टाईप-5 डायबिटीस काय आहे? तो कुणाला होऊ शकतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नित्या पंडियन
- Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी
फक्त लठ्ठ लोकांनाच डायबिटीस होतो आणि बारीक असणाऱ्यांना फारशी आजारपणं येत नाहीत, असं अनेकांना वाटतं.
पण कमी BMI असणाऱ्या लोकांनाही डायबिटीस म्हणजे मधुमेह होऊ शकतो आणि तो लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या टाईप-1 किंवा टाईप-2 मधुमेहांप्रमाणे नसतो, असं अलीकडेच बँकॉकमध्ये झालेल्या वर्ल्ड डायबिटीस कॉन्फरन्समध्ये तज्ज्ञांनी जाहीर केलं.
BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये फॅट म्हणजे चरबी किती प्रमाणात आहे हे मोजण्यासाठी वापरलं जाणारं सूत्रं. यामध्ये तुमचं वजन आणि उंची यांचं गुणोत्तर केलं जातं.
तुमचा BMI 25 किंवा जास्त असेल तर तुमचं वजन जास्त आहे म्हणजे ओव्हवेट आहे असं म्हटलं जातं.
जर BMI 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला ऑबेसिटी म्हणजे लठ्ठपणाचं लक्षण समजलं जातं.
नवीन प्रकारचा हा डायबिटीस विशेषतः मध्यम आणि कमी उत्पन्न गटांमधील देशांमध्ये जास्त आढळत असल्याचं डॉक्टर्सनी म्हटलंय.
अशा व्यक्ती ज्या लठ्ठ नाहीत वा ज्यांचं शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही, अशा लोकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेहाचं 'टाईप-5 डायबिटीस' असं वर्गीकरण करावं आणि त्याबद्दल अधिक संशोधन करण्यात यावं असं इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनचे अध्यक्ष प्रा.पीटर श्वार्झ यांनी जाहीर केलंय.
टाईप-5 डायबिटीस कोणाला होतो? तो कसा होतो? आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत? याचा अभ्यास करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
टाईप-5 डायबिटीस म्हणजे नेमकं काय? तो पहिल्यांदा केव्हा शोधून काढण्यात आला? आणि कोणत्या सामाजिक गटांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो? याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.
टाईप-5 डायबिटीस म्हणजे काय?
19 पेक्षा कमी बीएमआय (BMI) असलेल्या लोकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेहाला टाईप-5 डायबिटीस म्हणतात. हा डायबिटीस प्रामुख्याने स्थूल नसणाऱ्या - बारीक लोकांमध्ये आढळतो.
"टाईप-2 डायबिटीस असलेल्या स्थूल लोकांचं शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत असलं तरी इन्सुलिन रेझिस्टन्समुळे शरीर त्याला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात रहात नाही."
मात्र, टाईप-5 मधुमेह अशा बारीक लोकांना होऊ शकतो ज्यांचा BMI हा 19 पेक्षा कमी आहे आणि शरीरातलं इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाणच कमी आहे.
"पण टाईप-2 मधुमेह असणाऱ्यांसारखं त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन देण्याची गरज नसते. गोळ्यांद्वारे साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं," वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या एंडोक्रिनोलॉजी, डायबिटीस आणि मेटाबॉलिझम डिपार्टमेंटचे प्राध्यापक डॉ. फेलिक्स जेबराज यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
टाईप-5 डायबिटीस कुणाला होऊ शकतो?
कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये हा डायबिटीस होत असल्याचं आढलंय. वेल्लोर मेडिकल कॉलेजच्या संशोधनानुसार, टाईप-5 मधुमेहाची शक्यता खालील गटांमध्ये जास्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images
- बालपणी कुपोषित असणाऱ्या व्यक्ती
- गर्भावस्थेतच कमी BMI असलेले
- 30 वर्षांखालील व्यक्ती
- पुरुष
- केटोन्यूरिया किंवा केटोसिस असणाऱ्या व्यक्ती ज्यांची साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही.
- ज्यांना रोज जास्त प्रमाणात इन्सुलिनची गरज भासते
टाईप-5 डायबिटीसचा इतिहास
कमी BMI असणाऱ्या लोकांमध्ये आढळणाऱ्या डायबिटीसचा शोध ह्यू-जोन्स यांनी 1955 मध्ये लावला. जमैकामधल्या लोकांना असणारा मधुमेह हा टाईप-1 किंवा टाईप-2 प्रकारचा नसल्याचंही त्यांनी अभ्यासातून सिद्ध केलं.

फोटो स्रोत, Getty Images
कमी वा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये हा रोग आढळून आला. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, कोरिया, थायलंड यासारख्या आशिया खंडातल्या देशांचा आणि इथिओपिया, नायजेरिया आणि युगांडा या देशांचाही समावेश होता.
डायबिटीसच्या या प्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेने 1985 मध्ये मान्यता दिली.
कुपोषणाशी संबंधित डायबिटीस Malnutrition Related Diabetes Mellitus (MRDM) असं याचं वर्गीकरण करण्यात आलं.
WHO च्या यादीतून टाईप-5 डायबिटीसला का वगळलं?
1980 साली जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदा डायबिटीसचं वर्गीकरण केलं. 1985 मध्ये यामध्ये सुधारणा करून वर्गीकरण प्रसिद्ध करण्यात आलं.
1980 मध्ये तज्ज्ञांनी डायबिटीसच्या प्रकारांमध्ये Type 1 diabetes mellitus (IDDM) आणि Type 2 diabetes mellitus (NIDDM) या प्रकारांचा समावेश केला.

फोटो स्रोत, Getty Images
1985 मध्ये या यादीमध्ये पोषणाशी संबंधित Diabetes Mellitus (MRDM) चा समावेश करण्यात आला.
पण कुषोषण वा प्रथिनांच्या अभावामुळे मधुमेह होतो, हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे नसल्याने MRDM ला 1999 साली WHO ने वर्गीकरणाच्या या यादीतून वगळलं. याविषयी अधिक संशोधन करण्यात यावं, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं.
2022 मधील महत्त्वपूर्ण संशोधन
वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने याबद्दल 2022 साली संशोधन केलं. कमी वजन असणाऱ्या, कुपोषित व्यक्तींमध्ये आढळणारा मधुमेह हा Type 1 वा Type 2 डायबिटीस नसल्याचं या अभ्यासात आढळलं.
1955 मध्ये नोंदवण्यात आलेल्या कुषोषणाशी संबंधित MRDM डायबिटीसचा हा प्रकार असू शकतो, हे देखील या संशोधनातून सिद्ध झालं.
वेल्लोर कॉलेजने केलेल्या अभ्यासात 73 कमी BMI असलेल्या भारतीय पुरुषांची चाचणी झाली. त्यापैकी 20 जणांना MRDM आढळला. हे निष्कर्ष "An Atypical Form of Diabetes Among Individuals With Low BMI" या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आले.

फोटो स्रोत, Professor Peter Schwarz/Linkedin
'कमी BMI असणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारा डायबिटीसचा विशिष्ट प्रकार' या नावाचं संशोधन 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलं. या संशोधनासाठी कमी BMI असणाऱ्या, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गामधल्या 73 भारतीय पुरुषांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी 20 जणांना कुपोषणाशी संबंधित मधुमेह असल्याचं आढळलं.
वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या एंडोक्रिनोलॉजी, डायबिटीस आणि मेटाबॉलिझम डिपार्टमेंटचे वरिष्ठ प्राध्यापक निहाल थॉमस, न्यूयॉर्कमधल्या अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनच्या प्राध्यापक मेरिडिथ हॉकिन्स आणि या क्षेत्रातल्या इतर तज्ज्ञांचा या संशोधनात सहभाग होता.
टाईप-5 बद्दल संशोधन का गरजेचं?
डॉ. फेलिक्स जेबराज यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं, " सामान्यतः अशा (बारीक) लोकांना मधुमेह होत नाही, असा समज आहे. पण त्यांना डायबिटीस होतो. अशा रुग्णांना टाईप-1 किंवा टाईप-2 चे उपचार दिले तर ते घातक ठरू शकतं. आताच्या काळात लोक फक्त सिद्ध झालेले उपचारच घेतात. म्हणूनच डॉक्टर्स आणि जनतेमध्ये टाईप-5 डायबिटीस विषयी जागरूकता निर्माण करणं आणि त्यावर विशिष्ट उपचारपद्धती विकसित करणं ही काळाची गरज आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











