You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अल्ट्रा प्रोसेस्ड फूड'चा अकाली मृत्यूशी किती संबंध? नवीन संशोधनातून समोर आली माहिती
- Author, फिलिपा रॉक्सबी
- Role, आरोग्य प्रतिनिधी
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यू येण्याचा धोका जास्त असतो, असं ब्रिटन आणि अमेरिकेसह आठ देशांमध्ये केेलेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे.
प्रकिया केलेल्या खाद्यपदार्थांची काही उदाहरणं म्हणजे बंद पाकिटातलं मांस, बिस्किटं, फेसाळ शीतपेयं, आईसक्रीम आणि सकाळी नाष्ट्यासाठी खाल्ली जाणारी धान्यापासून बनलेली, दुधासोबत खातो ती सिरियल्स.
अलिकडच्या काळात जगभरात या खाद्यपदार्थांचा वापर वाढलेला दिसतो.
या खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात जास्तीची साखर आणि रसायनांचा वापर केलेला असतो.
त्यामुळेच या खाद्यपदार्थांचं आपल्याला व्यसन लागतं. आपल्या रोजच्या घरी बनवलेल्या जेवणात एवढी साखर आणि केमिकल्स नसतात.
प्रक्रिया केलेलं अन्न शरीरासाठी धोकादायक असतं हे तर सर्वश्रुत आहेच. पण ते नेमकं का? याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्याचं तज्ञ सांगतात.
कदाचित त्यावर प्रक्रिया केली आहे म्हणून नाही तर या अन्नपदार्थांमध्ये चरबीचं, मीठाचं आणि साखरेचं प्रमाण फार जास्त असतं म्हणून त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असावा, असं काही तज्ञांना वाटतं.
कृत्रिम घटक
'अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेन्टेटिव्ह मेडिसीन' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातल्या संशोधकांनी अतिप्रक्रियायुक्त अन्नावर याआधी झालेल्या काही संशोधनांचा आढावा घेतला.
प्रक्रिया केलेल्या अन्नाचा अकाली मृत्यूशी काय संबंध आहे हे शोधणं त्यांचं उद्दिष्ट होतं.
पण प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे लवकर मृत्यू ओढावू शकतो याबाबत त्यांना काही ठोस पुरावे मिळाले नाहीत.
याचं कारण, एखादा माणूस प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ किती प्रमाणात खातो याचा त्याच्या एकूण जेवणाशी, व्यायामाशी, जीवनशैलीशी आणि राहणीमानाशीही संबंध असतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम आरोग्यावर होत असतो.
ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चिले, कोलंबिया, मॅक्सिको, ब्रिटन आणि अमेरिका अशा आठ देशांत करण्यात आलेल्या लोकांच्या जेवणाच्या सवयींबद्दलच्या सर्वेक्षाणाचा आणि त्यातून मिळालेल्या आकडेवारीचा आढावा या अभ्यासात घेतला होता.
या अहवालानुसार, इंग्लड आणि अमेरिकेत अतिप्रक्रियायुक्त अन्नातून लोकांना दिवसातल्या अर्ध्याहून जास्त कॅलरीज मिळतात. तिथं जवळपास 14 टक्के अकाली मृत्यू या अन्नामुळे होणाऱ्या नुकसानीशी संबंधित असू शकतात.
तर, कोलंबिया आणि ब्राझीलसारख्या देशात अतिप्रक्रियायुक्त अन्न फार कमी प्रमाणात खाल्लं जातं. एकूण कॅलरीजपैकी 20 टक्क्यांपेक्षाही कमी कॅलरीज लोक अतिप्रक्रिया केलेल्या अन्नातून मिळवतात. तिथे या अन्नाचा साधारणपणे 4 टक्के अकाली मृत्यूंशी संबंध असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं.
या अभ्यासातले प्रमुख संशोधक होते ब्राझीलचे एडुआर्डो निलसन. त्यांच्या मते, "अन्नावर केलेल्या औद्योगिक प्रक्रियेमुळे त्यात बरेच बदल होतात. त्यात रंग, कृत्रिम चव आणि साखरेसारख्या गोड चव आणणारे पदार्थ, इमल्सिफायर्स आणि इतर अनेक रसायनं वापरली जातात. ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात."
त्यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये अमेरिकेत अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाशी संबंधित 1,24,000 अकाली मृत्यू झाले होते. तर ब्रिटिनमध्ये जवळपास 18,000.
या अभ्यासात म्हटलं आहे की देशातल्या सरकारने आहारविषयीची मार्गदर्शकं काढून लोकांना अशा अतिप्रक्रियायुक्त अन्नाचं सेवन कमी करण्याचा सल्ला द्यायला हवा.
पण अनारोग्य आणि प्रक्रिया केलेलं अन्न यातला सहसंबंध स्पष्ट करणारा कोणताही ठोस पुरावा नसल्याचं ब्रिटन सरकारमधल्या पोषणावर काम करणाऱ्या तज्ज्ञ समितीने नुकतंच जाहीर केलंय.
अतिप्रक्रिया केलेलं अन्न म्हणजे नेमकं काय याची एक व्याख्या मान्य केले गेलेली नाही. पण नोव्हा क्लासिफिकेशनने सांगितलेली व्याख्या सर्वाधिक वापरली जाते.
अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाची काही उदाहरणं म्हणजे,
- केक, पेस्ट्री आणि बिस्किट्स
- चिप्स
- बाजारात मिळणारे ब्रेड
- पॅकेटबंद मांस, बर्गर्स
- लगेच करता येणारं पाकिटातलं सूप, नुडल्स आणि गोड पदार्थ
- पॅकेटमधलं चिकन
- पॅकेटबंद मासे
- फळांचं दही आणि फळांपासून बनलेली इतर पेयं
- वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आणि स्प्रेड्स
- लहान बाळांसाठी येणारं अन्न
अनुत्तरित प्रश्न
या अभ्यासातली आकडेवारी ही लोकांच्या आरोग्यावर अतिप्रक्रियायुक्त अन्नामुळे होणाऱ्या परिणामांचं संगणकीय विश्लेषण करून काढण्यात आली आहे.
ओपन युनिव्हर्सिटीतले अप्लाईड स्टॅटिस्टिक्समधले निवृत्त प्राध्यापक प्रोफेसर केविन मॅककॉन्क्वे म्हणतात की, या अभ्यासात बरीच गणिती गृहितकं वापरण्यात आली आहेत. त्यामुळं या निष्कर्षांचा अर्थ लावताना सावधगिरी बाळगायला हवी.
"अतिप्रक्रिया केलेले कोणतेही अन्नपदार्थ खाणं आरोग्यासाठी धोकादायक असतं की, त्यातल्या काही विशिष्ट गोष्टींमुळे त्रास होऊ शकतो हे अजून स्पष्ट नाही."
"या सर्वाचा अर्थ असा होतो की, फक्त एका अभ्यासातून हे निश्चितपणे सांगता येत नाही की, जे लोक वेगवेगळ्या प्रमाणात अतिप्रक्रियायुक्त अन्न खातात, त्यांच्यातल्या मृत्यूदरातला फरक खरोखरच हे अन्न खाल्ल्यामुळे होतो की, इतर कारणांमुळे."
"अशा प्रकारच्या कोणत्याही अभ्यासातून तुम्ही अजूनही नक्की सांगू शकत नाही की नेमकी कोणती गोष्ट कोणता परिणाम घडवते."
ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतले अन्न आणि स्थुलता या विषयातील तज्ज्ञ डॉ. नेर्यस अस्टबरी यांनीही संशोधनाला मर्यादा असल्याचं म्हटलंय.
उर्जा, चरबी आणि साखर जास्त असणारे पदार्थ टाईप टू डायबेटिस, स्थुलता, हृदयाचे आजार आणि कॅन्सर सारख्या विकारांना आमंत्रण देतात हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळेच अकाली मृत्यू येऊ शकतो.
"अतिप्रक्रिया केलेल्या अनेक खाद्यपदार्थांत हे घटक जास्त असतात," त्या म्हणतात.
अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाचे वाईट परिणाम हे त्यातल्या चरबी आणि साखरेच्या जास्त प्रमाणामुळे होतात की आणखी कशामुळे हे अजून कोणत्याही अभ्यासातून सिद्ध झालेलं नाही, असंही त्या सांगत होत्या.
अशा पद्धतीच्या संशोधनातून अतिप्रक्रिया केलेलं अन्न घातक असतं हे सिद्ध होत नाही, असं कॅम्ब्रिज युनिवर्सिटीचे डॉ. स्टिफन बर्जीस सांगतात.
एखादा शारीरिकदृष्ट्या किती धडधाकट नसणं हे आरोग्यावर मोठा परिणाम करतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
पण वेगवेगळ्या देशांत झालेली संशोधनं अतिप्रक्रियायुक्त अन्नाकडे बोट दाखवतात तेव्हा त्यात काहीतरी असलं पाहिजे असं डॉ. बर्जीसही मान्य करतात.
"आरोग्य बिघडवण्यात अतिप्रक्रियायुक्त अन्नाचा भाग असला पाहिजे. बाजुला उभं राहून बघत नुसतं निरीक्षण करणारा घटक म्हणून त्याला गृहीत धरता येणार नाही."
या अन्नाचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांच्या 'फूड अँड ड्रिंक फेडरेशन' या संघटनेच्या म्हणण्यानुसार, याला अतिप्रक्रियायुक्त अन्न असा शब्द वापरल्याने खरंतर शरीरासाठी चांगले असणारे दही, पास्ता सॉस किंवा ब्रेड असे पदार्थही बदनाम होतात.
उत्पादकांकडून वापरले जाणारे सगळे घटक हे अन्न सुरक्षा प्राधिकरणासारख्या सरकारी विभागाकडूनच मंजूर करून घेतलेले असतात. परवानगी देताना ते खाण्या-पिण्यासाठी योग्य आहेत याचीही खात्री करूनच घेतलेली असते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)