You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहारमध्ये स्तनदा मातांच्या दुधात युरेनियमचे अंश कुठून आले? काय म्हणाले तज्ज्ञ?
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बिहारमधून एक चिंताजनक घटना समोर आली आहे. बिहारच्या सहा जिल्ह्यांमधील स्तनदा मातांच्या दुधात (ब्रेस्ट मिल्क) युरेनियम आढळून आलं आहे.
17 ते 35 वयोगटातील 40 महिलांच्या दुधावर करण्यात आलेल्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली असून, त्यामुळे संशोधक आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे.
युरेनियम हा एक किरणोत्सर्ग करणारा धातू आहे, ज्याचं रासायनिक चिन्ह हे इंग्रजीतील 'U' अक्षर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार पाण्यात युरेनियमची कमाल मर्यादा प्रति लिटर 30 मायक्रोग्रॅम असावी. यापेक्षा जास्त युरेनियम असेल तर ते शरीरातील मूत्रपिंडाचं (किडनी) सर्वाधिक नुकसान करू शकतं.
हे संशोधन पाटणा येथील महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूट, दिल्ली एम्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयपीइआर, वैशाली) या पाच संस्थांच्या मदतीने करण्यात आलं आहे.
ऑक्टोबर 2021 ते जुलै 2024 दरम्यान झालेल्या या संशोधनात थेट स्तनदा मातांकडून दूध घेतलं गेलं. म्हणजेच आधीपासून साठवून ठेवलेलं दूध घेण्यात आलं नव्हतं.
संशोधन कसं झालं?
बिहारमधील भोजपूर, समस्तीपूर, बेगुसराय, खगडिया, कटिहार आणि नालंदा या सहा जिल्ह्यांमध्ये हा अभ्यास करण्यात आला.
प्रत्येक गटात एका महिलेला ठेवण्यात आलं. थेट त्या महिलांच्या दुधाचे नमुने घेता यावेत यासाठी असं करण्यात आलं.
महिलांच्या दुधाचे नमुने एनआयपीइआर, वैशाली येथे तपासले गेले. नमुन्यांची तपासणी करण्यासाठी एलसी-आयसीपी-एमएस नावाची मशीन वापरण्यात आली. ही मशीन द्रवातील जड धातू शोधण्यासाठी खूप प्रभावी आहे.
संशोधनात महिलांच्या दुधात युरेनियमचे प्रमाण 0 ते 5.25 मायक्रोग्रॅम प्रति लिटर असल्याचे आढळून आलं आहे.
कटिहार जिल्ह्यातील एका महिलेमध्ये 5.25 मायक्रोग्रॅम इतकं सर्वाधिक युरेनियम आढळून आलं. तर सर्वात कमी भोजपूरच्या महिलांमध्ये मिळाले.
सरासरी पातळी पाहता, नालंद्यातील महिलांमध्ये सर्वात कमी 2.35 मायक्रोग्रॅम आहे, तर खगडियातील महिलांमध्ये 4.035 मायक्रोग्रॅम युरेनियम आढळून आले.
या अभ्यासात आईचे दूध पिणाऱ्या 35 मुलांचेही नमुने घेण्यात आले होते.
यातील 70 टक्के मुलांच्या रक्तातही युरेनियम आढळलं. संशोधनात या मुलांना नॉन-कार्सिनोजेनिक आरोग्य धोका (कर्करोग नाही परंतु धोका आरोग्याचा धोका आहे) वाढण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.
नॉन-कार्सिनोजेनिक मूत्रपिंड, मज्जासंस्था आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
आईच्या दुधासाठी (ब्रेस्ट मिल्क) मानकं आहेत का?
मनीषा सिंह या महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या संचालक आणि ऑन्कोलॉजीच्या मेडिकल हेड आहेत.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "सर्वप्रथम, घाबरण्याची काही गरज नाही. आईचे दूध मुलासाठी सर्वोत्तम असतं, त्यामुळे आईने आपलं दूध मुलाला पाजत राहिलं पाहिजे."
युरेनियमच्या बाबतीत, पाण्यासाठी कमाल मर्यादा ठरलेली आहे. परंतु, आईच्या दुधासाठी कोणतीही मर्यादा नाही. तरीही, जर दुधात युरेनियम आढळलं असेल, तर ती चिंता करण्यासारखी बाब आहे.
कॅन्सर इन्स्टिट्यूट आता या भागातील पिण्याच्या पाण्याचीही तपासणी करत आहे, या सहा जिल्ह्यांतील पाण्यातील युरेनियमची स्थिती कळण्यासाठी ही तपासणी केली जात आहे.
महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूटला आता हे संशोधन मोठ्या प्रमाणावर करायचं आहे.
संस्थेचे संचालक एल. बी. सिंह म्हणतात, "आम्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरोग्य मंत्री मंगल पांडे यांना भेटून या तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढवायची आहे.
"कारण आतापर्यंत झालेल्या तपासणीतील नमुने खूप थोडे आहेत. कॅन्सर इन्स्टिट्यूट चालवतानाच्या आमच्या अनुभवानुसार, कोणताही आजार जितक्या लवकर आढळेल, तितकं चांगलं असतं."
बिहारमधील 11 आणि देशातील 151 जिल्ह्यांमध्ये युरेनियम
वेगवेगळ्या अभ्यासात बिहारच्या 11 जिल्ह्यांच्या भूजलामध्ये (ग्राउंडवॉटर) युरेनियम आढळून आलं आहे.
हे जिल्हे म्हणजे गोपालगंज, सिवान, सारण, पूर्व चंपारण, पाटणा, वैशाली, नवादा, नालंदा, सुपौल, कटिहार आणि भागलपूर आहेत.
आईच्या दूधाशी संबंधित अभ्यास भोजपूर, समस्तीपूर, बेगुसराय, खगडिया, कटिहार आणि नालंदा जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे.
महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मेडिकल रिसर्च हेड आणि पाण्याच्या अभ्यासाशी संबंधित अशोक कुमार घोष यांनी बीबीसीशी चर्चा केली.
ते सांगतात की , "बिहारमध्ये पाण्याच्या संशोधनात आर्सेनिक, फ्लोराइड, मॅगनीज, क्रोमियम, मर्क्युरी (पारा) आणि युरेनियम आढळून आले आहेत. यात सर्वात जास्त प्रमाण आर्सेनिकचे आहे. राज्याजवळ पाण्याचे मुबलक स्रोत आहेत, पण लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणं हे एक मोठं आव्हान आहे."
आईच्या दुधात युरेनियम कुठून आलं असेल? या प्रश्नावर अशोक कुमार घोष म्हणतात, "हे पिण्याच्या पाण्यातून किंवा त्या जिल्ह्यात पिकवलेल्या धान्यामुळे, म्हणजेच फूड चेनद्वारे आलं असण्याची खूप शक्यता आहे."
पुढे ते सांगतात, "युरेनियममुळे दोन प्रकारच्या समस्या होऊ शकतात. नॉन-कार्सिनोजेनिक आणि कार्सिनोजेनिक. नॉन-कार्सिनोजेनिकमुळे मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेचे आजार होऊ शकतात, तर कार्सिनोजेनिकमुळे कॅन्सरसुद्धा होऊ शकतो."
भूजल गुणवत्ता अहवाल 2024
मार्च 2025 मध्ये केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्र्यांनी संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना बिहारमधील फक्त एका जिल्ह्याचे पाणी युरेनियमने प्रभावित असल्याचं सांगितलं होतं.
भूजल गुणवत्ता अहवाल (ग्राउंडवॉटर क्वालिटी रिपोर्ट) 2024 नुसार, बिहारमध्ये नायट्रेट चाचणीसाठी 808 नमुने घेतले गेले.
त्यापैकी 2.35 टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेट 45 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त आढळून आले. यामुळे राज्यातील 15 जिल्हे बाधित होते.
तसंच, फ्लोराइड तपासण्यासाठीही 808 नमुने घेतले गेले. त्यापैकी 4.58 टक्के नमुन्यांमध्ये फ्लोराइडची मात्रा 1.5 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त होती आणि यामुळे 6 जिल्हे प्रभावित होते.
आर्सेनिकबद्दल सांगायचं झाल्यास, 607 नमुन्यांपैकी 11.9 टक्के नमुन्यांमध्ये आर्सेनिक 10 पीपीबीपेक्षा (पार्ट पर बिलियन/भाग प्रति अब्ज) जास्त आढळले आणि यामुळे 20 जिल्हे प्रभावित होते.
युरेनियम तपासण्यासाठी 752 नमुने घेतले गेले. त्यापैकी फक्त 0.1 टक्के नमुन्यांमध्ये युरेनियम 30 पीपीबीपेक्षा जास्त आढळून आले. यामुळे फक्त एक जिल्हा प्रभावित होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.