वंशावळ समितीला मिळाली मुदतवाढ, पण वंशावळ म्हणजे काय? ती कशी काढतात?

मराठा आंदोलन

फोटो स्रोत, Alpesh Karkare

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारने वंशावळ समितीचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आंदोलकांच्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 25 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती.

या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आला होता.

मनोज जरांगे

फोटो स्रोत, Sharad Badhe

फोटो कॅप्शन, मनोज जरांगे

यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ 30 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

सदर समितीस 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

पण, वंशावळ म्हणजे काय? ती कशी काढतात? तिचे फायदे काय आहेत, जाणून घेऊया.

वंशावळ म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते.

आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात.

आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो.

यालाच इंग्रजीत फॅमिली ट्री असं संबोधलं जातं.

वंशावळ कशी काढतात?

वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.

आधी खापर पणजोबा, मग पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.

ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते.

निजामकालीन नोंदी शोधण्याचं काम महसूल विभाग करत आहे.

फोटो स्रोत, lahu pawar

फोटो कॅप्शन, निजामकालीन नोंदी शोधण्याचं काम महसूल विभाग करत आहे.

समजा मला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे, तर मी शोध घेणार की, माझ्या पणजोबाच्या नावासमोर कुणबी आहे.

याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये आढळतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते. तिथं कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास मिळतो.

याशिवाय, जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळतो. आजोबा शिकलेले असेल आणि त्यांनी जातीची नोंद केलेली असेल तर तिथंही नोंद आढळते.

वंशावळ कशासाठी लागते?

आताच्या जन्म नोंदींसमोर नावासमोर जात लिहिली जात नाही. फक्त आडनाव लिहिलं जातं.

पण कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जातीचं प्रमाणपत्र काढावं लागतं. त्यासाठी जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो. कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावासमोर जातीचाच उललेख केलेला असायचा.

याशिवाय, जात पडताळणीसाठीही वंशावळ लागते.

वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची?

वंशावळ काढण्याची जबाबदारी ही अर्जदाराची स्वत:ची असते.

जुने अभिलेख

फोटो स्रोत, lahu pawar

फोटो कॅप्शन, जुने अभिलेख

वंशावळ स्वयंघोषित असते. म्हणजे अर्जदारानं स्वत:हून वंशावळ लिहायची असते.

वंशावळीसाठी कुठेही अर्ज वगैरे करायची गरज नसते.

एखाद्याची कुणबी नोंद सापडल्यास इतरांना फायदा?

एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींपैकी कुणाचं कुणबी नोंद आढळल्यास त्याच्या पुढच्या पिढ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं.

याचा अर्थ एखाद्या भागात एकाची कुणबी नोंद सापडली म्हणजे त्या भागातल्या सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा होत नाही.

यासाठी प्रत्येकाला स्वतंत्रपणे कुटुंबाचा इतिहास तपासून त्यासंबंधीची कागदपत्रं सबमिट करावे लागतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)