You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोकणात खरंच लग्नांमध्ये हुंडा देत-घेत नाहीत? - ब्लॉग
- Author, डॉ. मुकुंद कुळे
- Role, लेखक आणि पत्रकार
भारतीय परंपरेतील सोळा संस्कारांत 'विवाह संस्कार' अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर विवाहसंस्कारात जे वेगवेगळे विधी आहेत त्यात 'कन्यादान' विधीला विशेष महत्त्व आहे.
कारण या विधीच्या अंतर्गतच पिता आपल्या कन्येचा हात वराच्या हाती देऊन एकप्रकारे तिच्यावरील आपल्या 'हक्का'वर पाणी सोडतो.
आपली कन्या ते वराला 'दान' करतात. जणू काही कन्या ही एक वस्तू असावी.
मात्र, कन्यादान विधीतला 'दाना'चा हा व्यवहार एवढ्यापुरताच सीमित नसतो. कन्यादानाच्या या विधीत वधूपित्याने आपल्या इच्छेप्रमाणे वराला काही वस्तू भेट द्याव्यात, असा स्पष्ट उल्लेख कन्यादान विधीच्या वेळी केल्या जाणाऱ्या मंत्रात येतो आणि अशा तब्बल 19 वस्तूंची यादीच देण्यात आलेली आहे.
या वस्तू म्हणजे- गाय, भूमी, दासी, शय्या, अंगठी, कुंडलं, घोडा, रौप्यपात्र, हत्ती, घर, महिषी, तांब्याचं भांडं, काशाचं भाडं, चांदी, सुवर्णपात्र, पानदान, सुवर्णकंकण, पुस्तक आणि बैल.
पण या वस्तू वधूपित्याने वराला का द्यायच्या?
तर मुलीच्या सर्वांगीण सुखासाठी!
असं 'आश्वलायन गृह्यसूत्र' या मानवी जीवनातील सोळा संस्कारांची माहिती देणाऱ्या प्राचीन भारतीय धार्मिक ग्रंथात स्पष्टपणे म्हटलेलं आहे.
म्हणजेच भारतातील हुंडापद्धतीचं मूळ 'आश्वलायन गृह्यसूत्र' या धर्मग्रंथात आहे, असं म्हणायला हरकत नाही.
आजवर वधूपिता आपल्या (खरंतर वर आणि वरमंडळींच्या) इच्छेखातर वराला जे-जे देत आलाय त्याला हुंडा म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही.
अगदी नुकत्याच घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातही हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या आईवडिलांकडून सोनं-चांदी-गाडी जे-जे काही घेतलं होतं ते सारंच या 'आश्वलायन गृह्यसूत्रा'तल्या यादीशी जुळणारंच आहे.
मात्र, बापाने एवढं सारं देऊनही सासरचे मुलीला नीट नांदवतील की नाही याची खात्री देता येत नाही, ही खरी शोकांतिका आहे!
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार (नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरो) 2022 मध्ये भारतात हुंडाबळीच्या तब्बल 6,450 घटना घडलेल्या दिसतात.
महत्त्वाचं म्हणजे याच काळात महिलांवरील अत्याचाराच्या सुमारे 4 लाख 45 हजार 256 गुन्ह्यांची नोंद झाली.
पैकी सुशिक्षित-सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातला महिलांवरील अत्याचाराचा हा आकडा 45 हजार 331 आहे.
याचा अर्थ एवढाच होतो की, कायद्याने कितीही बंदी घातलेली असली, तरी प्राचीन काळापासून सुरू असलेली हुंडापद्धत आजही राजरोसपणे सुरू आहे.
महिलांवरील अत्याचाराची नोंद, तर दर तासाला एक अशी होत आहे.
हुंडा काय किंवा महिलांवरील एकूण अत्याचार काय, हे आता समाजाने जणू स्वीकारल्यातच जमा आहेत.
वैष्णवी हगवणेसारख्या प्रकरणाने कधीमधी उगा शांत तळ्यात असंतोषाच्या लाटा फुटतात एवढंच.
काही दिवसांनी पुन्हा 'जैसे थे', आणखी एखाद्या वैष्णवीचा हुंडाबळी जात नाही आणि त्याचा गाजावाजा होत नाही तोपर्यंत!
मात्र, यावेळी वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणाची कधी नव्हे एवढी चर्चा झाली. हे प्रकरण राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्यामुळेही असेल कदाचित. पण यावेळी वेगवेगळ्या अंगाने, म्हणजे सामाजिक-सांस्कृतिक अंगानेही हुंडा पद्धतीची चर्चा झाली.
या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे- कोकणात हुंडापद्धत नाही!
एका परीने हे खरंच आहे की, कोकणात हुंडापद्धत नाही. उर्वरित महाराष्ट्रात लग्नात जो अवाढव्य खर्च केला जातो आणि जो प्रामुख्याने वधूपक्षाच्या माथी मारला जातो, ती पद्धत कोकणात नाही.
एवढंच कशाला, उर्वरित महाराष्ट्रात लग्नात हमखास जे मानापमानाचं नाट्य रंगतं, तेही कोकणात रंगत नाही.
उलट शेजार-पाजारच्या आणि नातेवाईक महिला वधू-वराच्या आईची लग्नकार्याच्या निमित्ताने खणा-नारळाने ओटी भरतात.
त्याचसोबत वधू-वराकडचे आपापल्या जवळच्या नातेवाईक महिलांना साड्या नेसवतात, हाही एक अगदी घरगुती सोहळा असतो.
दोन्ही पक्षांकडे अशा वीस-पंचवीस साड्या आग्रहाने नेसवल्या जातात. अर्थात, या साड्या काही खूप महागड्या नसतात. जेमतेम 300 ते 500 रुपयांच्या घरात. अगदी तालेवार घराणं असेल तर 700 ते 1000 रुपयांच्या साड्या. त्यातही कोण किती जवळचं, यावर किती महागाची साडी घ्यायची, ते अवलंबून असतं.
मात्र, लग्नात नेसवल्या जाणाऱ्या या साड्यांची खरेदी म्हणजे कोकणवासीयांसाठी अमाप उत्साहाचा क्षण असतो.
नवरी मुलगी, वरमाय-वधूमाय आणि इतरांसाठीच्या या साडीखेरेदीला 'बस्ता बांधणं' असं म्हणतात.
असा बस्ता बांधायला अख्खं कुटुंब किंवा कधीकधी सोबतीला गावातली जाणती माणसंही घेतली जातात. चांगले पाच-सहा तास खर्ची घातल्याशिवाय हा बस्ता बांधला जात नाही.
जे कपड्यांचं तेच दागदागिन्यांचं.
अगदी 20 वर्षांपूर्वीपर्यंत नवरामुलगा मुलीला लग्नात फक्त मणी-मंगळसूत्र आणि जेमतेम अंगठी-कुड्या करत असे.
तर मुलीकडचे वराला जमलं तर अंगठी करत, अन्यथा तीही नसे. आग्रह किंवा सक्ती कशाचीच नसे. एकमेकांची परिस्थिती पाहून जो-तो ज्याला जमेल तसं करत असे.
प्रत्यक्ष लग्नाचा खर्चही बेतास बातच असे. म्हणजे लग्नासाठी मुलीच्या गावी वऱ्हाड आलं की त्यांचं जेवण-खाणं करणं, एवढाच काय तो खर्च असे.
त्यातही भातासाठी लागणारा तांदूळ घरातच पिकवला जायचा आणि जेवणाची ऑर्डर म्हणजे, गावातले महिला-पुरुष मिळूनच लग्नाचं जेवण शिजवत असत.
म्हणजे पूर्वी आणि अगदी आजही कोकणातली लग्न म्हणजे केवळ एका घरातलं लग्न नसतं, तर ते गावाचंच लग्न असतं.
कोकणातल्या कोणत्याही लग्नासाठी भावकी आणि गावकी सारखीच खपत असते. आता कोकणातले चाकरमानी बायका-मुलांसहित मुंबईला स्थायिक झाल्यामुळे त्यांची लग्नकार्य इतरांसारखीच मुंबईला हॉलमध्ये पार पडत असली, तरी मुळातला समंजसपणा कोकणी माणसाने अद्याप सोडलेला नाही.
मुंबईकडे लग्न लागली, तरी मग होणारा खर्च दोन्ही पक्ष आपापसात वाटून घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणी माणूस आजही हुंडा घेत नाही. कारण कोकणी माणूस अंथरुण बघून हातपाय पसरणारा आहे.
आता कुणी म्हणेल मग अंथरुण मोठं का करू नये? तर अंथरुण मोठं करायला हरकत नाही, पण आपलं अंथरुण मोठं करताना आपण दुसऱ्याचं अंथरुण तर काढून घेत नाही ना, असाही विचार कोकणी माणूस करतो.
अर्थात, कोकणी माणूस म्हणजे सद्गुणाचा पुतळा नव्हे. अर्ध्या फुटाच्या जमिनीच्या बांधावरून-कुंपणीवरून वाद उकरून काढून त्यापायी आयुष्यभर कोर्टकचेऱ्या करण्यात कोकणी माणसाचा हात कुणी धरणार नाही.
जमिनीच्या छोट्या तुकड्यासाठी तो अगदी सख्ख्या भावालाही सोडणार नाही अन् तरीही कोकणी माणूस लग्नात हुंडा घेत नाही, हे नक्की!
मग काय आहे हे हुंडा न घेण्यामागचं गौडबंगाल?
उर्वरित महाराष्ट्रात हुंडा हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात असताना (हो हुंडा घेणं आणि देणं कायद्याने गुन्हा असला, तरी आजही हुंडा घेणं जसं प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं, तसंच ते देणंही प्रतिष्ठेचं मानलं जातं.)
कोकणी माणूस मात्र हुंडा का घेत नाही? यामागे कोकणी माणसाची सामाजिक विवेकबुद्धी आहे, वैचारिक नैतिकता आहे की सुसंस्कृत वृत्ती आहे? तर या तीन्हीपैकी काहीही नाही.
असलंच तर ते परिस्थितीतून आलेलं शहाणपण आहे. म्हणजे कोकणी माणूस मराठवाडा-विदर्भ आणि पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील (अर्थात तिथेही अपवाद आहेतच) लोकांप्रमाणे हुंडा घेत नसला, तरी त्यामागे कोणतंही वैचारिक वा सामाजिक कारण नाही.
तो हुंडा घेत नाही. शेवटी हुंडा देण्या-घेण्याची पद्धत कुठे असते? तर जिथे मुळातच समृद्धी-सधनता असते तिथे. मग कोकणात आजवर कुणी समृद्धी-सधनता पाहिलीय? समृद्धी आणि सधनता आली की माज-ऐट येते आणि त्यातून मग नकोत्या प्रवृत्तीही येतात.
गेल्या काही वर्षांत आपण 'शेतीचा मुळशी पॅटर्न' पाहिला होता, वैष्णवी हगवणेच्या निमित्ताने आपण 'हुंड्याचा मुळशी पॅटर्न'ही पाहिला. ही मिजास-धमक पैशातून आणि जमिनीच्या ताब्यातून येते. साधा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घेण्याची धमक कोकणी माणसात नाहीय, कारण त्याच्याकडे ना पैसा आहे ना जमिनी.
खरंतर कोकणी माणसाकडे काहीही नाही आणि म्हणूनच तो हुंडा घेत नाही. तेव्हा कोकणी माणूस हुंडा का घेत नाही, याची कारणं शोधायची झाली तर त्यासाठी कोकणाचं सामाजिक-सांस्कृतिक उत्खनन करावं लागेल आणि मग त्यासाठी अगदी कोकणाच्या निर्मितीच्या तळाशी जावं लागेल.
अल्प भूधारक कोकणी माणूस
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी बघितल्यावर लक्षात येतं की, कोकणातली जमीन म्हणजे समुद्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा यांच्यामधील निमुळती जागा आहे. ही भूमी अथांग समुद्र आणि सह्याद्रीच्या घनदाट जंगलांमुळे निसर्गदृष्ट्या कितीही समृद्ध असली, तरी मुळात कसण्यासाठी जमिनीच कमी. त्यामुळे निसर्गातली समृद्धी कोकणी माणसाच्या जगण्यात आलीच नाही.
उर्वरित महाराष्ट्रात प्रत्येकाकडे कितीतरी एकर जमीन असल्यामुळे आणि या जमिनीत नगदी पिकं घेतली जात असल्यामुळे त्यांच्याकडे कायमच समृद्धी राहिली. याउलट कोकणी माणूस आधीच अल्पभूधारक. त्यात पावसाळ्यातल्या चार महिन्यांत भाताचं पीक घेतलं, तर एरव्ही आठ महिने त्यांची जमीन पडूनच असते.
महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस पडूनही केवळ ते पाणी साठवण्यासाठी कोणत्याही शासनाने कोणत्याच सोयी न केल्यामुळे पावसाचं सारं पाणी समुद्रात वाहून जातं.
परिणामी, भातशेतीनंतर कोणतंच दुबार पीक कोकणी माणसाला घेता येत नाही (आता नवनवीन प्रयोग केले जात आहेत). परिणामी जमीन आणि जमिनीत पिकवल्या जाणाऱ्या अन्न-धान्यांतून जी समृद्धी यायला हवी, ती कोकणी माणसाच्या आयुष्यात कधीच आली नाही. परिणामी नोकरीधंद्यासाठी मुंबईत स्थलांतरित होणाऱ्यात पहिला माणूस कोकणी होता.
पावसाळ्यात भाताबरोबर नाचणी, वरी असं पिकवलं की कोकणी माणसाची वर्षभराची सोय होत असे. तर अधिकच्या तेल-मसाल्याच्या खर्चासाठी मुंबईत गेलेला चाकरमानी पैसे पाठवून देत असे. नैसर्गिक परिस्थितीतून प्राप्त झालेली ही आर्थिक गोची वर्षानुवर्षांच्या सवयीतून कोकणी माणसाने स्वीकारली. परिणामी कुणाशीही सोयरिक जुळवली, तरी साऱ्यांची परिस्थिती सारखीच.
'उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीनं कुडकुडून मेलं...' अशी सारी गत. त्यामुळे हुंडा मागणार कोण आणि मागितला तरी देणार कोण?
पण यामुळे एक झालं की कोकणी माणूस कधी माजला नाही आणि त्याला संपत्तीची हावही सुटली नाही. मात्र, यामुळे आहे त्यात समाधान मानण्याची त्याची वृत्ती वाढत गेली.
खोती पद्धत आणि कोकणी माणूस
मुळातच जमिनी कमी आणि त्यात खोती पद्धत यामुळे कोकणी माणूस कधीच समृद्ध-संपन्न झाला नाही. ब्रिटिश काळात कोकणात महसूल जमा करण्याचं काम खोताचं असे. कोकणात बहुतांशी ब्राह्मण, मराठा आणि क्वचित मुस्लीम समाजातील व्यक्तींकडे खोती होती.
हे खोत म्हणजे एकप्रकारे जमिनीचे मालकच असायचे. त्यांच्याकडे काही गावांची मिळून खोती असायची. उर्वरित महाराष्ट्रात ज्याप्रमाणे देशमुख-इनामदार, त्याप्रमाणे कोकणात खोत.
हे खोत आपली शेती कुणबी व इतर समाजातील लोकांना कुळाने जमीन कसायला देत असत. मात्र कुळांनी जमीन कसायची आणि उत्पन्नातला 60-70 टक्के वाटा खोतांना-सरकारला द्यायचा अशी पद्धत होती. त्यामुळे शेतात कितीही उत्पन्न झालं, तरी प्रत्यक्ष खपणाऱ्याच्या वाट्याला काहीच येत नसे.
नाही म्हणायला कोकणी माणूस आता कोकणात फार उरलेला नाही. आधी पोटापाण्यासाठी चाकरमानी बायको-मुलांना गावीच ठेवून मुंबईत आला. नंतरच्या काळात मुंबईत जम बसल्यावर त्याने बायका-मुलांनाही गावावरून मुंबईत आणलं.
आता कोकणात उरलेली पिढी ही 50-60 आणि त्या पुढची आहे. एक मात्र आहे कोकणी माणूस आता मुंबईला स्थायिक झालेला असला, तरी सण-उत्सव-कुळाचार करायला मात्र गावी जातोच जातो. कारण गावच्या मातीवर त्याची श्रद्धा आहे.
... आणि हो आता कोकणी माणूस मुंबईत रहात असला आणि त्यांची लग्नही बहुंतांशी मुंबईत होत असली, तरी हुंडा मात्र कोकणी माणूस अजूनही घेत नाही. कारण जमिनीच्या मालकीतून आणि सत्तेतून आणि प्रतिष्ठेतून येणारी ऐट-गुर्मी त्याच्यात आलेली नाही.
कोकणाच्या लाल मातीतील आपली जन्मजात सहनशील आणि आटोपशीर वृत्ती तो अद्याप विसरलेला नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटा दिखाऊपणा त्याच्या स्वभावातच नाही. त्यामुळेच रोजचं जगणं असो वा लग्नसमारंभ तो सगळं काही आपल्या आटोक्यातच करतो. कर्ज काढून सण-उत्सव साजरे करणं त्याला मान्य नाही.
अगदी मुंबईतल्या चाकरमान्यांनाही आणि गावाकडे अद्याप शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनाही. म्हणून तर कोकणी माणूस लग्नात हुंडा देत-घेत नाही आणि स्वतःवर कितीही बिकट परिस्थिती ओढवली तरी आत्महत्याही करत नाही!
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आज महाराष्ट्रातला ज्वलंत प्रश्न बनला आहे आणि त्याला शासनाचं चुकीचं कृषी धोरण जबाबदार आहे.
कोकण सोडून उर्वरित महाराष्ट्रात शेती हा आता आतबट्ट्याचा व्यवहार होत चाललेला आहे. म्हणजे इतरत्र बियाण्यांपासून खतापर्यंत आणि पिकाच्या निगराणीपर्यंत होणारा शेतीचा उत्पादन खर्चच एवढा जबरदस्त असतो की त्यानंतर पिकाला मिळणाऱ्या बाजारभावातून तो खर्च वसूलच होत नाही.
हे तोट्याचं गणित वर्षानुवर्ष चालू राहतं आणि हळूहळू शेतकरी कर्जबाजारी होतो आणि मग कधी कधी नाईलाजास्तव तो आत्महत्येसारखं पाऊल उचलतो.
मात्र, कोकणात जमिनीच थोड्या आणि आकारानं लहान असल्यामुळे, तसंच नगदी पीक नसल्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला उत्पादनखर्च कमी येतो. परिणामी तो आर्थिक नुकसानीतून वाचतो. त्यामुळेच मग साहजिकच त्याच्यावर जीवावर उदार होण्याची पाळी येत नाही.
अर्थात कोकणी माणसासाठी यात सगळ्यात दिलासा देणारी बाब कोणती असेल, तर ती म्हणजे कोकणात नसलेली हुंडा पद्धत! यापुढे जाऊन सांगायचं, तर एखाद्या घरात आर्थिक परिस्थितीअभावी मुलीचं लग्न रखडलेलं असेल, तर प्रसंगी गावाने पुढाकार घेऊन त्या मुलीचं लग्न लावून दिलेलं आहे.
कोकण पैशाने श्रीमंत नाही खरं, परंतु मनाने श्रीमंत आहे.
लेखात मांडलेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)