You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनपापडी : दिवाळीत चर्चेत असणाऱ्या या मिठाईचा इतिहास काय? ती आली तरी कुठून?
- Author, शुभ राणा
- Role, बीबीसी हिंदी
दिवाळी म्हटलं की घराघरात फराळाची रेलचेल असते. एकमेकांच्या घरी मिठाई आणि शुभेच्छांची देवाण-घेवाण होते. या सर्वांत एक कायम असणारी एक गोष्ट म्हणजे 'सोनपापडी'.
या मिठाईला तुम्ही कितीही नावं ठेवा, कितीही मिम्स बनवा किंवा ट्रोल करा, सोनपापडी आणि दिवाळी या कॉम्बिनेशनकडे तुम्ही कानाडोळा करूच शकत नाही.
'दिवाळी आणि सोनपापडी'ची ही जोडी आताही कायम आहे. सोनपापडी पाहून काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं तर काहींचा चेहरा पडतो.
सोनपापडी आवडो किंवा न आवडो, दिवाळी आली की सोनपापडी तुमच्या घरी येणारचं, हे मात्र नक्की.
बेसन, तूप आणि साखरेपासून तयार होणारी ही मिठाई संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. सोनपापडीला देशभरात सोहन पापडी, पतिसा, शोनपापडी, सुनपापडी किंवा शोमपापडी म्हणूनही ओळखलं जातं. पण ही मिठाई नेमकी आली कुठून? तिचा इतिहास काय?
बीबीसीने या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भारतीय खाद्य समीक्षक पुष्पेश पंत आणि खाद्यसंस्कृतीच्या इतिहासावर संशोधन करणारे चिन्मय दामले यांच्याशी संवाद साधला.
'सोनपापडी केवळ दिवाळीपुरती मर्यादित नाही'
सोनपापडी ही फक्त दिवाळीचीच मिठाई आहे का? तर असं नाही.
भारतीय खाद्य संस्कृतीचे जानकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) निवृत्त प्राध्यापक पुष्पेश पंत याबाबत माहिती देतात.
ते म्हणाले की, "सोनपापडी फक्त दिवाळीपुरतं मर्यादित नाही. ही मिठाई आपल्याला वर्षभर सगळीकडे सहज उपलब्ध असते.
तुम्हाला सोनपापडीचे पॅकेट शेजारच्या दुकानांपासून ते विमानतळ आणि रेल्वे स्थानकांपर्यंत सहज आढळून येतील."
पंत पुढे सांगतात, "सोहन पापडीमध्ये दूध नसते. ती बेसन आणि साखरेपासून बनवली जाते, त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत टिकते.
म्हणूनच अनेक मोठे ब्रँड्स सोनपापडी देशोदेशी निर्यात करतात. मोतीचूर लाडू किंवा काजू कतलीप्रमाणेच ही देखील 'प्रत्येक कार्यक्रमातील मिठाई' आहे."
खाद्यपरंपरांवर संशोधन करणारे चिन्मय दामले सांगतात की, "सोनपापडी इतर मिठाईंच्या तुलनेत स्वस्त असते आणि मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते, म्हणूनच दिवाळीसह इतर उत्सवातही सर्वाधिक वाटली जाते. त्यामुळेच लोक 'घराघरातली मिठाई' म्हणून तिची थट्टाही करतात."
पतिसापासून सोनपापडीपर्यंतचा प्रवास
पुष्पेश पंत यांच्या मते, या मिठाईचं मूळ पंजाबमध्ये आहे आणि ती पतिसा या मिठाईशी संबंधित आहे.
प्राध्यापक पंत सांगतात, "पतिसा बनवणं काही सोपं काम नव्हतं. जुन्या पंजाबी घरांमधली ही एक आठवणंच आहे. साखरेच्या पाकाला वारंवार फेटून ताणून बारीक रेशा तयार केल्या जातात. हाच रेशेदार पोत सोनपापडीला वैशिष्ट्यपूर्ण बनवतो.
ते पुढे सांगतात, "तुम्हाला आपल्या लहानपणी खाल्लेले 'बुढ्ढी चे बाल' (कॉटन कँडी) किंवा गजक आठवतच असेल. या मिठाईमागचं तंत्रही अगदी तसंच आहे. पूर्वी हे सर्व हाताने बनवलं जायचं, पण आता मशिनमुळे काम सोपं झालं आहे."
पंत सांगतात, "पंजाबमध्ये बेसन लाडूंसोबत पतिसा बनवला जायचा, आणि नंतर तोच हळूहळू सोनपापडीत रूपांतरित झाला. मात्र, दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे रेशेदार पोत आणि साखरेची गोडी."
पंत यांच्या मते, "सर्व काही बाहेरून भारतात आलं असं नाही. तर, अनेक गोष्टी अविभाजित भारतात आधीपासूनच अस्तित्वात होत्या."
सोनपापडीचं परदेशी नातं
चिन्मय दामले याबाबत बोलताना सांगतात, "सोहनपापडीचं मूळ पर्शियन मिठाई 'पश्मक' मध्ये आहे. 'पश्मक' म्हणजे 'लोकरसारखं', लोकरीचा धागा जसा बारिक धाग्यांपासून तयार झालेला एक नरम धागा असतो, अगंदी तसंच सोनपापडीच्याही बाबतीत आहे. ती देखील अनेक रेषांनी तयार झालेली मिठाई आहे.
19 व्या शतकात पर्शियन व्यापारी मुंबईच्या गल्लीबोळात पश्मक विकत असत. एस.एम. एडवर्ड्स यांच्या 'बाय-वेज ऑफ बॉम्बे' या पुस्तकात याचा उल्लेख आहे. पश्मकमध्ये साखर, सुका मेवा, पिस्ता आणि वेलचीचा सुगंध असायचा."
दामले 'सोहन' शब्दाचा संबंध संस्कृतमधील 'शोभन' (सुंदर) याच्याशी जोडतात. याबाबत दामले म्हणाले, "मिर्झा गालिब यांच्या एका पत्रात त्यांनी बाजरीच्या हलव्याचा उल्लेख केला आहे, त्यात 'सोहन' शब्दाचा उल्लेखही आढळतो."
चिन्मय दामले सोनपापडीचा संबंध पर्शियन सोहन हलव्याशी असण्याची शक्यता देखील सुचवतात. ही मिठाई पर्शिया आणि तुर्किस्तानमार्गे भारतात आली असावी, असं त्यांना वाटतं.
सोहन हलवा आणि सोहनपापडी यात काय फरक?
दामले सांगतात, "सोहन हलवा गव्हापासून बनतो आणि घट्ट असतो, तर सोहनपापडी बेसनापासून तयार होते आणि रेशेदार असते.
18व्या शतकात अवधमध्ये सोहन पापडी बनवायला सुरुवात झाली. आणि ती चार प्रकारच्या 'सोहन मिठाईंपैकी' एक मानली जायची. 20 व्या शतकापर्यंत बिहार आणि बंगालमध्ये, विशेषतः बक्सरमध्ये ती प्रसिद्ध झाली."
दामले यांनी आणखी एका गोड पदार्थाचा उल्लेख केला, ज्याचं नाव आहे सौंध हलवा. हा पदार्थ 18 व्या शतकात नायजेरियातून रामपूरपर्यंत पोहोचला. मात्र, हा पदार्थ सोनपापडीपेक्षा वेगळा होता, असं ते सांगतात.
दिवाळी, सोनपापडी आणि मीम्स
दिवाळीच्या काळात सर्वात जास्त मीम्समध्ये येणारी मिठाई म्हणजे सोनपापडी. सोनपापडीवरून अनेक मजेशीर मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
ऑफिसमध्ये दिवाळीच्या बोनससह मिळणारी, घरात जास्त आलीये म्हणून पाहुण्यांकडे, ओळखी-पाळखीच्यांकडे पुढे ढकलण्यात येणारी मिठाई म्हणूनही ती ओळखली जाते. इतकी थट्टा-मस्करी होऊनही तिचं महत्व आणि गोडवा मात्र कायम आहे.
दामले सांगतात, "सोनपापडी मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते. ती स्वस्त असते आणि दुधाशिवाय बनल्याने जास्त काळ टिकते. म्हणूनच लोक दिवाळीत सोनपापडी उदारपणे वाटतात.
जवळजवळ प्रत्येक घरात सोनपापडीचा एक डबा तर पोहोचतोच, आणि त्यामुळेच की काय लोक 'दिवाळीचं ठरलेलं गिफ्ट' म्हणून तिची थट्टाही करतात."
सोनपापडीची कथा दोन संस्कृतींना जोडते. पुष्पेश पंत हे तिचा संबंध भारतातील पंजाबच्या पतीसाशी जोडतात, तर चिन्मय दामले तिचं नातं पर्शियातील पश्मक मिठाईशी असल्याचं सांगतात.
मात्र, हे सांगत असतानाच ते दोघेही एका गोष्टीवर सहमत होतात. ती म्हणजे, 'सोनपापडीचे बारीक रेशे आणि तोंडात विरघळणारी चव हीच तिची खरी ओळख आहे.'
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.