महागड्या फोनची दिली कॅश ऑन डिलिव्हरीनं ऑर्डर; 90 हजारांसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या

फोटो स्रोत, Getty Images
लखनौमध्ये महागड्या मोबाईल फोनची डिलिव्हरी करणाऱ्या फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लखनौच्या चिनहट स्टेशन परिसरातील ही घटना आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
एनएनआयनुसार लखनौच्या पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी), शशांक सिंह यांनी सांगितलं की आरोपींनी डिलिव्हरी बॉयला घरात बोलावून लॅपटॉपच्या चार्जरच्या केबलद्वारे त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॅगेत भरून कालव्यात फेकून दिला.
भरतचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
मृत व्यक्तीचं नाव भरत कुमार असून महागड्या मोबाईल फोनची कॅश ऑन डिलिव्हरी (COD) पर्यायाद्वारे ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाने ही हत्या केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
पोलिस उपायुक्त शशांक सिंह म्हणाले, "आम्ही आरोपी आकाश शर्मा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीनं सांगितलं की तो आणि त्याचा मित्र गजानन शर्मा यांनी हिमांशु नावाच्या त्यांच्या दुसऱ्या मित्राच्या फोनवरून दोन महागड्या फोनची फ्लिपकार्टवर ऑर्डर दिली होती."
कॅश ऑन डिलिव्हरी आणि हत्या
शशांक सिंह पुढे म्हणाले, "ऑर्डर देण्यात आलेल्या दोन फोनपैकी एक फोन Vivo V40 Pro होता तर दुसरा फोन Google Pixel 7 Pro होता. या दोन्ही महागड्या फोनची एकत्रित किंमत 90 हजार रुपये होती. कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायाद्वारे ही ऑर्डर देण्यात आली होती."
त्यांनी सांगितलं, "मात्र ऑर्डर दिल्यानंतर आरोपींनी फोनचे पैसे न चुकवता फोन ठेवून घेण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे डिलिव्हरी बॉय भरत कुमार मोबाईल फोनची डिलिव्हरी करण्यासाठी येताच आरोपींनी त्याला घरात बोलावलं आणि लॅपटॉपच्या चार्जरच्या केबलद्वारे गळा आवळून त्याची हत्या केली."
"त्यानंतर फ्लिपकार्टच्या बॅगेत मृतदेह कोंबून त्यांनी तो एका कालव्यामध्ये फेकून दिला. आरोपी आकाश शर्माला अटक करण्यात आली असून त्यानं गुन्ह्याची कबूली दिली आहे."
पोलिस उपायुक्त शशांक सिंह म्हणाले की, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

फोटो स्रोत, ANI
एएनआयनुसार, शशांक सिंह यांनी पुढे सांगितलं की "भरत कुमार हा फ्लिपकार्टचा डिलिव्हरी एजंट बेपत्ता झाल्याची तक्रार फ्लिपकार्टचे प्रतिनिधी आदर्श कोशथा यांनी 26 सप्टेंबरला चिनहट पोलीस ठाण्यात नोंदवली होती."
"त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता भरत कुमारने केलेला प्रवास, त्याचं शेवटचं लोकेशन, त्याने डिलिव्हरी केलेलं सामान आणि शिल्लक राहिलेल्या डिलिव्हरी या सर्व गोष्टी संशयास्पद असल्याचं आढळून आलं. त्यानंतर आम्ही पुढील तपास करण्यास सुरूवात केली."
ते पुढे म्हणाले की भरतचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
मृतदेहाचा शोध सुरू
पोलीस उपायुक्त शशांक सिंह यांनी पुढे सांगितलं की, "ऑर्डर देण्यात आलेले दोन फोन आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. मृतदेहाचा शोध घेतला जातो आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पाणबुड्यांच्या आम्ही संपर्कात आहोत."
"गजानन शर्माला देखील लवकरच अटक केली जाईल. भरतची मोटरसायकल देखील ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपी आकाश आणि गजानन दोघेही चिनहट परिसरात राहतात. आकाश सुतारकाम करतो तर गजानन प्लायवुडची कामं सांभाळतो. ते दोघेही चांगले मित्र आहेत."


शशांक सिंह यांनी पुढे सांगितलं की हत्या केल्यानंतर गजानननं भरतच्या उरलेल्या ऑर्डरची डिलिव्हरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्यांच्याबद्दल कोणालाही संशय येऊ नये.
भरतचा भाऊ प्रेम कुमार यांनी त्यांच्या भावाची हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आली आहे.
प्रेम कुमार म्हणाले, "माझी एकच मागणी आहे ती म्हणजे पोलिसांनी आरोपींना अशी शिक्षा करावी की जेणेकरून त्यातून त्यांना धडा मिळेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











