कृत्रिम हिरा अमेरिकाः हिरे उद्योग करणार देश गतिमान

भारताच्या डायमंड इंडस्ट्रीमध्ये मागील सात वर्षांपासून काम करणारा चिंतन सुहागिया फक्त 26 वर्षांचा आहे.

डायमंड पॉलिशिंगची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातच्या सूरत शहरात चिंतनची कंपनी आहे.

या सात वर्षांच्या अनुभवात चिंतनला हिऱ्यांचं परीक्षण कसं करायचं हे समजलं. आणि आज तो काही खास उपकरणांच्या मदतीने हिऱ्यांची गुणवत्ता तपासतो.

हिरे उद्योगातील मोठ्या बदलांनी चिंतनचं करियरच बदललं. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्याने जे जे हिरे टेस्ट केले होते ते सगळे नॅचरल होते. म्हणजेच हे हिरे खाणींमधून काढण्यात आले होते.

पण आता तो मशीन्समधून बनवलेल्या हिऱ्यांचा व्यापार करतो. हिऱ्यांच्या इंडस्ट्रीमध्ये दहा वर्षांपूर्वी हे काम होत नव्हतं. पण आज टेक्नॉलॉजीच्या मदतीमुळे हे काम सोपं झालंय.

हे काम आहे लॅबमध्ये हिरे बनविण्याचं. हे आर्टिफिशियल हिरे नॅचरल हिऱ्यांइतकेच चमकदार असतात. त्यामुळे हिऱ्यांचं काम करण्याऱ्या तज्ञांना देखील हे हिरे बारकाईने तपासावे लागतात.

चिंतन सुहागिया सांगतो, "लॅबमध्ये तयार झालेले हिरे आणि नैसर्गिक हिरे, यांत उघड्या डोळ्यांनी फरक करता येणं शक्यच नाही."

तो पुढे सांगतो, "लॅबमध्ये तयार झालेल्या हिऱ्यांमध्ये आणि नैसर्गिक हिऱ्यांमध्ये इतकं साम्य होतं की, लॅबमध्ये टेस्टिंग केल्यानंतरही कोणते हिरे खरे आहेत असा संभ्रम तयार झाला. हिरा लॅबमध्येच तयार झाला आहे याची खात्री करण्यासाठी आम्हाला दोनदा टेस्ट करावी लागली."

लॅबमध्ये हिरे कसे तयार होतात?

नैसर्गिक हिरे हे पृथ्वीच्या गर्भात खोलवर उष्णता आणि दाबाखाली तयार होतात. पण हे हिरे पृथ्वीच्या गर्भाबाहेर तयार करण्यासाठी 1950 पासून शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी दोन प्रकारच्या तंत्रांचा वापर होतो.

हाय प्रेशर टेम्परेचर सिस्टममध्ये हिऱ्याच्या बीजाभोवती शुद्ध ग्रेफाइट ठेवलं जातं आणि त्याला सुमारे 1500 सेल्सिअस तापमानात ठेऊन त्यावर 1.5 मिलियन पौंड प्रति चौरस इंच इतका दबाव तयार केला जातो.

दुसऱ्या प्रक्रियेला केमिकल व्हेपर डिपॉजिशन म्हणतात. या प्रक्रियेत हिऱ्याचं बीज कार्बनयुक्त वायूने भरलेल्या सीलबंद चेंबरमध्ये ठेऊन त्याला सुमारे 800 डिग्री सेल्सियस पर्यंत गरम केलं जातं. या प्रक्रियेत वायू हिऱ्याभोवती चिकटतो आणि अणूंच्या मदतीने हिऱ्याची निर्मिती होते.

या दोन्ही टेक्निक 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात समोर आल्या. पण यात नेमके बदल घडले ते मागच्या दहा वर्षात. या टेक्नोलॉजीच्या मदतीने लॅबमध्ये योग्य किमतीत चांगल्या दर्जाचे हिरे बनवता येतात आणि ते दागिन्यांमध्ये वापरता येतात.

बॅन अँड कंपनीच्या नॅचरल रिसोर्सेस प्रॅक्टिसच्या झुरिच स्थित पार्टनर ओला लिंडे म्हणतात, "सुरुवातीच्या काळात हे खूप अवघड होतं कारण याच्या मशिन्स कमी होत्या. शिवाय खूप कमी शास्त्रज्ञ या मशीनचा वापर करू शकत होते. पण मागच्या सात वर्षात हिऱ्यांच्या बाजारात याची संख्या वाढली आहे. या कामात मोठी गती दिसून आली आहे."

लिंडे सांगतात, लॅब मध्ये तयार होणाऱ्या हिऱ्यांची किंमत दर चार वर्षांनी निम्मी होते.

म्हणजे लॅब मध्ये बनवलेले हिरे स्वस्त आहेत का?

साधारणपणे साखरपुडा आणि लग्नाच्या अंगठ्यांमध्ये वापरला जाणारा बारीक आकाराचा हिरा लॅब मध्ये तयार केल्यास त्याची किंमत नैसर्गिक हिऱ्याच्या 20 टक्के इतकीच असते.

अशाप्रकारे हिऱ्यांच्या किमतीत घट झाल्याने नवउद्योजक या उद्योगाकडे आकर्षित झाले.

स्नेहल डुंगरणी या भंडारी लॅब ग्रोवन डायमंड्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 2013 मध्ये त्यांनी या उद्योगाची सुरुवात केली. त्यांची कंपनी हिरे बनवण्यासाठी केमिकल व्हेपर डिपोजिशन टेक्निकचा वापर करते.

त्या सांगतात, "आम्ही अणुंचा वापर करून हिऱ्याची निर्मिती करण्यास सक्षम आहोत. यामुळे खाणकामाची गरज पडत नाही. आणि शिवाय हे हिरे पर्यावरण पूरक देखील आहेत."

आता भारतात लॅबमध्ये हिरे बनवण्याच्या व्यवसायाला गती मिळावी आणि भारत या उद्योगातील मोठा प्लेअर म्हणून समोर यावा अशी सरकारची इच्छा आहे.

हिरे उद्योगात भारताने फार पूर्वीपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एका अंदाजानुसार, जगातील दहापैकी नऊ हिरे सुरतमध्ये पॉलिश केले जातात.

भारतातील बाजारपेठ

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते, भारत दरवर्षी लॅबमध्ये सुमारे 30 लाख हिऱ्यांचे उत्पादन करतो. आणि हे उत्पादन जागतिक उत्पादनाच्या 15 टक्के आहे. या बाबतीत चीन हाही मोठा उत्पादक देश आहे.

या क्षेत्राला चालना देण्याच्या प्रयत्नात भारत सरकारने जानेवारी महिन्यात हिऱ्यांच्या बीज आयातीवरील करात पाच टक्क्यांची सूट दिली. यासोबतच हिऱ्यांच्या बीज उत्पादनाचे तंत्र भारतातच विकसित करण्यासाठी मदत जाहीर करण्यात आली.

वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव विपुल बन्सल म्हणतात, "जसं जसं जग समृद्धीच्या दिशेने जाईल तसं हिऱ्यांची मागणी वाढेल."

कट आणि पॉलिश हिऱ्यांच्या उत्पादनात 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेली हरी कृष्णा एक्सपोर्ट्स ही भारतातील आघाडीची हिरे उत्पादक कंपनी आहे.

याचे सर्वेसर्वा असलेल्या घनश्याम भाई ढोलकिया यांनी याचवर्षी लॅबमध्ये हिरे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी लावलेल्या अंदाजाप्रमाणे, "पुढील तीन ते चार वर्षात लॅबमध्ये तयार झालेल्या हिऱ्यांची मागणी वाढणार आहे."

भारताला तयार व्हायला आणखीन किती वेळ लागेल?

पण हा नवा उद्योग त्याच्या पारंपारिक हिरे व्यवसायातील बाजारपेठेला काबीज करू शकेल का?

यावर ढोलकिया म्हणतात, "नैसर्गिक आणि लॅबमध्ये तयार झालेले हिरे वेगवेगळ्या ग्राहक वर्गाची मागणी पूरी करतात. आणि ही मागणी दोन्ही बाजूला आहे."

ते पुढे सांगतात की, "लॅबमध्ये हिरे बनवण्याच्या तंत्रज्ञानामुळे एक नवा ग्राहक वर्ग निर्माण झाला आहे. भारतात ज्यांच्याकडे पैसा कमी आहे ते लोक किंवा मध्यमवर्गीय लोक लॅब मध्ये तयार केलेले हिरे विकत घेतील."

मात्र, भारतात या उद्योगाला उभारी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. भारतात लॅबमध्ये तयार केलेले बहुतेक हिरे अमेरिकेला विकले जातात.

लॅब ग्रोन डायमंड अँड ज्वेलरी प्रमोशनचे अध्यक्ष शशिकांत डालीचंद शाह सांगतात, भारताची बाजारपेठ अजून यासाठी तयार नाहीये. एक काऊन्सिलर या नात्याने आम्ही लॅबमध्ये तयार झालेल्या हिऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शन आणि कार्यक्रम भरवतो आहोत. येत्या चार वर्षात हा उद्योग भारतात फोफावेल.

डालीचंद शाह हे डायमंड ट्रेडिंग कंपनी नाईन डायमचे देखील अध्यक्ष आहेत. ही कंपनी त्यांच्या आजोबांनी स्थापन केली होती. लॅबमध्ये तयार केलेल्या हिऱ्यांचं आणि नैसर्गिकरित्या उत्खनन केलेल्या हिऱ्यांचं बाजारात वेगळं स्थान असेल याच्याशी ते सहमत आहेत.

ते म्हणतात, "लॅबमध्ये तयार केलेला हिरा हा एक कृत्रिम हिरा असतो. त्यामुळे ज्याला हिऱ्याची जाण आहे तो नेहमीच नैसर्गिकरित्या तयार झालेला हिरा खरेदी करतो."

शाह पुढे म्हणतात की, नॅचरल हिऱ्यांच्या बाजारातील कमतरतेमुळे त्यांना नेहमीच मोठी मागणी असेल.

ते सांगतात, "लॅबमध्ये तयार केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांना पुन्हा किंमत येत नाही. तेच नॅचरल हिऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत किंमत मिळते."

रोजगार निर्माण करणारी इंडस्ट्री

लॅबमध्ये तयार केलेले हिरे ज्वेलरी डिझायनर्सना आणखीन उपयोगी पडू शकतात.

लिंडे म्हणतात, "नॅचरल हिरे इतके महाग असतात की तुम्हाला ते नेहमीच हवे असतात. पण लॅबमध्ये तयार करण्यात येणारे हिरे तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये तयार करता येतात.

"आम्ही असेही दागिने पाहिलेत ज्यात हिरे आणखीन चमकावे यासाठी त्याला छिद्र पाडली जातात."

डेन्मार्कचे पेंडोरा ज्वेलर्स हे जगातील सर्वात मोठे ज्वेलर्स आहेत. ते देखील आता लॅबमध्ये तयार झालेल्या हिऱ्यांच्या दिशेने वळत आहेत. 2021 मध्ये उचललेल्या या पावलाविषयी सांगताना कंपनीचे सीईओ म्हणाले की, यामुळे

हिऱ्यांचा बाजार वाढेल. आणि व्यवसाय देखील पर्यावरणपूरक असेल.

दुसरीकडे सुरतमध्ये काम करणारा चिंतन सुहागिया त्याच्या कामात खुश आहे. या क्षेत्रात आणखीन लोक येतील असं त्याला वाटतं.

तो म्हणतो, "लॅबमध्ये तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल. या इंडस्ट्रीला लगाम घालता येणार नाही."

हे वाचलंत का?