद यांनी आरोप केला की 'शुक्रवारी (17 ऑक्टोबर) रात्री पाकिस्तानच्या सैन्यानं पक्तीका प्रांतातील रहिवासी भागात हवाई हल्ले केले. यात अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आणि काहीजण जखमी झाले.'

मुजाहिद म्हणाले की अफगाणिस्तानचं सरकार अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध करतं आणि या कारवायांना उत्तर देण्याचा अधिकार बाळगतं.

ICC, BCCI आणि जय शाह काय म्हणाले?

अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर आयसीसी, बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं वक्तव्यं जारी केलं आहे.

आयसीसीनं त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे की, तीन तरुण क्रिकेटपटूंच्या मृत्यूमुळे ते अत्यंत दु:खी आहेत.

या वक्तव्यात म्हटलं आहे, "तीन तरुण खेळाडू फ्रेंडली क्रिकेट सामना खेळून घरी परतत असताना एका हल्ल्यात मारले गेले. आयसीसी या हिंसाचाराचा निषेध करतं. आयसीसी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबर उभं आहे आणि या दु:खात त्यांच्याबरोबर सामील आहे."

आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

त्यांनी लिहिलं आहे, "कबीर आगा, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन तरुण अफगाण क्रिकेटपटूंच्या निधनाचं मला दु:ख वाटतं. निरर्थक हिंसाचारामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे."

तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) देखील त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे की, ते अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड, क्रिकेट समुदाय आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी उभं आहे.

यात लिहिलं आहे, "निर्दोष लोकांचा, विशेषकरून गुणी खेळाडूंचा मृत्यू होणं ही खूप दु:खद आणि चिंतेची बाब आहे. बीसीसीआय अफगाणिस्तानमधील लोकांबद्दल संवेदना व्यक्त करतं आणि त्यांच्या दु:खात आणि हानीमध्ये सहभागी आहे."

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं (एसीबी) आयसीसीचं वक्तव्यं जारी करून त्यांचे आभार मानले आहेत.

एसीबीनं एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, "अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा या हिंसक कृतीचा तीव्र निषेध करतं. आयसीसीनं दाखवलेल्या एकजुटीचं कौतुक करताना, एसीबी या अमानवी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या लोकांच्या विरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई करण्याची मागणी करतं."

एसीबी काय म्हणालं?

याआधी एसीबीनं या हल्ल्यानंतर तीन देशांमध्ये होत असलेल्या टी-20 मालिकेत खेळणार नसल्याचं सांगितलं होतं.

एसीबीनं म्हटलं होतं, "खेळाडूंचा सन्मान आणि या दु:खद घटनेविरोधातील प्रतिक्रिया म्हणून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानबरोबर होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे."

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये 17 ते 29 नोव्हेंबर दरम्यान लाहोर आणि रावळपिंडीमध्ये ही मालिका खेळली जाणार होती.

बोर्डाचं म्हणणं आहे की मृत खेळाडू एका फ्रेंडली क्रिकेट सामन्यात भाग घेण्यासाठी पक्तीका प्रांताची राजधानी असलेल्या शारना इथं गेले होते. तिथून अरघुनला परतल्यावर एका सभेत त्यांना लक्ष्य करण्यात आलं.

बोर्डानं ही अफगाणिस्तानील खेळ, खेळाडू आणि क्रिकेट यांची मोठी हानी असल्याचं म्हटलं आहे.

घटनेचा सर्वत्र निषेध

आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट्स फाऊंडेशननं पाकिस्तानच्या सैन्यानं स्थानिक अफगाण क्रिकेट टीमवर केलेल्या बॉम्बहल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

फाऊंडेशननं म्हटलं आहे की सर्वसामान्य लोकांना लक्ष्य करणं, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार चार्टरचं उल्लंघन आहे.

फाऊंडेशननं सर्व आंतरराष्ट्रीय संघटना आणि मानवाधिकाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना आवाहन केलं आहे की त्यांनी लवकरच या घटनेचा तपास करावा आणि अफगाण नागरिकांच्या विरोधातील हिंसाचाराच्या पॅटर्नची तपासणी करावी.

याव्यतिरिक्त, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खाननं ही एक दु:खद घटना असल्याचं म्हटलं आहे. त्यानं पुढे म्हटलं आहे की पाकिस्तानबरोबर होणाऱ्या तिरंगी क्रिकेट मालिकेत न खेळण्याच्या एसीबीच्या निर्णयाचं तो समर्थन करतो.

तो म्हणाला, "नागरिकांना लक्ष्य करणं पूर्णपणे अनैतिक आणि अमानवीय आहे. याप्रकारच्या बेकायदेशीर आणि अन्यायी कारवाया म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे."

मोहम्मद नबीनं हा क्रूर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की ही घटना फक्त पक्तीकासाठीच नाही, तर संपूर्ण क्रिकेट जगत आणि अफगाणिस्तानसाठी खूपच दु:खाची बाब आहे.

गुलबदीन नायबनं हा हल्ला म्हणजे 'पाकिस्तानच्या सैन्याची क्रूर कारवाई' असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "हा आमच्या लोकांवर, सन्मानावर आणि स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. मात्र यामुळे अफगाणिस्तानचा निर्धार कधीच कमी होणार नाही."

बीबीसीनुसार, मोहम्मद नबी म्हणाला, "ही घटना फक्त पक्तीकासाठीच नाही, तर संपूर्ण क्रिकेट परिवार आणि अफगाणिस्तानसाठी खूपच दु:खाची बाब आहे. आम्ही त्यांचं बलिदान कधीच विसरणार नाही."

तर हशमतुल्लाह शाहिदी म्हणाला, "हे खेळाडू, शांतता, सन्मान आणि देशाचे प्रतिनिधी होते."

घटनेबद्दल आणखी काय माहिती समोर आली आहे?

अफगाणिस्तान तालिबाननं या हल्ल्याला 'गुन्हेगारी' कारवाई म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की या कारवाईला प्रत्युत्तर दिलं जाईल. त्याचबरोबर ते म्हणाले की जोपर्यंत दोघांमध्ये चर्चेतून काही तोडगा निघत नाही, तोपर्यंत सैन्यानं कोणत्याही प्रकारची कारवाई टाळली पाहिजे.

बीबीसीनुसार, पक्तीका हल्ल्यामध्ये मारले गेलेल्यांच्या संख्येबद्दल अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.

तालिबान सरकारच्या एका प्रांतीय अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की शुक्रवारी (17 ऑक्टोबर) संध्याकाळी "पक्तीकामधील खानदार गावातील एक व्यक्तीच्या घरावर बॉम्बहल्ला झाला, त्यात अनेकजण मारले गेले."

बीबीसीनुसार, स्थानिक लोकांनी सांगितलं की हवाई हल्ला झाला त्यावेळेस तिथे क्रिकेटचा सामना सुरू होता. काही तरुण रात्रीच्या भोजनासाठी एका घरी एकत्र जमले होते.

हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या लोकांचं म्हणणं आहे की हल्ल्यानंतर या भागात अनेकजण गोळा झाले. त्यानंतर दुसरा हल्ला करण्यात आला. त्यामुळे अनेकजण मारले गेले आणि जखमी झाले.

शस्त्रसंधीवर चर्चा सुरू

गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अनेक चकमकी झाल्यानंतर दोन्ही देश 48 तासांच्या शस्त्रसंधीसाठी तयार झाले होते.

दोन्ही देशांमध्ये कतारच्या मध्यस्थीनं दोहा इथं चर्चा सुरू आहे. शुक्रवारी (17 ऑक्टोबर) दोन्ही देश 48 तासांचा शस्त्रसंधी पुढे नेण्यास तयार झाले होते.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, दोन्ही देशांमध्ये दोहा इथं सुरू असलेली चर्चेतून तोडगा न निघाल्यामुळे शस्त्रसंधी पुढे सुरू ठेवण्याचं ठरलं होतं.

अफगाणिस्तानच्या सीमेजवळच्या पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान जिल्ह्यामध्ये एका आत्मघातकी हल्ल्यामध्ये सात पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांनी दोन्ही देश शस्त्रसंधीचा कालावधी वाढवण्यास तयार झाले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या वक्तव्यानुसार, या हल्ल्यामध्ये सहा बंडखोर मारले गेले आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, शस्त्रसंधी पुढे वाढवण्याच्या बातमीनंतर काही वेळानं पक्तीका प्रांताचे पोलीस प्रवक्ते मोहम्मद इस्माइल माविया म्हणाले की पाकिस्ताननं अरघुन आणि बरमलमध्ये हवाई हल्ले केले आहेत.

टोलो न्यूज या अफगाणिस्तानच्या न्यूज वेबसाईटनुसार, दोहामध्ये चर्चेसाठी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि गुप्तहेर प्रमुख आसिम मलिक सहभागी झाले आहेत.

तर अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की त्यांच्याकडून शिष्टमंडळाचं नेतृत्व संरक्षण मंत्री मुल्ला मोहम्मद याकूब मुजाहिद करत आहेत.

यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवणं त्यांच्यासाठी सोपं आहे. ट्रम्प म्हणाले की त्यांनी आठ युद्ध थांबवली आहेत.

ट्रम्प म्हणाले, "मला वाटतं की पाकिस्ताननं हल्ला आहे किंवा अफगाणिस्तानवर हल्ला होतो आहे. हा संघर्ष थांबवणं हे माझ्यासाठी सोपं आहे."

ते म्हणाले, "यादरम्यान मला अमेरिकादेखील सांभाळायची आहे. मात्र युद्ध थांबवायला मला आवडतं. माहित आहे का? लोक मारले जाण्यापासून वाचवणं मला आवडतं आणि मी लाखो-कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले आहेत."

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेवरील तणाव खूप वाढला आहे.

शुक्रवारी (17 ऑक्टोबर) पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ असंही म्हणाले की पाकिस्तान अफगाणिस्तानबरोबर आधीसारखे संबंध ठेवू शकत नाही.

ते म्हणाले की अफगाणिस्ताननं त्यांच्या देशातील दहशतवादावर लगाम घातली पाहिजे. नाहीतर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल.

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं जेव्हा दावा केला की पाकिस्ताननं त्यांच्या हवाई हद्दीचं उल्लंघन केलं आहे आणि अफगाणिस्तानच्या प्रदेशावर हवाई हल्लेदेखील केले आहेत. त्यानंतर

दोन्ही देशांमधील तणाव वाढला.

त्यानंतर शनिवारी (11 ऑक्टोबर) तालिबान सरकारच्या संरक्षण खात्यानं अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करण्याच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ले सुरू केले होते.

या हल्ल्यांना उत्तर देताना पाकिस्तानच्या सैन्यानं अफगाणिस्तानमधील तालिबानच्या चौक्यांवर हल्ला केला होता.

जय शाह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानची तीव्र प्रतिक्रिया

अफगाणिस्तानात झालेल्या तीन अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूबद्दल आयसीसीनं दिलेल्या वक्तव्यावर पाकिस्ताननं तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तारड म्हणाले की आयसीसी आणि त्याचे चेअरमन जय शाह यांचं वक्तव्यं म्हणजे पाकिस्तान क्रिकेटची हानी करण्याचा प्रयत्न आहे.

अताउल्लाह तारड यांनी जय शाह यांचं वक्तव्यं म्हणजे गेल्या महिन्यात आशिया कपमध्ये झालेल्या 'नो हँडशेक' वादाचाच पुढचा भाग असल्याचं म्हटलं आहे.

'आयसीसीनं कोणताही पुरावा दिला नाही'

पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तारड यांनी आयसीसी आणि जय शाह यांची वक्तव्यं फेटाळत हा 'अपुरी माहिती' पसरवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

तारड यांनी एक्सवरील वक्तव्यात म्हटलं आहे की पाकिस्तान स्वत: सीमेवरील दहशतवादाचा सर्वात मोठा बळी आहे.

त्यांनी लिहिलं आहे, "ज्या वक्तव्यात तीन 'अफगाण क्रिकेटपटू' एका 'हवाई हल्ल्या'त मारले गेल्याचा वादग्रस्त आरोप मान्य करण्यात आला होता, असं आयसीसीनं पक्षपातीपणे आणि घाईघाईनं दिलेलं वक्तव्यं पाकिस्तान फेटाळतो. आयसीसीनं या दाव्यांच्या पुष्टीसाठी कोणताही स्वतंत्र स्त्रोत किंवा विश्वासार्ह पुरावा दिलेला नाही."

तारड यांचं म्हणणं आहे की, आयसीसीप्रमाणेच जय शाह यांनीदेखील हाच दावा केला आहे.

अताउल्लाह तारड म्हणाले की, "हा आरोप एका अशा मालिकेचा भाग आहे, ज्याच्याद्वारे आयसीसीचं नेतृत्व आणि जय शाह पाकिस्तानच्या क्रिकेटचं नुकसान करू पाहत आहेत."

त्यांच्या मते अलीकडेच आशिया कपमध्ये झालेल्या 'नो हँडशेक वादा'द्वारे देखील पाकिस्तानच्या क्रिकेटवर परिणाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)